सदा एक साधा, सरळ नाकासमोर चालणारा शेतकरी होता. गाठीला पाच एकरचा सुपीक, बागायती वडिलोपार्जित जमीनीचा तुकडा होता. दावणीला खिलार बैलांची जोडी आणि दाराशी दुधातुपासाठी गायम्हैसीची घंटा वाजत रहायची. सदा प्रामाणिकपणे शेतात राबवायचा. यामध्ये त्याला त्याच्या बायकोची पूर्ण साथ मिळायची. सदाच्या घरात पाळणा हालला. पहिली मुलगी झाली. सदा मात्र नाराज होता. त्याला वंशाला दिवा हवा होता. मग मुलासाठी प्रयत्न सुरु झाले. नवस-सवस, उपास-तापास सुरु झाले. देवाने सदाच ऐकलं आणि घराला कुलदीपक मिळाला. मनीला भाऊ आणि वंशाला दिवा मिळाला. मनीच्या जोडीला घरात मन्या खेळू लागला.
मन्या आणि मनी मोठे होऊ लागले. गावात चौथी पर्यंत शाळा होती. दोघे एकत्र शाळेत जाऊ लागले. मनीची शाळा चौथीलाच संपली. ती हुशार होती, पण मुलगी म्हणजे परक्याचं धन. शिकून कुठं जायचंय? असं म्हणत तिला घरकामाला आणि शेतकामाला जुंपण्यात आलं. मन्या मात्र शेजारच्या गावात दहावीपर्यंत जात राहिला. त्याला दहावीला मार्क चांगले पडले. डीएड ला नंबर लागेल, चांगली शिक्षकाची नोकरी मिळेल असं मास्तर म्हणाले. पण, नको ती मास्तरकी, त्यापेक्षा तो घरच्या शेतीत राबेल, असं म्हणत सदाने त्याला डीएड ला पाठवायचा विचार फेटाळून लावला आणि मन्या बापाबरोबर शेतात राबू लागला. मनी आईबरोबर धुणीभांडी, शेतात भाकऱ्या पोहोचवणे वगैरे काम करू लागली.
दिवस कापरासारखे उडून गेले. मनी उपवर झाली. शेजारच्या गावात सोयरीक करून मनीचे हात पिवळे केले. सासरी जातांना पोरगी बापाच्या खांद्यावर डोकं ठेऊन हमसून हमसून रडली. पोरीला बापाचा लळा होता. मनी सासरी गेली. आणि घरात निर्माण झालेली पोकळी मन्याच्या बायकोने भरून काढली. पुढे मन्याच्या घरी कुलदीपक आला आणि मनीचीही कूस उजवली.
मन्या तसा निर्व्यसनी. आपलं काम भलं आणि शेत भलं. याव्यतिरिक्त गावातील राजकारण, पारावरील गप्पा यापासून तो नेहमी दुर राहिला. प्रामाणिकपणे शेतात राबल्याने त्याची पिकं इतरांपेक्षा नेहमी उजवी असायची. त्यामुळे संसारात कोणत्याही गोष्टीची उणीव भासली नाही. दिवाळी आखाजीला मनीच माहेरी येणं व्हायचं. मण्याच्या बायकोला तिचं येणं खटकायचं. प्रत्येक भेटीदरम्यान मनीला तो कोरडेपण जाणवायच. मग ‘भावाच्या संसारात उगाच कशाला अडचण’ असा विचार करत तिने माहेरी येणं कमी केलं.
सदाही पोरासोबत खांद्याला लावून राबवायचा. उसाला पाणी देतांना सदा शेतात पडला आणि चालताफिरता गडी खाटेला लागला. आता शेताचा, गुराढोरांचा सगळं भार मन्यावर आला. सगळा पसारा आवारतांना त्याची दमछाक होऊ लागली. बापाला भेटायला मनी लगोलग आली. आधीच वैतागलेल्या मन्याने ना तिला चहापाण्याला विचारलं ना तिच्या पोराला जवळ घेतलं. मन्याचं पोरगं बिस्कीट खात बसलं होतं. मनीच्या पोराला ते हवं होतं. तो आशाळभूत होऊन त्या बिस्किटाच्या पुड्याकडे पाहत होता. आल्याआल्या तिच्याशी एकदोन तुटक शब्द बोलून मन्या डेरीवर दूध लावायला निघून गेला. बापाला पाहून मनीही आल्यापावली निघून गेली. माझ्या पोराला मन्याने साध्या बिस्कीटच्या पुड्याला देखील विचारलं नाही याचं मात्र मनीला वाईट वाटलं
*********************************************************************
गावातून हायवे जाणार अशी उडत उडत बातमी आली. कोणाकोणाची जमीन या हाईवेत जाणार यावर पारावार चर्चेच्या फैरी झडू लागल्या. कडक इस्त्रीतल्या साहेबांच्या गाड्या शिवारात फेऱ्या मारू लागल्या. गावातील एजेंटची सुगी सुरु झाली. वेगवेगळ्या पार्ट्यांच्या साहेबांचे वेगवेगळे गावएजेंट झाले. मन्याच्या शेतातून हायवे जाणार अशी बातमी शिर्प्याने मन्यापर्यंत पोहोचवली. शिरपा हा बेरकी गावएजन्ट. शिरपा तसा मन्याचा वर्गमित्र होता. पण बोलबच्चनगिरीत पारंगत असल्याने शाळेपेक्षा शाळेबाहेरच तो जास्त रमला. कोणाला आधार कार्ड काढून दे, कोणाला जन्माचा दाखला. तालुक्यातील टेबलाखालील कामात त्याचा हातखंडा होता. मन्या घाबरला. ‘आता करायचं काय?’ मन्या हतबल झाला होता. शहरातील बरेचजण गावागावात शेती शोधत फिरतात. ‘या शेरातल्या सायबाला कायबी माहित नसतं, एखाद्याच्या गळ्यात मारू तुझी जमीन’ असं शिरपा म्हणाला. जमीन विकण्याचा प्लॅन सुरवातीला मन्याला पाचला नाही. पण विचार केल्यावर त्याला तो पटायला लागला. असाही म्हातारा खाटेला लागलाय. मजूर मिळणं दुरापास्त झालाय. मला एकट्याला आता हा भार सोसेनासा झालाय. जमीन विकून आलेल्या पैशाने दुसरीकडे थोडी जमीन घेऊ. उरलेला पैसा एफडी मध्ये ठेऊन पोराच्या शिक्षणाची तरतूद करून ठेऊ. शिर्प्याचा सल्ला मन्याला पटला. काळजाच्या तुकड्यागत सांभाळलेली जमीन विकायच्या निर्णयाला सदाने कडाडून विरोध केला. पण बापाला व्यवहार समजत नाही, जग बदललंय असं म्हणत मन्या आणि त्याच्या बायकोने तो मोडून काढला.
शिरपाने गिर्हाईक शोधलं. जमिनीची मोजणी करून घेतली. पन्नास हजार ऍडव्हान्स देऊन ईसार पावती करून घेतली. त्यांच्या वकील साहेबांनी कायद्याच्या कठीण शब्दात अग्रीमेंट बनवलं. ‘मला अग्रीमेंट वाचायला दे’ असं शिरपाला म्हटल्यावर ‘व्यवहाराच्या दिवशी मिळेलच की, वाचायला, त्यात काही नवीन नसतं रे, समदी अग्रीमेंट सारखी असत्यात, फक्त पार्ट्यांची नावं बदलतात’, असं म्हणत शिरपाने वेळ मारून नेली. मन्याला शेवटच्या दिवशी दहा मिनिटात अग्रीमेंट वाचून सह्या करा असं सांगितलं. मन्या थबकला. ‘काय होत नाही रे, सायेब लै देवमाणूस, कर सही, मी आहे ना?’ म्हणत शिरप्याने आग्रह केला. मन्याने सही केली. व्यवहाराच्या दिवशी संपूर्ण कुटुंब ऑफिस मध्ये हवं असं बजावलं होतं. पण मनी सहीला आली नाही. साहेबाने कुलमुखत्यारपत्र सही करून घेतलं होत. ईसार पावती आगोदरच करून घेतली होती. बहिणीची सही आणून देण्याची जबाबदारी मण्याची आहे असं अग्रीमेंटमध्ये लिहलं होत. साहेब राजकारणात मुरलेले होते.
‘हा कसला मामा, तेव्हा माझ्या मुलाला साधा बिस्कीट चा पुडा दिला नाही ह्याने’, असं म्हणत मनीने सहीला नकार दिला. व्यवहार थांबला. ईसार आधीच घेतला होता. जमीन वादात गेली. सुपीक जमीन पडीक झाली. मन्या आणि त्याची बायको दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाउ लागले. कशी जिरवली! म्हणून मनी मनोमन जाम खुश झाली. ‘आमच्या या परिस्थितीला बहीणच कारणीभूत आहे, बहीण झाली वैरीण, असं म्हणत मन्या आणि त्याची बायको गावात नातेवाईकांत तिच्या नावाने शंख करू लागले. याच गोष्टी नातेवाईक मीठमसाला लावून मनीकडे जाऊन सांगायचे. त्यामुळे मनीचा अजूनच तिळपापड व्हायचा, आणि कोंबड्यांची झुंज पाहिल्यागत नातेवाईक त्यांची गंमत पाहायचे. या टेन्शन मध्ये मन्याला दारूचं व्यसन लागलं.
सदा मात्र खाटेवर पडून शून्य नजरेने छताकडे पाहत पडून असतो. तुमच्या मुलीमुळेच आमचं वाटोळं झालं असं म्हणत मुलगा आणि सुनबाई सदाला सदानकदा घालून पाडून बोलतात. सून उपकार केल्याप्रमाणे जेवणाची थाळी समोर आदळते. शिरप्याला साहेबांकडून, मन्याच्या संसारात शेण कालवून कमिशन मिळालं. सध्या तो मन्याला भेटणं टाळतो. लांबूनच रास्ता बदलतो. अश्या पद्धतीने मन्याचा व्यवहार बिस्किटाच्या पुड्यात अडकला होता. एका बिस्किटाच्या पुड्याने त्याला शेतकऱ्यांपासून शेतमजूर बनवलं होतं.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.