drsatilalpatil Agrowon Article ……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो. post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 27 February, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या म्हणजेच ब्रह्मदेश उर्फ म्यानमार च्या सीमेला जोडणारा तो पूल होता. सीमेवर ना कुठले कुंपण ना सीमाभिंत. दोन्ही देशातून वाहणारी नदीच सीमा म्हणुन उभी ठाकलीय. नदीच्या  पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम लोखंडी पट्ट्याची भिंत. एखाद्या लोखंडी बोगद्यात बाईक चालवायचा फिल येतोय.

 

भारत-सिंगापूर-भारत अशा २० हजार किलोमिटरच्या बुलेट मोहिमेदरम्यानच्या प्रवासात आम्ही या आंतरराष्ट्रीय सीमेवर  येऊन  पोहोचलो  होतो. भूतान नंतर या मोहिमेतील हा दुसरा देश. माप ओलांडायला या या अविर्भावात दुसरी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडायला या असं म्हणत तो आवताण देत होता. मोरेह हे भारतातलं आणि तामु हे म्यानमारमधलं गाव या पुलाच्या भरवश्यावर एकमेकांशी संबंध राखून आहे.  या पुलाला ‘भारत म्यानमार मैत्री  पूल’ असं नाव आहे. दोन्ही  देशांच्या  सीमांना सांधत हा पोलादी मैत्रीचा दुवा उभा आहे. भारत म्यानमार व्यापार ह्याच रस्त्याने होतो. आम्ही म्यानमार मध्ये यावं असं तो पुल प्रेमाने खुणावतोय. आम्हीही त्याच्या प्रेमाने ‘पुल’कित होऊन बुलेट पुढे दामटाळल्या. 

 

‘म्यानमारमध्ये आपलं स्वागत आहे’ असं म्हणत पिवळ्या सरकारी बोर्डाने आमचं स्वागत केलं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गोल चेहऱ्याच्या म्यानमारी सैनिकाने आमच्या  बाईककडे त्याच्या  बारीक नजरेनं निरखून पाहिलं. अगोदरच  बारीक असलेले त्याचे डोळे बिना चष्म्याचा वाचायचा प्रयत्न करणाऱ्या चष्मेबहाद्दरा सारखे वाटत होते. पुढे ‘उजव्या बाजूला गाडी चालवा’ अशी पाटी दिसली आणि डोक्यात प्रकाश पडला. अरे इथं उजवीकडे बाईक चालवायचीय. आयुष्यभर धुत्या हाताला गाडी चालवणाऱ्या आम्हा बाईकर्सला आता खात्या हाताला गाडी  चालवावी लागणार होती.

 

बॉर्डरवरचे सरकारी  सोपस्कार आवरून रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या शेतात नुकतच कापलेलं भाताचं पीक खुंटांद्वारे आपलं अस्तित्व दाखवत होतं. मोकळ्या शेतातुन गुरं हिरवळीच्या शोधात फिरत होती. म्यानमारी लोकांची घरं रस्त्याच्या कडेला शेत राखण करत उभी होती. ही घरं जमिनीपासून चांगली ४-५ फूट उंच लाकडी खांबावर बांधली होती. म्हणजे भरभक्कम लाकडी खांब जमिनीत रोवुन त्यावर लाकडी फळ्या ठोकून बांधलेली घरे. इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. इथं वर्षभरात तब्बल २२०० मिलीमीटर पाऊस कोसळतो. म्हणजे आपल्यापेक्षा जवळपास तिप्पट. म्हणून इथली लोकं जमिनीपासून उंच घरं बांधत असावेत.

 

नवीन देशातील शेती आणि शेतकऱ्याची घरं, गावं न्याहाळत आरामात बाईक चालवत पुढे निघालो. रास्ता बराय. हा हायवे भारतानेच बांधलाय. अधूनमधून लाकडी पुल गाडीला पैलतीरावर घेऊन जातोय. आत्तापर्यंत रस्त्यात भेटलेले सर्व पूल लाकडीच होते. सिमेंटचा एकही पूल दिसला नाही. रस्त्यावरून धाकधकत बाईक निघाल्यात.  आयुष्यभर  दारूच्या व्यसनाला चिकटलेल्या दारुड्याची पावले  दारू सोडल्यावरसुद्धा गुत्त्याकडे आपोआपच वळावी तसेच आमच्या वामांगी बाईकर्सच्या बाईकची चाके डावीकडे ओढली जात होती. मग समोरून  येणारं वाहन आम्हाला आमची जागा दाखवून देत, हॉर्नारव करत निघून जात होतं. तो ट्रकड्रायव्हर कदाचित म्यानमारी भाषेत शिवीही हाणत असेल, पण आम्हाला त्याची भाषा कळत नव्हती आणि बाइक आणि ट्रकच्या आवाजात काही ऐकूही येत नव्हतं, त्यामुळे त्याचे ओठ आमच्या प्रशंसेत हालताहेत अशी समजूत करून घेत पुढे निघालो. म्यानमारी शिव्या आमच्या ओव्या झाल्या होत्या.

 

रस्त्यावर अजून एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे म्यानमारमध्ये उजवीकडे आणि डावीकडे  स्टिअरिंग असलेली वाहनं दिसतात. रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवण्याचा नियम असणाऱ्या देशात उजवीकडे आणि डावीकडे अश्या दोन्ही बाजूला ड्रायव्हिंग सीट आणि स्टेअरिंग असलेली वाहने कशी, हा प्रश्न पडला. पण खोदून काढल्यावर मनोरंजक माहिती समोर आली.

 

या देशाला १९४८ मध्ये इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं आणि नामांतराच्या लाटेत ते बर्माचं म्यानमार झालं. १९७० पर्यंत इथं भारतासारखी रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहनं चालायची. पण १९७० मध्ये सत्तेवर आलेल्या ‘जनरल वीन ने’ ला उपरती झाली आणि त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन ६ डिसेंबर १९७० ला संपूर्ण देशात रस्त्याच्या उजवीकडून वाहनं चालवायचा वटहुकूम काढला. इथे मिलीट्रीराज असल्याने त्याची अंमलबजावणीही त्वरित झाली. ‘वीन ने’ साहेब, या खात्या-हाताला वाहनं चालवायच्या कल्पनेमागे हात धुवून का लागले, याबाबतच्या काही आख्यायिका सांगितल्या जातात. लोकं म्हणतात की जनरल साहेब देशविदेशात फिरले आणि त्यांना आढळून आलं की बहुतेक देशात उजव्या बाजूला वाहतून आहे. मग आपल्या देशाची वाहतूक हि आंतरराष्ट्रीय पद्धतीशी मिळतीजुळती असावी असा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला. पण काही लोकांच्या मते ‘वीन ने’ साहेबांच्या बायकोला ज्योतिष शास्त्राची आवड होती. आणि उजवं ट्राफिक देशाच्या भविष्यासाठी उजवं ठरेल असं तिचं ज्योतिषशास्त्र सांगत होतं. ही शक्यता नाकारता येत नाही. कारण म्यानमारमध्ये लोकांचा ज्योतिषावर भरपूर विश्वास आहे. अगदी छोट्याछोट्या गोष्टींपासून ते लग्नकार्य सुद्धा ज्योतिषाच्या सल्याने होतात. पण काहींच्या मते जनरल  साहेबांना एके दिवशी स्वप्न पडलं आणि  त्यनुसार त्यांनी हा उजवा निर्णय घेतला.

 

आख्यायिका काहीही असोत, पण या निर्णयाने म्यानमारी लोकांची आणि वाहनं निर्माण करणाऱ्या कंपन्यांची झोप उडाली होती हे मात्र खरं. डाव्या बाजूला चालवण्यासाठी बनवलेली वाहने एकदम उजव्या बाजूला चालवावी लागली. वाहनचालक गोंधळली. रस्त्यावरच्या ट्राफिकचा पार बोजवारा उडाला. आजही रंगुन सारख्या शहरात डावीकडील ट्राफिक चे रस्त्यावरील फलक जुन्या वाममार्गीय वाहतुकीची आठवण करून देत उभे आहेत. मध्यंतरी या गोंधळामुळे अपघात वाढलेत याच्या तक्रारी वाढल्या. पण या अपघातवाढीला उजवी वाहातून पद्धती जबाबदार नाही असं सांगत सरकारने सारवासारव केली.

 

म्यानमारमध्ये वाहनउत्पादन होत नव्हतं. जास्तकरून जपानवरून वाहनं आयात केली जायची. मग सरकारनं ‘नवीन वाहन आयात कायदा’ करून, वाहन कंपन्यांना नवीन गाड्या उजव्या बाजुला चालवण्यालायक बनवा असं फर्मावलं. जुनी वाहनं डावी आणि नवी उजवी असा डाव्या-उजव्याचा संसदेप्रमाणे गोंधळ सुरू झाला. डाव्या-उजव्यांच्या या रस्त्यावर आम्ही उजव्यांच्या पक्षात टिकून राहायचा प्रयत्न करत  होतो,  पण स्वभावधर्मानुसार आमच्यातील काही बाइकर अजाणता डावीकडे पक्षांतर करायचे तर काहीजण अपक्षाच्या मध्यम मार्गाकडे कलायचे. अशा वेळी योग्य मार्गावरील वर्तमानात बाईक चालवणाऱ्या बाईकरने ओरडून किंवा हॉर्न वाजवून त्यांना स्वपक्षात परत आणून परिस्थितीची जाणीव करून द्यायची. २-३ दिवसांच्या म्यानमारी सरावाने मात्र उजवीकडचं बाईकिंग जमू लागलं.………पण अशा  पद्धतीने आयुष्यभर वाममार्गाने चालणारे पापभिरू बाईकर्स मात्र या मार्गावरून ढळले होते !

 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

4 thoughts on “……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.”

  1. Mast. Shirshak ekadam समर्पक आणि उत्सुकता वाढवणारे. त्या अनुषंगाने लेखही सुंदर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

देशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाटदेशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भगवान विष्णूच्या या देशात मी आणि माझी बाईक फिरतोय. ‘अंगकोर वाट’ मंदिराचं दर्शन घेतल्यापासून,

देवाची करणी आणि नारळात दुध !देवाची करणी आणि नारळात दुध !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधल्या हिरव्यागार दिवसांचा आणि चमचमत्या रात्रीचा आनंद घेत बुलेट प्रवास सुरु आहे.

थायलंडचं चावणारं पीकथायलंडचं चावणारं पीक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 17 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ झिंगूर म्हणजेच क्रिकेटची चव चाखून पहिली. झिंगूर बरोबरच, बांबूतल्या अळ्या, रेशीम किड्याच्या अळ्या,