drsatilalpatil Tondpatilki भाग- २४. विषागार

भाग- २४. विषागार

भाग- २४. विषागार post thumbnail image

अहो, घरात झुरळं खूप झालीयेत, पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवावं लागेल? बायको म्हणाली आणि घरफवारणीवाल्याला मी फोन लावला. दुसऱ्या दिवशी तो आला. आम्हाला सर्व भांडीकुंडी बाजूला काढून ठेवायला सांगितली. जादूगाराने आपल्या पिशवीतून सामान काढावं तसं लेबल नसलेल्या बाटल्या, झुरळांची जेलची डबी, फवारयाचा पंप अश्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. औषध पंपात टाकून घरभर भरगच्चं फवारल. किचन मध्ये तर त्याचा फवारा जरा जास्तच तेज होता. झुरळांचं आमिष म्हणून पिठाच्या (कि जेलच्या) गोळ्या घरभर चिकटवल्या. ‘हे कसलं औषध आहे हो भाऊ?’ असं विचारल्यावर ‘सेंद्रिय आहे सर!’ असं चेहऱ्यावर सेंद्रिय हसू आणून उत्तर दिलं. हे खरंच सेंद्रिय आहे का? याचा तपस मात्र लागू शकला नाही. 

पेस्ट कंट्रोल साठी मोजकी रसायनं वापरली जातात. इमीडाक्लोप्रिड, साईपरमेथ्रीन, फिप्रोनील ते त्यातील काही कीटकनाशक. तीच लेबल काढून, पिठाच्या, किंवा आमिष जेल मध्ये मिसळून, सेंद्रिय म्हणून फवारतात. पेस्ट कंट्रोल मध्ये आता रसायनं अनकंट्रोलेबल झालेत. पण या रासायनिक कीटकनाशकांमुळे कित्येक अपघात झाल्याचे आपण ऐकतो. सर्वात जास्त अपघात उंदीर मारायच्या औषधाने होतात. ब्रोमोडिओलोन, झिंक फॉस्फेट या रसायनांनी बरेच जीव घेतले आहेत. उंदरांसाठी ठेवलेलं रसायन लहान मुलं किंवा पाळीव प्राणी चुकून त्याला खातात आणि त्यांना विषबाधा होते. विषबाधेच्या बाबतीत.

दुसरा नंबर लागतो तो ‘फ्युमीगंट’ म्हणजे वासाने मारणाऱ्या कीटकनाशकांचा. या प्रकारात, फवारल्यावर कीटकनाशकाचा वास घरात भरून राहतो. या वासाने किडे मारतात. पण घरात हा रसायनी वास भरलेला असतांना घरात झोपलेले कुटुंबातील सदस्य संपल्याची उदाहरणं भरपूर आहेत. ही झाली त्वरित होणारी विषबाधा. पण या कीटकनाशकांचे दीर्घ दुष्परिणाम देखील आहेत.  डोळ्याची जळजळ होणं, कमजोरी, गरगरणं, डोकं दुखणं, त्वचेवर पुरळ उठणं, यासारखे अल्पावधीच्या लक्षणाबरोबरच ते चरबीत साठून राहतात,  किडनी, लिव्हर सारख्या अवयवांना इजा होऊ शकते आणि मोठ्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

जमिनीवर, हवेत, भिंतीवर आणि किचन ओट्यावर त्याचे अंश पडलेले असतात. बऱ्याचदा ते धुळीच्या कानांना चिकटून हवेत येतात आणि श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्या जागेला आपला स्पर्श झाल्यास ते आपल्या शरीराला चिकटतात. अमेरिकन पर्यावरण संशोधन संस्थेच्या आवाहलानुसार घरामध्ये लक्षणीयरीत्या कीटकनाशकांचं प्रमाण सापडत. या रसायनच संसर्ग घरातील लोकांना सतत होत असतो.

आजमितीला घरातील किड्यांनां मारण्यासाठी  ११३ कीटकनाशकं केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने मंजूर केलेल्या यादीत आहेत.  त्यापैकी डेल्टामेथ्रीन, मॅलॅथिऑन, प्रोपॉक्सर, इमिडाक्लोप्रिड, फिफ्रोनील, क्लोरपायरीफॉस यासारखे कीटकनाशके सर्रास वापरले जातात.

कीटकनाशकांचा ‘हाप लाईफ पिरियड’ महत्वाचा असतो. हाफ लाईफ पिरियड म्हणजे अर्धायूषी काळ. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपण जेवढं कीटकनाशक फवाराल होतं त्यांच्यापैकी ५०% कीटकनाशक विघटित व्हायला जेवढे दिवस लागतील तो वेळ. फवारल्यानंतर मातीतील जिवाणू, पाणी, सूर्यप्रकाश यामुळे कीटकनाशकाचं विघटन होतं. कीटकनाशनकांच्या हाफ लाईफ म्हणजे अर्धायुष्याच्या काळासाठी या तीन घटकांचा मोठा सहभाग आहे. पण घरात ना माती असते, जिवाणू आगोदरच डिसइन्फेक्टन्टने  आणि साबणाने सकाळीसकाळी धुऊन पुसून काढतो, पाण्याचा काही संबंध नाही, गॅलरी सोडल्यास सूर्यप्रकाशाचा संबंध दूरदूरपर्यंत नाही. अश्या वातावरणात घरात वापरलेल्या किटकनाशकांचं हाफ लाईफ किती आहे? याचा अभ्यास करायच्या भानगडीत कोणी पडलं नाही. जी माहिती आपल्या कडे आहे ती सगळी हे कीटकनाशक नदीनाल्याच्या पाण्यात गेल्यावर, मातीत मिसळल्यावर काय होईल? यावर आधारित आहे.  किचनच्या ओट्यावर आज कीटकनाशक फवारले तर किती दिवस त्याचे अंश तिथं राहतील याचा अभ्यास कुणाकडे सापडत नाही.

आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा हाफ लाईफ पिरियड किती आहे ते पाहूया. मातीमध्ये फिफ्रोनील १२५ दिवसात अर्ध विघटित होतं. काही शोधनिबंधांच्या मते तो ३६ तासांपासून सात महिन्यांपर्यंत असतो. म्हणजे झुरळाच्या दोनएक पिढ्या घरांत नांदून जातात पण फवारलेलं फिफ्रोनील संपत नाही. त्याचबरोबर डेल्टामेथ्रीनचा हाफ लाईफ पिरियड साधारणतः सहा दिवसापासून ते २०९ दिवसापर्यंत आहे. मॅलॅथिऑनचा १७३ दिवस आहे, इमिडाक्लोप्रीडचा चाळीस दिवसापासून १२४ दिवसापर्यंत आहे. म्हणजे वर दिलेला काळ हा या कीटकनाशकांचा अर्धा ऱ्हास व्हायला लागणार वेळ आहे. त्याचा १००% निप्पात व्हायला किती वेळ लागेल हे रामचं जाणे. कारण तशी माहिती कुठे सापडत नाही. थोडक्यात ही रासायनिक कीटकनाशकं आपल्या घरात लांबचा मुक्काम ठोकून राहतात.  

या रसायनाच्या अतिवापराने कीटकनाशकांप्रती किड्यांमध्ये पचनक्षमता तयार झालीये. एक कीटकनाशन सलग तीनचार वेळा फवारले की त्याला झुरळं पचवतात आणि  बेअसर करून टाकतात. मग एकतर डोस वाढवला जातो किंवा दोनतीन कीटकनाशकांचं कॉकटेल करून झुरळाला किक देण्याचा प्रयत्न होतो.

मला आठवतं लहानपणी गावातील घरात झुरळ झाल्याचे कधी आठवत नाही की पेस्ट कंट्रोल केल्याचं देखील स्मरत नाही. लाकडी छत होतं त्यात जीवसृष्टीचं चक्र फिरत राहायचं. फोटोखाली, मीटरच्या मागे चिमण्यांचा संसार फुललेला असायचा. पालीचा निवांत मुक्काम भिंतीवर असायचा. झुरळ, किड्यामुंग्यांचा ते फडशा पडायचे. पण चिमण्या, कबुतर, पाल, मुंग्यांचा कधी त्रास झालाच नाही. शहरात सिमेंटचा जंगल झालं आणि घरातील किड्यांचं जीवनचक्र बिघडलं. मग ते बेलगाम वाढू लागले आणि फवाऱ्याची गरज भासू लागली.  विकसित देशात घरातील किड्यांचा त्रास सर्वात जास्त आहे. म्हणून पेस्ट कंट्रोलची मागणी तिकडे जास्त आहे.  म्हणजे पर्यावरणाशी किडे करणारी आधुनिक जीवनशैली, घरातील किडे वाढवते असा याचा अर्थ घ्यायचा का? ढेकणाचा बाबतीत तर अमेरिकेत जगातील सर्वात जास्त ढेकणांचा प्रादुर्भाव आहे आणि पर्यायाने ढेकणांच्या औषधाचं देखील. ढेकणांना वैतागलेली इथली लोकं चक्क घर, फर्निचर जाळून टाकतात. जगाचं रक्त शोषणाऱ्यांचं देखील रक्त शोधणारा पाश्चिमात्य ढेकूण पाहून मला टोपीबंद (हॅट्स ऑफ) व्हावंसं वाटतं.  

घरातील रसायनांच्या बाबतीत उपाय कोण करेल? या बाबतीत सरकार उदासीन आहे. सरकारदराबातील मेनकाबाईंचा उंदीर मारण्याला, चिकट सापळ्यात पकडण्याला विरोध आहे. काही राज्यात तर त्यांनी कायदेशीर बंदी घातलीय. मग या गणेशाच्या वाहनाला ‘बाबा, आमच्या घरात येऊ नको’ असं समुपदेशन तरी कसं करायचं आणि होणारं नुकसान तरी कसं टाळायचं? केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने ११३ कीटकनाशकांचा घरातील कीडनियंत्रणासाठी समावेश केलाय. पण त्यात पायरेथ्रीन सोडल्यास एकाही जैविक/सेंद्रिय कीटकनाशकाचा समावेश नाहीये.

सरकार पुढे सरकेल तेव्हा सरकेल. पण आपण मात्र घरात पेस्ट कंट्रोल करतांना काही काळजी घेऊ शकतो. आपल्या घरात फवारल्या गेलेल्या कीटकनाशकाचं लेबल तपासा. लेबलवर लाल, पिवळे, निळे आणि हिरवे त्रिकोण छापलेले असतात. शक्यतोवर हिरव्या, किंवा निळ्या त्रिकोणाच्या कीटकनाशची निवड करा. ते सेंद्रिय असल्याचं तो म्हणत असेल तर त्यावरील सेंद्रिय असल्याचा लोगो पहा. सेंद्रिय प्रमाणपत्राची मागणी करा. त्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन उत्पादनाची माहिती घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उत्पादनाचा ‘मटेरील सेफ्टी डेटा शीट’ ज्याला ‘एमएसडीएस’ असं म्हणतात तो वाचा. त्यामध्ये त्या घटकाचे काय विषारी दुष्परिणाम होतात आणि तो कसा हाताळावा ते लिहलेलं असत. सर्वात महत्वाचं म्हणजे अतिवापर टाळा.

आपण सेंद्रिय अन्नाच्या बाबतीत आग्रही आहोत. अन्नपाण्यातून पोटात जाणाऱ्या कीटकनाशकांच्या अंशाबाबत जागरूक आहोत. हे अन्नपाणी आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यावर प्रक्रिया झालेली असते. त्यातील कीटकनाशके विघटित होण्याची शक्यता त्यामुळे वाढते. पण आपल्या घरात वापरली जणांनी कीटकनाशके मात्र सरळ आपल्या स्वयंपाकघरात, जेवणाच्या टेबलावर बायकोच्या भावागत, दिमाखात येऊन बसतात. म्हणजे चोर येऊ नये म्हणून घराभोवती तटबंदी उभारावी आणि चोराने मात्र चोर-दरवाजाने घरात आरामात प्रवेश करावा असं होतंय.  सेंद्रिय अन्नाचा अट्टाहास धरणाऱ्या लोकांच्या स्वयंपाकघरात रासायनिक कीटकनाशके वास करतात हे नग्नसत्य आहे. अन्नाच्या, शेतातील कीडनियंत्रणाच्या बाबतीत आपण जेवढी सजगता बाळगतो तेवढीच घरातील कीडनियंत्रणात बाळगावी आणि सेंद्रिय घर या संकल्पनेचा नारळ फोडावा. ही वाट सोपी नाहीये पण अशक्यही नाही. आपलं घर विषागार होऊ नये ही अपेक्षा!

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “भाग- २४. विषागार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भाग- २३. रेन! रेन! गो अवेभाग- २३. रेन! रेन! गो अवे

अंगकोरवाट म्हणजेच कंबोडियाच्या सांस्कृतिक राजधानीतून सायकलिंग करत आम्ही थायलंडमध्ये प्रवेश केला होता. उत्तर थायलंडच्या रॅनॉन्ग या शहरात आम्ही पोहोचलो. दिवसभरच्या पायडलपीटीने जरा दमछाक झाली होती. संध्याकाळची वेळ होती. शॉवर घेतला

भाग-८: आत्मनिर्भरभाग-८: आत्मनिर्भर

आटपाट गावात धोंडिबा नावाचा तरुण शेतकरी राहत होता. धोंडिबाचं घर नदीच्या या काठाला तर शेत नदीच्या दुसऱ्या काठाला होतं. पूर्वी नदीला बारमाही पाणी असायचं त्यामुळे घरातून नजरेच्या टप्प्यात असलेल्या नदीपल्याडच्या

भाग-७: आपल्यापुरतं सारवता येतं ?भाग-७: आपल्यापुरतं सारवता येतं ?

ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने ‘कुटूर कुटूर’ असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते.