प्रसंग: पहिला
स्थळ: डोंगरातील गुहा.
काळ: आदि (मानवाचा) काळ
वेळ: आदीपहाट
आदिमानवाचं बाळ: ‘पोट दुखतंय!’
आदीआई: ‘बाळा आज नदीपलीकडच्या जंगलात जाऊया जेवायला. तिकडे ते लांब पानाचं झाड आहे ना, ते खाल्लं की होईल पोट बरं’.
आईने बाळाला पाचसहा किलोमीटर दूर नदीपलीकडच्या जंगलात कडे नेलं. हिंस्र प्राण्यांपासून स्वतःला वाचवत, झाडावरून, डोंगरकड्यावरून उड्या मारत, पोहत दोघं नदीपलीकडे गेले. बाळाला लांब पानाच्या झाडाची औषधी पानं खाऊ घातली. संध्याकाळी गुहेत परत येईस्तोवर आदिबाळाची पोटदुखी गायब झाली. बाळ आनंदाने गुहेत बागडू लागलं, झाडा-वेलीवर लटकत माकडांसह खेळू लागलं.
************************

प्रसंग: दुसरा
स्थळ: भारतवर्षातील एक गाव
काळ: मध्ययुग
वेळ: दिवेलागण
मध्ययुगीन बाळ: ‘ हे माते! पोटशूळ उठलाय !’
मध्यआई: ‘बाळा आज कमी खा, आराम कर. मी झाडपाला वाटून पोटावर बांधते. संध्याकाळपर्यंत बरं वाटेल’.
मध्याई दिवा घेऊन, घरामागच्या जंगलात गेली. औषधी झाडपाला तोडून आणला. वरवंट्यावर वाटून बाळाच्या पोटावर बांधला. त्या दिवशी हलका आहार दिला, थोडं दही खाऊ घातलं. सकाळपर्यंत बाळ उड्या मारत वडीलांसोबत शेतात गेलं.
************************
प्रसंग: तिसरा
स्थळ: पाटलांचा वाडा
काळ: ऐतिहासिक
वेळ: दुसरा प्रहर
ऐतिहासिक बाळराजे: ‘मातोश्री, आमचे पोट दुखत आहे.’
ऐतिआई: ‘ चिंता नसावी बाळराजे, वैद्यांना पाचारण केलंय. ते येतच असतील.
निरोप मिळाल्या मिळाल्या वैद्यबुवा, परसबागेतील झाडांकडे गेले. झाडपाला तोडून आणला. त्याला कुटून, काढा बनवून बाटलीत भरला. दोनतीन किलोमीटर पायवाट तुडवत ते पाटलाच्या वाड्यात पोहोचले. बाळाला काढा पाजला. सोबतीला मधाळ चाटण चाटवून आराम करायचा सल्ला देऊन आणि दोन आणे घेऊन वैद्य प्रस्थान करते झाले.
************************
प्रसंग: चौथा
स्थळ: तालुक्याचं गाव
काळ: १९८० (अंदाजे)
वेळ: संध्याकाळ
विसाव्या शतकातील बाळ: ‘मम्मी, माझं पोट दुखतंय !’.
विसाव्या शतकातील मम्मी: ‘थांब हा बाळा, पप्पाना सांगते’ असं म्हणत ‘विशम’ (विसाव्या शतकातील मम्मी) ने पप्पांना, आणि पप्पांनी रामा गड्याला हुकूम सोडला. रामा गड्याला शेजारच्या गावातील डॉक्टरांना घ्यायला पाठवलं. तो सायकल मारत डॉक्टरांकडे पोहोचला. डॉक्टरांना ‘विशम’ चा निरोप दिला. लाखो रुपये भरून डॉक्टरांनी नुकतंच मेडिकलचं शिक्षण घेतलं होतं. निरोप मिळाल्यामिळाल्या त्यांनी लोखंडी पेटी भरली. कालच जिल्ह्याहुन आणलेली औषधं पेटीत टाकली. ही औषधं परदेशी कंपनीने स्वदेशी पैसा ओढत भारतात निर्यात केली होती. जिल्ह्याच्या मेडिकल दुकानात येण्याअगोदर, ती औषध मेडिकल कंपनीने त्यांच्या फॅक्टरीत हजारो कामगार वापरून आणि शेकडो टन प्रदूषकं हवेत, पाण्यात आणि मातीत सोडून बनवली होती. वेगवेगळ्या प्रकारचा रसायनीक कच्चा माल वापरला होता. हे औषध त्यांच्याऐवजी इतर कोणीही बनवू शकणार नाही यासाठी त्यांनी पेटंट देखील मिळवलं होतं. हा ‘राकमा’ (सायनीक कच्चा माल) बनवतांना देखील निसर्गाची बक्कळ वाट लागली होती.
आपल्या राजदूत फटफटीवर, रॉकेलचा धूर उडवत डॉक्टर साहेब आले. पाणी गरम करायला सांगितलं. त्यामध्ये इंजेक्शन आणि सिरिंज टाकली. हे प्लास्टिकचं इंजेक्शन पेट्रिलियम पदार्थापासून बनवलं होत. हे पेट्रोलियम पदार्थ आखाती देशातून आयात केले गेले होते. तिथं हजारो कामगारांना रोजगार आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने निसर्गाला, रोज गार करत मिळवलं होत.
सिरिंज निर्जंतुक झाल्यावर डॉक्टरांनी त्यामध्ये औषध भरलं. बाळाला ते टोचलं. इंजेक्शनच्या वेदनेने बाळ कळवलं. बाळाच्या कळवळन्याने आई कळवळली. आईच्या वेदनेने बाळाचा पिता टेन्शन मध्ये आला. मग त्याने खिश्यात हात घालून, राष्ट्रपित्याचा फोटो असलेली नोट, डॉक्टरांच्या हातात ठेवली. अश्या पद्धतीने बाळाच्या पोटदुखीसाठी निसर्गाचा आणि फटफटीचा धूर उडवत, डॉक्टर धुळभरल्या रस्त्यावरून धुराच्या डोंगराआड दिसेनासे झाले.
************************
प्रसंग: पाचवा
स्थळ: सिमेंटच्या जंगलातील महानगर
काळ: २०२२
वेळ: मॉर्निंग (स्कुल मध्ये जाण्याची वेळ)
एकविसाव्या शतकातील बब्बू: ‘मॉम, माझ्या स्टमक मध्ये खूप पेन होतंय !’.
एकविसाव्या शतकातील मॉम: ‘ओ माय गॉड!’
ती घाबरली. तिला टेन्शन आलं. घाईघाईने डॅडीच्या मोबाईलवर फोन केला. त्यांचा आयफोन सायलेंट मोडवर होता. माणसाच्या अनैसर्गिक, लाइफस्टाईमुळे होणाऱ्या रोगांवर, नवीन ऍप बनवायच्या प्रोजेक्ट मीटिंगमध्ये डॅड बिझी होते. शेवटी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला. तिने तातडीचा निरोप पोहोचवला. डॅड विसाव्या मजल्यावरील त्यांची मिटिंग सोडून, पाचव्या मजल्यावरील पार्किंगमध्ये धावले. आपली बीएमडब्लू कार, वेगाने पार्किंगबाहेर काढत, रस्त्यावरील सर्व सिग्नल तोडत, ते घराकडे निघाले. त्यांच्या हृदयाची धडधड १२५ झालीये असं त्यांची स्मार्ट वॉच सांगत होतं. पाणी पिण्याचा आणि मोठा श्वास घेण्याची आठवण घड्याळ त्यांना करून देत होतं. दोन किलोमीटरवरील ऑफिसमधून घरी पोहोचायला, डॅडींना तासभर गेला. माझ्या बब्बूला काय झालं असेल? त्याचं अपेंडिक्स वाढलं असेल का? का किडनीचा विकार? पोटात अल्सर तर नसेल? किंवा कॅन्सरच्या गाठी? अश्या नाना विचारांनी त्यांचा रक्तदाब वाढत होता. हातावरील स्मार्टवॉच त्याच्या तब्बेतीची टिपणं ‘बीप’ माध्यमातून देत, त्याचा ‘बीपी’ अजून वाढवत होती.
धावतपळत डॅड घरी पोहोचले. हॉस्पिटलला फोन केला. त्यांची ऍम्ब्युलन्स आली आणि पेशंटला हॉस्पिटलला घेऊन गेली. सोनोग्राफी, एक्सरे घेण्यात आला. त्यात काही निदान झालं नाही. मग उपचारासाठी आत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पहिल्या हॉस्पिटलमध्ये अँटिबायोटिकचा मारा झाला होता. अँटिबायोटिकच्या वापराने पोटातील जिवाणू कमी झाले होते. त्यावर उपाय म्हणून प्रोबायोटिक औषधं डॉक्टरांनी लिहून दिली होती. ‘हे प्रोबायोटिक म्हणजे काय? असा प्रश्न बब्बुने विचारल्यावर ‘अँटिबायोटिक खाल्ल्याने पोटातील उपयुक्त जिवाणू मरतात, उपाय म्हणून प्रयोगशाळेत वाढवलेले जिवाणू, प्रोबायोटिक औषधातून घ्यायचे’ असं उत्तर डॉक्टरांनी दिलं. त्यांनी इतर औषधंही दिले. दुधाने पोळलेले बब्बुचे डॅडी म्हणाले’ डॉक्टर, ह्या औषधांचा काही साईड इफेक्ट तर नाही ना?’ त्यावर डॉक्टर उत्तरले. काळजी नको, ते हर्बल आहेत. औषधी वनस्पतींचा अर्क काढून, त्यातून सक्रिय घटक प्रयोगशाळेत वेगळा करून, त्यापासून हे औषध बनवलं गेलय. हे १०० टक्के हर्बल, नैसर्गिक आणि पर्यावणपूरक आहे’. डॉक्टरांच्या उत्तराने डॅडी निर्धास्त झाले. निसर्गातील, झाडपाल्यातील मुक्त रानऔषधे, कॅप्सूल मध्ये बसून, पेटंटबंद होऊन हॉस्पिटलमार्गे बब्बूच्या पोटात पोहोचले होते.
हॉस्पिटलचं पाच लाखाचं बिल भरून बब्बुला घरी आणलं. इन्शुरन्स असल्याने हॉस्पिटलने बिल फुगवलं, त्यामुळे हॉस्पिटल खुश होतं, आणि इन्शुरन्स असल्यामुळेच आपल्या खिशातून बिल जाणार नाही, म्हणून बाळाचे डॅडी खुश.
या आधुनिक उपचाराने बब्बुला कमजोरी आली होती. पोस्ट ट्रीटमेंट उपचारासाठी त्याला शहरातील नॅचरोपॅथी हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं. वेगवेगळ्या वनस्पतींचे काढे, नैसर्गिक आहार, पोटातील जिवाणू वाढण्यासाठी दही, पंचकर्म, सूर्यस्नान, जलक्रिया आणि मातीप्रक्रिया, यासारख्या ट्रीटमेंट सुरु झाल्या. आठवड्याभराच्या नैसर्गिक उपचारानंतर बब्बुला घरी सोडण्यात आलं.
………. यादरम्यान बब्बूच्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा रंगली होती. शाळेला दांडी मारण्यासाठी बब्बुने पोटदुखीचं नाटक किती बेमालूम केलं, आईवडिलांचं प्रॅन्क केलं म्हणून तो हिरो झाला होता. त्याच्या व्हिडिओला दहा हजार लाईक्स मिळाले होते. मित्रांमध्ये त्याची कॉलर ताठ झाली होती.
************************
प्रसंग: सहावा
स्थळ: अंतराळ स्थानकावरील माणसाची वसाहत
काळ: ई. स. २२९०
वेळ: एमएसटी (मंगळ स्टॅंडर्ड टाइम) दहा वाजता
बाविसाव्या शतकातील बाळ: xxxxx
बाविसाव्या शतकातील आई: xxxxx
काय म्हणता? xxxx म्हणजे काय?…. या पुढे तुमची कल्पनाशक्ती चालावा ना राव ! …
ता. क.
मला चावणारे प्रश्न. निसर्गातील मुक्त वनौषधी पेटंटच्या कुलुपात बंद का? औषधे झाडपाल्यात आहेत, मग ताजा झाडपाला खाण्याऐवजी, शिळ्या गोळ्या-कॅप्सूलमधून तो का खायचा? अस्तित्वासाठी झगडणारा आदिमानव तणावविरहित होता की अणुबॉम्बने सुरक्षित आधुनिक माणूस? आधुनिक शस्त्रक्रिया करूनही निसर्गोपचार घ्यायची गरज का पडते? पृथ्वीच्या तब्ब्येतीसाठी, पर्यावरणाच्या बाबतीत अनभिज्ञ प्राचीन मानव योग्य, की पर्यावरणाच्या काळजीत मगरीचे अश्रू गाळणारा आधुनिक माणूस?

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
” निसर्ग हाच पालनपोषण करणारा ”
” निसर्ग हाच आरोग्य रक्षण करणारा ”
” निसर्ग हाच जिवन देणारा ”
” निसर्ग राहील तर जिवसृष्टी राहील “
छान.