drsatilalpatil Agrowon Article थाईलंडचा काटेरी राजा

थाईलंडचा काटेरी राजा

थाईलंडचा काटेरी राजा post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 15 May , 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बाइकिंगचा स्वर्गीय आनंद घेत प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या पिकांचे मळे, जंगलं, खाड्या ओलांडत रास्ता अवखळ मुलागत बेलगाम पळतोय. मधूनच तो डोंगरघाटात चढतो, पुढच्या घडीला उतारावरून झोकून देत थेट समुद्रकाठी बीचवरील वाळूसोबत मस्ती करत धावू लागतो. रस्त्याच्या काठाला लोकांची लगबग सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या लगबगीत व्यस्त आहे. रस्त्याकाठच्या वाड्यावस्त्यातून पक्ष्याच्या चिवचिवाटासारखाच मंजुळ थाई थाईठयाट कानावर पडतोय. सगळं कसं स्वर्गीय वाटतंय.  

रस्त्याच्या कडेला फणस विकायला ठेवलेले दिसताहेत. थाईलंडचा फणस चाखून बघूया असं म्हणत बुलेट रस्त्याच्या कडेला थांबवली. जवळ जाऊन बघतो तर काय, हा फणस जरा वेगळा आहे असं जाणवलं. आपल्या फणसापेक्षा बरंच लहान फळ होत. म्हणजे थाई फणसही बुटका असतो का? असा बुटका विचार मनात तरळून गेला. दुकानदाराला विचारल्यावर ‘मित्रा हे फणस नाही, हा आहे फळांचा राजा, डुरियन फळ’ असं उत्तर मिळालं.

डुरियनला इकडे फळांचा राजा असं म्हणतात. अगदी फणसासारखं दिसणारं काटेरी फळ ‘डूरिओ’ या पोटजातीतलं. या झाडाच्या एकूण ३० प्रजाती आहेत. याचे थायलंड मध्ये ३०० आणि मलेशियामध्ये १०० वाण आहेत. तसं हे फळ मूळचं इंडोनेशियातील बोर्निओ आणि सुमात्रा बेटावरचं. तिथून ते मलेशिया, थायलंड मार्गे इतर देशात पोहोचलं. आपल्याकडे दक्षिण भारतात काही ठिकाणी डुरियन फळाचा आढळ आहे. थायलंड हा जगातला सर्वात जास्त डुरियनफळ पिकवणारा देश आहे.

फणस आणि डुरियन दिसायला जरी सारखे असले तरी त्यांच्यात बराच फरक आहे. दोघांचीही मोठाली झाडं असली तरी डुरियनचं झाड १५० फुटापर्यंत उंच जातं. पण फणसाच्या झाडाची उंची काही अपवाद सोडले तर ८० फुटापर्यंत असते. फणसाचे फळ, आईने बाळाला छातीशी घट्ट पकडल्यासारखे झाडाच्या खोडाला चिकटलेले असते पण डुरियन मात्र बोट पकडलेल्या शान्या मुलागत फांद्यांचा टोकाला पकडून वाढते. फणसाच्या झाडाला जास्तीत जास्त २०० फळं येतात पण डुरियनच्या पिलावळीची संख्या मात्र ८०० पर्यंत जाऊ शकते.

दिसण्यावर जात असाल तर, फणसाच्या फळाची साल मगरीच्या पाठीसारखी काटेरी पण न टोचणारी असते. पण डुरियन फळावरील काटे टोकदार असतात. दुरून पाहताक्षणी ते नजरेला टोचतात. फणसाचं फळ लहान मुलाच्या फसलेल्या वर्तुळासारखं लांबुळकं असतं तर डुरियन त्यामानाने गोल दिसतं. 

या काटेरी फळात भरपूर पोषक तत्वे आहेत. डुरियनमध्ये पोटॅशिअम, लोह, व्हिटॅमिन-सी आणि बी-कॉम्प्लेक्स भरभरून आहेत. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढणे, रक्तदाब नियंत्रिक करणे, त्वचेची कांती वाढवणे यासारखे त्याचे भरपूर फायदे मिळतात. म्हणजे थाई सुंदरीच्या तुकतुकीत त्वचेचे रहस्य साबणात नसून या काटेरी सौंदर्यप्रसाधनात आहे तर!  

ह्या फळात सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यासारख्या साध्या साखरी आहेत, त्यामुळे सध्या लोकांनी ते खाल्लं तर चालतं, पण खास मधुमेही लोकांनी हे फळ खाणं टाळावं. हे काटेरी साखरेचं खाणं त्यांच्या प्रकृतीला टोचत राहू शकतं. डुरियन खाल्ल्याने ताजतवानं वाटतं याचं गुपित त्यातील साखर आणि पोटॅशियम मध्ये दडलंय. यामधील साखरेमुळे, लगेच ताजगीच अहसास येतो आणि  पोटॅशियम मुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे डुरियन पासून बरीच देशी औषधे बनवली गेलीयेत. 

डुरियन मध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण मुबलक असल्यामुळे हृदयाच्या तब्बेतीसाठी ते उत्तम आहे. कार्डिओग्रामच्या आलेखातील काटा, हे काटेदार फळ खाली आणू शकतं, पण त्यातील बक्कळ कॅलरी आणि कर्बामुळे, कमरेच्या पट्ट्याला वर्षागणिक पडणारी नवीन छिद्रे मात्र आपण थांबवू शकणार नाहीत याची दखल घेऊन किती खायचे हे ठरवावं. एका डुरियन फळामध्ये नऊशे ते पंधराशे कॅलरी असतात. आपल्या शरीराचं रोज साधारणतः २००० कॅलरी च्या रेशन वर भागतं. म्हणजे एका फळात पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत दिवसाच्या अन्नाची गरज भागू शकते. पण अधाश्याप्रमाणे डुरियन खाणे योग्य नाही. एका वेळेस दोन ते तीन फोडीच घ्याव्यात.

काटेरी दणकट आवरणात दाबून भरलेली अन्नद्रव्ये रक्तदाबावर गुणकारी आहेत. पण ‘डुरियन गोड लागले म्हणून (काटेरी) सालीसकट खाऊ नये’ ही नवी म्हण इथं लागू पडेल. २०१० मध्ये मलेशियन राजकारणी ‘अहमद लै भुजंग’ यांना जास्त डुरियन खाल्लं म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं. या ‘भुजंग’रावांनी डुरियन च्या फोडींवर ‘लै’ हात मारला. मग या काटेरी अन्नानं आपला प्रताप दाखवायला सुरवात केला. साहेबांचा श्वास कोंडला, चक्कर आली आणि हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागलं, ‘लै भुजंग’ माणसाला देखील या काटेरी फळाने आडवं केलं होत. 

डुरियन फळाबाबत बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरले आहेत. त्यातील एक म्हणजे ‘डुरियन मध्ये कोलेस्ट्रेरॉल जास्त असतं’ हा आहे. पण हे साफ चूक आहे, या फळात शून्य कोलेस्ट्रेरॉल असतो, त्याऐवजी हृदयासाठी चांगले मोनोसॅचुरेटेड फॅट यामध्ये बक्कळ आहेत. दुसरा गैरसमज असा आहे की  डुरियन हे फार उष्ण फळ आहे आणि यामुळे होणारी उष्णता टाळण्यासाठी सोबत मँगोस्टीन हे फळ खावं. जुन्या चिनी प्रथेनुसार तसं म्हणतात. पण याला काहीही शास्त्रीय आधार नाही. कदाचित दोन्हीही फळांचा मौसम एकत्र येत असल्याने त्यांना एकत्र खाण्याची प्रथा पडली असावी.

काही लोकांच्या मते डुरियन आणि बिअर एकत्र घेतल्याने माणूस मरतो. पण यालाही काहीही शास्त्रीय आधार सापडत नाही. कदाचित दोघांचं कॉकटेल केल्याने आणि  अति सेवनाने लिव्हरला जास्त अल्कोहोल, साखर आणि तेल असलेले पदार्थ पचवायचा लोड आल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोट फुगणं आणि अपचन होऊ शकत. पण फळांसोबत बिअर घायला कोणी सांगितलं? दारू माणसाला मारते हे सगळ्यांना माहित असूनही तिला फळांसोबत घायची आणि फळांमुळे माणूस मरतो असा कांगावा करायचा हे जागावेगळंच आहे.

अजून एक गैरसमज म्हणजे डुरियन खाल्ल्यामुळे कामवासना वाढते हा आहे. यामुळे हजारो, लाखो रुपयाला हे फळ विकल्याच्या बातम्या ऐकण्यात येतात. पण या दाव्यातही शास्त्रीय तथ्य नाही. काम नसलेल्या रिकामटेकड्या लोकांनी कामवासनेकसंबाधीची अफवा पसरवली असावी.

डुरियन फळाची सर्वात जमेची आणि कमकुवत बाजू म्हणजे त्याचा विशिष्ट वास. याचा वास एवढा तीव्र असतो की तो काटेरी टणक आवरण भेदून बाहेर पडतो आणि फळाभोवती आसमंतात भरून राहतो. फळ त्या जागेवरून हलवलं तरीही बराच काळ तिथं रेंगाळत असतो. हा वास काही लोकांना आवडतो पण काहींवर मात्र त्याचा उलटा परिणाम होऊन पार उलटी होण्यापर्यंत बात पोहोचते.

थायलंड, जपान, हॉंगकॉंग आणि तैवानमध्ये सार्वजनिक वाहनातुन डुरियन नेण्यास बंदी आहे. डुरियन च्या बाबतीत सिंगापूर जरा जास्त कडक आहे. कायद्याने इथं सर्व सार्वजनिक वाहनातून डुरियन नेण्यास सरसकट बंदी आहे. अगदी टॅक्सिमध्येही ‘डुरियनफळ नेण्यास बंदी आहे’ अश्या पुणेरी पाट्यांसारख्या पाट्या दिसतात. म्हणजे वासाडे प्रवाशी चालतील पण बिच्चरं डुरियन नको. असा अन्याय या काटेरी फळांच्या राजावर होतोय. सरसकट भाडं नाकारणारे आपल्याकडील रिक्षावाले बरेच पाहिले होते, पण ‘डुरियन असेल तर दुरूनच निघा’ असा इशारा देणाऱ्या सिंगापूरी टॅक्सिवाल्यांबद्दल पहिल्यांदाच ऐकत होतो. 

रसरशीत डुरियनची फोड तोंडात टाकली. वासाचं आणि चवीचं विश्लेषण करण्याच्या भानगडीत न पडता, फळाची अपेक्षा न करता, एक नवीन फळ चाखतोय या विचाराचा आनंद घेत परत बुलेटाधीश झालो.    

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “थाईलंडचा काटेरी राजा”

  1. साबणामुळे सौंदर्यात वाढ होत नसून.
    ” निस्वार्थी निसर्गाने ” दिलेल्या वेगवेगळ्या
    ” वनस्पती , फुले आणि फळांमुळे ”
    ” अंत आणि बाह्यअंग ” खुलून दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

शेतीच्या गप्पा आणी थायलंडचा बाप्पा !शेतीच्या गप्पा आणी थायलंडचा बाप्पा !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 01 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमार ची सीमा ओलांडून आमच्या बुलेटी थायलंडच्या रस्त्याला लागल्या आणी चॅनल बदलावं

गो… गोचीड… गो ! (भाग-२)गो… गोचीड… गो ! (भाग-२)

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 June , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मागच्या लेखात आपण गोचीड कुटुंबाचा इतिहास आणि वंशावळीबाबत माहिती घेतली. या लेखात आपण गोचीडा

कीटकनाशकांचा रिझल्ट कसा ओळखावा?कीटकनाशकांचा रिझल्ट कसा ओळखावा?

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 03 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पूर्वी नवीन कीटक नाशकाची ट्रायल घायची असल्यास, त्या प्रॉडक्टचे लहान बाटल्यातले नमुने आम्ही