हॅलो मित्रा,
कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं.
अरे, इकडे गेले काही दिवस जाम उकडत होतं. डोंगराला पाझर फुटावा तसे घामाचे झरे वाहत होते. तापमानाने तर जणू नवनवीन रेकॉर्ड करायचा चंग बांधला होता. सूर्याचा वाढलेला पारा थर्मामीटरच्या नळीतून ढुश्या देत वरती चढत होता. कधी एकदाचा उन्हाळा जाऊन पावसाळा येतो असं झालं होतं. खरं तर माणसांची ही तगमग मान्सूनने जाणली आणि तोही ढगांची बॅग भरून, जरा लवकरच भारतभ्रमणाला निघाला. तो आला खरा, पण खूप वर्षांनी गावाकडे जावं आणि वेशीवरच ओळखीच्या माणसाने ‘बसा हो अमंळ, जाल की घरी’, असं म्हणत चहापाण्याला दोन तास बसवून ठेवावे, तसं वेशीवरच आठदहा दिवस रेंगाळला. शेवटी कमिंग सून, कमिंग सून म्हणत, मान्सूनची सून, सह्याद्रीचा उंबरठा ओलांडून महाराष्ट्रात गृहप्रवेश करते झाली.
दोस्ता, हा मान्सून येणारे तीनचार महिने पृथ्वीवर काय जादू करणार आहे, हे तुला माहितीये का? तुझ्यामाझ्यात, झाडाफुलात, सजीवनिर्जीवात तो आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. उत्सव सजणार आहे. सगळ्यात पहिला सुगंधी बदल तो मातीत घडवेल. उन्हाने तापलेल्या मातीला तो सुगंधी बनवेल. तुला प्रश्न पडला असेल की, हे कसं होत? मातीचा हा वास येतो तरी कुठून? तर ऐक, पावसाळी वासाला शास्त्रीय भाषेत ‘पेट्रिकोर’ म्हणतात. या पेट्रिकोर मध्ये मातीचा, ओझोनचा, सूक्ष्मजीवांचा आणि वनस्पतींनी मुळांद्वारे मातीत सोडलेल्या ‘इसेन्शिअल तेलाचा’ संमिश्र वास भरलेला असतो. पण या वासांच्या भाऊगर्दीत मातीशी जोडणारा, भारावून टाकणारा सुवास म्हणजे ‘जिओस्मीन’.
तुला आठवतं? लहानपणी, पाऊस आला की आपण शाळा चुकवून शाळेशेजारील शेतात, गढूळ चिखली पाण्यात खेळत बसायचो. मातीला एवढा सुगंध यायचा की माती खावीशी वाटायची. कित्त्येकदा आपण माती खाल्लीदेखील होती. हो! पण आजकाल प्रदूषणामुळे माणसांनी एवढी माती खाल्लीये, की शेतातील मातीला म्हणावा तेव्हडा वास येत नाही ते अलहिदा! असो. आपल्याला भुरळ घालणारा तो सुवास म्हणजेच ‘जिओस्मीन’. हे नाव पुरातन ग्रीक नावावरून घेतलय. ‘जिओ’ म्हणजे माती आणि ‘स्मिन’ म्हणजे सुवास. थोडक्यात मातीचा सुवास. आता तू म्हणशील ही सगळी शास्त्रीय नावं ग्रीक, लॅटिन आणि इंग्रजीतच का असतात? तर मित्रा, जसं ‘ज्याची बॅट त्याची बॅटिंग’ असते तशीच ‘ज्याची लेखणी त्याची भाषा’. गोऱ्यांनी या गोष्टी अभ्यासल्या, लिहून ठेवल्या, म्हणून भाषा आणि नावंही त्यांचीच. त्यामुळे इतिहासातील बऱ्याच काळ्या घटनांना बगल देऊन त्यांचा आंग्ल-रंग दिलेला दिसतो. आपली पुरातन भाषा आणि पुस्तकं त्यांच्या नावांसह नालंदा सारख्या यवनी आगीत जाळालीत. असो, विषयांतर टाळतो.
तुला माहितीये?, ‘सायनो बॅक्टरीया’ सारखे शेवाळं आणि ‘स्ट्रेप्टोमायसिस’ सारखे तंतुमय जिवाणू ‘जिओस्मीन’ तयार करतात. उन्हात तापलेल्या मातीवर जेव्हा पावसाचं शिंपण होतं, त्या वेळी हा जिओस्मीनचा सुवायू मातीच्या रंध्रातून बाहेर पडण्याची खटपट करतो. जमिनीत मुरणाऱ्या पाण्याला बाहेर ढकलण्याच्या प्रयत्नात तो पाण्याच्या सूक्ष्म थेंबांना घेऊन वातावरणात येतो. अश्या प्रकारे निसर्गाचं हे ‘एरोसोल’ युक्त अत्तर, ‘फॉग चल राहा है’ म्हणत हवेच्या प्रवासाला निघतं. म्हणूनच जोरदार पावसापेक्षा, रिमझिम पावसात जिओस्मीनचा सुवास जास्त दरवळतो. पावसाळ्यात माती, थेंबाला अत्तर बनवत, निसर्गसोहळ्याची सुरवात करते.
मित्रा, बीटच्या आणि पाण्याच्या मातकट चवीला देखील जिओस्मीन जबाबदार आहे बरंका. जी लोकं पेयजलासाठी नदीनाल्यांवर अवलंबून असतात, त्यांच्या पाण्याला जिओस्मीन मुळे विशिष्ट, मातकट चव येते. पण जिओस्मीन, ऍसिडिक वातावरणात टिकत नाही. त्यामुळे पाण्याचा पीएच कमी झाला की जिओस्मीनचं विघटन होतं आणि त्याचा वास जातो. मातीच्या सुपीकतेची पावती हा जिओस्मीन देतो. ज्या मातीला हा सुवास जास्त ती माती सुपीक, जिवंत, आणि योग्य सामू असलेली आहे असं समज.
आपलं नाक जिओस्मिनच्या बाबतीत अगदी तीक्ष्ण आहे बरंका! एका लिटर पाण्यात ०.००६ मायक्रोग्राम जिओस्मीन टाकल्यावर जेवढं प्रमाण होईल, तेवढ्या अत्यल्प जिओस्मीच्या वासाला माणसाचं नाक ओळखू शकतं. भारतात फार पूर्वीपासून मातीच्या या अत्तराचं उतपादन लोकं करतात. जसं मातीच्या भांड्याला तापवून डिस्टिलेशन द्वारे (स्व) देशी दारू बनवतात, त्याच पद्धतीने मातीचं अत्तर बनवलं जातं. फरक फक्त एवढा, ‘ती’ गुळापासून आणि ‘ते’ मातीपासून बनतं. तुला माहितीये, आधुनिक संशोधकांनी सायनोबॅक्टेरियाच्या डीएनए मधील जिओस्मीन साठी जबाबदार ‘जीन’ देखील शोधून काढलाये. म्हणजे भविष्यात एखाद्या जिवाणूच्या शरीरात हा जिओस्मीनचा जीन टाकला, की हवं तेवढं मातीचं अत्तर फॅक्टरीत बनवता येईल. म्हणून म्हणतो मित्रा, मातीचा हा वास अमेझॉन मार्गे फॅक्टरीतून येण्याअगोदर, निसर्गात जाऊन एन्जॉय करून घे.
अरे, हा मान्सून दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतो आणि पंगतीतल्या वाढप्यासारखा, मध्य, उत्तर भारताच्या पत्रावळीत पाणी वाढत पार हिमालयाला भिडतो. आपल्या प्रवासात तो धूर, धूळ, फॅक्टऱ्यांच्या धुराळ्यातून टाकलेला रासायनिक वायू सोडत हवेत गेलेल्यांना देखील, जमिनीवर आणतो. जमिनीवर साठलेली घाण, रासायनिक कचरा तो धुवून चकाचक करतो.
मित्रा, या पावसाळ्यात मान्सून, पाण्याच्या आशेने निश्चल जमिनीवर पडलेल्या बियांना अंकुरित करेल. त्यांची मुळं मातीला गुदगुल्या करत जमिनीत घुसतील. सेंद्रिय आम्लांचा पाझर तिथं सोडतील. या पाझरच्या आशेने जमिनीतील सूक्ष्मजीव मुळाभोवती सत्यनारायणाच्या प्रसादाला मुलं गर्दी करतात तशी गर्दी करतील. बदल्यात हवेतील, जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाशादी अन्नद्रव्यांचा रतीब मुळांशी घालतील. प्राणी, पक्षी, किडे जोमात वाढतील. किड्यांना आकर्षित करण्यासाठी झाडे रंगीबेरंगी, सुवासिक फुलांची आरास मांडतील. निसर्गाचा हा सोहळा हवेत, पाण्यात, मातीत आणि जमिनीवर रंगणार आहे. मुलाबाळांनी भरलेल्या घरासारखी माती जिवंत होईल, नांदती होईल. अरे, पावसाळा म्हणजे निसर्गाची दिवाळी असते. सारी सृष्टी पावसाळ्यात मेकओव्हर करेल. या सोहळ्याला तू पाचही इंद्रियांनी साक्षीदार हो. या पावसाळ्यात या गोष्टी नक्की कर..
मुसळधार पाऊस खिडकीत उभं नुसतं राहून पाहू नको...
हात लांबवत, तळहातांवर झेलत पावसाचं पाणी अनुभवत वेळ घालवू नकोस..
तडक घराबाहेर पड…
थंडगार पावसाचे थेंब अंगावर झेलत चालत राहा..
लहानपणी आपण तुडवल्या मातीत, डबक्यात मुद्दाम पाय टाक, जमलं तर उडी देखील मार ..
थंडगार गढूळ पाण्याचा स्पर्श तुला भूतकाळात ओढून नेईल… तुही तुझा पोक्तपणाच्या बेड्या तोडून त्याच्याबरोबर ओढला जा..
तुटलेल्या माळेगत आयुष्यातून घरंगळलेले सवंगडी… आपल्या पदराने आईने पुसलेला निथळणारा चेहरा…यासारखं.
… बघ काही आठवतं का?
नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, शेतात जा…
ओल्या, काळ्या लोण्याच्या गोळ्याला हातात घे,
त्याचा मृदू स्पर्श अनुभव, नाकाशी नेऊन त्याचा वास छातीत भरून घे…. फुफ्फुसातून धमन्यांमार्गे पार मेंदूपर्यंत त्याच्या संवेदना पोहोचवं…
जमलं तर सुवासित मातीचा एक खडा जिभेवर ठेऊन तिची चव चाखून बघ…..
गेल्या वर्षी तू तिच्यात टाकलेल्या रसायनांच्या विचाराची इंगळी डसायचा प्रयत्न करेल.. पण तू तिला झटकून टाक..
मऊशार माती तिच्या सुपीक गर्भारतेची साक्ष देईल.. येणाऱ्या हंगामाची नांदी देईल.. ती अनुभव..
…. बघ काही आठवतं का?
काही दिवसांनी करडी सृष्टी, हिरवीगार होईल… जिवंतपणा तिच्या रोमारोमात जाणवेल.. मग बाहेर पड ..
फुलांचे सुगंधी, रंगीबेरंगी आवताण स्वीकारत फुलपाखरे, मधमाश्यांची लगबग सुरु असेल…
आपला संसार फुलवण्यासाठी पाखरांची लगीनघाई दिसेल…
पक्ष्यांचा, किड्यांचा सनईचौघडा दाहिदिशात वाजत असेल… त्यावर पानांची टाळी वाजवत, ताल धरत डोलणारी झाडं पहा…
पावसाच्या धुक्यात लपेटलेले लांबवरचे डोंगर, भिजलेल्या बकरीगत अंग आखडून उभी असलेली झाडे पहा.
जंगलात, किल्ल्यांवर, शेतात नुसता हुंदडत, हा सोहळा अनुभवत फिरत राहा…
…. बघ काही आठवतं का?
मग घरी परत ये..

ती दरवाजा उघडेल, म्हणेल.. कशाला पावसात हुंदडता? सर्दी होईल, ऑफिस बुडेल..
मग तू ”तेरी दो टकीयादी नौकरीमे, मेरा लाखो का सावन जाये’ हे गाणं गुणगुणत, हसत तिने दिलेला चहाचा कप घे..
खिडकीपाशी ये… बाहेर पाऊस कोसळतच असेल…
चहाच्या वाफाळलेल्या कपावर फुंकर मार… तिच्या वाफेने चेहऱ्यावर साठलेले दवबिंदू अनुभवतांना, खिडकीवरच्या काचेवर पावसाने जमलेलं दव पहा, त्यावर रेघोट्या ओढत, नुकत्याच जमा केलेल्या निसर्गाच्या उबदार आठवणींचा उजाळा दे….
रात्री छतावर पडणाऱ्या पावसाचे संगीत ऐकत, आयुष्यात हुकलेले पावसाळे आठवत, झोपेच्या झोपाळ्यावर झोकून दे…..
….. बघ कुणाची आठवण येते का?
मित्रा, यावर्षी, रोमारोमात हा पावसाळा अनुभव. पंचेंद्रियांच्या साक्षीने निसर्गाची अनुभूती घे…..
मान्सून आल्यावर वातावरणात, मातीत, प्राण्यात, माणसात होणारे बदल सजगपणे पहा….
व्हाट्सअप, फेसबुकवर टाकण्याअगोदर ते अनुभव मनाच्या पाटीवर कोरून घे….
आपल्या गतस्मृतींशी त्याची सांगड घाल….
हा पावसाळा पुन्हा आयुष्यात येणार नाही असं मनाला बजावून सांग….
या पावसाळ्यात, एक दिवसतरी हे नक्की कर…
… मग बघ माझी आठवण येते का?

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

खूप छान शब्दांकन आहे सतिश .
प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखे वाटले.
धन्यवाद
फारच छान.
फारच छान. “काळया लोण्याचा गोळा ..” अतिशय सुंदर उपमा दिलीत.
आपल्या लेखनातून मी अनुभवले ” माती , पाऊस , फळं , फुले , किटक , सुंदर निसर्ग , या सर्वां मधुन साजरा होणारा अलौकिक ” निसर्ग सोहळा “
फारच अप्रतिम………….