Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 03 July, 2021
Published by: अग्रोवन

सकाळची कोवळी हवा अंगावर मोरपीस फिरवतेय. सर्व गाड्या एका लयीत चालताहेत. बॅंकॉक अब दूर नही, असं वाटतंय. गुळगुळीत थाई रस्त्यावर, सलग दोन तास कशी गाडी चालवली, हे कळलंच नाही. रस्त्याच्या कडेला चहानाश्ता मारला. त्या हॉटेलजवळ हत्ती आणि घोड्याचे मोठे पुतळे ठेवलेले होते. मग काय, पोलादी घोड्यांवरील स्वारांनी, त्यांच्यासोबत फोटोसेशन आटोपलं. हॉटेल मालकही या फोटोसेशनमध्ये उत्साहाने सहभागी झाला. फोटोसेशन आटोपून पुढे निघालो.
थायलंडची राजधानी अब दूर नही, असं म्हणत असतांनाच समोर एक बोर्ड दिसला आणि गुळगुळीत रस्त्यावर आम्ही आश्चर्याने उडालोच. तो बोर्डच होताच तसा. तुमच्या कुतूहलाची दोरी जास्त न ताणता सांगतो. बोर्ड सांगत होता ‘आयुथायाकडे!’ हो! ‘अयुथाया’ म्हणजेच थायलंडमधील रामाची ‘अयोध्या!’ जशी आपल्याकडे अयोध्या आहे, तशी थाईलंडमध्ये त्यांची ‘आयुथाया’ आहे. इथं भेट द्यायचा प्लॅन तर अगोदरच ठरला होता, पण हा योग इतक्या अनपेक्षितपणे येईल, असं वाटलं नव्हतं. उजवं वळण घेतलं. हायवे सोडला आणि आयुथायाच्या रस्त्याला लागलो. अवघ्या 15-20 मिनिटांत प्रभु श्रीरामचंद्राच्या परदेशी आयोध्येत पोहोचलो.

आयुथाया म्हणजेच अयोध्या हे थायलंडमधील पौराणिक शहर आहे. दक्षिणपूर्वेकडील देशांत, खासकरुन थायलंड, म्यानमार, कंबोडीया, लाओस, इंडोनेशिया, मलेशीया व फिलीपिन्स च्या पौराणीक ग्रंथांमध्ये आणि नृत्यामध्ये रामायणाचा मोठा प्रभाव पहायला मिळतो. रामाला इकडे वेगवेगळ्या नावाने संबोधतात. कंबोडीयातील पौराणिक ग्रंथात रामाला ‘फेरेह रीअम’, लाओसमध्ये ‘फ्रा राम’, मलेशियात ‘सेरी रामा’, म्यानमारमध्ये ‘यामा’ तर थायलंडमध्ये ‘रामा’ नावाने संबोधले गेले आहे. याव्यतिरिक्त इंडोनेशीया आणि फिलीपीन्सच्या पौराणिक ग्रंथामध्ये रामायण आहेच. या देशांमध्ये रामायणावर नाटकं बसवली जातात. थायलंडमध्ये तर प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकात ‘रामाकेन’ म्हणजे रामायणाचा समावेश आहे. दक्षिणपूर्व आशियायी देशातील रामायणावर आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव साजरा केला जातो. त्यात, त्या त्या देशातील कलाकार, आपल्या देशातील पौराणीक रामायणाच्या कथेवर नृत्य सादर करतात.

या शहराला इ.स. 850 मध्ये खेमेर साम्राज्यातील राजांनी आयुथाया हे नाव दिलं. आयुथायावर रामायनाचा संपूर्ण प्रभाव आहे. 15 व्या शतकात आयुथाया ने सुकोथाई सारख्या भक्कम राजधान्यांना हरवून, एक बलशाली शहराचा दर्जा मिळवला. रामायणाचा प्रभाव आयुथायामध्ये 13 व्या शतकात वाढला. पूर्वी इथं जुनं रामायण होत. पण 1767 च्या युद्धात जुननं रामायण नष्ट झाललं. मात्र राजा रामा-१ आणि त्याचा मुलगा रामा-२ ने नष्ट झालेले साहित्य नव्याने लिहून घेतललं. तेच रामायण आता थायलंडच्या प्राथमिक शाळेत शिकवलं जातंय. ‘रामाकेन’ हे थायलंडचचं राष्ट्रीय काव्य सुद्धा आहे. येथील काही लोक प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म याच आयोध्येत झाला होता असंही मानतात. पण त्यामागील सत्य थाई रामाचं जाणे.
‘आयुथाया’ ने बरेच भूराजकीय स्थित्यंतरे पहिली. बर्मीज, खमेर, सियामी राजांच्या राजवटी अनुभवल्या. हिंदू संस्कृतीपासून बौद्ध धर्मापर्यंतचे बदल पहिले, अंगिकारले. इथं संपूर्ण शहर व्यवस्थित जपून ठेवलाय. सगळीकडे स्वच्छता आहे. जुन्या काळात बर्मीज आक्रमणानंतर झालेल्या मूर्तिभंजनाचे पुरावे पाहायला मिळतात.

या थाई रामाच्या आयुथाया चा थायलंड च्या शेती आणि शेतकऱ्याच्या विकासात मोठा वाटा आहे. जुन्या चिनी म्हणीनुसार ‘जर तुम्ही एका वर्षासाठी नियोजन करत असाल तर भात लावा, दहा वर्षासाठी नियोजन करत असाल तर झाडं लावा आणि आयुष्यभरासाठी प्लांनिंग करत असाल तर लोकांना शिकवा’ आयुथयाच्या शासकांनी यातल्या दोन्ही गोष्टी केल्या. लोकांच्या आयुष्यभराच्या कल्याणासाठी त्यांना शिकवलं, चांगले संस्कार लोकांमध्ये रुजवले. त्याचबरोबर एक मोठा प्रश्न त्यांनी सोडवला. जास्त पावसाचा प्रदेश असल्याने इथंली जमीन बऱ्यापैकी पाण्याखाली असायची. त्यामुळे पिकं घेणं कठीण होऊन बसायचं. पण हा प्रश्न त्यांनी तरंगणाऱ्या भाताची जात शोधून सोडवला. काय? तरंगणारा भात? हो! १३व्या आणि १५व्या शतकात थायलंड च्या शेतीत मोठे संशोधनं झाली. पारंपरिक भाताच्या लागवडीला टांग देत त्यांनी बारीक, ग्लुटेनविरहित भाताचा नवीन वाण शोधून काढला. याभातजातीचा उगम भारतातून झाला होता. आयुथाया प्रदेशात अतिवृष्टी मुळे सखल भागात कायम पाणी साचायचं. नद्या पुराने फुगून शेताचा ताबा घ्यायच्या. हा भाताचा वाण, पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या शेतात, आपल्या पाण्यात तग धरून राहण्याच्या गुणधर्मामुळे टिकला. म्हणूनच याला ‘फ्लोटिंग राईस’ म्हणजे ‘तरंगणारी भातशेती’ असं म्हणतात. भारतात प्रभूरामचंद्राच्या सेतूत, दगडं तरंगली होती, पण थाई रामाच्या अयोध्येत भातशेती तरंगवली होती.

या तरंगणाऱ्या भातामुळे आयुथाया मध्ये तांदळाचं उत्पन्न वाढलं. समुद्रकाठावर वसलेल्या या प्राचीन राजधानीमुळे निर्यातीला फायदा झाला. वेगवेगळ्या भागातून कालवे खोदून नद्यांना आणि पर्यायाने समुद्राला जोडले गेले. त्यातून हा तांदूळ जहाजापर्यंत आणला गेला. आणि या जास्तीच्या तांदळाने चीन, युरोप सारख्या देशात निर्याती साठी प्रवास सुरु केला. आजही थायलंड हा भारतानंतर, जगातला दुसऱ्या नंबरचा भातनिर्यातक देश आहे. १५व्या आणि १७व्या शतकात परदेशी व्यापारी आयु थाया च्या बंदरात आपल्या जहाजाचा नांगर टाकू लागले. भाताच्या बदल्यात किमती सामान आणि हत्यारं विकु लागले. शहराची भरभराट झाली. त्याकाळच्या सर्वात मोठ्या शहरात त्याची गणना होऊ लागली. निर्यातीमुळे लोकांच्या हातात पैसे खेळू लागले. अशा प्रकारे तरंगणाऱ्या शेतीने, स्वतः पाण्यात राहून, थाई शेतकऱ्याची नाव काठाला लावली होती.
पूर्वी हाताने चालवता येणारा नांगर वापरला जायचा. शेतात रेड्याचा वापर व्हावयाच. पण लोकं सध्या ट्रॅक्टर वापरतात. रासायनिक खताचा भरपूर वापर आहे. त्यामुळे कीडरोग वाढलेत. पाण्यात बुडलेल्या भाताच्या मुळात नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी दडून बसलाय, त्याच्या नियंत्रणासाठी मुळात औषध टाकणे कठीण असल्याने आंतरप्रवाही औषधावर भर दिला जातोय. भाताच्या पानाखोडाला विषारी बनवत ते मूळात दडून बसलेल्या सूत्रकृमींचा गेम करायला निघालय. सूत्रकृमींचा गेम कराच्या नादात भात खाणाऱ्यांचा गेम होऊ देऊ नको अशी थाई प्रभुरामचंद्राला विनंती करत बाईक ला किक मारली.
उत्तम लिखाणातून , नवीन उत्तम माहिती मिळाली.