मित्रो! असं म्हणत पंतप्रधानांनी, लॉकडाऊन होण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला दिला आणि मला शेतातल्या घरात महिनाभर राहण्याचा योग आला. या महिन्याभरात गरजा कमी असल्यास किती कमी पैशात महिना घालवता येतो, याची प्रचिती आली. पेपर, टीव्ही, हॉटेलमध्ये खाणे, पेट्रोल-डिझेल, सिनेमा, शॉपिंग यासारखे कोणतेच खर्च नाहीत. अगदी शुल्लक खर्चात सहाजणांच्या कुटुंबाचा महिनाभराचा चरितार्थ भागाला. मी विचार करू लागलो आयुष्य जगायला एकूण पैसे लागतात तरी किती? अगदी कमी गरजा ठेवल्यास, जीवनावश्यक वस्तूंसाठी किती पैसे लागतील? हिशोब मांडल्यावर लक्षात आलं की, एका आयफोनच्या किमतीत चार लोकांचा वर्षभराचा दाणापाणी विकत घेता येऊ शकतो. रोजच्या अन्नधान्यासाठी खूप कमी पैसा लागतो. पोटासाठी उपयोगात न येणाऱ्या, भौतिक सुखाच्या गोष्टींसाठी जास्त पैसा खर्च होतो. कुतूहलापोटी दैनंदिन जीवनाचं अर्थशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.

अर्थशास्त्र म्हटलं तर सर्वात पाहिलं नाव ‘ऍडम स्मिथ’ या अर्थतज्ज्ञाचं घेतलं जातं. त्याचं गाजलेलं पुस्तक ‘वेल्थ ऑफ नेशन’ ही आधुनिक अर्थशास्त्राची गाथा आहे. त्या तोडीचं दुसरं पुस्तक जन्मायला १०० वर्षे लागली. ‘दास कॅपिटल’ हे कार्ल मार्क्सचं पुस्तक जन्माला यायला शतकी कालखंड जावा लागला. ‘वेल्थ ऑफ नेशन’ जन्माला आलं नसतं तर ‘दास कॅपिटल’ या अर्थशास्त्राच्या पुस्तकालादेखील काही अर्थ राहिला नसता. ‘दास कॅपिटल’ हा साम्यवादाचं दास्यत्व पत्करतो तर ‘वेल्थ ऑफ नेशन’ भांडवलवादाची तळी उचलतो. ऍडम स्मिथनं गोष्ट सांगावी तसं अर्थशास्त्र सांगितलंय. तो सोप्या भाषेत समजावतो, उदाहरणं देतो. या पुस्तकात अर्थशास्त्राबरोबरच समाजशास्त्र, नैतिकता, कविता अश्या अनेक अंगांना स्पर्श करतो.
‘वेल्थ ऑफ नेशन’ हे पुस्तक आशावादी आहे. पण हा आशावाद दयाळूपणातून निर्माण न होता माणसाच्या स्वार्थीपणातून निर्माण होतो. प्रत्येकजण स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य तो उद्योग किंवा नोकरी करेल असं तो म्हणतो. हे समजावून सांगतांना तो उदाहरणादाखल म्हणतो, कुत्रे हाडाच्या तुकड्याची देवाणघेवाण करत नाहीत, पण माणसे मात्र आपल्या स्वार्थासाठी, मोबदल्याची तो करतात. खाटीक, बेकरीवाला, हॉटेलमालक यांच्या दयाळूपणामुळे आपल्याला जेवण मिळेल याची अपेक्षा चुकीची आहे. पण त्यांच्या स्वार्थी भावनेमुळे आपल्याला जेवण आणि त्याला धंदा मिळतो हे मात्र खरं. प्रत्येकाने स्वतःच हित लक्षात घेऊन कार्य केलं तर सर्वांचे कल्याण होईल. हे सर्व बाजारपेठेच्या यंत्रणेतून घडून येईल, कुणाच्या परोपकाराने किंवा त्यागाने नव्हे, असं तो म्हणे. समजा काही उद्योजक हातमोजे बनवण्याच्या व्यवसायात आहे. त्यातल्या एकाने जास्त नफा मिळवण्यासाठी किंमत वाढवली तर गिऱ्हाईक त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून हातमोजे विकत घेतील आणि पहिल्याची विक्री कमी होईल. त्यामुळे तो अव्वाच्या सव्वा किंमत वाढवू शकणार नाही. म्हणजे कारखानदार आणि ग्राहक आपापल्या स्वार्थासाठी वागत असले तरी त्यामुळे सर्वांचे भले होते.
कुठल्या गोष्टींचं किती उत्पादन करायचं हेही बाजारपेठेची यंत्रणा ठरवते. समजा लोकांची हातमोज्यांची मागणी कमी होऊन बुटांची मागणी वाढली, तरी बुटांचा पुरवठा कमी असल्याने ते महागच राहतील. त्यामुळे उद्योजकाला बूट विकून जास्त नफा मिळायला लागेल. मग बरेच कारखानदार जास्तीचे बूट बनवायला लागतील. त्यामुळे बुटांचं उत्पादन वाढेल, आणि पुरवठा वाढल्याने, स्पर्धा वाढून बुटांची किंमत कमी होईल. त्यामुळे शेवटी ग्राहकांचाच फायदा होईल. अश्या रीतीने किती उत्पादन करावं आणि त्याची किंमत किती ठेवावी हे बाजारपेठेचा अदृश्य हातच ठरवत असतो आणि त्यातून सर्वांचं भलं होत. शिवाय या बाजारपेठेत असंख्य स्पर्धक आहेत, आणि त्या सर्वांना प्रत्येक वस्तू उत्पादन करण्याची सारखीच संधी आहे असं गृहीत धरलं तर या व्यवस्थेमुळे सगळ्या वस्तूंचं योग्य प्रमाणात चांगल्या दर्जाचं आणि कमीत कमी किमतीला उत्पादन स्मिथच्या मॉडेलमुळे होत. एखाद्या कंपनीच्या एखाद्या प्रॉडक्टची किंमत जास्त असेल किंवा तिचा दर्जा कमी असेल, तर ग्राहक त्या कंपनीकडून ती वस्तू विकत घेण्याऐवजी तिच्या स्पर्धकाकडून ती खरेदी करतील. मग ती कंपनी स्पर्धेतून बाहेर तरी फेकली जाईल किंवा तिला नवे तंत्रज्ञान वापरून प्रतिस्पर्ध्यापेक्षा मालाचा दर्जा वाढवावा लागेल किंवा किंमत कमी करावी लागेल. थोडक्यात स्पर्धेमुळे तांत्रिक प्रगती होते, मालाची गुणवत्ता वाढते आणि किंमत देखील कमी होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, हे करण्यासाठी सरकारी किंवा बाहेरची यंत्रणा यांच्या हस्तक्षेपाची गरज पडत नाही. बाजारपेठेचे नियम म्हणजेच, अदृष्य हात हे काम आपोआपच साध्य करतात.
स्मिथ च्या अदृष्य हाताच्या सिद्धांताबरोबरच त्याच्या श्रमविभागणीच्या थेअरीची कल्पनादेखील चांगली गाजली. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप, भांडवलसंचय याविषयी देखील त्याने मांडणी केलीय. पैसे आणि वस्तू बाजारात चक्राकार फिरताहेत हे तो सांगतो. व्यापारावर बंधने घालण्याच्या तो विरोधात होता. मुक्त व्यापाराचा त्याने पाठपुरावा केलाय. पब्लिक फिनान्स, मूल्य यावर त्याने विस्तृत लिहिलंय.
युज व्हॅल्यू आणि एक्सचेंज व्हॅल्यू ही संकल्पना त्याने छान मांडलिये. आता तुम्ही विचारलं हे काय गौडबंगाल आहे? यासाठी पाणी आणि हिरा याचं उदाहरण घेऊया. पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही. म्हणून त्याची ‘युज व्हॅल्यू’ म्हणजेच उपयोगमूल्य भरपूर आहे. पण त्याला बाजारात विकायचे म्हटल्यावर जास्त किंमत येत नाही. म्हणजे त्याची ‘एक्सचेंज व्हॅल्यू’ म्हणजेच बाजारमूल्य अगदी कवडीमोल आहे. याउलट हिऱ्याचे उपयोगमूल्य अगदी शून्य. हिरा नसल्याने माणूस मेल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. पण त्याला बाजारात विकायचे म्हटल्यावर एका रात्रीत आपल्या मालकाला करोडपती बनवायची आर्थिक ताकद त्याच्यात आहे. म्हणजे त्याचे बाजारमूल्य पाण्यापेक्षा कित्तेक पटीने जास्त. शेतीमालाच्या बाबतीतदेखील असंच आहे. पण हे असं का असतं? हा प्रश्न अनेक वर्षे भेडसावत होता. बाजारातील किमती, मागणी आणि पुरवठा या तत्वावर ठरत असतात. हिरा दुर्मिळ आहे म्हणून महाग झाला. पण पदार्थांच्या किमती देखील बाजारपेठ नियंत्रित करत असतात. स्मिथच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष किंमत ही या इक्विलिब्रियम किमतींभोवती, मागणी पुरवठा या तत्वावर फिरत असते. एखाद्या गोष्टीचा पुरवठा तेवढाच असतांना मागणी वाढली की त्याची किंमत वाढते आणि मागणी तेवढीच असतांना पुरवठा वाढला कि त्याची किंमत घटते. हेच तत्व सगळीकडे लागू पडतं. या तत्वाने वस्तूंच्या किमती नैसर्गिक किमतींभोवती घोटाळत राहतात. कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय किंमती नियंत्रित होत राहतात. ही करामत करतो बाजारपेठेचा अदृश्य हात.
ऍडम स्मिथ जन्माला येण्याअगोदर दोन हजार वर्षांपूर्वी भारतात महान अर्थशास्त्री होऊन गेले. ते म्हणजे ‘कौटिल्य’ उर्फ आर्य चाणक्य. जगातलं सर्वात जुनं अर्थशास्त्राचं पुस्तक ‘कौटिल्य अर्थशास्त्र’ त्यांनी लिहिलं. कौटिल्य हे खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राचे जनक आहेत. ऍडम स्मिथने ‘कौटिल्य अर्थशास्त्रातुन’ काही सिद्धांत उचलले आहेत असंही बोललं जात. कौटिल्यांचं म्हणणं होतं, की कणभर नीतिमत्ता ही मणभर कायद्यांपेक्षा सरस आहे. शिक्षणात नीतिशास्त्राचा अंतर्भाव असावा असं त्यांनी सांगितलंय. बाजारपेठेचं पतन वाईट, शासनव्यवस्थेत पतन त्यापेक्षा वाईट, पण नैतिक अधःपतन हे सर्वात घातक, ते इतर सर्व पतनांच कारण होऊ शकत, असं त्यांनी सांगितलंय. राज्य व्यवस्था नीट चालण्यासाठी त्यांनी सप्तांग सिद्धांत मांडला. यशस्वी देशासाठी त्यांनी राजा, प्रजा, नोकरशहा, भांडवल, मुद्रा भांडार, सेनाबळ आणि मित्रदेश अश्या सप्तांगाचं महत्व सांगितलंय.
कौटिल्य आणि ऍडम स्मिथ दोघांनी आर्थिक विकासात भांडवलाचे महत्व अधोरेखित केलंय. भांडवल आणि मनुष्यबळ हे एकदुसऱ्याला पूरक आहे यावर देखील दोघांची सहमती आहे. पण दोघांच्या सिद्धांतात महत्वाचा फरक आहे नैतिक मूल्यांचा. ऍडम स्मिथचे सिद्धांत वैयक्तिक स्वार्थावर आधारित आहेत. कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय मुक्त अर्थव्यवस्था, भरपूर स्पर्धा या घटकांवर त्याचे यश अवलंबून आहे. पण व्यापाऱ्यांची गटबाजी, साठेबाजी, शासनाने निर्बंध घातले किंवा एखाद्या क्षेत्राला मदत केली तर हे चक्र डळमळतं. अदृष्य हाताच्या नियंत्रणात ढवळाढवळ नको असते. याउलट आर्य चाणक्यांनी नीतिमत्ता आणि आवश्यक असल्यास राजकीय हस्तक्षेप याचा पुरस्कार केलाय. सर्वांसाठी नीतिनियम घातले आहेत.
अर्थशास्त्राचा हा हात, अदृष्य असो की दृष्य, शेतीव्यवसायावर त्याचा कसा परिणाम होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. अमूल्य उपयोगमुल्य असलेल्या शेतीमालाचे बाजारमूल्य मात्र कवडीमोल आहे. त्याचे बाजारमूल्य वाढवण्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन कसे करता येईल? उत्पादनापासून ग्राहकांपर्यंतची मूल्यसाखळी कशी बांधता येईल, साध्या आणि सोप्या भाषेत शेती व्यवसायाचे मार्केटिंग आणि अर्थशास्त्र, शेतकऱ्याच्या दैनंदिन आयुष्यात कसे रुजवता येईल यावर भर द्यायला हवा. जमिनीची किंमत ही आपण तिच्यात काय पिकवतो यावरून ठरते असे चाणक्य म्हणतात. आपल्याकडे असलेल्या या अमूल्य कारखान्यात आपण कोणते आणि किती मूल्याचे प्रॉडक्ट उत्पादित करतो, याचा सारासार विचार व्हावा. शेतीव्यवसायाच्या भल्यासाठी राबणारा असा दृष्य-अदृष्य हात जर कुणाकडे असेल, तर मी त्याला जादू कि झप्पी देत म्हणेल ‘ये हात मुझे दे दे ठाकूर’.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.