Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 11 December , 2021

आज मलेशियातील शेवटचा दिवस आहे. येथील प्रवासादरम्यान मी आणि माझी बाईक वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतोय. तेल आणि टुरिझम बरोबरच शेतीने या देशाच्या विकासात हातभार लावलाय. मलेशियात पामच्या शेतीबरोबरच येथील बीफ, मासेमारी, फळबागा, रबराची शेतीही प्रसिद्ध आहे. जसा शेतीचा यांच्या जीडीपीत भरीव वाटा आहे तसाच टुरिझमचा देखील आहे. त्याचबरोबर शेतीमधील अग्रीटुरिझम देखील इथं चालत. मलेशियामध्ये शेतीची वस्तुसंग्रहालये आहेत. आजपर्यंत ऐतीहासिक संग्रहालयांसंबंधी ऐकलं होतं. पण शेतीसंग्रहालये हे पहिल्यांदाच ऐकत होतो. मलेशियाच्या ‘जाशीन’ शहरात हे शेती संग्रहालय आहे. संग्रहालयाची इमारत पूर्वी पोस्ट ऑफिस म्हणून वापरली जायची. नंतर मात्र पोस्टाचा पत्ता कट झाला आणि मुक्काम पोस्ट ‘शेतीसंग्रहालय’ असा या इमारतीचा पत्ता झाला. ऑक्टोबर १९९० मध्ये हे ‘जाशीन’ संग्रहालय लोकांसाठी खुले झाले. जाशीन परिसरातील शेती अर्थकारण आणि शेतीसंबंधी ऐतिहासिक घटना आणि वस्तूंचा संग्रह या शेतीसंग्रहालयात केला गेलाय.

यानंतर अजून एक शेतीसंग्रहालय मलेशियात आहे. ते म्हणजे ‘पायनॅपल संग्रहालय’. हे जोहार राज्यातील, ‘पोन्टीयन’ जिल्ह्यातील ‘पेकान नानास’ या शहरात आहे. ‘पेकान नानास’ म्हणजे अननसाचे शहर. म्हणजे जशी आपल्याकडील ‘ऑरेंज सिटी’ तशीच त्यांच्याकडील पायनॅपल सिटी. जोहर राज्याचे मुख्यमंत्री ‘अब्दुल घनी अथमन’ यांच्या हस्ते २००२ मध्ये या अननस संग्रहालयाचं उदघाटन झालं होतं. या संग्रहालयात प्रास्ताविक, ऐतिहासिक आणि कृषिशास्त्र असे वेगवेगळे विभाग आहेत. अननस पिकाचा इतिहास, पिकतंत्रज्ञान, प्रक्रिया आणि त्यासाठीची साधनं यासारखी माहिती इथं उपलब्ध आहे. एका पिकाला केंद्रस्थानी ठेऊन संग्रहालय बनवन्याची कल्पना फार मस्त वाटली. आपल्याकडे किती चांगल्या संधी आहेत यासारख्या गोष्टींना. द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, मसाल्याची पिके अशी शेकडो पिके प्राचीन काळापासून भारतभूमीवर पिकवली जाताहेत आणि त्यांच्यावर प्रक्रिया केली जातेय, आणि त्यांची निर्यातदेखील केली जातेय. या पिकांचा इतिहास आणि वर्तमान जर संग्रहालयाच्या माध्यमातून लोकांसमोर आला तर शाळकरी मुलांपासून ते, या व्यवसायात येऊ पाहणाऱ्या लोकांसाठी ते मार्गदर्शक ठरतील.
भारतात आहेत का शेती संग्रहालये? माझ्या चौकस मनाने प्रश्न केला. त्याच्या प्रश्नाबरहुकूम माहिती मिळवल्यावर दोन संग्रहालयांची माहिती मिळाली. पाहिलं ‘राष्ट्रीय शेतीविज्ञान संग्रहालय’ आयसीएआर, दिल्लीत आणि दुसरे पोर्तुगीजांनी गोव्यात बनवलेलं ‘गोवा चित्र मुझियम’. पोर्तुगीजांच्या काळातील गोव्यातल्या लोकांच्या जीवनावर आणि शेतीवर आधारित गोष्टी इथं पहाया मिळतात. पण पीकनिहाय संग्रहालय माझ्या माहितीत नाहीत.
शेतीसंग्रहालयाच्या या देशातील ज्ञानाचा संग्रह करत करत पुढे निघालो. आकाशात ढगांचा संग्रह झाला आणि त्यातील ज्ञान-तुषारांचा माझ्यावर अभिषेक सुरु झाला. नंतर मात्र या अभिषेकाचे भडिमारात रूपांतर झालं. पावसाने मला झोडपून काढायला सुरवात केली. मलेशियात प्रवेश करतेवेळी आणि मलेशियातून बाहेर जातेवेळी अश्या दोन्हीवेळी पावसाने झोडपून काढलय. म्हणजे यांच्या देशात प्रवेश करतांना आणि बाहेर जातांना अभ्यंगस्थानाशिवाय सोडत नाहीत का? असा प्रश्न पडला.
मलेशियातील माझा प्रवास आता संपत आलाय. सिंगापूरची सीमा जवळ येतेय. असं रस्त्यावरचे बोर्ड मलशोयन भाषेत सांगताहेत. मला समजावं म्हणून काहींनी इंग्रजीत भाषांतर करून माझे भाषांतराचे कष्ट कमी केले. आज तुझं सिंगापुरी आगमन होईल असं ते म्हणतायेत. पावसाचा अडसरसुद्धा माझं सिंगापूर आगमन थांबू शकणार नाही याची मला खात्री आहे. शेवटी ‘जोहर बारू’ हे सिंगापूरच्या सीमेवरील मलेशियन गाव आलं आणि मी सुटकेचा ओलाचिंब सुस्कारा सोडला. पोहोचलो एकदाचा. एवढ्या लांबचा प्रवास करून दक्षिणपूर्व आशियाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो होतो.

समोर पाहिलं, एक मोठ्ठा पुल सिंगापूर आणि मलेशियाला जोडतोय. रस्ता मोठा प्रशस्त आणि चकचकीत आहे. मलेशियापेक्षा इकडे जरा जास्त चहलपहल जाणवतेय. लोकांच्या स्वभावातही जरा जास्त मोकळीक वाटतेय. फक्त सव्वासातशे चौरस किलोमिटर क्षेत्रावर पसरलेला हा टिकलीएवढा देश. जगातल्या सर्वात लहान २० देशांच्या यादीत सिंगापूर येतं. मुख्य बेट ४२ किलोमीटर लांब आणि २३ किलोमीटर रुंद आहे. म्हणजे फुल मॅरॉथॉनची स्पर्धा घायची असल्यास देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत जावं लागेल. हाफ मॅरॅथॉन वाल्यांनी लांबीऐवजी रुंदी मोजत पाळावं. येथील लोकसंख्या पन्नास लाखाच्या आसपास. म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून भरेल एवढीच. पण देशाचा जीडीपी किती? तर दर माणसी सुमारे 65 लाख रुपये ! म्हणजे सिंगापूरच्या प्रत्येक माणसाचं सरासरी वार्षिक उत्पन्न अर्धा कोटीच्या आसपास आहे. जीडीपीच्या यादीत सिंगापूरचा जगात सातवा नंबर लागतो.
पूर्वी सिंगापूर हा मलेशियाच्या भाग होता. मलेशियापासून ९ ऑगस्ट १९६५ रोजी वेगळा झाला. झालं असं की, मोठ्या भावाने छोट्या भावाला नाकर्ता म्हणून अव्हेरावं, तसं त्याला खड्यासारखं वेगळं केलं. पण या जिगरबाज छोटूनं आपल्या मेहनतीनं स्वतःचा आश्रर्यकारक विकास केला. मलेशियाचा प्रती माणसी सरासरी जीडीपीच्या जागतीक यादीत ६२ वा नंबर आहे. तिथं या छोटूनं जगात 7 वं स्थान गाठलंय. सलाम त्यांच्या जिगरबाज लढाऊ बाण्याला. लहान मुर्तीचा छोटू आपल्या किर्तीने मोठा झाला होता.
सिंगापूरची भारताशी प्राचीन नाळ जुडलीये. इ.स. १०२५ मध्ये सिंगापूर बेट, दक्षिण भारतातील चोला साम्राज्याचे राजे ‘राजेंद्र चोला’ यांच्या अधिपत्याखाली होतं. त्यानंतर १२९९ मध्ये ‘शिंगापूरा’ साम्राज्याचे राजकुमार ‘श्रीविजया’ यांच्याकडे सिंगापूरचा ताबा आला. १३९० मध्ये राजा परमेश्वरा यांच राज्य सिंगापूरवर होतं. दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान १९४२ मध्ये सिंगापूर जपानच्या ताब्यात गेलं. जपानचा पाडाव झाल्यावर त्याचा ताबा ब्रिटीश साम्राज्याकडे गेला. पुढे १९६३ मध्ये गोऱ्या साहेबाने सिंगापूरचा ताबा मलेशियाकडे दिला. शेवटी ९ ऑगस्ट १९६५ रोजी ते मलेशियापासून पूर्णपणे वेगळे झाले. एवढ्या भुराजनैतिक संक्रमणातून गेलेल्या सिंगापूरची प्रगती प्रशंसनीय आहे.
सिंगापूर हे नाव ऐकलं की मला शिंगणापूर आठवत. सिंगापूरचं हे भारताळलेलं नाव कसं पडलं यामागे एक कथा आहे. श्रीविजयाचा राजपुत्र समुद्रातील वादळी वाऱ्यांमुळे या बेटावर आसऱ्यासाठी आला. इथं त्याला सिंहासारखा एक प्राणी दिसला. म्हणून त्याने या जागेला सिंहापुरा असं नाव देऊन टाकलं. पुढे त्याचाच अपभ्रंश ‘सिंगापूर’ असा झाला.

‘मरलायन’ हे सिंगापूरचं राष्ट्रीय चिन्ह आहे. ‘मरलायन’ म्हणजे तोंड सिंहाचं आणि धड माशाचं. जशी लहान मुलांच्या परिकथेतील ‘मर्लिन’ असते ना, तोंड बाईचं आणि धड माशाचं, अगदी तस्सच. इथल्या ‘मर्लिन पार्क’ मध्ये तोंडातून पाण्याचा फवारा फेकत मर्लिनचा पांढराशुभ्र पुतळा उभा आहे. या पुतळ्याचं माश्याच धड हे, सिंगापूर हे मासेमाऱ्यांचं गाव होतं याच प्रतीक आहे. ‘मरलायन’ ला सिंहाचं शीर मिळालं ते सिंगापूरच्या जुन्या नावावरून.
या टिकलीएवढ्या देशात शेती होते का? ही प्रश्नाची टिकली डोक्यात चमकून गेली. या संपूर्ण देशाच्या शेतजमिनीचा आकार आहे फक्त पाचशे एकर. आपल्याकडच्या एका जमीनदाराच्या शेताच्या आकाराएवढा. मग यांच्या रोजच्या अन्नधान्याच्या गरजेचं काय? तर सिंगापूरमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त अन्न बाहेरून आयात होतं. कोविड १९ च्या पार्श्ववभूमीवर आयातीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देश आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतोय. जमीन तोकडीच आहे. समुद्रात भर टाकून नवीन जमीन बनवण्याचा प्रयत्न होतोय. पण समुद्र कोरून किती जमीन काढणार?
‘सिंगापूर आ राहा हू मैI’ असं म्हणत बाईकला किक मारली आणि सिंगापूरला मलेशियाचे जोडणाऱ्या पुलावरून पलीकडे निघालो.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
भारतात पण पीक निहाय ” संग्रहालय ” झाले तर
भारतातील शेतकऱ्यांना ” सुगीचे दिवस ” येतील.