Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 04 December , 2021

थंडगार हवेत लपेटलेली मलेशियन सकाळ. सीटवर पहुडलेल्या साखरझोपेतल्या दवबिंदूंना दूर सारत, बाईकवर मांड ठोकली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. दूरवरून हवेच्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या मंद संगीताचे सूर ऐकू येताहेत. समोर दिसणाऱ्या शेजारच्या गावातून ते येताहेत असं वाटतंय. दुरून या गाण्याची चाल थोडीशी ओळखीची वाटतेय. माझी मोटरसायकल मोहीम सुफळ, संपूर्ण व्हावी म्हणून मलेशियन लोकं मला प्रोहत्साहित करण्यासाठी तर गात नसतील ना? गाण्याचे शब्द स्पष्ट नाहीत, पण चाल जरा ओळखीची वाटतेय. थोडं पुढं गेल्यावर स्पष्ट ऐकू येईल असं वाटतंय. एक्सएलरेटर पिळला आणि गाण्याच्या दिशेने हेल्मेटमधील कान देत बाईक पुढे नेली. ते मलेशियन भाषेतलं गाणं होतं. ‘रासा सयांग हे, रासा सायांग सायांग हे’ असे काहीसे शब्द असलेलं हे गाणं. ‘रासा सायांग’ हे गाणं मलेशियातील प्रसिद्ध गाणं आहे. ‘माझ्या मनात प्रेमाचा बहर आलाय’ या अर्थाचं हे गाणं आहे. प्रत्येक मलेशियन माणूस शाळेत, सण, उत्सवात हे गाणं ऐकत आणि गुणगुणत मोठा झालाय.

जसा चंद्रावर देखील डाग आहे, तसा प्रेमाच्या या गाण्यावर देखील वाद आहे. ज्याप्रमाणे मलेशियाच्या चीनबरोबर सीमावाद आहे, तसा इंडोनेशियाचा मलेशियाबरोबर ‘रासा सायांग’ वाद आहे. त्याच झालं असं की २००७ मध्ये मलेशियाच्या पर्यटन मंत्रालयाने, हे गाणं त्यांच्या पर्यटनाच्या प्रसारासाठी बनवलेल्या जाहिरातीत वापरलं. पण आमचं गाणं तुम्ही चोरलं असा आरोप इंडोनेशियातील लोकांनी करायला सुरवात केली. कारण ‘रासा सायांग सायांग’ गाणं इंडोनेशियात देखील तितकंच प्रसिद्ध आहे. शेवटी मलेशियन सांस्कृतिक मंत्री ‘रईस यतीम’ यांनी हे गाणं मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन्ही देशाची शान आहे असं सांगत वाद मिटवला. पण ‘रासा सायांग’ चा धागा भारताशीदेखील जोडला गेलाय हे युट्युब ची नळी तपासल्यावर समजलं. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंगापूर या हिंदी चित्रपटात ‘रास्सा सायांग हे!’ गाणं आहे. या चित्रपटात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या हिंदी आवाजावर, शम्मी कपूर आणि पद्मिनी नाचताना दिसतात. म्हणजे ‘रास्सा सायांग च्या रस्स्याचा घमघमाट, १९६० मधेच भारतापर्यंत दरवळला होता तर. प्रेमाचं हे गाणं मलेशियाच्या बेटाबेटांवर प्रसिद्ध आहे.
मलेशिया हा बेटांचा देश आहे. हिंदी महासागरात हा कित्येक मलेशियन बेटांचा पुंजका पसरलाय. म्हणजे किती बेटांचा हा देश बनला असेल, याचा अंदाज सांगू शकाल का? इथल्या बेटांची संख्या ऐकून चक्कर येईल. हा देश एकूण वीस हजार बेटांमध्ये विखुरलाय. यामधील ‘सबाह’ या राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३९४ बेटं आहेत. एवढंच नाही तर या देशात ५३५ अशी बेटं आहेत की ज्यांचं अजून नामकरण झालंच नाहीये. मलेशियाच्या या नवजात ‘बेट्यांचं’ नामकरण करून ऑफिसिल देशप्रवेश करून घेण्याची सरकारची घाई चाललीय. नाहीतर शेजारी देश त्यांच्यावर दावा सांगतील अशी त्यांना भीती आहे. चीनने त्यांची हि भीती खरी ठरवलीय. आपलं शेत एखाद्या भांडखोर शेजाऱ्याच्या शेताला लागून असावं आणि त्याने रोज नवीन खुसपट काढून भांडावं, तसं चीन या देशाचं आहे. आपल्या सर्व शेजाऱ्यांशी त्याचे सीमावाद सुरु आहेत. मग त्यातुन मलेशिया तरी कसा सुटेल. मलेशियाच्या बेटांवर हक्क सांगत चीनने वाद उकरून काढलाय.

मलेशिया मध्ये उष्णकटिबंधीय फळांचं उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मुबलक उन्हाचा ताप आणि मुबलक पाऊस अश्या मुबलक वातावरणात पिकणारी मुबलक फळं, मलेशियन शेतकऱ्याच्या पाकिटात मुबलक पैसे घेऊन येतात. इथं डुरियन हे मोठ्या प्रमाणात पिकणारं फळ आहेच, पण फळांचा राजा ‘आंबा’ आणि फळांची राणी ‘मँगोस्टीन’ हे राजाराणीदेखील मलेशियाच्या बेटाबेटांवर राजाराणीचा संसार करतात. याव्यतिरिक्त लोनयान फळ, फणस, ड्रॅगन फळ, पेरू, राम्बुटान, पपई यासारखी फळं मलेशियाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडी आणतात. ‘कॅमेरॉन’ हे मलेशियाचं महाबळेश्वर आहे. समुद्रसपाटीपासून एक हजार मित्र उंचीवरील या प्रदेशात स्ट्राबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. स्ट्राबेरीच्या उत्पादनासाठी सुप्रसिद्ध असलेली ही जागा, राजधानीच्या क्वालालांपुर शहरापासून फक्त दोनशे किलोमीटरवर आहे. स्ट्राबेरीव्यतिरिक्त वेगवेगळी पीक इथं घेतली जातात. यात महत्वाचं पीक आहे ‘चहा’. ‘कॅमेरॉन हायलँड’ इथं मलेशियातील सर्वात जास्त चहाचं पीक घेतलं जातं.

या वेगवेगळ्या फळांच्या गर्दीत, बोर्निओ बेटाच्या बाजूला एक विशिष्ट फळ आढळतं. या फळाचं नाव आहे ‘तराप’ फळ. याला फिलिपिनो भाषेत ‘मरांग’असाही म्हणतात. ‘तराप’ फळ हे डुरियन आणि फणस या दोन काटेरी फळांचा संकर आहे. दोन काटेरी जन्मदात्यांपासून जन्माला आलेल्या फळाने मलमलीची झालर घेऊन जन्माला यावं अशी अपेक्षा करणं म्हणजे, कारल्याच्या वेलाला कलिंगड लागेल अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. हे ‘तराप’ फळ देखील त्याच्या जन्मदात्यांसारखंच काटेरी आहे. पण डुरियन फळासारखा वास (काही जणांच्या भाषेत त्याला दुर्गंधी म्हणतात) मात्र त्याला नाही. त्याची चव चांगली आहे. लोक त्याला चवीने खातात.
हे झालं फळांचं, पण मलशोयातलं फुल देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथलं फुल, मलेशियातच नाही जगात भारी आहे. या फुलाचं नाव आहे ‘रॅफ्लेशिया’. हे फुल जगातलं सर्वात मोठं फुल म्हणून प्रसिद्ध आहे. मोठं म्हणजे किती? तर त्याच व्यास असतो तीन ते चार फूट. वजनातही ते लई भारीये . या वजनदार फुलाचं वजन आहे फक्त १० किलो. रॅफ्लेशियाच्या फुलाला खोड नाही, पानं नाहीत की फांद्या नाहीत. आहे ते फक्त पाच पाकळ्यांचं महाकाय फुल. रॅफ्लेशिया हे झाडाला लागणारं फुल नसून झाडावर वाढणारं फुल आहे. डोक्यात या प्रश्नाचा फुल्ल गोंधळ मजला ना? सांगतो. ‘रॅफ्लेशिया’ हे दुसऱ्या झाडावर वाढणारं परोपजीवी वनस्पतीचं फुल आहे. इतर झाडांचा रस शोषत त्याच्या फांद्यांवर ते वाढतं. या फुलाला इंडोनेशियात ‘पद्म’ असं म्हणतात. संस्कृतमधील ‘कमळ’ या अर्थाने ‘पद्म’ हे नाव पडलंय. मलेशियाच्या बेटांवरील जंगलात इतर झाडांचा रस शोषत हे परोपजीवी कमळं फुलतात.

या अवाढव्य फुलाचा वास कसा आहे? हा प्रश पडेल. रॅफ्लेशियाच्या फुलाला वास आहे पण त्याला सुगंध म्हणने चुकीचं ठरेल. या फुलाला कुजलेल्या मांसासारखी दुर्गंधी येते. दुसऱ्या झाडाचा जीवनरस शोषून फुलणाऱ्या फुलाकडून सुगंधाची अपेक्षा तरी कशी करायची. मराठीतील ‘फुला’ची अपेक्षा करणाऱ्यांना हे, नाजूक, हलकं आणि सुगंधी नसलेलं परोपजीवी फुल मात्र इंग्रजीतील ‘फूल’ बनवतं.
मलेशियाच्या प्रेमळ गाण्याने माझ्याही मनात प्रेमाचा बहर आलाय. गाण्याच्या तालावर आणि प्रेमाच्या बहरात बाईक चालवत पुढे निघालो. बेटाबेटांमध्ये विखुरलेल्या या देशाच्या कान्याकोपऱ्यातून येणारा थंडगार वारा ख्यालीखुशाली कळवत, शीळ घालत माझ्या गाण्यावर ताल देत होता. माझी बाईक धकधक च्या भाषेत ‘रासा सायांग हे’ गाणं गुणगुणत सिंगापूरच्या दिशेने नाचत नाचत निघाली.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
Mastach
सकाळच्या प्रसन्न वातावरणात गरमागरम चहा सोबत मलेशियन फुलाची गोष्ट वाचून उत्साह दुणावला! छान लेखन.
खूप सुंदर लेखन कौशल्य अवगत केलेले आहे लेख अभ्यासपूर्ण तर आहेच परंतु सौंदर्यशास्त्राने सुद्धा नटलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्या स्टॉल ला विजीट केली आपली भेट थोडक्यात चुकली स्टॉल वरती सांगण्यात आलं की अर्ध्या तासापूर्वी तुम्ही परत गेले
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले मलेशिया आणि
सुंदर लेखनशैली मुळे हृदय 💓 झाले आनंदीत.
👌👍👍