Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 13 March, 2020
Published by: अग्रोवन

म्यानमारच्या खेड्यापाड्यातून मी फिरत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला लुंगीवाले लोक फिरताना दिसत होते. गैरसमज करून घेऊ नका, म्यानमारचा राष्ट्रीय पोशाख लुंगी आहे. तामिळनाडूसारख्या पांढऱ्याशुभ्र लुंग्या नसतात इकडे. राजाबाबू सारख्या चांगल्या भडक, रंगीबेरंगी, चट्ट्यापट्ट्याच्या नक्षीदार लुंग्या नेसून लोक सगळीकडे फिरत असतात. ऑफिसमध्ये आणि लग्नसमारंभात सुद्धा त्यांचा हा लुंगीडान्स सुरू असतो.

आताशा बाईक आणि बाईकर दोघांच्या पोटात म्यानमारी कावळे पोटतिडकीने ओरडायला लागलेत. शेवटी रस्त्याच्या कडेला थांबलो. मस्तपैकी गावरान जेवणावर ताव मारला. बिल देऊन रेस्टाॕरंटबाहेर येऊन पाहतो तर काय? एका टपरीवजा दुकानाशेजारी आठ दहा लुंगीधारींचा घोळका दिसला. आगाऊ कुतूहल शांत बसू देत नव्हतं. पुढे जाऊन काय भानगड आहे हे पाहिल्यावर, एका फळकुट्यावर ४०-५० पानं मांडून ठेवली होती. दोन विडामग्न बायका पानावर सुपारीचे भलेमोठे तुकडे ठेवून भराभर विडे बांधत गिऱ्हाइकाच्या हातात ठेवत होत्या. विचारपूस केल्यावर या देशातील पाणशौकाची गोष्ट समजली आणि रस्त्यात दिसलेल्या जागोजागी, भिंतीभिंतीवर सजलेल्या लालेलाल नक्षीची उकल झाली.
म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात पान खाण्याचा रिवाज आहे. त्यामुळे पानमळ्यांची आणि सुपारीच्या मळ्यांची संख्याही बरीच आहे. मोठ्या प्रमाणात पान-सुपारी पिकवणारे शेतकरी इथं आहेत. दक्षिण म्यानमारमध्ये त्यांची संख्या जास्त आहे.
जगभरात विड्याच्या पानाच्या सुमारे १०० जाती आहेत. पानाचा आकार, जाडी, चव आणि कडवटपणा यावर त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्यानमारी पान भलंमोठं, गर्द हिरवं आणि जाडजूड असतं. हृदयाच्या आकाराच्या या पानाने जगभरातील लोकांची हृदयं जिंकलीयेत. परदेशातून याला चांगली मागणी असते. दरवर्षी करोडो रुपयांची पानं फक्त युरोपात निर्यात केली जातात. उत्तम प्रतीची पाने निर्यात करून गोऱ्या साहेबाच्या तोंडाला पाने न पुसता येथील शेतकरी घसघशीत युरो पदरात पाडून घेतो.

येथील पानमळ्यांचा आकार तसा अंमळ लहानच. अगदी काही स्क्वेअर फूटपासून ते अर्ध्या एकरापर्यंतचं क्षेत्र. मान्सूनच्या आधी शेत तयार करायचं. शेतात नारळाच्या झावळ्या आणि बांबू रोवून कारल्या-दोडक्यासारखा मांडव घालायचा, आणि मग रोपांमध्ये दोन फुटांचं अंतर ठेवून निरोगी रोपांची लागवड करायची. प्रत्येक वेलीला एका बांबूचा आधार द्यायचा. प्रखर सूर्यापासून संरक्षण, योग्य पाणी आणि खत मिळालं की मग हा पानवेलू आपल्या आधारस्तंभाला पकडून आकाशाकडील प्रवासाला जोमात सुरुवात करतो. उन्हाळ्यात बागेची जरा जास्त काळजी घ्यावी लागते. साधारणतः एका वर्षांनी ही मांडवातील पाणवधू वयात येते. आणि शेतकऱ्याचा उत्पन्नाचा स्रोत सुरू होतो. सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीसारखा पुढे वर्षानुवर्षे हा पानमळा सोबत करतो.
इथल्या पानमळ्यात किडीचा-अळीचा तसा जास्त त्रास नाहीये. म्यानमारी अळ्यांमध्ये पानसुपारीचं व्यसन नसावं कदाचित, म्हणूनच ते या पानाला तोंड लावत नाहीत. असो. पण पानमळ्यात आर्द्रता जास्त असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. जसे सुंदर चंद्रावर डाग आहेत तसेच या सुकुमार पानवेलीवर फ्युजॅरियम बुरशीचे डाग येतात. मूळकूज, खोडकूज आणि पानावरील डाग हे या फ्युजॅरियम बुरशी रोगाची लक्षणं. सुरुवातीला पिवळा असणारा वाटोळा डाग हळूहळू काळा पडायला लागतो आणि शेवटी संपूर्ण पानाचं वाटोळं करतो. पण इथं ‘दाग अच्छे है’ असं म्हणून चालत नाही. लगेच बुरशीनाशकांचे डबे उघडले जातात

म्यानमारमध्ये बरेच वर्षे मिलिटरी राज होते. त्यामुळे बाहेरील देशाचा हस्तक्षेप तसा कमीच होता. त्यामुळे का असेना इथली जंगलं टिकली. शासन आधुनिक शेतीचा अजेंडा जोरात राबवतंय. या रेट्यात इथला शेतकरीही रूप पालटतोय. जंगलाचा लचका तोडून रबर, पाम, पानमळे यासारखी पिकं वाढलेत. जुनी राजधानी रंगून जवळ पानमळ्यांची शेती जास्त रंगलीय. पण ‘ताऊन्गु’ या ठिकाणी म्यानमारमधलं सर्वांत चांगल्या प्रतीचं पान पिकवलं जात. हे ठिकाण पानाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच “पान प्रेमी.. ताऊन्गु च्या वाटेला” अशी म्हण इथं प्रसिद्ध आहे.
भारतासह संपूर्ण दक्षिण आशियायी देशात पानाचा तोबरा भरला जातो, पण खरे पानाचे शौकिन म्यानमारीच असं मी म्हणेन. अगदी सण, समारंभापासून तर लग्नकार्यापर्यंत यांचं विड्याच्या पानाशिवाय पान हालत नाही.
म्यानमारी भाषेत पानाला ‘क्वऊन – या’ असं म्हणतात. इथं जागोजागी पानाच्या टपऱ्या दिसतात. आपल्याकडे पानवाला भैया असतो तर इकडे बहुतांश ठिकाणी पानवाली बहेना असते. ‘विडा घ्या हो नारायणा हे पद आळवत’ या म्यानमारी लक्ष्म्या टपऱ्या -टपऱ्यांवर उभ्या असतात. हिरव्याकंच बदामी पानावर पांढरंशुभ्र चुन्याचं लोणी आणि कात लावून, त्यावर सुपारीचे तुकडे, काही सुगंधी पदार्थ, आणि खास गिऱ्हाइकाला तंबाखू टाकून विडा बनवला जातो. मग तो लुंगीधारी पाणवीर, देश रंगवायचा विडा उचलत त्याला तोंडात कोंबतो. हिरव्यांच्या पार्टीतील पान, पांढऱ्या चुण्यासोबत आणि विटकरी कातासोबत युती करून लालभडक राजमार्गावर प्रवासासाठी तयार होतो. निसर्गाने कर्बयुक्त अन्न पचवायला दिलेल्या लाळेसोबत विड्याला घोळवत ही तांबूल पिकदाणी फुल भरतो. अगदी बोलतानासुद्धा हा पानार्क तोंडाच्या टाकीतून ओघळणार नाही ह्याची काळजी घेत लहान बाळागत बोबडं बोलत गप्पा मारत असतो. ही रसभरित चर्चा, तोंड मुखरसभरित होईपर्यंत चालते. शेवट टाकी ओव्हरफ्लो व्हायच्या बेतात आल्यावर मुखरसाची लाल पिंक मिळेल त्या जागेवर टाकून मोकळा होतो. म्यानमारमध्ये हे पानसडे सर्वत्र दिसतात. आपली ही मॉडर्न-आर्ट चितारत हे अज्ञात चित्रकार सर्वत्र फिरत असतात. पानाने लाल झालेले दात दाखवणारे लोक इथं जागोजागी दिसतात.
पानसुपारी खाण्याची प्रथा ऐतिहासिक आहे. इथं पानाशिवाय लोकांचं पान हालत नाही. प्रत्येक घरात पानाचा डब्बा असतो. त्याला इथं ‘कुन-इट’ असं म्हणतात. जसं आपल्याकडे पाहुण्याला चहापाणी केलं जातं, तसं इथं ग्रीन टी आणि पानाचा विडा देऊन ‘चहा-पान’ करतात. लहान पोरं गोड पान खातात पण मोठे मात्र वेलची, लवंग आणि तंबाखूयुक्त पान पसंद करतात. पान, सुपारी आणि लाफेट (चहाच्या पानाचं लोणचं) या इथल्या संस्कृतीतल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लग्न झाल्यावर नववधू आपल्याबरोबर नक्षीदार पानाचा डबा नेते. इथं अजून एक विचित्र जुनी प्रथा आहे, ती अशी की शत्रूला मारण्याआधी त्याला पान आणि पाणी हवंय का? असं उपहासाने विचारलं जात.


अशा या सेलिब्रिटी पानाने मात्र माणसाच्या आरोग्याला पानं पुसलीयेत. या देशातील ४०% माणसं आणि २०% बायकांना पानसुपारीचं व्यसन आहे. २००७ च्या सर्वेनुसार सर्वसामान्य रोगांच्या यादीत तोंडाच्या कॅन्सरचा नंबर माणसांमध्ये ६ वा आणि बायकांमध्ये १० वा आहे. कॅन्सरच्या पेशंटमध्ये पानसुपारी खाणाऱ्यांचं प्रमाण आहे तब्बल ३६%. वेगवेगळ्या संशोधनात समोर आलंय की पानसुपारीमुळे तोंडाच्या कॅन्सरची शक्यता ९ टक्क्यांनी वाढते. २००९ मध्ये १० देशातील शास्त्रज्ञांनी एकत्र केलेल्या संशोधनांती सिद्ध केलं की बिना तम्बाखूच्या पानानेसुद्धा कॅन्सर होऊ शकतो. शासनाने बरेच प्रयत्न करूनदेखील हे व्यसन कमी होत नाही. याच्या जोडीला गुटखादेखील आहे. गुटख्यातला ‘ट’ सायलेंट केला तरी त्याची तल्लफ आणि आकर्षण कमी होणार नाही इतकं हे व्यसन निर्ढावलंय.

म्यानमारी पानाची चव चाखून पाहावी म्हणून एक बिनसुपारीचा विडा घेतला आणि देश रंगवणार नाही अशी प्रतिज्ञा करत तोंडात कोंबला. तोंडात तुंबलेला विडा आणि डोक्यात तुंबलेले विचार घेऊन बाईकला किक मारली.
सतीश जी , मस्त जमलाय हा लेख-विडा ! खुसखुशीत
आणि एका टप्प्यात वाचून होतो . Look forward for more !
बिना तम्बाखूच्या पानाने सुध्दा कॅन्सर होतो.
हे १० देशातील शास्त्रज्ञांनी संशोधन केल्यामुळे
पान खाण्याची भिंती वाटू लागली.
बिना तम्बाखूचे पान खाल्ल्याने सुध्दा कॅन्सर होतो.
हे १० देशातील शास्त्रज्ञांनी संशोधन केल्यामुळे,
पान खाण्याची भिंती वाटू लागली.
खुपच सुंदर माहीती सतिश..वर्णन तर इतके छान की मनाने अक्षरश: म्यानमारला पोहोचलो….
Myanmaracha ferfataka sahaj Marun aale .Khupach oghavati bhasha likhanachi ,sunder lekh.
Bina tambakuchya panane pan cancer hoto,he first time clear sale.