भाग-१: तंटा(मुक्ती)

कथा-१…

भारत आणि पाकिस्थांची फाळणी झाली. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या भावाभावांची ताटातूट व्हावी तसा, एक देश दोन भागात विभागाला गेला. फोडा आणि राज्य करा ही नीतीला बळी पडलेले दोघेही. दोन शेजारी देश बनले. बांधाला बांध असलेले दोन्ही वेगळे झाले खरे, पण त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. पाकिस्थानाने खुसपट काढलं आणि भारताने त्याला धडा शिकवला.

भारताला रशिया आणि पाकिस्थानाला अमेरिका, दोन वेगवेगळ्या पार्टीच्या भाईने पाठिंबा द्यावा तसा पाठिंबा द्यायला सुरवात केली. आपण स्वसंरक्षणात सक्षम व्हायला हवं हे जाणून भारताने रशियाकडून लढाऊ विमाने घेतली. त्याच्या प्रतिसादात पाकिस्थानाने अमेरिकेकडून भारीतली फायटर विमाने घेतली. 

मग भारताने ३५० किलोमीटर लांब मारा करणारं क्षेपणास्त्र बनवलं. ‘च्या मारी आम्हाला कमी समजला काय?’ असं म्हणत  पाकिस्थानाने साडेसातशे किलोमीटर लांब मारा करणारं क्षेपणास्त्र, नकट्यांच्या लाल देशातून स्पेअर पार्टस आणून,बनवलं (?), आणि लाल क्षेपणास्त्र हिरव्या रंगाने रंगवून नसलेल्या मिशीला ताव दिला.

‘लालचं हिरवं करणाऱ्या, थांब आता तुझी पिवळीच करतो’ असं म्हणत भारताने ५२००  किलोमीटरवर रेंजच अग्नी मिसाईल बनवलं आणि करोडो रुपयांचा जाळ काढला.

तरीही पाकिस्थानच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाया सुरूच होत्या.  मग भारताने मास्टरस्ट्रोक मारत डायरेक्ट अणुबॉम्बच बनवला. शेजारच्यांच्या अणुबॉम्बपासून आम्हाला मोठा धोका आहे. आम्ही गवत खाऊ पण अणुबॉम्ब बनवू असं म्हणत पाकने अब्जावधी रुपये खर्च करत, आंतरराष्ट्रीय चोरीमारी करून अणुबॉम्ब बनवला. पण गप बसेल तो भारत कसला. त्यानेही परत एकदा अणुचाचणी करून, ‘बाप, बाप होता है’ याची प्रचिती दिली.

*************************************************************

यादरम्यान…

भारताचा रक्षा बजेट एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १३.७४ टक्के आणि पाकिस्थानचा १६ टक्क्यावर फुगला.  

एकदुसऱ्याला घाबरावा-घाबरवीच्या कार्यक्रमात दोन्ही देशाचे अब्जावधी रुपये बरबाद झाले.

गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम, गरीबच राहिला.

महागाई नियंत्रण महाग झाले, रास्ता, पाणी आणि विजेचा ओघ मिलिटरी कॅम्पच्या वाटेल लागला आणि सामान्य नागरिकांच्या हाती धुपाटणे आले.

*************************************************************

दुसरीकडे अमेरिका आणि रशियाने, अब्जावधी रुपयांची शस्त्रे विकली आणि ते गब्बर झाले.

त्यांच्या देशात सुबत्ता आली. लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या. रोजगार मिळाला. त्यांचं सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून सकलजनांचा फायदा झाला.

या पैशातून अमेरिकेने, भारतपाकिस्थांच्या हुशार लोकांना आपल्या देशात नोकरी दिली. त्यांच्याकडून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्यांच्याच देशात निर्यात केली.

‘तुमच्याकडे फारच घाण असते बुवा!‘ असं म्हणत ही (पर)देशी जमात, अमेरिकेत टिशू पेपर वापरत स्वच्छ राहू लागली. 

*************************************************************

कथा-२…

आटपाट नगरजवळ एक गाव होतं. या गावात भिवा आणि शिवा हे सख्खे शेजारी आणि भाऊबंद राहत होते. या भाऊबंधांची घरं एकदुसऱ्यासमोर आणि शेत बांधाला बांध. एका घरात शिजणाऱ्या भाजीचा वास दुसऱ्याच्या घरात आणि एका शेतात फवारलेल्या औषधाचा वास दुसऱ्याच्या शेतात यायचा. त्यामुळे शेजारच्या घरात शिजणारा पदार्थ आणि शेतात फवारलेलं औषध दुसऱ्याला लगेच कळायचं. एकाच्या बायकोला दागदागिणा मिळाला, पैठणी घेतली की दुसऱ्याचं पाकीट हलकं होणार यात शंकाच नाही.

भिवाच्या घरातला जुना जाड टीव्ही जाऊन नवीन सपाट ११ इंच टीव्ही आला. ‘च्या मायला मला पैशाचा माज दाखवतो का?’ असं म्हणत शिवा एक लाखाचा २१ इंच टीव्ही हप्त्याने घेऊन आला.

पुढे शिवाच्या मुलाचे लग्न शेजारच्या गावातील मुलीशी जमले. समोरची पार्टी तशी हलक्यातली आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर. पण मुलाच्या मर्जीसमोर शिवाची मर्जी चालली नाही. लग्न आटोपले. आपल्या अंगणात वरात जरा जास्त वेळ थांबली होती असा भास भिवाला झाला.

भिवाने मात्र ‘अरे आपण आपल्या मुलीचं लग्न त्याच्या मुलापेक्षा धडाक्यात लावणार’ असं म्हणत ९६ कुळी लग्नाचा घाट घातला. लग्नात जिल्ह्यातलं सर्वात फेमस बॅण्डपथक मागवलं. मुद्दाम शिवाच्या अंगणात जास्तवेळ मिरवणूक थांबवली. या दणकेबाज लग्नाने दोन एकरचा लचका तोडला होता. 

याचा वचपा काढत शिवाने कर्ज काढून नवी कोरी स्कॉर्पिओ दारात आणली. अंगणात पूजा करून भिवाच्या घराकडे तोंड करून गाडी लावली. रोज सकाळी दोन तास गाडी साफ करण्यात जाऊ लागले. भिवाच्या स्वाभिमानाला स्कॉर्पिओचा विंचू डसला आणि कर्ज मिळत नव्हतं म्हणून घर तारण ठेऊन पांढराशुभ्र फॉर्च्युनरचा हत्ती घेऊन आला.

दोघांची शेती बांधला बांध. शिवाने बांधला औत लावलं आणि दीडेक फुटाचा बांध कापला. मग भिवानेही त्याची भरपाई करत वखर लावला. काही वर्षांपूर्वी बैलगाडी जाईल एवढा अजाडजूड बांध, जेमतेम एक पाय ठेवता येईल एव्हडा कुपोषित झाला होता. मग बांधाची केस कोर्टात गेली. आख्ख शेत विकलं गेलं तरी बेहेत्तर पण बांधाची केस हरणार नाही अस्स म्हणत दोघांचीही तालुक्याला कोर्टवारी सुरु झाली. लाखो रुपयांचा चुराडा झाला.

पंचायतीची निवडणूक लागली. शिवा वरच्या आणि भिवा खालच्या, अश्या वेगवेगळ्या पार्टीला पाठिंबा देऊन होते. गोठ्याच्या पडक्या छपराला टेकू देण्यासाठी भिवाने बांबूच्या दणकट काठ्या आणल्या. अंगणात बसून त्यांना साफ करत तेल चोळले. भिवाच्या पंटरने ‘दादा, तुमचा शेजारी निवडणुकीची लै तयारी करून राह्यला बरं का!असं म्हणत ही बातमी भिवाला मीठमसाला लावून सांगितली. खबरदारी म्हणून भिवाने पाचसहा भाले मागवून घेतले. ‘च्या मायला आम्हीबी कमी नाय’ असं म्हणत अंगणातच त्यांची पाहणी सुरु केली. शिवाने दाराआडून हा प्रकार पहिला. या निवडणुकीत भिवाचा काहीतरी डाव दिसतोय हे त्याने ओळखले आणि दुसऱ्या दिवशी  तालुक्यातील पाव्हण्याला फोन करून १०-१२ तलवारी मागवून घेतल्या. आता मात्र, या निवडणुकीत रक्तपात होणार याची शिवाला खात्री पटली, आणि आमदारसाहेबांना पाच लाख रुपयांचा मलिदा चारत डबल बोअर बंदुकीचं लायसन मिळवलं. निवडणूक संपल्या. शिवा आणि भिवाने भावकीत दुश्मनी पत्करत लाखो रुपयाची सव्याज होळी केली होती.

**************************************************

अश्या पद्धतीने….

भिवा आणि शिवा पारंपरिक दुश्मनी निभावत जगताहेत.

सोसायटीच्या कर्जासाठी दरवर्षी उंबरठे झिजवताहेत.

कोर्टकचेरीच्या कामासाठी जिल्ह्याला फेऱ्या मारताहेत. 

एका बँकेचा हफ्ता भरण्यासाठी दुसरीला साकडं घालताहेत.

वडिलोपार्जित शेती वर्षागणिक कमी होतेय.

मुलं जेमतेम दहावी पर्यंत पोहोचली आणि घरी आली. बापाला शिव्या देत सुशिक्षित शेतमजुरी करताहेत.

गावात ‘तंटामुक्त गाव’ समिती बनली. वशिल्याने भिवा आणि शिवा दोघांनीही त्या समितीत वर्णी लावून घेतली. 

सध्या ते तंटामुक्त गावाच्या समितीत भांडतात.   

**************************************************

दरम्यान….

निवडणुका पार पडल्या. कोणालाही बहुमत न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती करून सरपंचपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतलं. दोघेही ग्रामपंचायतीची कमाई अर्धीअर्धि वाटून, गळ्यात गळा घालून श्रीमंत होताहेत.

भिवाशिवाची जमिनीची केस लढणाऱ्या वकिलांचे बंगले उभे राहिले.

भिवाच्या शेजारी राहणाऱ्या, कोणाच्याही अध्यात मध्यात न पडणाऱ्या हरितात्याने शेतात ड्रीप लावली,  ग्रीनहाऊस केलं. त्याची फुलं परदेशात निर्यात होऊ लागली. अजून पाच एकर नवीन शेती घेतली. मुलगा शिकला, पीएचडी करून परदेशात गेला.

शिवाचा शेजारी जितुकाका आणि म्हादबाने बांधाचा वाद समुपचाराने मिटवून, तो पैसे शेतीच्या विकासासाठी लावला.

आंतर्राष्ट्री असो वा गावातला…. तंटा आणि तंटामुक्तीची ही घंटा सारखीच आवाज करते.  फरक फक्त एवढाच…. आंतरराष्ट्रीय तंटा टीव्ही आणि पेपरात चघळला जातो आणि गावातला सकाळी डबे घेऊन नदीकाठी जातांना. पोट आणि पोटातील बातम्या, इथंच साफ होतात. 

(या कहाणीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही चर-आचर, सजीवनिर्जीव, व्यक्ती अथवा घटनेशी काडीचाही संबंध नाही. योगायोगाने आपल्याला काही साधर्म्य वाटल्यास तो भास समजावा आणि चिंतन करावे ही विनंती.)

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

error: Content is protected !!