
सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. कोणत्या देशाने कोणाची बाजू घ्यावी यासाठी तोडपाणी, गटबाजी याला ऊत आलाय. लहानसहान देशांना आपल्या कंपूत ओढून घेण्यासाठी मोठ्यांची धावपळ सुरु आहे. रशिया कसा जागतिक खलनायक आहे, हे ‘सौ चुहे खाऊन हजला निघालेला’ अमेरिकन भोंगा ओरडून सांगतोय. या गदारोळात, युद्धाच्या आगीवर भाजलेली चिनी पोळी, रशिया-युक्रेनच्या टाळूवरील लोण्यासह चीन एन्जॉय करतोय. या गदारोळात युद्धाचे पडसाद मात्र शेताच्या आपल्या बांधापर्यंत पोहोचत आहेत.

युक्रेन रशिया युद्धामुळे जगात खतांचा तुटवडा होणार अशी भीती व्यक्त केली जातेय. रशिया आणि त्याचा कट्टर साथीदार बेलारूस हे रासायनिक खतांचे प्रमुख उत्पादकांपैकी आहेत. रशियावर बंधनं घालून पाश्चिमात्य जगाने त्यांच्या आणि इतर देशांच्या पायावर भलामोठा रशियन धोंडा मारून घेतलाय. यामुळे खताची वाहतूकदेखील विस्कळीत होतेय. काळ्या समुद्रातून होणाऱ्या खत वाहतुकीवर, युद्धाच्या काळ्या ढगांचे सावट पसायलंय. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान होणार यात शंकाच नाही. पण याच्याकडे सर्व युद्धयोन्मत्त देश जाणूनबुजून दुर्लक्ष करतायेत.
युद्धजन्य परिस्थितीमुळे खताच्या किमती पेटल्या आहेत. पण खताच्या फक्त किमतीचं पेटतात असं नाही. खतांचे साठे पेटल्याच्या, फुटल्याचा घटना देखील घडल्या आहेत. काही उदाहरणं द्यायची झाल्यास, १९ एप्रिल १९९५ ओक्लोहोमा मध्ये ट्रक बॉम्बचा स्फोट झाला. या तीव्रता एवढी होती की त्यात इमारतीचा मोठा भाग जमीनदोस्त झाला. त्यानंतर १२ ऑगस्ट २०१५ मध्ये अश्याच प्रकारच्या स्फोटांची मालिका चीनमध्ये घडली. इथं साठवलेल्या अमोनिअम नायट्रेट खताच्या साठ्याचा मोठा स्फोट झाला. स्फोटांच्या मालिकेने उत्तर चीनच्या तियानजिन बंदर हादरलं. खटस्फोटाच्या मालिकेतली ताजी घटना म्हणजे, ४ ऑगस्ट २०२० मध्ये याच प्रकारचा स्फोट लेबनाच्या बैरुत शहरात झाला. इथल्या बंदरात अमोनिअम नायट्रेट या नत्रयुक्त खताचा मोठा साठा होता. हा स्फोट येवढा मोठा होता की त्यामुळे बैरुतमध्ये ३ रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला. स्फोटामुळे तयार झालेल्या शॉकवेव्ह मुळे घरांच्या दारेखिडक्यांची तावदाने फुटली. अगदी शेजारी देशातदेखील स्फोटाचे हादरे जाणवले. या दुर्घटनेत २१८ जण मृत्युमुखी पडले आणि सात हजार जण जखमी झाले. १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान त्यामुळे झालं. या स्फोटाचा कारण होतं ते लेबनानने जप्त केलेलं २७५० टन अमोनियम नायट्रेट खत घेऊन उभं असलेलं जहाज. मातीत मिसळण्यासाठी बनवलेल्या या खताने, लाखो लोकांच्या जीवनातची माती केली होती. वर सांगितलेल्या तिन्ही स्फोटात एक साम्य होतं, आणि ते म्हणजे हे तिन्ही स्फोट, अमोनिअम नायट्रेट या नत्रयुक्त रासायनिक खतामुळे झाले होते. पिकाला जीवन देणारं हे खत एवढ्या मोठ्या विध्वंसाला तरी कसं कारणीभूत झालं हा प्रश्न पडणं अपेक्षित आहे.
या घटनांव्यतिरिक्त जगभरात होणाऱ्या लहानमोठ्या स्फोटांच्या घटना आणि रासायनिक खतांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटांच्या बातम्या अधूनमधून घडतातच. हे झाले अजाणता झालेले अपघात. पण नत्रयुक्त खताचा जाणूनबुजून स्फोटकांसाठी उपयोग देशांकडून किंवा आतंकवाद्यांकडून केला जातोच. गेल्या शतकात मोठमोठ्या ३० आतंकवादी हल्ल्यात या नत्रयुक्त खताचा वापर स्फोटक म्हणून केला गेला होता. नत्राच्या खताचा हा स्फोटक इतिहास जरा समजून घेऊया.
नत्र हे झाडासाठी महत्वाचं अन्नद्रव्य आहे. हवेत मोठ्या प्रमाणात नत्र उपलब्ध आहे पण झाडे हवेतील ही नत्रयुक्त हवा पिऊ शकत नाही. पिकांच्या कामी येण्यासाठी ते स्थिर होऊन झाडाला खाण्यायोग्य होणं आवश्यक आहे. हवेतील नत्राला स्थिर करण्याचं काम जमिनीतील रायझोबियन आणि ऍझोटोबॅक्टर सारखे जिवाणू करतात. ते हवेतला नायट्रोजन शोषून घेतात. त्यांच्यावर विकरांनी अभिक्रिया करून स्थिर बनवतात, आणि झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचवतात. जिवाणूंमुळे हाताबाहेर असलेला नत्राचा घास पिकाच्या तोंडापर्यंत येतो. पण जिवाणूंमुळे घडणाऱ्या या स्थिरीकरण्याच्या अभिक्रियेला काही मर्यादा होत्या. जमिनीतील कर्ब आणि आद्रतेवर तिथं वाढणाऱ्या जिवाणूंच्या संख्येवर परिणाम होतो. नैसर्गिक नत्रस्थिरीकरणाची या प्रक्रियेला वेगाचं बंधन होतं. तिच्यावर मर्यादा होत्या. आधुनिकतेच्या रेट्यात जीवनात वेग भरण्याच्या नादात नत्र स्थिरीकरणाचा हा जैविक वेग कालबाह्य होता. त्याला वेग येणे गरजेचे होते.
रासायनिक नत्र स्थिरीकरणाच्या क्षेत्रात ‘फ्रीड्झ हबर’ या शास्त्रज्ञांने क्रांती आणली. हबर हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने हवेतील नायट्रोजन आणि हायड्रोजन यांची अभिक्रिया करून त्यापासून अमोनिया बनवला. ते पहिल्या महायुध्दाचे दिवस होते. देशाला नत्रास्त्राची गरज होती. या स्थिर नत्राचा स्फोटके बनवण्यासाठी उपयोग होणार होता. हबरच्या या संशोधनाने युद्धासाठी विस्फोटक तयार करण्यासाठी लागणाऱ्या नत्रासाठी तजवीज झाली. पहिल्या महायुद्धात जर्मनीने हबरच्या या संशोधनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला. या बॉम्बने पहिल्या महायुद्धात मोठा विध्वसं केला. हबरला त्याच्या या कामाबद्दल १९१८ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. या संशीधनामागे हुबरचा मानवजातीचा फायदा करण्याचा उद्धेश होता असं नाहीये. या संशोधनानंतर त्याने क्लोरीन, फॉस्जिन आणि मस्टर्ड गॅस सारख्या विषारी रासायनिक अस्त्रांच्या निर्मितीसाठी काम केलं. त्यामुळे पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जर्मनीच्या विरोधी देशांनी, हबरला युद्धातील गुन्हेगार म्हणून घोषित करून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे १९१९ मध्ये हुबरला स्वित्झरलँड मध्ये काही दिवस अज्ञातवासात काढावे लागले.
पुढे सर्वच युद्धयोत्सुक देशांनी नत्रबॉम्बचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला. महायुद्ध संपलं आणि युध्दासाठी जमवलेल्या स्थिर नत्रयुक्त रसायनांच्या साठ्याचं काय करायचं? हा प्रश्न पडला. त्याला उत्तर होतं, शेतात खत म्हणून त्याचा उपयोग करणे. हुबरच्या संशोधनाने बॅक्टेरियावरचा नत्रस्थिरीकरणाचा ताण कमी करत, रासायनिक अभिक्रियेद्वारा हवेतील नत्र स्थिर केला होता. युध्दात विस्फोट करणाऱ्या तंत्रज्ञानाने शेतीत देखील विस्फोटक बदल घडवले. स्थिर नत्राची रासायनिक खते बांधावर पोहोचली. माणसाच्या रक्तात सलाईन मार्फत औषध पोहोचल्यावर, जसा त्वरित परिणाम होतो, तसाच वेगवान फायदा या रासायनिक नत्रामुळे पिकांना झाला. पिकाच्या मुळावरील नत्रस्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंना आराम मिळाला आणि आयते स्थिर नत्र खताने पिकाला दिलं. मोठ्या प्रमाणात या खताचा प्रसार केला गेला. शेतकऱ्याला या रासायनिक सापशिडीत अडकवण्यासाठी, सबसिडीचा सापळा देखील वापरला गेला. वेगवेगळ्या रंगाच्या क्रांतीचं पॅकिंग वापरून ही खते देशाच्या विकासासाठी गावागावात पोहोचवली गेली. युध्दात वापरण्यासाठी बनवल्या गेलेल्या या रासायनिक सैतानाचा संचार, शेताशेतात सुरु झाला. अश्या पद्धतीने शेतीतील खत युध्दामध्ये अडकलं. त्याची नाळ युद्धाशी जोडली गेली. आजमितीला या रासायनिक खताचा, शेतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय की, पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या शरीरातील ४०% आवश्यक नायट्रोजन हा हुबरच्या प्रक्रियेने बनलेला आहे.
फक्त नत्रच नाही तर त्याबरोबरच शेतीत महत्वाचे अन्नद्रव, स्फुरद आणि पालाश देखील युध्दात महत्वाची भूमिका बजावतात. नत्र, स्फुरद आणि पालाश हे पिकासाठी जीवनदायी आहेत तसेच युद्धात जीव घेणारे देखील आहेत. सध्याच्या रशिया युक्रेन युद्धात, रशियाने फॉस्फरस बॉम्ब वापरला गेल्याचा आरोप लावला गेलाय. याला लसूणबॉम्ब देखील म्हणतात. हा बॉम्ब फुटल्यावर फॉस्फरसचा लसणासारखा येणाऱ्या वासामुळे त्याला लसूणबॉम्ब असं नाव पडलंय. पोटॅशिअम मुळे अस्तित्वात आलेले पोटॅशिअम नायट्रेट, पोटॅशिअम सायनाईड, पोटॅशियम ब्रोमाइड यासारखे रसायने युध्दात विषारी रंग भरतात.
युद्धातील तंत्रज्ञान, शोध आणि रसायने शेतीशी नाळ जोडून आहेत. कधी शेतातील कीडरोग मारण्यासाठी वापरले जाणारे रसायनं युद्धातील प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी वापरली जातात. अमोनिअम नायट्रेट, व्हिएतनाम युध्दात वापरली गेलेली एजन्ट ऑरेंज सारखी तणनाशकं अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. भांडण हत्तीचं होत पण चिरडलं मात्र गवत जातं. त्याचप्रमाणे मोठमोठे देश भांडतात आणि त्यामध्ये शेती आणि शेतकऱ्यासारखे निरापराध चिरडले जातात.
या प्रकारातून काही प्रश्न माझं डोकं कुरतडताहेत. नत्रस्थिरीकरणाची नैसर्गिक पद्धत डावलून अन्ननिर्मितीत रासायनिक हस्तक्षेप करायची खरंच गरज होती का? शेतीतील नत्रस्थिरीकरणाचा हा प्रश्न नैसर्गिक घटकांची मदत घेऊन सोडवता आला असता का? युध्दात उरलेल्या रसायनांना खपवण्यासाठी शेतकऱ्याला मामा बनवलं गेलंय का? स्फोटकांची नाळ खतांशी जोडून, जागतिक अस्थिरतेला शेतकऱ्यांच्या नशिबाशी बांधलंय का?
हुबरच्या अभिक्रियेने बनवलेल्या नत्रातील, ४० टक्के नत्र माझ्या शरीरात सामावत, एवढा मोठा स्फोट घडवण्याची क्षमता असलेल्या खतावर पोसलेल्या अन्नावर ताव मारत, मी या प्रश्नांचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय. तुम्हीही प्रयत्न करून बघा. मिळालंच उत्तर तर मला भेटा. मिल बैठेंगे दो रसायनग्रस्त !
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

Good article
रासायनिक खतांचा वापर जर शेतीसाठी केला तर
संपूर्ण जगाचा अन्नाचा प्रश्न सुटेल.
कुणी उपाशी पोटी राहणार नाही.
पोटभर जेवण मिळाले की डोक्यात विध्वंसक विचार येत नाही.
” जहॉं शांती , वही प्रगती “
अत्यंत महत्वाचा लेख आहे.विचार करु शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाचायला हवा इतका हा महत्त्वाचा आहे.