Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 26 December , 2021

मित्रांनो,
गेल्या वर्षभरापासून आपण एकत्र बाईकवरून ही आंतरराष्ट्रीय शेतशिवाराची फेरी मारतोय. तुम्हाला डबलसीट घेऊन मी भारतातून, भूतान, ब्रहमदेश, थायलंड, कंबोडिया, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत फेरफटका मारलाय. गेल्या ४९ भागाची ही सफर आज अर्धशतक गाठून संपत संपतेय. या सफरीदरम्यान आपण सात देशातील शेती, पर्यावरण, समाज, संस्कृती, व्यापार, अन्न पदार्थ अश्या विविध प्रकारच्या गोष्टींची चव चाखली. इथल्या डोंगरदऱ्यातून, शेतशिवारातून हिंडलो, जंगलातून आणि समुद्रावरून आलेल्या वाऱ्याला अंगावर घेत प्रवास केला.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातून सुरु झालेल्या या बाईक सफारी दरम्यान, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणारच्या सरोवराला भेट देऊन श्रीगणेशा केला. चंद्राच्या मातीशी साधर्म्य असणारं आणि प्रोटीनची शेती शिकवणारं लोणार सरोवर जवळून अनुभवलं. त्यानंतर शिंदखेडा राजाला राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन ईशान्य भारताकडे निघालो. आसाममधील वेगळाच ‘टाइम झोन’ असणाऱ्या ‘टी टाइम’ पाळणाऱ्या चहाच्या मळ्यांपासून ते पर्यावरणाची पायरी ओलांडणारी पायऱ्यांची शेती पहिली. इथला नयनरम्य निसर्ग अनुभवाला.
सिलिगुडीमधून भूतानमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदा बाईकने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. जगातील सर्वात आनंदी लोकांच्या देशात, आनंदाने बाईक हाकली. आख्या देशात एकही सिग्नल नसलेल्या रस्त्यावरून बाईक पळवली. मुबलक जलविद्युत आणि आनंद पिकवणारा, भारताचा लहान भाऊ, ‘भुतान’ पहिला. जगातल्या पहिल्या वाहिल्या, संपूर्ण सेंद्रिय देशातून सफर केली.

भुतानमधून परत भारतात प्रवास करत गुवाहाटीत आलो. तेथील ईशान्य भारतीय पाहुणचार झोडला. भारतातील शेवटच्या, म्हणजे मणिपूर मधील ‘मोरेह’ गावामधून ‘म्यानमार’ म्हणजेच ‘ब्रह्मदेशात’ प्रवेश केला. चहा पिणाऱ्या देशातून आलेल्या बाइकवरील पाहुण्याने, चहा खाणाऱ्या देशातील चहा खाल्ला. वाळूचे कण रगडून तेल मिळवणाऱ्या कष्टाळू म्यानमारी लोकांशी गप्पा मारल्या. तरंगणाऱ्या टोमॅटोच्या शेतीच्या गोष्टी ऐकल्या. पान खाऊन देश रंगवणाऱ्या लोकांकडून, सात देशात बाईक चालवण्याचा विडा उचललेल्या बाईकरने, पानाचा विडा घेतला. लालभडक ‘रुबी’ च्या खाणी असणारऱ्या ब्रह्माच्या देशात वाममार्गावरून ढळत चिखलाचे रस्ते तुडवत बाईक चालवली.
म्यानमारच्या ‘म्यावडे’ गावातून थायलंड मधल्या ‘मेसॉट’ मध्ये प्रवेश केला. पर्यटन व्यवसायात प्रसिद्ध थायलंड, शेतीव्यवसायात देखील अव्वल आहे. या अव्वल देशातील निर्यातीचं गुपित समजण्याचा प्रयत्न केला. फुलशेती, डुरियनची काटेरी शेती, रबराची शेती, बियाणे उत्पादन, मत्स्य व्यवसाय, पोल्ट्री अश्या वेगवेगळ्या व्यवसायातील त्यांची प्रगती पहिली. नारळी दुधाचा व्यवसाय आणि त्यात राबणारा ‘माकड’ मजूराची कहाणी एन्जॉय केली. चव आणणारी मिठाची शेती पहिली. भाजीपाला आणि फळबागांबरोबरच, वळवळणाऱ्या किड्यांची, विंचवाची, मुंग्यांची शेतीतील वळवळ चाखली. येवढा विकास करूनही माध्यम मार्गावरील पांथस्थांना सन्मानाने वागवणारा थायलंड आदर घेऊन गेला. शेतीव्यवसायात ढिगाने डॉलर कमावणाऱ्या देशातील शेतीची, रसायनांमुळे होणारी फरफट पाहून मन हेलावले. इथला हलाहल पचवणारा बळीराजा पहिला आणि सेंद्रिय शेतीच्या मार्गाकडे त्याचा वळलेला मार्गही पहिला.
भारतीय संस्कृतीच्या थायलंडमधील अस्तित्वाच्या खुणा दिसल्या. भारतीय गणपतीची मंदिर प्रेमाने बांधणारा देश, आणि रामाची थाई अयोध्या बांधणारा देश जवळून पहिला. प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकात रामायण हा विषय शिकायला ठेऊन, आपल्या देशाच्या उज्वल भूतकाळाशी एकरूप असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय. अश्या या प्राचीन भारतीय भावकीच्या देशाचा सर्वांगाने आस्वाद घेतला.
त्यानंतर थायलंडमधील अरण्यपथेक मधून कंबोडियात प्रवेश करत, येथील सियाम-रीप शहरात पोहोचलो. जगातलं सर्वात मोठं मंदिर पाहिलं. हे विष्णुमंदिर आहे. भारतातुन ब्रह्माच्या देशामार्गे बाहेर पडत, विष्णूच्या देशात येऊन पोहोचलो. व्हिएतनाम युध्दात, तणनाशकाने भूतकाळ जाळलेल्या या देशाने फिनिक्स पक्षाप्रमाणे कश्या पद्धतीने भविष्य सावरलं? हे पाहिलं. वर्षागणिक नावं बदलणाऱ्या या देशातील भारतीय सणांची आणि राजघराण्यातील पुरुषाकडून होणाऱ्या शाही नांगरणीच्या सुरस कथा ऐकल्या.
पुढे थायलंड मार्गे मलेशियात प्रवेश केला. लंबू पेट्रोनास टॉवर उंचच उंच मिरवणारा आणि भारताला पामतेल पुरवणारा, पाम उत्पादक मलेशियाचा मलमली प्रवास केला. माणसाला ‘फुल’ बनवणाऱ्या, मलेशियन फुलाच्या सुरस कहाण्या चघळल्या. पावसात भिजत मलेशियाच्या जोहर बारू गावातून, भल्यामोठ्या पुलाने जोडलेल्या एकशहरी देश, सिंगापूरमध्ये प्रवेश केला. टिकली एवढ्या देशातले सधन, श्रीमंत लोक पहिले. अजब नियमांच्या गजब देशात बाईक चालवली. शनिवारवाड्याच्या शहरापासून सुरु होऊन मरलायन च्या शहरात ही सफर संपतेय.
दक्षिण पूर्वेच्या या देशांशी भारताची सांस्कृतिक नाळ जुळलीये. त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल आदर आहे. त्यांचे सण, उत्सव, संस्कृती आपल्याबरोबर जुळतेय. हे या प्रवासादरम्यान पदोपदी जाणवले. पुणे सिंगापूर पुणे अश्या या बाईक मोहिमेवर आधारित ‘ड्रीमर्स अँड डुअर्स’ हे मराठी पुस्तक लिहतांना या देशातील सर्व प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यासमोरून सरकले. हा प्रवास पुन्हा एकदा जगलो. त्या मलमली आठवणीत न्हाऊन निघालो.
ऍग्रोवन च्या माध्यमातून, या मोहिमेचे शेती, शेतकरी, पर्यावरण आणि समाज यासंबंधी अनुभव आपल्या पोहोचवण्याची संधी मिळाली. या प्रवासादरम्यान दक्षिणपूर्व आशियायी देशातील शेतीची ओळख आपल्याला झाली. वाचकांनीही या लेखमालेला भरभरून प्रतिसाद दिला. हजारो फोन आणि मेसेज द्वारे, लेखमाला आवडल्याची पावती दिली. वर्षभर चाललेली ही ऍग्रोवन मुशाफिरी आता संपत आलीये. पण आपण लवकरच अजून तपशिलांसह ही मुशाफिरी पुस्तकरूपात आणू याचा विश्वास वाटतो.
लोक विचारतात, तुम्हाला काय मिळालं एवढ्या लांब मोटारसायकल चालवून? कशाला पैसे आणि वेळ वाया घालवला? या मुशाफिरीने काय शिकवलं? या प्रश्नांचं नेमकं एक उत्तर देता येणार नाही. पण या प्रवासाने वेगवेगळ्या देशातील माणसे, त्यांची संस्कृती, अन्न, समाज यांच्या संपर्कात येण्याची, त्यांना समजून घेण्याची संधी दिली. येथील निसर्ग, शेती, पर्यावरण यात समरस होता आले. नवनवीन गोष्टी शिकलो. मला कूपमंडूक होण्यापासून वाचवलं.
गेले वर्षभर माझ्या बुलेटच्या मागच्या सीटवर बसून आपणसुद्धा हे अनुभवलं आहे. आता बाईक उतार होण्याची वेळ आलीये. पण हा प्रवास इथं संपणार नाहीये. या मुशाफिरीने लावलेला हा दिवा तुम्ही तेवत ठेवणार आहात. दैनंदिन जीवनात आपण करत असलेला प्रत्येक प्रवास ‘मुशाफिरी’ होऊ शकतो. त्याच्या कहाण्या बनु शकतात, त्यातून धडा घेतला जाऊ शकतो. प्रवास!, मग तो कृषी प्रदर्शनाला भेटीचा असो, शिवारफेरीचा असो की कृषिविद्यापीठाच्या भेटीचा असो. या मुशाफिरीतून निरीक्षणे आणि त्यांच्या नोंदी करून चांगल्या गोष्टींचा अंगीकार करूया.
मग उचला तुमचं वाहन. मारा किक किंवा स्टार्टर, आणि सुरु करा तुमची मुशाफिरी. जगाला सामोरं जा. शेती, पिकं, निसर्ग, माणूस आणि समाज याला समजून घेण्यासाठी. फिरल्याने होत आहे रे, आधी फिरलेच पाहिजे! या उक्तीला साजेशी सुरवात करूया. चला तर मग, सुरु करा आपली मुशाफिरी!
ऑल द बेस्ट! …….. कदाचित आपली गाठ पडेल या मुशाफिरीदरम्यान… तोपर्यंत.. डॉ. सतीलाल पाटलांचा रामराम…
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
सर, आपले मस्त लिखाण आहे!!!
Very nice efforts…
Such kinds of visits or tours make different countries more close.
Khuup chan likhan …