drsatilalpatil Agrowon Article थायलंडचे साखर सम्राट

थायलंडचे साखर सम्राट

थायलंडचे साखर सम्राट post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 26 Jun , 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

थाकसिन विद्यापीठातील चर्चा आता रंगलीय. अजून एक गरमागरम ‘ग्रीन टी’ चा कप समोर आला. प्राध्यापक महोदयांनी माझ्या चहाच्या कपात एक साखरेचा चौकोन टाकत, अजून साखर हवीय का? अश्या बारीक प्रश्नार्थक नजरेनरेने पाहिलं. मी ‘अजून नकोय, धन्यवाद’ असा सस्मित नकार दिला. मग त्यांनी आपल्या कपात चांगले तीन साखरी चौकोन टाकले, चमच्याच्या रवीने, खळखळ आवाज करत त्याला ढवळलं. या साखरी चहामुळे थायलंडमधील साखरशेतीचे प्रश्न डोक्यात उकळू लागले आणि आमची गाडी तिकडे वळली. 

थायलंडमधील पहिला साखर कारखाना १९३८ मध्ये लामपांग प्रभागात उभा राहिला आणि खऱ्या अर्थाने साखर उत्पादन सुरु झाले. सध्या थायलंड जगातला दुसऱ्या नंबरचा निर्यातदार आहे. पहिल्या नंबरवर अर्थातच ब्राझील आहे. ‘ऊस आणि साखर बोर्ड’ हे सरकारी खातं, थायलंडमधील साखरेसंबंधी सर्वेसर्वा आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार साधारणतः ९ कोटी टन उसाचं उत्पन्न होतं. त्यातून ९० लाख टन साखर बनते. थायलंड १.१ कोटी टन साखर निर्यात करतो. त्यातून जवळपास २६००० कोटी रुपयांची परदेशी चलनाची गंगाजळी देशाच्या खजिन्यांत आणून टाकत.

थाईलंडमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्याने ऊसशेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. आपल्यासारखाच पावसाच्या लहरीपणाचा फटका येथील शेतकऱ्यांनाही बसतो. उसाच्या लागवडीच्यावेळी पावसाला उशीर होतो आणि तोडणीच्यावेळी तो यावेळी कोसळतो. त्यामुळे उसाचं आणि पर्यायाने साखरेचं उत्पादन कमी होतं.

साखर उत्पादनात आत्मनिर्भर बेण्यासाठी थाई सरकारने बरेच प्रयत्न केले. आगोदर लोकं भातशेती मोठ्या प्रमाणात करत होते. २०१० मध्ये भातशेती सोडून उसाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती ‘रे’ ४००० रुपयांची सबसीडी सरकारकडून देण्यात येऊ लागली. एक ‘रे’ म्हणजे साधारणतः ०.३९ एकर. कायदे ऊसधार्जिणे केले गेले. प्रतिटन उसामागे सरकार १०० रुपयाचा अतिरिक्त बोनस देऊ लागली. मग काय? साखरेचं उत्पन्न मारुतीच्या शेपटीसारखं वाढलं. शेतकऱ्याची कमाई वाढली. एक ‘रे’ भातशेतीतून सातआठ हजार रुपये मिळायचे ती कमाई उसामुळे वीस हजारापर्यंत गेले.  

भविष्यात साखरेचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात काम करताय. २००७-८ मध्ये ६५ लाख ‘रे’ क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या ऊसपिकाला २०२६ पर्यंत १.६ कोटी पर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. नुसतं उसक्षेत्र वाढवण्यावर भर नसून, उसाचा उतारा वाढवून २०२६ पर्यंत दोन कोटी रिफाइन साखर उत्पादनाचं लक्ष त्यांनी ठेवलय. 

म्यानमारमध्ये जागोजागी गुळवे कामाला लागलेले दिसायचे. इथं गुळ बनवतात का? हा प्रश्न पडला, मी त्याला उचलून घेत समोरच्या प्राध्यापकांवर भिरकावला. त्यावर, ‘हो, काही शेतकरी ऊस किंवा पाम पासून गुळ बनवतात. पण हा गूळ उद्योग भारताएवढा मोठा नाहीये.’ असं उत्तर मिळालं. ‘पाम’चा गुळ? मी आश्चर्याने विचारलं. यावर ‘हो, आमच्याकडे पामच्या झाडापासून गूळ बनवतात’ असं उत्तर मिळालं.  मज ‘पाम’राला एकदा चाखला पाहिजे हा ‘पाम’चा गुळ असा गुळचट विचार मनात घोळून गेला. 

या गोड पिकाच्या काही कडू अंगही आहेत. गोड लागणाऱ्या उसाला मुळांसह खाण्याच्या प्रयत्नांमुळे काही समस्या निर्माण झाल्याहेत, होताहेत.

जगातील इतर देशांतसारखं थाई लोकांनासुद्धा काडी लावण्यात जाम मजा येते. इथं ऊस दोन प्रकारे तोडला जातो. एक म्हणजे, जुन्या पद्धतीने हाताचा वापर करत, कामगारांमार्फत आणि दुसरा म्हणजे आधुनिक हार्वेस्टर मशीनद्वारे. जुन्या पद्धतीत, ऊस तोडण्याआगोदर तो जाळतात. अनावश्यक पाचट जाळून खाक झालं की मग कामगारांना ऊस तोडायला सोप्प जातं. पण त्या नादात धुरकांडाने हवेची वाट लावलेली असते ते अलहिदा. देशभर उसाचे पाचट जळणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले. हार्वेस्टर चा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना पाचट जाळायची गरज नाहीये. उलट हे पाचट पुढच्या पिकासाठी उपयुक्त आच्छादन म्हणून काम करत. पण हार्वेस्टर चा खर्च वाचवण्यासाठी पाचटाची पांचटजाळ सुरूच राहिली. शेवटी सरकारने जळलेला ऊस घेण्यास साखर कारखान्यांना मर्यादा घातल्या. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उसाच्या कांडाचं हे ‘जळीतकांड’कमी झालं. 

दुसरी समस्या म्हणजे, ऊसशेतकरी प्रति ‘रे’ दीड ते दोन लिटर तणनाशक वापरतो. त्यामुळे जमिनीत तणनाशकांचं प्रदूषण वाढलाय. ऊस पीक दुष्काळातून आल्यागत अधाश्यासारखं पाणी पितं. इतर पिकांच्या मानाने पाच पट जास्त पाणी ऊस गट्ट करतो.  आपल्या घरात येणाऱ्या एक किलो पांढऱ्याशुभ्र साखरेने, इथ पोहोचेपर्यंत १४५ लिटर पाण्याचा बळी घेतलेला असतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. माती, पाणी आणि हवा अश्या तीनही घटकांवर परिणाम करणाऱ्या या ऊसपिकात शाश्वत बदल करावे लागतील. नाहीतर वातावरणाबदलांमुळे येत्या काही दशकात ऊसशेती आणि उत्पन्नात घट होईल असा अंदाज शेतीशास्रज्ञ वर्तवताहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर पिकवणारा थाई माणूस, साखर खातो तरी किती हा प्रश्न डोक्यात घोळू लागला. दुधाला तोंड न लावणारा थाई माणूस मात्र दिवसाकाठी २६ चमचे म्हणजे जवळपास १०४ ग्राम साखर फस्त करतो असं समजलं. शिफारशीनुसार माणसाने दिवसाला ६ चमचे साखर खाल्ली तर चालते. म्हणजे थाई माणूस सरासरीच्या चारपट जास्त साखरेचं खातो. पैसा आला की समृद्धी आली. आणि समृद्धी म्हणजे गोऱ्यांचं अनुकरण हे समीकरण ओघाने आलंच. थाई लोकांचं साखरेचं हे व्यसन पाश्चिमात्य जीवनशैलीच्या अनुकरणामुळे आलंय. हवा, पाणी आणि साखरेचं मिश्रण विकून अरबपती झालेल्या कंपन्यांच्या, साखरी सापळ्यात तो अडकतो. विमानातून उडी मारत, एका हातात नक्षीदार बाई आणि दुसऱ्या हातात शीतपेयाची बाटली झेलत, हे गोड विष रिचवणाऱ्या भाडोत्री हिरोची नक्कल करण्याच्या नादात, सामान्य माणूस, कंपन्यांचा बकरा बनतो. ही आमिषं फुलबॉलसाखा ठोकरणारा रोनाल्डो अभावनेच आढळतो.  थाई लोकंही खासकरून पेयपानातून ही साखर पोटात ढकलतात. रोज, ग्रीन टी मधून  १३ चमचे आणि शीतपेयातून ९ चमचे साखर थाई घशाखाली उतरतेय. ‘साखरेचं खातो त्याला देव देतो’ ही म्हण बदलून ‘साखरेचं खातो त्याला देव नेतो’ अशी बदललीय याची त्याला कल्पना नसावी.  

या अतिशर्करापानाने आगोदरच बुटके असलेल्या थाई लोकांची आडव्या अंगाने वाढ व्हायला लागलीये. इतर बाबीत अव्वल नंबर गाठणारा थायलंड एक नकोश्या अवजड यादीतही वरच्या क्रमांकावर ढकलला गेलाय. हा देश आग्नेय आशियात, लठ्ठपणाच्या यादीत दुसऱ्या नंबरवर येऊन पोहिचलाय. शासनाच्या आकडेवारीनुसार पावणेदोन कोटी मुलांपैकी १४ लाख मुलं जरा जास्तच भरल्या अंगाची आहेत. त्यांच्यात व्यायामाचा अभाव आणि टीव्ही किंवा कम्पुटरसमोर सतत बसून राहिल्याचा हा परिणाम. पण त्या मुलांचा आणि त्यांच्या आईवडिलांचाही नाईलाज आहे. इंटरनेट वरून आरोग्य ‘डाउनलोड’ करता येत नाही त्याला ते बिचारे तरी काय करणार?

ह्यावर उपाय म्हणून थाई सरकारने ‘फ्लॅट टमी कॅम्पेन’ म्हणजे ‘पोट कमी करा रे’ अभियान राबवलंय. या अंतर्गत ग्रीन टी आणि शीतपेयांच्या जाहिरातींवर बंदी घालायचा विचार करतायेत. लोकांच्या डोक्यात ‘हिरो’ आणि पोटात ‘साखर’ घालणाऱ्या जाहिरातीतून येणाऱ्या पैशांवर, सरकार पाणी सोडतं का? आणि ही बंदी हटवण्यासाठी कंपन्या, सरकारदरबारी कशी साखरपेरणी करतात, ते पाहण्यासारखं आहे.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “थायलंडचे साखर सम्राट”

 1. एखादे पिक अती प्रमाणात घेतले की , शेतजमीन नापीक होते.
  असेच दक्षिणआफ्रिकेत आणि अमेरिकेत फार वर्षांपूर्वी कापसाचे पीक घेतल्यामुळे झाले होते.
  ” एक होता कार्व्हर ” पुस्तकातून या बाबतची माहिती मिळाली.
  आपल्या भारतात अशीच परिस्थिती येणार आहे. पैसे कमावण्याच्या नादात भारतातील शेतकरी फार वर्षांपासून कापसाची लागवड करीत आहोत. मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापरामुळे शेतजमीन भुसभूसीत करणारया जिवांचा नाश झाला आहे.
  अजुन थोड्या कालावधी नंतर आपली जमीन नापीक होणार आणि आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही.
  आताच आपण सर्वजण रासायनिक युक्त
  धान्य , कडधान्य , रासायनिक वैरण खाऊन आपल्या गाय-म्हैशी पण रासायनिकच दुध देत आहे. दूधापासून तयार होणार पदार्थ पण सर्व रासायनिकच आहेत. त्यात अजुन भेसळवाल्यांची भरती. एक दिवस असा येईल की , आपल्याला प्रत्येक जिवनसत्वाचे डोस घेतल्या शिवाय जिवन जगता येणारच नाही.

 2. काही वर्षांपूर्वी कारखाने कमी होते व त्यांच्या गाळपक्षमतेपेक्षा ऊस जास्त झाला होता तेव्हा आपल्याकडेही ऊस जाळण्याचे प्रकार घडले होते.दिल्लीच्या हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न याचमुळे तरी आहे.एकूण काय सगळीकडे पळसाला पाने तीन.जळितकांड आहेतच सर्वत्र.’पाम’राला शेवटी पामचा गुळ मिळाला की नाही.आपल्याकडेही ताडाचा गुळ बनवतात ना.साखरेचे खातो त्याला देव नेतो हे आता सगळ्या जगानेच लक्षात घ्यायची वेळ आली आहे.एकी कडे कुपोषित बालके आहेत तर एकीकडे ही अशी अती पोषित.माझ्या शेजारच्या पाच वर्षाच्या मुलाचे वजन चाळीस किलोच्या आसपास आहे.नेहमी सारखी या ही लेखात साखरपेरणी आहेच.त्यामुळे आता माझीसुद्धा शुगर वाढण्यपूर्वी थांबतो.रोनाल्डोचे प्रकरण मला माहित नाही.हा कुठला खेळाडू का?मी आज नेटवर पाहतो.तुम्ही आठवणीने लेख पाठवता यासाठी मी तुमचा आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

राखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्सराखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्स

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 02 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ कंबोडियाची अमेरिकेबरोबरच्या युद्धात झालेली फरफट आणि त्यानंतर त्यांचा भूमिपुत्र ‘पोल पॉट’ ने दिलेला

मलयदेशीचा मलमली प्रवासमलयदेशीचा मलमली प्रवास

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघालेली माझी बुलेट आणि मी, आता मलेशियात येऊन पोहोचलो आहोत. भारत, भूतान,

चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेतीचंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 09 January, 2020 Published by: अग्रोवन जागतिक आश्चर्यापैकी एक असलेल्या लोणार सरोवरामध्ये स्पीरुलिना शेवाळ वाढतं. हे हिरवं लोणी प्रोटिन, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेले