घरातून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे, अंगणात बसून पुस्तकात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटूचे लक्ष विचलित झाले. पुस्तक बाजूला ठेऊन तो घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे वडील आणि काकांचे भांडण सुरु होते. त्याचे वडील कुशा कदम आणि काका दादू कदम, या सख्ख्या भावांचे भांडण जुंपले होते. या दोघांना वेगळं व्हायचं होतं. एकोप्याने राहणाऱ्या कदम कुटुंबाला घरात सुना आल्यावर वाटणीचे वेध लागले होते. कोणे एके काळी शेकडो एकरच्या वडिलोपार्जित जमिनीचे, दोन पिढ्यातच चिंचोळ्या तुकड्यात रूपांतर झाले होते. त्याचे अजून तुकडे होऊ नये असं चिंटूच्या आजोबांना वाटत होत. चिंटूने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. निकालाची वाट पाहत तो त्याच्या आवडत्या पुस्तकाच्या जोडीने सुट्ट्या घालवत होता. रोजच्या भांडणाचा चिंटूला कंटाळा आला होता. पुस्तक बेडवर भीरकावले, सायकल काढली आणि त्याच्या आवडत्या ‘देवा गुरूजींच्या’ घरी तो आला. ‘देवा गुरुजी’ हे त्याचे विज्ञानाचे शिक्षक. आदर्श शिक्षकाचा राज्यसरकारचा पुरस्कार नुकताच त्यांना मिळाला होता. प्रचंड वाचन आणि आकलनशक्ती असलेल्या देवा गुरुजींनी, चिंटूच्या एकूण देहबोलीवरून प्रकरण ताडले आणि त्यांनी हसत विचारले, ‘काय रे चिंटू, घरात आज पुन्हा महाभारताचा एपिसोड सुरु झाला का?’

हो ना गुरुजी, हे भांडण कधी थांबेल माहित नाही. चिंटू उद्वेगाने म्हणाला. मला कंटाळा आलाय या जगाचाच. टीव्ही, रेडिओ, पेपर, इंटरनेट, जिथं पाहावं तिथं भांडण. सर्व जगच भांडतंय, स्पर्धा करतंय. बघा ना, माणूस एकटं राहू पाहतोय, कुटुंब वेगळी होण्यासाठी झगडताहेत, एका आडनावाची मंडळी आमची ‘पट्टी’ वेगळी म्हणत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराची मतं आरक्षित करताहेत. गावकुसं तर मोडून पडली, पण काहींच्या मनात ती अजूनही घट्ट रुतून बसलीयेत. दोन गावदेखील भांडताहेत. दोन जिल्ह्यात कुरबुरी सुरु आहेत. दोन राज्याच्या हद्दीच्या वादाने तर हद्द ओलांडल्याची उदाहरणे ताजी आहेत. दोन देश, खंड यांचादेखील अखंड भांडणे सुरु असल्याचा इतिहास आणि वर्तमान समोर आहेच. याव्यतिरिक्त जात, धर्म, पंथ,गोत्र, राजकीय-अराजकीय पक्ष, रंग, भाषा अश्या एक ना अनेक मुद्द्यांवर आपले-परके वाटले जाऊन भांडणं अव्यवहात सुरु आहेत. म्हणजे भांडण हाच निसर्गाचा नियम आहे का हो गुरुजी?’
चिंटूची मनस्थिती हेरून गुरुजी म्हणाले, हे बघ चिंटू, प्रकृतीचा पिंड भांडण हा मुळीच नाहीये. हो, निसर्गात अस्तित्वासाठीची धडपड आहे. अन्नपाण्यासाठी स्पर्धा आहे. पण भांडण नक्की नाही. झाडं पशु पक्षी आपल्या पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडेल म्हणून अन्नाची साठेबाजी करत नाहीत. ते वर्तमानात जगतात. एकदा पोट भरल्यावर सिंहाजवळून हरणाचे पिल्लू बागडत गेले तरी तो, त्याच्याकडे वाकडी नजर करत नाही याचे व्हिडीओ तू पहिले असशील. माणूस मात्र आपल्या सात पिढ्यांची मक्तेदारी घेऊन निसर्गाला ओरबाडत साठेबाजी करतोय. याउलट परक्याला सांभाळून, सामावून घेणं, सहजीवनात राहणं हाच निसर्गाचा पिंड आहे’.
असं, मग एखादं उदाहर सांगा की गुरुजी, चिंटूने गळ घातली. ‘ठीकाय, सांगतो’ म्हणत गुरुजी सांगू लागले. हे बघ चिंटू पृथ्वीवर जीवन कसं आलं माहितीये का? ते आलं ‘गोल्डीलॉक’ परिस्थिती मुळे. गोल्डीलॉक परिस्थिती म्हणजे एखादी अभिक्रिया होण्यासाठी हवी असणारी अनुकूल परिस्थिती. त्यात द्रावक, तापमान वगैरेचा समावेश आहे. अशी ‘गोलडोलॉक’ परिस्थिती समुद्रात उपलब्ध झाली आणि पृथ्वीवरील पहिला जीव अस्तित्वात आला. पण या जलजीवाला पाणी सोडून जमिनीवर यायला करोडो वर्षे लागली. हवेत प्राणवायूची कमतरता होती. ती भरून काढली ‘सायनोबॅक्टरीया’ या जिवाणूने. ‘सायनोबॅक्टरीया’ हा प्रकाशसंस्लेषक जिवाणू आहे. तो वनस्पतींप्रमाणे सूर्यप्रकाश वापरून अन्न बनवतो आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू वातावरणात सोडतो. थोडक्यात तो प्रकाश-संश्लेषण अभिक्रिया धारक सजीवांचा आजोबा आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढले आणि जमिनीवरील जीवनासाठी सुयोग्य वातावरण तयार झाले. स्वतः जगतांना इतरांच्या जगण्यासाठी सुयोग्य वातावरण बनवणारा सायनोबॅक्टरीया बघ!
‘तु गोत्राच्या भेदभावाबद्दल बोलत होतास, पण गोत्राचं सोड, तुला आता नत्राची गोष्ट सांगतो. नत्र पुरवठ्याचा आदीस्रोत देखील सायनीबॅक्टरीया होता. सुरवातीला समुद्रात नत्राचा रतीब घालणारा हा नत्रवीर जमिनीवरील वनस्पतींच्या मदतीला धावला. जमिनीवर वनस्पती आल्या खऱ्या, पण मातीत स्थिर झालेला नत्र त्यांना उपलब्ध होत नव्हता. हवेतील नत्र त्यांना खाता येत नव्हता. अश्या कात्रीत सापडलेल्या वनस्पतींच्या मदतीला जिवाणूं धावून आले. अझोटोबॅक्टर सारख्या जिवाणूंनी मुळांभोवतीच्या मातीत, गावकुसाबाहेर वस्ती केली. हवेतील नत्राचा कच्चा माल वापरून, नत्र स्थिर करायचा पिढीजात धंदा त्यांनी मुळांबाहेर थाटला. वनस्पतीने मुळातून सेंद्रिय अम्लांचा, अन्नद्र्याव्यांचा पुरवठा करायचा आणि बदल्यात जिवांणूनी हवेतील नत्र स्थिर करून पिकांना पुरवायचा असा सहजीवनाचा सहवास सुरु झाला.
पुढे लाखो वर्षाच्या शेजारांती त्यांना उमगले, की आपण ‘एक दुजे के लिये’च बनलेले आहोत. त्यामुळे अजून जवळ येणे आवश्यक आहे. मग रायझोबियम सारखे काही जिवाणू झाडांच्या मुळांवरील गाठीतल्या खोलीत राहायला आले. त्यामुळे जीवाणूंना अन्नाचा पुरवठा सरळ वनस्पतीच्या मुळांवरील घरात करता आला आणि जिवाणूंची स्थिर केलेला नत्र शोषून घ्यायला झाडांना सोपं गेलं. मुळांवरील गाठीत जिवाणूला आसरा देण्याचा हा प्रकार द्विदल वनस्पतींनी केला. पण मायकोरायझा सारख्या बुरश्यांनी सहजीवनाची अजून वेगळी पद्धत अवलंबली. झाडाच्या आत वास्तव्य करून त्यांनी मुळांबाहेर आपले धाग्यांचे पाईप पसरवून ठेवले. या धाग्यांना बुरशीची मुळे म्हटलं तरी चालेल. या धाग्यांद्वारे मातीतील अन्नद्रव्ये पिकाच्या आत आणण्यासाठी ही पाईपलाईन त्यांनी वापरली. ज्या वनस्पतीत मायकोरायझाचे जाळे जास्त, तिला अन्नाची उपलब्धता जास्त.
चिंटू बाळा, हे तर काहीच नाही, सहजीवनात वनस्पती त्याच्याही पुढे गेल्या. वनस्पतींच्या पेशीत प्रकाशसंस्लेषन प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारा ‘क्लोरोप्लास्ट’ म्हणजे ‘हरितलवक’ हा वनस्पतीचा भाग नव्हताच मुळी. तो आहे सायनोबॅक्टरीया जिवाणू. वनस्पतींनी या प्रकाशसंस्लेषन करणाऱ्याला जिवाणूला सरळ आपल्या पेशीतच अढळपद दिले. त्यामुळे आपल्या शरीरात स्वतःचा सोलर जनरेटर बसवून, त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करून लागल्या. अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्या.
‘वनस्पतींसारखेच, किडे, प्राणी आणि इतर सर्व जीवांमध्ये देवासारखा सूक्ष्मजीवांचा वास आहे. त्यांच्याशिवाय जीवन अशक्य आहे. लेडीबर्ड किड्याच्या शरीरातील जिवाणू त्याचे बाळ, नर असेल की मादी ते ठरवते. यावरून किडे आणि जिवाणूंचे सहजीवन लक्षात येईल. माणसाच्या शरीरात देखील साधारणतः दोन टक्के जिवाणू आहेत. याला सोप्प करायचं झाल्यास, पन्नास किलो वजनाच्या माणसाच्या अंगात एक किलो वजनाचे जिवाणू आहेत. त्यांचा समतोल आणि आपली तब्येत एकदुसऱ्याला बांधलेली आहे. जिवाणूंच्या तब्येतीत बिघाड झाला की आपल्या तब्येतीत देखील बिघाड होतो’. गुरुजी म्हणाले.
‘अंगात एवढे किडे असल्यामुळेच माणूस एवढे किडे करतो’ चिंटूने शाब्दिक चिमटा काढला आणि गुरुजींनी हसून त्याला दाद दिली.
ते पुढे म्हणाले, बघ चिंटू, एवढे लांबचे जिवाणू, वनस्पती, किडे, प्राणी एक-दुसऱ्याच्या जवळ येताहेत. आसरा देतायेत, आपल्यात सामावून घेतायेत. नको असलेलं टाळून हवं तेवढं जवळ करताहेत. यापेक्षा सकारात्मक उदाहरण अजून कोणतं असू शकेल.
‘जिवाणू आणि वनस्पतींचं ठीकाय, पण माणसाचं काय?’ चिंटूने विचारलं.
‘माणसात देखील चांगली उदाहरणं आहेतच की. वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकात लग्न लागताहेत. आफ्रिकन-युरोपियन जोडप्यांचे कृष्णधवल संसार रंगताहेत. डाव्यांचे उजवे होताहेत आणि उजवे वामांगाला झुकलेत. माणूस निसर्गापासून लांब जातोय म्हणून त्याला या गतिरोधकाचे धक्के जाणवताहेत. पण त्याच्या शरीरात निसर्गाने बांधलेले पंचमहाभूते परत निसर्गात विलीन होण्याअगोदर, एक दिवस त्याला त्याची जाणीव होईल आणि नैसर्गिक जीवन हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे हे त्याला कळेल हे निश्चित’.
‘पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसेल अशी अपेक्षा करूया’ उसासा सोडत चिंटू उद्गारला. ‘ये, जवळ ये!’ असं म्हणत दूरच्याला जवळ घेत निसर्ग पुढे जात असतांना, आपल्या घरातील मोठे मात्र जवळच्याला दूर लोटत, निसर्गविरोधी का वागताहेत हा प्रश्न चिंटूला पडला होता. गुरुजींचा निरोप घेऊन सायकली वर टांग मारून तो घराकडे निघाला.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.
जर माणसाने ” संचय वृत्त ” सोडली तर सदा सुखी राहील.