Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 18 December , 2021

माझ्या पुणे ते सिंगापूर या मोटारसायकलवरील मोहिमेच्या शेवटच्या देशात मी पोहोचलोय. सहा देशातील अनुभव घेऊन इथवर पोहोचलोय. इमिग्रेशन मधील कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून कायद्याने या चिमुकल्या देशात पाऊल ठेवले.
माझ्या टायरचा स्पर्श सिंगापुरी देशाला व्हायचा अवकाश, इथल्या महिला पोलिसाने मला ‘खिशातील च्युईंगम असतील तर इथंच टाका’ असा इशाऱ्यावजा सल्ला दिला. ‘का बुवा?’ असा निरागस प्रश्न मी विचारल्यावर, ‘इथं चुईंगम खाणाऱ्याला दंड भरावा लागतो’ असं उत्तर मिळालं. सिंगापूरमध्ये चुईंगम खाण्यावर आणि विकण्यावर बंदी आहे. चुईंगम विकणाऱ्याला एक लाख डॉलर, म्हणजे ७४ लाख भारतीय रुपये दंड आणि दोन वर्षाचा तुरुंगवास होतो. अरे बापरे ! आपल्याकडे तर चुईंगम चावल्याशिवाय बऱ्याच लोकांची, सकाळी प्रेशर कुकरची शिट्टी वाजत नाही. इथं अवघड आहे. हात खिशात गेले. चार-पाच चुईंगम हाताला लागले. अपराधी भावनेने एखाद्या बॉम्बसारखे काळजीपूर्वक ते कचरापेटीच्या स्वाधिन केले. लोक सुतावरुन स्वर्ग गाठतात. इथं चुईंगमवरुन तुरुंग गाठणारे सिंगापूरी पाहून शिंगणापूरी शनीदेवाला साकडं घालावसं वाटलं.

या अजब देशातले नियम खरंच गजब आहेत. कायदे बनवून ते अमलात आणण्यात सिंगापूरचा कुणी हात धरु शकणार नाही. इथे नुसते नियम बनवत नाहीत तर पाळलेही जातात. अश्याच काही नियमांबाबत आज तुम्हाला सांगतो. इथला एक मजेदार नियम म्हणजे कबुतरांना दाणे टाकणे हा इथं गुन्हा आहे. या दाणेदार गुन्ह्यासाठी ५०० डॉलर दंड आहे. म्हणजे कबुतराच्या दाणे टाकण्याच्या नादात ३७००० रुपयांचा भुर्दंड बंडू शकतो.

या प्रवासात हॉटेलमध्ये गेल्यागेल्या फुकटचं वायफाय शोधणं हा आमचा शिरस्ता होता. पण दुसऱ्याच्या वायफायला त्याच्या परवानगीशिवाय कनेक्ट करणं देखील इथं गुन्हा आहे. या वायफाय फुकट्यांसाठी इथं साडेसात लाख रुपयाचा वायफळ दंड होऊ शकतो.
शांतता आणि सुव्यवस्था राखायला इथलं सरकार प्राधान्य देतं. रात्री साडेदहा ते सकाळी सातच्या दरम्यान गोंधळ करणे आणि दारू पिणे याला सुद्धा मनाई आहे. कोणी तक्रार केली किंवा आपण ओली पार्टी करतांना ओल्या हाती सापडला तर त्यासाठी दीड लाखाला चुना लागू शकतो. बरं हा सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश असल्याने, पोलिसांचे हात ओलं करण्याचा प्रयत्न कारणं म्हणजे ओल्या बांबूच्या फटक्यांचा धनी होण्याची भीती. हे झालं रात्रीच, पण दिवसाचं काय? हा प्रश्न पडेलच. दिवसाही इतरांना त्रास होईल असं सिंगापूरमध्ये वागता येत नाही. रस्त्यावर वाद्य वाजवून इतरांना त्रास देणं देखील साडेसात लाखात पडू शकतं. हा नियम भारतात पळाला असता, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्थांचं या दंडाच्या रकमेवर चालली असती. रस्त्यावर नागीण डान्स करणाऱ्यांनीच, सरकारची तिजोरीत भरली असती.
भारताप्रमाणेश इथंही धूम्रपान करणे गुन्हा आहे. सार्वजनिक जागेत तब्बेत आणि पैसे जाळून त्याचा धूर काढणारऱ्या धूम्रवीरांवर इथं बंदी आहे. तंबाखूचा हा सार्वजनिक धूर, पंधरा हजाराचा धूर काढू शकतो. आपल्याकडेही हे नियम आहेत. पण त्यांचं पालन केलं जात नाही. सिंगापूरमध्ये मात्र ते काटेकोरपणे पळाले जातात.
स्वच्छतेच्या बाबतीत सिंगापूर फार काटेकोरपणे वागतं. सिंगापूरला गेल्यावर कचरा करू नका, त्यासाठी ३०० सिंगापुरी डॉलरचा दंड होतो. फक्त दंडावरच हे प्रकरण थांबत नाही तर चमकणारे भडक हिरवे कपडे खालून सार्वजनिक ठिकाणं साफ करण्याची शिक्षा देखील केली जाते. म्हणजे कचरा करणाऱ्याला सफाई करण्यात काय कष्ट पडतात याची जाणीव व्हावी. इथं भडक हिरव्या कपड्यातला सफाई करणारा माणूस दिसला की समजावे, याने घाण केलेली असून त्याच्या घाणेरड्या कृत्याची तो शिक्षा भोगतोय.

जशी शहराच्या सफाईसाठी सिंगापुरी कायदे आहेत तसे घरातील सफाईसाठीही आहेत. सिंगापूरच्या १९ नोव्हेंबर हा ‘वर्ल्ड टॉयलेट डे’ म्हणजे ‘जागतिक संडास’ दिवस साजरा केला जावा म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव ठेवला होता. यावरून त्यांचं संडासप्रेम दिसून येतं. संडासात पाणी टाकलं नाही तरी इथं तो दंडनीय अपराध ठरतो. यासाठी अकरा हजार रुपये दंड आहे. म्हणजे अकरा हजार रुपये पाण्यात जाण्यापेक्षा, संडासात पाणी टाकणे परवडेल. आपल्याकडील विदेशी संडासात, स्वदेशी पद्धतीने बसणाऱ्यांसाठी इथं दंड आहे का? ते मात्र समजू शकलं नाही.
सिंगापूरमध्ये काही गोष्टींवर वायफळ चर्चा करणं, सरकारवर टीका करणं, समाजात तेढ निर्माण होईल अश्या कॉमेंट करणं यासारख्या गोष्टी बेकायदेशीर आहेत. त्यामुळे तिथं गेल्यावर आपल्यासारखी राजकारणावरील चर्चा तुम्हाला अडचणीत आणू शकते. असा नियम भारतात आला तर काय होईल? या पडलेलल्या प्रश्नाकडे मात्र मी निवडणुकीत पडलेल्या उमेद्वारासारखं दुर्लक्ष केलं.
या नियमांव्यतिरिक्त लांब केस वाढवणं, २८० मीटरच्या वर बिल्डिंग बांधणं, कपडे काढून घराबाहेर फिरणं, सार्वजनिक जागेत थुंकणं, सार्वजनिक जागा खराब करणं यासारख्या गोष्टींवर इथं बंदी आहे. या नियमांचं हि लोक काटेकोरपणे पालन करतात. हे नियम पाळले नाहीत तर दंड भरायचा. म्हणजे श्रीमंत माणसाने गुन्हा केला तर चालतो असं आपल्याला वाटेल. पण फक्त आर्थिक दंड एवढीच शिक्षा इथं नाहीये. जुन्या काळी राज्याच्या न्यायनिवाड्यात दिली जाणारी फटक्यांची शिक्षा सिंगापूरमध्ये अजून अस्तित्वात आहे. इथं अजूनही शिक्षा म्हणून कायद्याने फटके दिले जातात. त्यामुळे आपल्याकडे पैसे असले, तरी फटक्यांची शिक्षाही होऊ शकते.

इथं एवढे नियम आहेत मग शेती किंवा शेतीमालासाठी काही नियम आहेत का? असा प्रश्न आपल्याला पडेल. तर त्याचं उत्तर आहे हो ! सिंगापूरने नियमांच्या बाबतीत शेतीमालालादेखील सोडलं नाहीये. डुरियन हे फळ सिंगापुरी नियमात सापडलय. डुरियनच्या बाबतीत सिंगापूर जरा जास्त कडक आहे. कायद्याने इथं सर्व सार्वजनिक वाहनातून डुरियन नेण्यास सरसकट बंदी आहे. अगदी टॅक्सिमध्येही ‘डुरियनफळ नेण्यास बंदी आहे’ अश्या पुणेरी पाट्यांसारख्या पाट्या दिसतात. म्हणजे वासाडे प्रवाशी चालतील पण बिच्चरं डुरियन नको. असा अन्याय या काटेरी फळांच्या राजावर होतोय. सरसकट भाडं नाकारणारे आपल्याकडील रिक्षावाले बरेच पाहिले होते, पण ‘डुरियन असेल तर दुरूनच निघा’ असा इशारा देणाऱ्या सिंगापूरी टॅक्सिवाल्यांबद्दल पहिल्यांदाच ऐकत होतो.
एवढे नियम लावल्यामुळे आणि त्यांचं नागरिकांनी पालन केल्यामुळे आज सिंगापूर जगातील श्रीमंत देशांच्या यादीत येतो. प्रत्येक सहा लोकांमागे एका सिंगापुरी माणसाची संपत्ती १० लाख डॉलर म्हणजे साडेसात कोटी पेक्षा जास्त आहे. हा करोडपतींचा देश आहे असं म्हटलं तरी चालेल. एवढ्याश्या देशाला ही किमया साधलीय ती येथील लोकांच्या शिस्तप्रियतेमुळे. देश पुढे कसा न्यावा हे सिंगापूरने सोदाहरण दाखवलंय. स्वयंशिस्त हेच इथल्या यशाचं गुपित आहे.
आपल्या देशातील शिस्तीचं काय? माझ्या बाईकने धुकधुकत प्रश्न विचारला. ‘परदेशातून परतलेल्या आणि भारतातील विमानतळावर उतरल्या उतरल्या खिशातील प्लास्टिक रस्त्यावर टाकणाऱ्या, उच्चशिक्षित साहेबाला विचारून सांगतो! असं म्हणत मी वेळ मारून नेली.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
” दंड ठोकून ” ” दंड वसूल करणार देश ”
म्हणजे ” सिंगापूर ”
आपला भारत देश ” बलदंड ” आहे. पण
” दंडा साठी , दंड ठोकत ” नाही.
तर
” बलदंडांन ” समोर अक्षर: ” दंडवत ” घालतो.
ही लाजीरवाणी गोष्ट आहे.