भाग-१: तंटा(मुक्ती)

जितुदादा हा गावातील तरुणांचा नेता. वडिलोपार्जित वीस एकर शेती. दावणीला गाय, बैल असा पारंपरिक पसारा. जुनं ते सोनं असतं असं म्हणत, आजोबांनी, वडिलांना आणि वडिलांनी जितुदादाला सांगितलेल्या मार्गावर मनोभावे ते शेतीत राबत राहिलेत.

जितुदादा तसा मेहेनती. दिवसभर मनापासून शेतात राबायचं आणि संध्याकाळी मित्रांच्या घोळक्यात, पारावार गप्पांचा फड रंगवायचा हा वर्षानुवर्षांचा दिनक्रम.

****************************************

देशमुखांचा तुषार पाचसहा वर्षे खासगी कंपनीत काम करत होता. त्याची प्रगती पाहून, कंपनीने त्याला एका प्रोजेक्ट्साठी परदेशी पाठवलं होत. तिकडची शेती पाहून आपल्यावर, तो नोकरी सोडून गावाकडे शेती करायला आला होता. देशमुखांचा त्याला विरोध होता. पण एकुलकत्या एक पोरांपुढे आणि (खासकरून) त्याच्या आईपुढे देशमुखी चालणार नाही याची त्यांना खात्री होती.

पोरगा गावात आला. आधुनिक शेती, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग वगैरे मोठमोठे इंग्रजी शब्द बोलू लागला. घरातला, ‘भीषण अपघात आणि बकरीला झाली दहा पिल्लं’ अश्या मनोरंजक बातम्यांचा पेपर बंद झाला. आधुनिक शेतीच्या ऍग्रोवनची एंट्री झाली.

****************************************

तुषार आणि जितुदादा दहववीपर्यंत गावाच्या शाळेत एकाच वर्गात शिकलेले. पण लहानपणापासून दोघांचे विचार कधी जुळले नाही.

तुषार गावात परत आला, पण जितुदादाच्या तरुण मंडळात त्याला जागा मिळाली नाही आणि तोही तिकडे फिरकला नाही. जितुदादाच्या ग्रुपमध्ये, ‘अरे चार बुकं वाचली, फॉरेनला जाऊन आला, म्हणजे काय दिवे लावले!’ ‘पेपर वाचून शेती होते का?’ असे टोमणे मारले जाऊ लागले.

तुषार समजुदार होता. शांततेत आपल्या प्रोजेक्ट वर काम करू लागला.

जिल्ह्याला कृषिप्रदर्शन होतं. जितुदादा आणि मंडळ लै उत्साहात. आपल्या मित्रांना घेऊन जितुदादाने प्रदर्शनाला जायचं ठरवल. एका मित्राची गाडी काढली आणि जिल्ह्याचं शहर गाठलं. मंडळ प्रदर्शनाच्या जागी पोहोचले.

प्रदर्शन जोरात होतं. वेगवेगळ्या कंपन्यांचे, विद्यापीठांचे, शासनाच्या कृषिविभागाचे आणि सहकारी संस्थांचे स्टॉल लागले होते. त्यांचे प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान तिथं मांडले होते.

प्लॅस्टिकच्या पाट्या आणि बादल्या आपटूआपटू, त्याच्या आवाजा येव्हडेच कर्कश ओरडून मार्केटिंग करणाऱ्यांचा आवाज, प्रवेशालाच प्रदर्शन जोरदार असल्याचा भास निर्माण करत होते.

चटपटीत भडंग, चणेफुटाणे, फटाफट कांदेबटाटे कापून देणारे मशीन, फटक्यात फरशीवर पडलेलं पाणी शोषून घेणारा स्पंजचं कापड विकणारे, गोंदवणारे, बॅटरीवर चालणारे मुलांचे खेळणे विकणारे यांची देखील रेलचेल होती.

ट्रॅक्टरच्या स्टॉलवर, नववारी नेसलेल्या बायका, ठसकेबाज लावणीवर नाचत गर्दी जमा करत होत्या.

काही स्टॉलवर वेगवेगळे गेम ठेवले होते. जिंकणाऱ्याला साबण, खेळणे यासारखी बक्षिसं मिळत होती.

फ्री सॅम्पल आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या वाटणाऱ्या स्टॉलवर विशेष गर्दी होती.

एकूण प्रदर्शनाची जत्रा चांगलीच फुलली होती. 

****************************************

जितुदादा आणि मंडळाने एंट्रीलाच, पाट्या आपटणाऱ्यांच्या स्टॉल वरील पाट्या जोरजोरात जमिनीवर आपटून पाहिल्या. ‘च्या मायला, लै मजबूत हाई रं!’ म्हणत पाटी आपटतांना फेसबुकसाठी विडिओ काढून घेतला.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या स्टॉलवर परतपरत जाऊन दरडोई ३-४ पिशव्या घेतल्या.

गडी गेमच्या स्टॉल वर चांगले तासभर गेम खेळले. दोन साबणाच्या वड्या आणि एक खेळणे जिंकले आणि बायको आणि पोरगा, दोघांनाच्या कामाच्या वस्तू मिळाल्याचा आनंद, सेल्फी काढून साजरा केला. 

ट्रॅक्टरच्या स्टॉलवर ठसकेबाज लावणीचा आनंद घेत मनमुराद शिट्या वाजवल्या.

‘लै भारी!’ म्हणत कारभारणीला खुश करण्यासाठी कांदेबटाटे कापायचं एक मशीन घेतलं.

ताऱ्यासाठी चटपटीत भडंगचं पाकीट घेतलं.

गुढगा टेकून बसलेल्या, छाती फाडणाऱ्या हनुमानाचं चित्र, उजव्या दंडावर गोंदवून घेतलं. 

प्रदर्शनात कंपन्यांचे प्रतिनिधी बारीवर नोटा उधळाव्या तसे प्रॉडक्टचे माहितीपत्रक वाटत होते. ते घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती.

जितुदादा आणि मंडळ त्या गर्दीत घुसलं. एकदा का माहितीपत्रक हातात पडलं, की त्याला पिशवीत कोंबायचं आणि पुढच्या स्टॉल समोरच्या गर्दीत घुसायचं, अशी त्यांची कसरत सुरु होती.

‘लै थकलो बुवा प्रदर्शन पाहून!’ असं म्हणत मंडळ खाद्यपदार्थांच्या स्टॉल कडे सरकलं आणि मस्तपैकी चमचमीत जेवणावर ताव मारला.

तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. मंडळीने गाडीला स्टार्टर मारला आणि गावाकडे कूच केलं.

****************************************

तुषारच्या प्लॅन मधेही प्रदर्शनभेट होती.

त्याने आठवडाभर आगोदर प्रदर्शनाच्या वेबसाईटला भेट दिली. त्यातील नकाशावरून, कोणकोणत्या कंपन्या आणि संस्थांचे स्टॉल असणार आहेत आणि त्यांचा स्टॉल नंबर काय आहे? हे शोधून काढले.

आपल्याला नेमकी कोणत्या प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञानाची माहिती हवी आहे याची यादी करून, नेमक्या त्या स्टॉलवाल्या कंपन्यांचे नंबर आणि इमेल पत्ता शोधून काढला. त्या कंपन्यांना संपर्क करून त्यांच्या प्रतिनिधींचा सोबत मिटिंगसाठी नेमका वेळ मागून घेतला.

घरून डायरी, पेन घेऊन, कोणाबरोबर कोणते मुद्दे मांडायचे आहेत याची उजळणी करून, सकाळी नऊच्या सुमारास प्रदर्शन गाठलं.

सर्वात आगोदर ठरलेल्या मिटिंग संपवल्या. प्रतिनिधींबरोबर चर्चा केल्या. त्यांच्या प्रॉडक्टची प्रात्याक्षिकं गावात येऊन देण्यासाठी बोलणी केली. उत्पादनाच्या किमतीवर आणि नेमक्या रिझल्टची माहिती घेतली.

त्यानंतर आवश्यक त्या स्टॉलला भेटी दिल्या. डायरीत नोंद करून घेतली.

माहितीपत्रक गोळा कण्याच्या भानगडीत न पडता, हव्या त्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला.

संध्याकाळपर्यंत हातात एकही माहितीपत्रक न घेता, माहितीचा खजिना घेऊन घरी परतला.

****************************************

जितुदादाच्या मंडळाची, दुसऱ्या दिवशी पहाटेपहाटे शेकोटीवर अंग शेकतांना, प्रदर्शन किती भारी होतं आणि काय मज्जा केली यावर जोरदार चर्चा सुरु होती.  प्रदर्शन पाहणं किती महत्वाचं यावर जितुदादाने मस्तपैकी भाषण देखील ठोकलं.

प्रदर्शनात जमा केलेले माहितीपत्रकं शेकोटीच्या आगीत सारली जात होती. पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनात अजून कायकाय करायला पाहिजे याचे प्लॅन बनत होते.

या माहितीपत्रकांनी मात्र घरातील सर्वांना खुश केलं होत.

शाळेच्या प्रोजेक्टसाठी रंगेबेरंगी चित्र मिळाली म्हणून पोरगा खुश होता.

बापाला तापकीर लावायला आणि उरलेल्या तापकिरीची पुडी बांधून खांबाच्या फटीत खोचून ठेवायला मजबूत कागद मिळाला होता, म्हणून बाप खुश.

बायकोला सकाळीसकाळी चूल पेटवायला आणि मूल बसवायला चांगला कागद मिळाला होता म्हणून ती खुश.

आणि एक दिवस प्रदर्शनाची जत्रा एन्जॉय करायला मिळाली म्हणून जितुदादा आणि मंडळ खुश.

****************************************

दुसरीकडे, तुषारने मोबाईल मधले फोटो पाहून त्यातून नोंदी काढल्या.

शासनाच्या स्टॉल वरून फार्मर प्रोड्युसर कंपनी काढण्याच्या योजनेवर चर्चा केली होती, त्याची योजना बनवली.

बियाणे, कीटकनाशकं आणि खताच्या कंपन्यांच्या वेळा घेऊन प्रात्यक्षिकं लावली.

सेंद्रिय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेला सर्टफिकेशनसाठी आमंत्रित केलं होतं.

मार्केटिंगसाठी एका कंपनीबरोबर करार केला.

प्रदर्शनात ज्यांना ज्यांना भेटला त्यांना, ‘धन्यवाद! असा मेसेज आणि ईमेल केला.

….. अश्या पद्धतीने जितुदादा आणि तुषार आनंदाने शेती आणि तीचं प्रदर्शन करू (मांडू) लागले……… 

(या कहाणीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही चर-आचर, सजीव-निर्जीव, व्यक्ती अथवा घटनेशी काडीचाही संबंध नाही. योगायोगाने आपल्याला काही साधर्म्य वाटल्यास तो भास समजावा आणि चिंतन करावे ही विनंती.)

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

error: Content is protected !!