drsatilalpatil Agrowon Article फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)

फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)

फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१) post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 04 July , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

आज जर आपण शेतीऔषधांच्या दुकानात गेलो, तर कीटकनाशकांपेक्षा टॉनिक, झाईम, स्प्रेडर, स्टिकर यासारख्या, मसाला प्रॉडक्टच्या रंगीबेरंगी, चमचमत्या, बाटल्यांनी दुकान भरल्याचे दिसते. कीडरोग नियंत्रणात मेन हिरो, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक हे आहेत. पण त्यापेक्षा या इतर सहकलाकार प्रॉडक्टची गर्दी, शेतीऔषधात का झाली? त्यांची उपयुक्तता काय? ते खरंच आवश्यक आहेत का? यासारख्या डोकं कुरतडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करूयात.

या सहकलाकार उत्पादनांना स्प्रे-ऍडजुवंट असं म्हणतात. मराठीत आपण त्याचं फवारा-सहाय्यक असं नामकरण करूया. या फवारा-सहाय्यकांचा वापर शेतीरासायनांची उपयुक्तता वाढवण्यासाठी केला जातो. ‘म्हंजे नक्की काय वं?’ हा प्रश्न तंबाखु चोळताचोळता काहींच्या डोक्यात पडला असेल. तर सोप्या भाषेत ‘स्प्रे-ऍडजुवंट’ समजून घेऊया. वेगवेगळ्या रासायनिक गुणधर्माची कीटकनाशके बाजारात येतात. त्यात काही तेलकट असतात, काही पाण्यात मिसळणारी, काही पेट्रोलियम पदार्थावर आधारित, तर काही विरघडणाऱ्या पावडर स्वरूपातील. अश्या नानाविध गुणधर्माच्या कीटकनाशकाला वापरण्यासाठी मात्र आपल्याकडे एकच पद्धत आहे, ती म्हणजे, पाण्यात मिसळून फवारणे किंवा पिकाच्या मुळात ओतणे. मग या वेगवेगळ्या गुणधर्माच्या रसायनांना, पाण्यात एकत्र नंदवण्यासाठी आणि पिकाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळऊन देण्यासाठी, फवारा-सहाय्यक वापरले जातात.

जवळपास दोनतीन डझन प्रकारचे फवारा-सहाय्यक जगभरात वापरले जातात. ते स्वतः कीड मारत नाहीत, पण कीटकनाशकाला, त्याचं काम करायला मदत करतात. फवारा-सहाय्यका मुळे फवाऱ्याच्या पाण्याचे गुणधर्म बदलतात. कधी तो, कीटकनाशकाला झाडावर एकसमान पसरवतो, कधी फवारा पानाला चिकटवून ठेवतो, तर कधी त्याचा बिघडलेला सामू सुधारतो. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळात राजा शिकारीला निघायचा. शिकार राजाच्या बाणानेच व्हायची, पण डझनभर सहाय्यक, हाकारे, त्याच्या सोबतीला असायचे. त्यांच्या मदतीने राजा शिकारीचं श्रेय घ्यायचा. तसंच हा फवारा-सहाय्यक, किड्याची शिकार करायला, कीटकनाशकाला मदत करतो. मग यात मोठा कोण, किंवा शिकार कोणाची, हा श्रेयवाद नको. शिकार फत्ते होण्यात जेवढा राजा महत्वाचा, तेवढेच त्याचे सहकारीही महत्वाचे. त्याचप्रमाणे कीडनियंत्रणांत जेवढे कीटकनाशक महत्वाचे, तेवढेच फवारा-सहाय्यकही महत्वाचे.

आपल्याकडे कंपनीचे साहेब लोकं येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची, टेक्निकल इंग्रजी नावांचा गोळीबार सुरु करतात. बऱ्याचदा या नावांचा अर्थ आपल्याला माहित नसतो (आणि कधीकधी साहेबालाही). या फवारा-सहाय्यकाचे प्रकार किती आहेत? केंव्हा, कुठले प्रॉडक्ट वापरावे? साहेब लोकं सुचवत असलेल्या प्रॉडक्टची आपल्याला गरज आहे का? या प्रश्नांचे उत्तरं आपल्याला ठाऊक हवीत. त्यामुळे अनावश्यक फवारे वाचतील आणि आवश्यक तेच, प्रॉडक्ट वापरून समस्याही सुटतील. पण जर डोक्यात या उत्तराचं वजन नसेल तर, अनावश्यक खर्चाने खिसा हलका व्हायला वेळ लागणार नाही. 

चला तर मग या फवारा-सहाय्यकाची माहिती जाणून घेऊया. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी, तिची वेगवेगळ्या भागात विभागणी करणे गरजेचे असते. या रसायनांचा गुंता सोडवण्यासाठी त्यांची विभागणी दोन पद्धतीने केलीय. पाहिलं म्हणजे त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार आणि दुसरं त्यांच्या उपयोगानुसार. रासायनिक पद्धतीने विभागणी केल्यास त्यांचे तीन प्रकार पडतात.  पहिला म्हणजे ‘कटआयोनिक’ म्हणजे ज्यावर ‘धन’ भार आहे तो. दुसरा ‘अनॉयोनिक’ म्हणजे ज्यावर ‘ऋण’ भार आहे तो, आणि तिसरा ‘नॉनआयोनिक, म्हणजे ज्यावर भारच नाही तो, म्हणजे ‘उदासीन’. पण या धन, ऋण, उदासीन भाराचा, जास्त भार घेऊ नका. सध्या ‘नॉनआयोनिक’ चा जमाना आहे ‘कटआयोनिक’ आणि ‘अनॉयोनिक’ या शर्यतीतून कधीच बाद झालेत.

फवारा-सहाय्यकाच्या उपयोगानुसार, त्यांना विभागायचे म्हटल्यावर, त्याची मोठी यादी होईल.  सध्या बाजारात स्प्रेडर म्हणजे पसरवणारे, स्टिकर म्हणजे चिकटवणारे, वेटिंग-एजंट म्हणजे पान ओले करणारे, पेनेट्रेन्ट म्हणजे पर्णभेदक, पीएच-बफर म्हणजे सामू नियंत्रक, ड्रिफ्ट-रिटार्डन्ट म्हणजे हवेच्या झोतापासून वाचवणारे, वॉशिंग एजन्ट म्हणजे धुणारे, कंपॅटीबिलिटी एजन्ट म्हणजे मिसळवणारे, स्टॅबिलाइसिंग एजन्ट म्हणजे स्थिर करणारे, डीफोमर म्हणजे फेस कमी करणारे, सॉईल पेनेट्रेन्ट म्हणजे जमीन भेदक, अँटीऑक्सिडंट, इमल्सिफायर असे एक ना अनेक प्रकारचे  फवारा-साहाय्यक वापरले जातात. ही यादी लांबवली तर मारुतीच्या शेपटासारखी लांबतच जाईल. या एवढ्या यादीतील नेमके कुठल्या फवारा-साहाय्यकाचे आपल्याला साहाय्य होईल हे ओळखणे आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या औषधाच्या यादीत, रोगावर लागू पडणारं, एखाद-दुसरं अँटीबायोटिक औषध असतं. पण त्याबरोबर ऍसिडिटी, टॉनिक, व्हिटॅमिन यांच्या गोळ्यांचा अतिरिक्त गोळीबार होतो. दुकानदाराला अँटिबायोटिकच्या गोळ्यात कमी फायदा असतो. मग तो फायदा ऍसिडिटी, टॉनिक, व्हिटॅमिन यासारख्या मसाला गोळ्यांनी भरून काढला जातो. डॉक्टर, मेडिकलवाला आणि कंपन्या सगळ्यांची चंगळ. अगदी याच न्यायाने, कीटकनाशक, एखाद दुसरंच असतं, मग स्प्रेडर, स्टिकर, झाईम, टॉनिक यांचा मसाला मारला जातो. चार आण्याच्या कीटकनाशकासाठी बारा आण्याचे फवारा-सहाय्यक वापरले जातात. स्प्रेडर, स्टिकर यासारख्या उत्पादनांची गरज शेतीत निश्चितच आहे, पण ती आवश्यकता असल्यावरच आणि आवश्यक तेवढीच वापरली जावीत ही अपेक्षा. 

या फवारा-सहाय्यकांचे जसे फायदे आहेत, तसेच योग्य प्रमाणात न वापरल्यास तोटेही आहेत. ते ही समजून घेणे आवश्यक आहे. बाजारातल्या चढाओढीत, फवारा-सहाय्यकाच्या लेबलवर, कमीत कमी डोस लिहण्याची प्रथा सध्या पडलीये. बऱ्याचदा हा डोस खरंच प्रभावशाली आहे का याची चाचणीसुद्धा झालेली नसते. लेबल सुटेबल नसल्यामुळे, गरजेपेक्षा कमी औषध वापरले जाते. मग त्याचा आवश्यक परिणाम मिळत नाही. पिकाला बोलता येत नसल्याने, ‘तेरी भी चूप’ या न्यायाने हे प्रकरण निकाली निघते. काही वेळा जास्त फवारा-सहाय्यक वापरले जाते. मात्र या अती डोसमुळे पिकाची माती होऊ शकते. काही फवारा-सहाय्यकामुळे मधमाश्यांसारखे उपयुक्त मित्रकीटक मरू शकतात. म्हणून प्रॉडक्ट निवडतांना योग्य निवडावे. ते सेंद्रिय शेतीत वापरासाठी प्रमाणित असेल तर ‘सोने पे सुहागा’च. पण भारतात सध्या तशी उत्पादने फार कमी आहेत. 

अश्या या साईड ऍक्टर ‘फवारा-सहाय्यकां’चा संपूर्ण इतिहास, भूगोल, आपण येत्या काही लेखात समजून घेऊया.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

3 thoughts on “फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)”

 1. This is interesting. Common farmers must be knowing these pesticide assistants. However it’s new to me.
  Waiting for next part of this article.
  Thanks
  Sushant
  7588514221

 2. Nice article ..

  I always read ur article published in Agrowon.

  Really new and informative article series on agriculture in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

‘फूल’ बनवणारं मलेशियन ‘फुल’‘फूल’ बनवणारं मलेशियन ‘फुल’

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थंडगार हवेत लपेटलेली मलेशियन सकाळ. सीटवर पहुडलेल्या साखरझोपेतल्या दवबिंदूंना दूर सारत, बाईकवर मांड

राखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्सराखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्स

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 02 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ कंबोडियाची अमेरिकेबरोबरच्या युद्धात झालेली फरफट आणि त्यानंतर त्यांचा भूमिपुत्र ‘पोल पॉट’ ने दिलेला

भाग-५: अ-विश्वासभाग-५: अ-विश्वास

भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे  रावसाहेबांना