drsatilalpatil Agrowon Article विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!

विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!

विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 30 January, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

गेले दोन दिवस जगातल्या सर्वात आनंदी देशात बुलेटने फिरतोय. रस्ते एकदम चकाचक आहेत. कुठेही कचरा नाही, प्लास्टिक च्या पिशव्या, गुटख्याच्या पुड्या नाहीत. घरं, दुकानं मराठी शाळेतल्या आज्ञाधारक मुलांसारखे शिस्तीत उभे. कुठेही राजकारण्यांचा वाशीला लावून केलेलं अतिक्रमण नाही. गावागावांना जोडणारे घाटाचे रस्ते हिरव्यागार डोंगरातून धावत जाताहेत.

 

भूतानमध्ये एकूण १२००० किलोमीटर रस्त्यांचं जाळं आहे. त्यातील २००० किलोमीटर मुख्य हायवे आणि साडेसहाशे किलोमीटर दुय्यम महामार्ग आहेत. उरलेले बारीक रस्ते हिमालयातील दुर्गम वाड्यावस्त्यांना जोडायला धावतात.  गेल्या दोन दिवसात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आम्हाला एकही ट्रॅफिक सिग्नल लागला नाही. अरे खरंच कि ! आपण सिग्नलला थांबल्याचं आठवत नाही. कमाल आहे ! डोक्यातील या बेलगाम विचारंना लाल दिवा दाखवून थांबवलं आणी जरा तापास करायचं ठरवलं.   

 

आख्या जगात ट्रॅफिक सिग्नल नसलेला भूतान हा एकमेव देश आहे. थिंपू  या राजधानीच्या शहरात जास्त वाहतूक असलेल्या चौकात वाहनांना दिशा दाखवण्यासाठी एखाद-दुसरा ट्रॅफिक पोलीस असतो. कोणे एके काळी थिंपू मध्ये एकमेव सिग्नल बसवला होता. पण लोकांनी या सिग्नलला रेड सिग्नल दाखवत नापसंत केलं आणि त्या ऐवजी ट्रॅफिक पोलिसाला पसंती दिली. हा पोलिसांवरील विश्वास होता की सिग्नल वरील अविश्वास हे मात्र कळू शकलं नाही. राजधानीतील वर्दळ असलेले काही चौक सोडले तर देशभरातील रस्त्यावर पोलीस मामा नसतो. पण सिग्नललाला भूतानी वाहतूक पोलीस नाही म्हटल्यावर, मामाचा सिग्नलवरील तो लपाछपीचा खेळ नाही …आणि तोडपाणीही नाही… त्यामुळे कमाई नाही ..अशापद्धतीने सिग्नल नसल्यामुळे या देशाने भलामोठ्ठा राष्ट्रीय उत्पन्नाचा श्रोत गमाऊन स्वतःच नुकसान केलंय असा लाल सिग्नलवर उधळलेल्या वाहनागत एक मोकाट विचार डोक्यात उधळून गेला.

 

सिग्नल नाही? म्हणजे इथं विजेची कमतरता आहे का? कदाचित त्यामुळे सिग्नलवर विजेची उधळपट्टी ह्यांना परवडत नसेल. पण आश्चर्याने विजेचा शॉक बसायची ही दुसरी वेळ होती. भूतान हा जगातील सर्वात जास्त जलविद्युत उत्पादन करणारा देश आहे अशी माहिती मिळाली. एखाद्या जिनियस पोराने शाळेत अभ्यास, खेळ, सामान्य ज्ञान अश्या सर्वच क्षेत्रात पहिला नंबर पटकवावा तसा हा चिमुकला देश सरप्राईज वर सरप्राईज देत होता. येथील विजेचा इतिहास असा आहे.

 

भूतानमध्ये १९६६ मध्ये पहिल्यांदा वीज आली. २५६ किलोवॅट चा एक डिझेल जनरेटर लाऊन फुनसोलींग या भारतीय सीमेवरील शहरात वीज पुरवली गेली. पण पुढच्याच वर्षी राजधानीचं शहर थिंपू मध्ये ३६० किलोवॅटचा जलविद्युत प्रकल्प लावून देशी विजेच्या उत्पादनाचं चांगभलं केलं. लँडलॉक देश असल्याने समुद्राचा संपर्क या देशाशी येत नाही. पण ह्याची कमतरता वरूण देवाने वरून भरून काढलीये. हिमालयाच्या डोंगरांवर भरपूर कोसळणारा पाऊस आणि बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी योग्य वातावरण होतं. हिमालयातील डोंगर दऱ्यातून अवखळ बालेप्रमाणे धावणाऱ्या नद्यांमुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी हा देश स्वर्ग ठरला. भूतानी लोकांनी विजेच्या देवाला कौल लावला आणि त्यानेही विजयी भव असं म्हटलं. हिमालयाने दिलेली गतीज ऊर्जा घेऊन हे पाणी जलविद्युत प्रकल्पातील टर्बाइन वर झोकून देत गतीज ऊर्जेत धर्मांतर करतं.  मग ही गतिज ऊर्जा जनित्रातील चुंबकीय प्रभावाखाली विजेत रूपांतरित होऊन देश उजळवण्या साठी तारातारांतून तरातरा धावत जाते.

 

निसर्गाने भरभरून दिलेल्या ऊर्जास्रोतांची जाणीव ठेऊन मग भूतान ने मोठ्या प्रमाणात ह्या व्यवसायात गती मिळवली. १९७४ मध्ये भारताशी द्विपक्षीय करार करून ३३६ मेगावॉटचा ‘वांगचु’ नदीवर ‘चुखा जलविद्युत प्रकल्प’ बांधला.  त्यानंतर १९७५ ते १९९० च्या काळात २० किलोवॅट ते १५०० किलोवॅटचे १२ लहानमोठे प्रकल्प लावले. त्यामुळे संपूर्ण देशाची विजेची गरज पूर्ण होऊन जास्तीची वीज भारताला निर्यात होऊ लागली. भूतान ला विजेचं हार्वेस्टिंग भारता मुळे शक्य झालाय. भारत मोठी तांत्रिक आणि आर्थिक मदत करतोय. इथे मोठमोठे जविद्युत प्रकल्प स्थापन करतोय.

 

आजच्या घडीला भूतानची स्थापित विजेची क्षमता १.६ गिगावॅट आहे. देशातील ९९.९७ टक्के लोकांच्या घरात २४ तास वीज खेळतोय. म्हणजे यांच्याकडे विजेमुळे शेतकऱ्याच्या नशिबी सक्तीची रात्रपाळी नाहीये तर! विजेमुळे निशाचर झालेले शेतकरी भूतानमध्ये दिसत नाहीत. इथं २०१३ पासुन ग्रामीण क्षेत्रातील लोकांना मोफत वीज दिली जाते. “बाप्पा! नशीबवान हैत भूतान चे शेतकरी”. उद्योगधंद्या साठीही जास्तीत जास्त सव्वाचार रुपये प्रतियुनिट वीजदर आहे.

 

भूतानला नैसर्गिक वायू आणि तेलाची नैसर्गिक देणगी नाहीये. भूतान दररोज फक्त १००० बॅरल तेलाची आयात करतो. तेही फक्त वाहनांच्या इंधनासाठी. म्हणायला थिम्पूत १३ लाख टन कोळशाचे साठे आहेत, पण त्यातील फक्त वार्षिक एक हजार टनाचा उपसा ते करतात. कोळश्याच्या धंद्यात हात काळे करण्यापेक्षा जलविजेच्या पर्यावरणपुरक नितळ धंद्यात त्यांनी हात घातलाय. इतर पिकांच्या उत्पादनात आणि निर्यातीत मागे असलेल्या भूतान ने मात्र वीज पिकवण्यात बाजी मारलीये. विजेच्या व्यवसायातील विजीगुषु वृत्तीमुळे आजच्या घडीला जलवीज हा भूतानच्या अर्थव्यवस्थेचा चा कणा बनलाय.    

 

एका बाजूला भरमसाठ वीजनिर्मिती आणि दुसऱ्या बाजूला विजेची भरमसाठ गरज असलेला गरजवंत भारत हे समीकरण चांगलंच जमलं. भारत मोठ्या प्रमाणात भुतान मधून वीज आयात करू लागला. अश्या प्रकारे शेजाऱ्याच्या विजेच्या तारेवर भारताने आकडा टाकला. 

 

विजेच्या या पर्यावरणपूरक पिकामुळे येथे कोळसा किंवा तेल जाळून वीज उत्पादन होत नाही. त्याचा फायदा हा झाला की भूतान हा जगातला पहिला कार्बन न्यूट्रल म्हणजेच कर्ब उदासीन देश बनला. म्हणजे हा देश जेवढा कार्बन उत्सर्जित करतो त्यापेक्षा जास्त शोषुन घेतो. सफेद कपड्यातल्या काळ्या इंधनतेलाच्या धंद्यातील अरबींपेक्षा काहीही न जाळता आणि कोणावर ही न जळता ऊर्जानिर्मिती करणाऱ्या स्थितप्रज्ञ देशाला सलाम.

 

स्वतः कार्बन न्यूट्रल असलेल्या या देशाला इतर देशांनी केलेल्या प्रदूषणामुळे होणाऱ्या वातावरण बदलाचा फटका बसतोय. इच्छा नसतांना दुसऱ्याच्या पापाचा वाटेकरी त्याला त्याला व्हावं लागतंय. हिमालयातील पावसाच्या बदलणाऱ्या परिस्थितीमुळे भरवशाची विजशेती बिनभरवश्याची होते कि काय अशी भीती वाढतेय. 

 

भूतानच्या स्वच्छ कार्बन-न्यूट्रल वातावरणातून पेट्रोलच्या बुलेंटीचे धुर उडवत आम्ही भारतीय भुतं निघालो. बुलेटच्या धुराच्या न्यूनगंडाचा लाल-सिग्नल डोक्यात घेऊन या सिग्नल विरहित देशातून प्रवास सुरु केला…

 

 

लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!”

  1. प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे 94231 94828. says:

    विज कशी पिकवली जाऊ शकते ,
    हे सत्य समजले.

  2. अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
    निरीक्षण व लेखन… उत्तम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पाऊस बदाबदा कोसळतोय. पावसाच्या थेंबांचा टपटपाट हेल्मेटच्या काचेवर एकसारखा सुरु आहे. नखशिकांत

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी

तरंगणारे म्यानमारी टोमॅटो !तरंगणारे म्यानमारी टोमॅटो !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 06 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ क्यू याम किम सी s s सर s s क्यू याम किम सी