आटपाट कळपात ‘टिंगी’ नावाची लहानगी गोंडस मेंढी राहत होती. छोटीशी पांढऱ्याशुभ्र लोकरीची ‘टिंगी’ तिच्या कुटुंबासोबत जंगलातील मेंढ्यांच्या कळपात राहायची. हा कळप डोंगराच्या कड्याशी, माळरानावरील पंचवीसतीस एकरावरील कुंपणात वसला होता. या कळपाचा मेंढपाळ सहृदयी आणि मेंढ्यांची काळजी घेणारा म्हणून मेंढीजगतात प्रसिद्ध होता. त्याच्या कळपात शंभर-सव्वाशे मेंढ्या होत्या. वडिलोपार्जित मेंढ्यांपासून बनलेला हा कळप तो मोठ्या चतुराईने सांभाळत होता. मेंढपाळाचा धंदा तेजीत होता. मेंढ्यांपासून लोकर मिळायची. मटण-आतडीबरोबरच, कातडीचा कातडीबचाव धंदा देखील बक्कळ पैसा मिळवून देत होता. ताजं दूध तर तो विकायचाच, पण त्याचबरोबर तूप, लोणी आणि इतर दुधाचे पदार्थदेखील त्याला चांगला नफा देऊन जायची. त्यांच्या लेंड्यांपासून कसदार खत तयार व्हायचं. थोडक्यात जन्माला आल्यापासून ते मृत्यूपश्चात प्रत्येक मेंढीपासून त्याला फायदाच फायदा होता.

आपल्या कळपाला ताब्यात ठेवतांना त्याला शेजारील मेंढपाळाचा त्रास होताच. प्रत्येक काळपमालकाला दुसऱ्याचा कळप हडपायचा होता. त्याच्या मेंढ्या हव्या होत्या. जास्त मेंढ्या म्हणजे जास्त धंदा आणि जास्त धंदा म्हणजे जास्त फायदा. त्यासाठी जास्त मेंढ्या आणि पर्यायाने जास्त जागा हवी. म्हणून बाहुबळाच्या जोरावर दुसऱ्याचा कळप हडपण्याचा सतत प्रयत्न होत असे.
हा धंदा टिकवून ठेवण्यासाठी मेंढ्यांची निगा राखणे, त्यांची तब्येत व्यवस्थित ठेवणे आवश्यक होते. धंद्यासाठी मेंढी धष्टपुष्ट हवी. त्यासाठी मेंढ्यांच आरोग्य जपणं महत्वाचं होत. कळपातील मेंढ्यांना अन्नसुरक्षा मोहिमेअंतर्गत पोटभर अन्न आणि वेळेवर औषधपाणी मिळायचं. आपला मेंढपाळ, आपल्या तब्येतीची किती काळजी घेतो हे पाहून मेंढ्यांचा उर भरून यायचा.
आपल्या कळपाचं आजूबाजूच्या मेंढीचोरांपासून रक्षण करणे गरजेचे असायचे. मेंढ्यांची सुरक्षा महत्वाची होती. मेंढपाळांच्या वडिलांच्या काळात मेंढ्या मोकळ्या रानात चरायच्या. पण आता काळ बदलला होता. त्याला सुरक्षेबरोबरच कळपावर नियंत्रण देखील हवं होत. त्यासाठी मेंढपाळाने रानाला मजबूत सिमेंटच्या भिंतीचं कुंपण घालून घेतलं होतं. खरं सांगायचं तर मेंढ्या पळून जाऊ नये म्हणून ती भिंत होती. पण या भिंतीचा, मेंढ्यांना भलताच अभिमान होता. आमचं चोरांपासून, कोल्ह्या-लांडग्यांसारख्या जंगली प्राण्यांपासून आणि परकीय शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी मेंढपाळ किती काळजी घेतो याचं त्यांना कायम अप्रूप वाटे.
मेंढपाळाच्या व्यवसायाची सुरवात त्याच्या वडिलांनी दिलेल्या दोन लख्ख पांढऱ्या रंगाच्या मेंढी-मेंढ्या च्या जोडीपासून झाली होती. या जोडीपासूनच पुढे संपूर्ण कळप बनला होता. त्यामुळे कळपातील सर्व मेंढ्या जवळपास एकाच रंगाच्या, म्हणजे पांढऱ्या दिसायच्या. लांब डोंगरापलीकडील कळपात, काळ्या रंगाच्या मेंढ्या राहतात अशी माहिती पांढऱ्यांच्यात काही बुजुर्ग पुरवायचे. एवढंच काय पण अजून दूरवरच्या कळपात लाल रंगाच्या मेंढ्या देखील आहेत, अश्या कहाण्या ते रंगवून सांगायचे. फार पूर्वी, जेंव्हा मेंढपाळाने कुंपणाच्या भिंती घातल्या नव्हत्या आणि एकातून दुसऱ्या कळपात जातांना पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नसायची, तेव्हापासून, या लाल-काळ्या मेंढ्या अस्तित्वात असल्याच्या कथा ऐकिवात होत्या. लहानगी टिंगी आपल्या पांढऱ्याशुभ्र लोकरीशी चाळा करत, या सुरस कहाण्या ऐकन्यात गुंग व्हायची. आपला पांढरा रंग, इतर मेंढ्यांपेक्षा कसा सरस आहे हे मेंढपाळाने त्यांना पटवून दिल्यापासून, त्यांचा पांढरा आत्मविश्वास वाढला होता. काळ्या किंवा लाल मेंढ्या आपला वंश भ्रष्ट करतील या भीतीने त्यांनी, त्या आपल्यात येणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करत, आंदोलने केली होती. याची दाखल घेत मेंढपाळाने सीमाभिंत अजून मजबूत केली. आतबाहेर करायला फक्त एकच दरवाजा ठेवला. भिंतीबाहेर येण्याजाण्याला बंदी घातली.
‘टिंगीच्या’ या कळपात बेss… ची भाषा बोलली जायची. रंगाबरोबर भाषेचा देखील येथील मेंढ्यांना अभिमान होता. आपली भाषा जगात भारी असून, इतर भाषा म्हणजे डाऊन मार्केट अशी धारणा मेंढपाळाने त्यांच्यात रुजवली होती. चुकून कुणी दुसऱ्या भाषेतील शब्द वापरले, तर आपल्या बेss…च्या भाषेची बेअदबी झाली झाली, या कारणाने सार्वजनिक असंतोष पसरायचा. संप व्हायचे. कळपातील मेंढ्या व्यस्त राहाव्यात म्हणून मेंढपाळ अधूनमधून असे वाद त्यांच्यात पेरत राहायचा. मेंढपाळाने कळपात काही राजकीय पक्ष देखील तयार केले होते. या पक्षांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर वाद उकरून काढत भांडत राहायचं आणि सामान्य मेंढ्यांना त्यात अडकवून ठेवायचं हेच त्यांचं काम होतं.
मेंढ्यांना नियंत्रित करण्यासाठी मेंढपाळाने नियम बनवले. त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिकलेल्या मेंढ्यां हव्या. मग साक्षरता अभियानांतर्गत शाळा सुरु झाल्या. साक्षर मेंढ्यांना कामावर ठेवले गेले. दगडाची नाणी घडवून त्यांना चलन म्हणून उपलब्ध करून दिले. या चलनाच्या बदल्यात साक्षर मेंढ्यांना नोकरी आणि पगार देऊन, पैशाच्या आमिषाने बांधून ठेवलं. दगडी चलनाची कर्जे देऊन बँक, पतसंस्था मार्फत पैशाचं दावं कळपातील प्रत्येक मेंढीपर्यंत नेलं. नाणी घडवणं मेंढपाळांच्या हातात असल्याने, हवं तेव्हा, हवं तेवढं चलन तो घडवायचा.
एवढ्या मेंढ्यांना चारा हवा. त्यासाठी चाऱ्याची शेती सुरु केली. मेंढ्यांच्या एका गटाची चारा पिकवण्यासाठी निवड केली गेली. त्यांचं काम फक्त चार पिकवणं. आपण संपूर्ण कळपाचं पोषण करतो असा अभिमान त्यांच्यात मेंढपाळाने भरला. या अभिमानात त्यांनी शेतीव्यवसायात स्वतःला वाहून घेतले.
कळपातील मेंढ्यांची संख्या वाढत होती. पूर्वी तो गुलामासारखं मेंढीला दोरीने, साखळीने बांधून ठेवायचा. एवढ्या मोठ्या संख्येतील मेंढ्यांना दावणीला बांधून ठेवणे कठीण काम होतं. सुरवातीला काठीचा वापर करून मेंढ्यांना काबूत ठेऊन दावणीला बांधलं जायचं. पण पुढे मेंढ्यांना याची सवय झाली. त्या काठीला जुमानत नाहीत हे ओळखून, तलवारी-भाल्याचा शोध लावला. त्यांची जरब काही वर्षे टिकली. मेंढ्यांनी त्यावरही उपाय शोधाला. दावणीला बांधतेवेळी, लोकर, दूध काढायच्या आधी, त्या लांब पोबारा करत आणि लपून बसत. मग मेंढपाळाने बंदुकीचा शोध लावला. एखादी मेंढी हाताशी येईनाशी झाल्यावर, तिला गोळी घालायची आणि तिच्या मटणाचा, कातडीचा व्यापार करायचा. लांबवर पळणाऱ्या मेंढ्यांना त्यामुळे काबूत ठेवता येऊ लागले. तरीही आपल्या नजरेआडच्या मेंढ्यांना काबूत कसं ठेवायचं, त्यांच्या पायात दावं कसं बांधावं हा प्रश्न होताच. मेंढ्यांना शरीराने बांधून ठेवण्यापेक्षा, मानसिक दाव्यात कसं बांधता येईल याचा तो विचार करू लागला. त्यासाठी मेंढपाळाने अंमली पदार्थाचा वापर करायला सुरवात केली. त्यामुळे नशेतील मेंढ्यांना पकडणे, त्यांचे दूध, लोकर काढणे सोपे जाऊ लागले. या अमली पदार्थांवरील भरभक्कम कर आकारणी मेंढपाळाची तिजोरी भरायला उपयोगी पडू लागली. पण हा धंदा बेकायदेशीर आहे हे शिकलेल्या मेंढ्यांना माहित होते, त्यामुळे मेंढपाळाला हा धंदा उघडपणे करता येत नव्हता. इतर मेंढयांद्वारे तो हा व्यवसाय करवून घेत होता. पण या नशेच्या दावणीला सर्व मेंढ्या बांधता येणार नाहीत याची त्याला कल्पना होती.
मेंढपाळांच्या सुपीक डोक्यात एक जगावेगळं दावं बनवायची कल्पना शिजली. त्याने उच्च शिक्षित मेंढ्यांना कामाला ठेऊन, इंटरनेटचं महाजाल बनवलं. पण हे महाजाळं प्रत्येक मेंढीपर्यंत कसं पोहोचवायचं कसं हा प्रश्न होता. त्यासाठी मोबाईलचं आमिष तयार करून त्याने मेंढ्यांपर्यंत पोहोचवलं. मेंढीमेंढीच्या हातात (म्हणजे पायात), मोबाईल आल्यामुळे इंटरनेटचं दावं त्यांच्या गळ्यात घट्ट बांधलं गेलं आणि कळपातील एकूणएक मेंढी ताब्यात आली. हवं तेंव्हा, हवा तसा तिचा उपयोग करता येऊ लागला.
सुरवातीच्या काळात ज्यांच्या ‘बी’ मध्ये (अर्थात भुजबळामध्ये) ‘जोर तो शिरजोर’ या उक्तीप्रमाणे, मेंढपाळाने ताकदीच्या जोरावर मेंढ्याना बांधून ठेवले. नंतर तो शहाणा झाला आणि ज्यांच्या ‘बी’ मध्ये (इथं मात्र ‘बी’ म्हणजे बुद्धिबळामध्ये) ‘जोर तो शिरजोर’ हे ओळखून त्याने, भुजबळवाल्यांसोबत, राजकारणी, व्यापारी, शेतकरी यांच्यासह कळपातील तमाम मेंढी जनतेला इंटरनेटच्या साखळदंडाने बांधून ठेवले. कळसूत्री बाहुल्यांसारखा हव्या तेव्हा तो दोऱ्या ओढत खेळ करू लागला.
सध्या प्रत्येक मेंढीच्या हातात मोबाईल आहे. स्क्रोलिंगच्या व्यसनात त्या मस्त आहेत. पूर्वी लोकर कापताना, दूध काढतांना किंवा मटणा-कातडीसाठी मेंढी मारतांना विरोध व्हायचा, त्या पळून जायचा प्रयत्न करायच्या. त्यांना काबूत ठेवणे, बांधून ठेवणे कठीण व्हायचे. पण मोबाईलचं दावं गवसल्यापासून मेंढपाळाचं काम सोप्प झालाय. त्याला विनासायास लोकर, दूध, मटण आणि कातडी मिळू लागलीय. भाषा, रंग, जातीधर्माचं राजकारण आता मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून खेळता येत. प्रत्येक मेंढी हातात मोबाईल घेऊन ‘पिशाच्च झोंबी’ सारखी फिरतेय. आजूबाजूला काय सुरु आहे याच देखील तिला भान उरलं नाहीये. मोबाईलच्या नशेत ती गर्क असतांना, तिची लोकर उतरवून तिला निर्वस्त्र केलं जातंय. तिच्या पिलांसाठीचं दूध पळवलं जातंय. प्रसंगी मटणासाठी तिचा बळी दिला जातोय…….. दारूसारख्या अंमली पदार्थाच्या नशेवर उतारा आहे. पण या इंटरनेटच्या नशेवर उतारा आहे का? असा प्रश्न, ‘कुणी घर देता का?’ या चालीवर काही सुज्ञ मेंढ्या विचारताहेत.
(या कहाणीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही चर-आचर, सजीव-निर्जीव, व्यक्ती अथवा घटनेशी काडीचाही संबंध नाही. योगायोगाने आपल्याला काही साधर्म्य वाटल्यास तो भास समजावा आणि चिंतन करावे ही विनंती.)

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
क्या बात हैं!! डॉक्टर साहब.. आगदी सनसनीत चपराक दिली आहे तासनतास मोबाईल वापर करणार्या नेटकर्यांना
बें बेन बेन…
सद्यस्थितीचे छान दर्शन घडविले……….
सद्य परिस्थिती चे छान दर्शन घडविले.