लहानपणीचं कुतूहल स्वस्थ बसू द्यायचं नाही. माणूस कसा बनला? माकडापासून तो हुबेहूब आपल्यासारखा कसा दिसू लागला? आपल्या ग्रहावर पहिला जीव कोणता? तो कुठून आला? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात घेऊन मी फिरायचो. काही प्रश्नांची उत्तरे मिळायची, काहींची नाही. त्या काळी इंटरनेट नसल्याने गुगल बाईला विचारायची सोय नव्हती. पुढे पुस्तकांनी त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली खरी, पण या विषयातलं कुतूहल कायम राहीलं.

आपल्या ग्रहावर जीवन कसं आलं याबाबतीत वेगवेगळ्या थिअरीज आहेत. आपल्या पुराणानुसार समुद्रात मत्स्यावतारापासुन त्याची सुरवात झाली. मग पाण्यातून त्याचा जमिनीकडे प्रवास सुरु झाला आणि कुर्मावतारातील उभयचर कासवरूपाने त्याने जमीन गाठली. पुढे वराह, नरसिंह असा प्रवास करत, आपल्यातील जनावरावर मत करत तो परशुराम बनला. बाहुबली परशुरामापासून पुढे राम, कृष्ण आणि बुद्ध असा त्याचा बुद्धिबळाकडे प्रवास सुरु झाला.
गोऱ्या डार्विन काकांनी देखील जीवन समुद्रात तयार झालं असं म्हटलंय, तर डॉ. हॉयले यांनी अवकाशातून पडलेल्या उल्केमार्फत परग्रहावरून ते आलं असं म्हटलंय. अलीकडेच टेक्सास तंत्र विद्यापीठातील डॉ. संकर चॅटर्जी यांनी हायड्रो थर्मल बेसिन मुळे ते बनलय असं शोधून काढलंय. वरीलपैकी कोणतीही थेअरी घेतली तरी पृथ्वीवर जीवनाचे विरजण लागले ते समुद्राच्या पाण्यात हे मात्र खरंय. पहिला एकपेशीय पृथ्वीवासीयांचं बारसं समुद्राच्या लाटेच्या पाळण्यावर झुलत साजरी झालंहे नक्की.
कदाचित त्याच्यामुळे असेल. पाणी पृथ्वीवरील जीवव्यवस्थेत महत्वाचा अंग बनले. जीवनाच्या रिअक्शन मध्ये पाणी हे द्रावक म्हणून काम करते. ही अभिक्रिया होते आयसोटोनिक सोल्युशन मध्ये, साडेसात ते आठ पीच दरम्यान. इथला पहिला जीव एकपेशीय होता. त्याच्या पेशीमधील पाण्यात तरंगत, त्याचे पेशीअंतर्गत अवयव काम करू लागले. पुढे बहुपेशीय जलजीव तयार झाले. त्यांचं प्रजनन समुद्रातच होणं स्वाभाविकच होतं. काही जीवांमध्ये समुद्राच्या पाण्यात नर मादीच्या तरंगत्या बीजाणूंचे मिलन होऊन पुढची पिढी जन्माला येऊ लागली. पण खरी समस्या तेव्हा उद्भवली जेव्हा पाण्यातील जीव जमिनीवर येण्याची खटपट करू लागले. पाण्याऐवजी हवेतून ऑक्सिजन घेण्याची कसब शिकून तो उभयचर झाला खरा, पण प्रजननासाठी त्याच्याकडे समुद्र नव्हता. मग नियतीने त्याच्या बाळांसाठी जादूई भांड्यात समुद्र बांधून दिला. हे भांडे म्हणजे अंडे. निसर्गाने त्याला ‘वत्सा, बिनधास्त जा, तुझ्या प्रजननासाठी मी हा समुद्र तुला देतो’ असं म्हणत क्षारयुक्त जल त्याच्या जीवासह अंड्यात बांधून दिलं आणि समुद्रासारखी परिस्थिती अंड्यात तयार केली. मग पुढे सस्तन प्राण्यांनी आमचं काय? असं विचारल्यावर ‘तुम भी क्या याद करोगे’ असं म्हणत त्याच्या गर्भजलात हा क्षारयुक्त समुद्र उपलब्ध करून दिला. आजही सूक्ष्मजीव असो की महाकाय प्राणी क्षारयुक्त पाण्यातच जन्माला येतो.
संपूर्ण पृथ्वीवर पाण्याच्या प्रवाहाने जीवांच्या जीवनचक्राचा प्रवाह सुरु आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त म्हणजे ७१ टक्क्यांपर्यंत पाणी आहे आणि जवळपास तेवढंच म्हणजे ७५ टक्के पाणी अंड्यात देखील आहे. प्राण्यांच्या पेशीत देखील ७० टक्क्यापर्यंत पाणी आहे. वनस्पतींमध्ये तर ते अजूनच जास्त आहे. याचा अर्थ संपूर्ण चर-आचर मोजलं तरी सर्वात जास्त हिस्सा पाण्याने व्यापला आहे. संपूर्ण पृथ्वीतलावर अत्र तत्र सर्वत्र पाण्याचा वास आहे.
पण या पाण्यालाच माणसाने ग्रहण लावलाय असं दिसतंय. लहानपणी सर्वव्यापी कोण आहे? असं गुरुजींनी विचारल्यावर, ‘भगवान?’ असं एकसुरी उत्तर आम्ही पोरं द्यायचो. पण सध्या एका सर्वव्यापी विषाने पृथ्वीला ग्रासलंय. ‘कायमचा किंवा फॉरेव्हर’ बंध म्हणजे मैत्रीचा बंध असं म्हटलं जाते. पण सध्या ‘फॉरएव्हर केमिकल’ नावाच्या रसायनांच्या बॉण्डने निसर्ग व्यापायाला सुरवात केलीय. यांना फॉरेव्हर केमिकल असं का म्हणतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? कारण एकदा का हे रसायनं आपल्या वातावरणात घुसले की काही केल्या त्यांचं विघटन होत नाही. दशकानुदशके ते हवेत, पाण्यात फिरत राहतात.
या रसायनांना ‘पीएफएएस’ म्हणजे ‘पर अँड पॉली फ्युरो अल्किल सबस्टन्सेस’ असं म्हणतात. हा जवळपास ४७०० प्रकारच्या रसायनांचा गट आहे. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे, ते सर्व कार्बन आणि फ्लोरिनच्या बंधातून बनलेले आहेत. कार्बन आणि फ्लोरिनचा बंध ऑरगॅनिक केमेस्ट्री म्हणजेच सेंद्रिय रसायनशास्त्रात सर्वात घट्ट बंध मानला जातो. हा बंध तापमान, सूर्यप्रकाश आणि पाण्याद्वारे तोडला जाऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं झाल्यास निसर्गात त्यांना विघटित करण्याची ताकद नाही.
निसर्ग पंचमहाभूतातील घटकांना वनस्पतींच्या माध्यमाने एकत्र बांधतो आणि हवा, पाणी, सूर्यप्रकाश माती यांच्यामार्फत त्यांना विघटित करून परत मुक्त करतो.
त्याचबरोबर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्यासह तमाम सजीवांच्या शरीरात देखील रसायने विघटित केली जातात. पण ‘फॉरएव्हर रसायनं’ सजीव अथवा निर्जीव अश्या कोणत्याही घटकांकडून विघटित होत नाहीत. दिवस, आठवडे, महिने, वर्षे आणि दशके अश्वस्थम्यासारखे वातावरणात फिरत राहतात. पृथ्वीवरील नैसर्गिक जल शुद्दीकरण प्रणाली म्हणजे समुद्रातील पाण्याची वाफ होऊन ढगात जाणे आणि पावसाद्वारे शुद्ध पाणी जमिनीवर परत पाठवणे. पण हे ‘फॉरएव्हर रसायने’ या डिस्टिलेशन पद्धतीला देखील जुमानत नाही. पावसाच्या पाण्याबरोबर वारंवार ते पृथ्वीच्या वाऱ्या करत राहतात.
बरं या रसायनांमध्ये असं काळजी करण्यासारखं काय आहे? हा प्रश्न तुम्ही मला विचारणार हे गृहीत धरून सांगतो. हे रसायन घटक आहेत. त्यांच्यामुळे कॅन्सर होतो, रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, अर्भकात जन्मतः दोष येतात, वंध्यत्व, वाढ खुंटणे, कोलेस्टेरॉल वाढने, हृदयरोग यासारख्या व्याधी या फॉर एव्हर
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे रसायने शोधली गेली. आणि तेव्हापासून वेगवेगळ्या क्षेत्रात वापरली गेली. पदार्थाला उष्णता, पाणी आणि आद्रतारोधक बनवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. सनस्क्रीन, नॉनस्टिक भांडी, घरपोच येणाऱ्या अन्नाचे पॅकिंग, शॅम्पू, वॉर्निश, दात साफ करायचा दोरा, वॉर्निश, रेनप्रूफ कोट, मेकअप, वॉटरप्रूफ फर्निचर आणि कारपेट, मायक्रोवेव्हच्या पॉपकॉर्न बॅग्स, नॉनस्टिक भांडी या वस्तू तुम्ही वापरात असाल तर फॉरएव्हर रसायनांच्या संपर्कात आपण आलो समजावे. फॉरएव्हर रसायने कुठे कुठे सापडतात? असं विचारलं तर, उत्तर आहे ते देवासारखे सर्वव्यापी आहेत. जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी सापडतात. ते तिथं पोचवले कोणी? उत्तर सर्वांना ठाऊक आहेच.
अमेरिकेतील पार्कर्सबर्ग मध्ये टेफ्लॉन बनवायच्या कारखान्यातील प्रदूषणाने सर्व प्रदेश व्यापला होता. शेकडो पाळीव जनावर मारली गेली, येथील लोकांमध्ये उच्च रक्दाब आणि रक्तातील साखरेचे जास्त पातळी आढळून आली. अल्सर, कोलायटिस, थायरॉईड, किडनी कॅन्सर, लिव्हर खराब होणे, अश्या व्याधी दिसायला लागल्या.
अमेरिकेतील मानकानुसार पिण्याच्या पाण्यात ७० पीपीटी (पार्ट पर ट्रिलियन) पेक्षा जास्त ‘पीएफओएस’ नको. युरपियनांनी हि मर्यादा १०० पीपीटी पर्यंत वाढवलंय, पण या क्षेत्रात संशोधक म्हणतात की ही पातळी १ पीपीटी पेक्षा जास्त नको. ही पातळी कोणी ठरवायची आणि कोणी सांभाळायची.
सध्या नद्या नाले, विहिरी आणि भूजल प्रदूषित झाल्या आहेत. २०१६ च्या संशोधनानुसार गंगेत १५ प्रकारचे पीएफए सापडलेत. गंगेच्या उगमाजवळ ते सापडले नसून खालच्या भागात मिळाले. पाण्यातच नाही तर गंगेतल्या जवळजवळ सर्वच माश्यांमध्ये हे रसायनं सापडलेत. याच्यावरून कोणीकोणी आपापल्या पापाने गंगा मैली केलीय याची कल्पना करता येते.
२००८ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार भारतीय महिलांच्या दुधात हे ४६ पीपीटी एवढे सर्वव्यापी रसायने सापडले. अमेरिकेत दुधात हे रसायन सापडले. त्यांची पातळी होती १८५० पीपीएम. लक्षात घ्या पीपीटी हे पीपीएम पेक्षा हजारपट मोठं असत. आईच्या दुधात सुरक्षा पातळीपेक्षा २००० पॅट जास्त रसायन मिळालं. आजमितीला बहुतांश अमेरिकन लोकांच्या रक्तात कमीतकमी एक फॉरेव्हर रसायन आहे.
हे रसायन प्राणघातक आहेत. आणि ते आपल्या अन्नसाखळीत घुसलंय. शास्रज्ञ म्हणतात की ९८ टक्के लोकांच्या शरीरात फॉरेव्हर रसायनं आहेत. एवढचं नाही तर गर्भजलात आणि अंड्यांमध्ये देखील ‘फॉरेव्हर रसायनाचे’ प्रदूषण दिसून आलंय. निसर्गाने अंड्यात बांधून दिलेल्या समुद्रापर्यंत देखील हे फॉरएव्हर विष पोहोचलं आहे.
हे भूत विषारी घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? याचं उत्तर सोपं नाहीये. पण तुम्ही आम्ही फ्लोरो आणि पीटीएफई असं लिहलेले उत्पादनं विकत घेणे टाळू शकतो, जलरोधक मेकअप, रसायने टाळून परंपरागत नैसर्गिक गोष्टी वापरू शकतो, टेफ्लॉनच्या नॉनस्टिक भांड्या ऐवजी स्टील आणि लोखंडाची भांड्यात स्वयंपाक करू शकतो, खोक्यात पिझ्झा, खाद्यपदार्थ मागवणे कमी करू शकतो, प्रक्रिया केलेले पाणी, चहा साठी वापरले जाणारे कागदी कप वापराने बंद करू शकतो. या काही जुजबी उपाययोजना.
‘तुम ने हमारा नमक खाया है’ म्हणत निसर्गाने दिलेल्या या खारट पाण्याच्या सागराला उदरात घेऊन जीवन जगणाऱ्या जीवसृष्टीला फॉर एव्हर विषारी करणे परवडणार नाही. जीवनाच्या हा ‘अंडे का फंडा’ निर्मळ ठेवणे अपरिहार्य आहे.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
महत्वपूर्ण माहिती……👌👌👌
डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख. नेहमीप्रमाणेच छान आणि उपयुक्त माहिती या लेखाद्वारे मिळाली. खूप खूप धन्यवाद.