drsatilalpatil Tondpatilki भाग-१५ मुंगीबाई मुंगीबाई !

भाग-१५ मुंगीबाई मुंगीबाई !

भाग-१५ मुंगीबाई मुंगीबाई ! post thumbnail image

आज रविवार. सुट्टीचा दिवस. शेतातील घरासमोर बसलो होतो. मोबाईल जवळ नसल्याने, दर पाचदहा मिनिटाला काहीतरी हरवलंय असं वाटून हात उगाचच खिसे चाचपायचे. मग मेंदूने, मोबाईल आपण घरात ठेवलाय! अशी आठवण करून दिल्यावर हात पुढच्या पाचसहा मिनिटासाठी शांत व्हायचे. डोक्यातले विचारांचे किडे वळवळत होते. तेवड्यात एक मुंगी माझ्या पायावर चढली. मी नकळत तिला झटकली. हा झटका तिच्यासाठी ‘जोर का झटका’ ठरला. काही क्षण पायांची जोरदार हालचाल करत ती धारातीर्थ पडली. मी तिचं निरीक्षण करत होतो. बिच्चारी ! तिच्या नशिबी असं एकलकोंडं मरण असेल. तिच्या जागी माणूस असता तर, अपघाताची गम्मत पाहायला माणसांची गर्दी जमली असती. डोक्यात मुंगीच्या विचारांच्या मुंग्या गोळा होत असतांना त्या मेलेल्या मुंगीजवळ कोण जाणे कुठून, एक मुंगी अवतरली. तिच्याभोवती एक फेरी मारली. नुकसानीचा अंदाज घेतला आणि मेलेल्या मुंगीच्या तोंडाजवळ तोंड नेऊन काहीतरी बोलल्यासारखं केलं. मी मुंगळा नसल्याने ते मला ऐकू आलं नाही. तेव्हड्यात कुणीतरी व्हाट्सअप केल्यासारखी दुसरी मुंगी तिथं आली. अश्या प्रकारे पाचदहा मिनिटांनीं चारपाच मुंग्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यां सर्वांनी मिळून मुंगीचं कलेवर उचललं आणि निघाल्या. माझ्या कुतूहलाचा राबरबॅंड ताणला गेला आणि त्यांची ही मिरवणूक मी काळजीपूर्वत न्याहाळू लागलो.

मुंग्या आकाराने लहान असल्या तरी उत्क्रांतीच्या प्रवासात त्यांनी इतर किड्यांपेक्षा चांगली मजल मारलीये. जसे आपले पूर्वज माकडे होती, तश्या मुंग्या ‘वेस्पॉइडिया’ गांधीलमाश्यांपासून करोडो वर्षांपूर्वी उत्क्रांत झाल्या आहेत. हा काळ किती जुना आहे याचा अंदाज येण्यासाठी म्हणून सांगतो, पृथ्वीवरील सपुष्प वनस्पती सुद्धा मुंग्यांनंतर विकसित झाल्या आहेत. या कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रवासात, माकडाचा माणूस होतांना त्याची शेपटी गेली आणि गांधीलमाशीची मुंगी होतांना तिने पंख गमावले. पृथ्वीवर मुंग्या अत्र-तत्र-सर्वत्र आहेत. अंटार्टिका आणि काही तुरळक ठिकाणं सोडल्यास, पृथ्वीवर सगळीकडे मुंग्यांचा अधिवास आहे. आतापर्यंत बावीस हजार प्रजातीचं वर्गीकरण केलं गेलय.

मुंग्यांचं सामाजिक जीवन अतिशय सुसंघटित आणि नियोजनबद्ध असतं. त्याला शास्त्रीय भाषेत ‘इउसोशिअलिझम’ म्हणतात. मुंग्या सहजीवनाचा आदर्श आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंग्या एकट्या राहत नाहीत, तर हजारोच्या, लाखोंच्या संख्येने वसाहत करून राहतात. या वसाहतीतील मुंग्यांचे राणी, नर आणि मादी असे तीन प्रकार असतात. माद्यांमध्ये कामकरी आणि सैनिक उप-प्रकार पडतात. प्रत्येकाचे काम वाटून दिलेले असते. त्याप्रमाणे निमूटपणे त्या काम करतात. कामकरीला राणी व्हायची हाव झाली नाही की, सैनिकाला कामकरी व्हावंसं वाटलं नाही. सर्वजण निसर्गाचे नियम पाळत नैसर्गिकपणे जगताहेत, त्यामुळे मुंग्यांच्या वारुळात उठाव, सत्याग्रह, मोर्चे वगैरे झाल्याचं ऐकिवात नाही. आपापल्या कामाप्रमाणे त्यांच्या शरीराची घडण झालेली असते. राणीचं एकच काम, तीने  आयुष्यभर फक्त अंडी देण्याचं आणि लोकसंख्यावाढीचं काम करत राहायचं. तसं म्हणायला वसाहतीत इतर मादी मुंग्या असतात. पण त्या वांझ असतात. संपूर्ण वसाहतीत फक्त राणीची कूस उगवते. इतर माद्या बाळबाळंतीणीची काळजी घेणे, घरट्यात डागडुजी करणे, अन्न गोळा करणे, संरक्षण करणे यासारखी कामं करतात.

मुंग्यां नराचा फक्त कामापुरता वापर करतात. त्यांचा उपयोग फक्त राणीच्या गर्भधारणेसाठी होतो. अगदी थोड्या काळासाठी ते वसाहतीत असतात. एकदा का त्यांचं काम झालं, की ते मारतात. राणीच्या शरीरात एक कप्पा असतो. त्याला ‘स्पर्म्याथिका’ असं म्हणतात. राणी या कप्प्यात, नराचे शुक्राणू काही वर्षे साठवून ठेऊ  ठेवते. त्यामुळे एकदा का नराची सोबत केली की त्याचे जीवनकार्य संपले. शरीरात साठून ठेवलेले शुक्राणू भविष्यात शेकडो अंड्यांची निर्मिती करण्यासाठी राणी वापरते.     

राणी जेव्हा नवीन वसाहत तयार करते आणि नवीन घरात पाहिलं अंड घालते, तेव्हा पहिल्या बाळाची ती स्वतः काळजी घेते, त्याचं पालनपोषण करते. पहिली पिढी मोठी झाल्यावर मग ते वसाहतीच्या कामाचा ताबा घेतात आणि नवीन पिढी त्यांच्या देखरेखीखाली काम करते. काही कारणाने राणी आजारी पडली आणि मृत्युपंथाला लागली, तर राणी एकीची निवड करते आणि तिच्यावर ‘फेरोमोनचा’ श्राव टाकते. त्यामुळे इतर मुंग्या तिला खाऊपिऊ घालू लागतात. ती धष्टपुष्ट होऊन नवीन राणी बनते आणि जुनी राणी समाधानाने मृत्यूला सामोरी जाते.

मुंग्या, संवाद कसा साधतात? भाषा कोणती बोलतात? हा प्रश्न मराठीत पडला असेल. आपला अँटेना दुसऱ्या मुंगीच्या अँटेनाशी घासून आणि जैवरसायनांचा वास सोडून त्या एकदुसऱ्याशी संवाद साधतात. जर एखादी जखमी झाली, तर तिच्या ग्रंथींमधून फेरोमोनचा गंध हवेत सोडते. हा वायूसंदेश मिळताच इतर मुंग्या येतात आणि जखमी मुंगीला उचलून नेतात. माणसांसारखा, हे अपघातस्थळ आमच्या हद्दीत येत नाही, वगैरे कामचुकार करणं त्या देत नाहीत. तिला आपल्या वसाहतीत परत आणतात, औषधी लाळेने मलमपट्टी करतात आणि पुन्हा लढाईसाठी तयार करतात. एखादी मुंगी मेली, तर तिच्यापासून रोगाचा संसर्ग वसाहतीत पसरू नये म्हणून तिला दूर नेतात. त्यांच्या स्मशानभूमीची जागाही ठरलेली असते. सगळ्या मेलेल्या मुंग्यांना त्या विशिष्ट जागीच नेऊन टाकतात. त्या जागी मेलेल्या मुंग्यांचा ढीग जमा होतो.

तुम्हाला माहितीये?, मुंग्या शेतीदेखील करतात. काय, मुंग्या आणि शेती? हे ऐकून डोक्याला मुंग्या आल्या ना? सांगतो. झाडांवर मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकूण, व्हाईटफ्लाय म्हणजे पांढरी माशी आणि अफीड म्हणजे मावा, यासारख्या रस शोषणाऱ्या किड्यांचा संसर्ग होतो. हे किडे पानाच्या मागच्या भागावर अंडी टाकतात. या अंड्यातून पिलं बाहेर आली, की ती पानाचा रस शोषायला सुरवात करतात. आपण सोसायटीच्या कर्जाऊ पैशाने विकत घेतलेल्या खतातील अन्नद्रव्ये, झाडामार्फत किड्याच्या पोटात जातात. थोडक्यात शेतकऱ्याच्या सोसायटीच्या कर्जातून किड्यांचं पोषण होत असतं. किड्यांच्या बालसंगोपन कार्यक्रमातून ती मोठी होतात. मोठं होत असतांना एक प्रकारचा चिकट, मधाळ, गोड पदार्थ ते आपल्या शरीरातून बाहेर टाकतात. ही साखरपेरणी मुंग्या हेरतात. या मधाळ किड्यांची, मुंग्या काळजी घेतात. किड्यांना मारण्यासाठी लेडीबर्ड बीटल सारखा परभक्षी किडा आलाच तर त्याच्याशी लढाई करून त्याला हुसकून लावतात. आपल्या बकऱ्यांच्या काळपाचं कोल्ह्यापासून संरक्षण करण्यासारखा हा प्रकार आहे. अश्या प्रकारे किड्यांच्या मधावर मुंग्यांची उपजीविका होत असते. जर एखाद्या ठिकाणी अन्न कमी पडतंय, किंवा किड्यांची गर्दी झालीये आणि पानाचं शोषण होऊन पार चाळण झालीये, आपल्या पाळलेल्या किड्यांना अन्नाची टंचाई भासू लागली हे जाणवलं, की मग या मुंग्या, मांजराने पिलाला अलगद तोंडात पकडून न्यावं, तसं या किड्यांना तोंडात पकडून कोवळ्या लुसलुशीत, ताज्या पानांवर नेऊन सोडतात. उचलून नेतांना किड्याने गडबड करू नये म्हणून त्याला नशा येईल असं रसायन त्याच्या शरीरात सोडतात. अश्या नशेतल्या बेशुद्ध किड्याला इतरत्र नेणं सोपं असत.

या मधाच्या शेतीत अजून एक अडचण आहे. प्रौढ मावा किड्याला पंख असतात. मोठा झाल्यावर तो उडून जाऊ शकतो. मुश्किलीने पाळलेला कळप हातातून सुटन्याची भिती असते. पण मुंग्यांना रसायनशास्रात पैकीच्या पैकी मार्क असावेत. माव्याला केलेल्या रसायनीक नाशापानामुळे, त्याच्यात पंख उगवायची क्षमताच नष्ट झालेली असते. त्यामुळे जीवनभर तो किडा, मुंग्यांना मधाचा रतीब घालत असतो. 

माणसापेक्षा मुंग्यांनी कित्येक उन्हाळे-पावसाळे जास्त बघितले आहेत. माणसा आगोदर लाखो वर्षांपासून मुंग्या पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. मानवाच्या सहजीवनाची कल्पना, मुंग्यांसारख्या सामाजिक किड्यांपासून घेतलीये असं म्हणतात. समाजातील कामाची विभागणी, एकदुसऱ्याला सांभाळत वसाहत वाढवणे, तिचे संरक्षण करणे, सर्वांसाठी अन्न गोळा करणे, एकदुसऱ्याची काळजी घेणे, जखमींची मलमपट्टी करणे आणि मेलेल्याच्या शरीराची विल्हेवाट लावणे, यासारखे, आपले कित्त्येक गुण मुंग्यांशी जुळतात. तसं असेल तर, तो मुंग्यांचा मार्ग आपण का सोडला. इतरांपेक्षा जास्त वाढलेला आणि आपल्या डोक्यात गेलेला मांसाचा गोळा, ज्याला आपण मेंदू म्हणतो, त्यामुळे आपण हवेत गेलोय का? स्वतः विश्वाचे स्वयंघोषित सरदार बनलोय का? असं असेल तर मग आपली वासाची भाषा कुठेय? डोक्यावरील अँटेनाने, न बोलता संपर्क साधायची जादू कुठाय? आपल्या शरीरातील निसर्गाने दिलेल्या शक्ती गमावून यंत्राच्या गर्दीत, आपण असे का हरवत चाललो आहोत?

मुंग्यांचं बरंय! निसर्गाचे नियम पाळून, नैसर्गिक (सह)जीवन त्या जगताहेत. त्यांचं प्रवाही ‘सहजीवन’ हे ‘सहज जीवन’ बनलं आहे. पण माणूस मात्र आयुष्यात ‘सहज जीवनाचा’ योग यावा म्हणून ‘सहज योगा’ करत सहज-क्षण शोधत फिरतोय. पाठीशी सुखसोयीची गाठोडी घेऊन ‘मला सांगा सुख म्हणजे काय असतं?’ असं अश्वस्थम्यासारखं विचारात फिरतोय. बा माणसा !, सुखी आयुष्याची गोड साखर चाखायची असेल तर मुंगी बन ! हत्ती बनलास तर, मात्र फक्त लाकडं फोडायला लागतील !

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “भाग-१५ मुंगीबाई मुंगीबाई !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भाग- १९. संकटमोचकभाग- १९. संकटमोचक

‘लै फडफड करतोय हा पाकिस्तान, एक अणुबॉम्ब टाकून संपून टाकायला पाहिजे याला’ माझा एक मित्र तावातावाने बोलत होता. विषय नेहमीप्रमाणे ‘भारत आणि पाकिस्तान’ हा होता. ‘तो रशिया बघा, अमेरिका युरोपची

भाग- १०. जरा थंड घे!भाग- १०. जरा थंड घे!

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे

भाग-४: अनर्थभाग-४: अनर्थ

भाग-४: अनर्थ आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत