Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 12 Jun , 2021
Published by: अग्रोवन

रस्त्यावरचे गिचमिड थाई फलक वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न करत माझा दुचाकी प्रवास सुरु आहे. ‘सुरत थानी’ नावाचं गाव, लांब कुठंतरी आहे, असं रस्त्यावरचा चुकार इंग्रजी फलक ओरडून सांगतोय. ‘सुरत थानी’ हे मोठं गाव असावं. कारण रस्त्यावर त्याच्या नावाचे फलक होते आणि ते ही इंग्रजीत. भारताच्या ‘सुरतेत’ आणि या थानीच्या ‘सुरतेत’ काही साम्य दिसतंय का? पाहूया… म्हणून पुढे निघालो. पण मध्येच दुसऱ्या फलकाने लक्ष वेधलं. बुलेटचा वेग कमी केला आणि तो बोर्ड व्यवस्थित वाचला. ‘थाकसीन युनीव्हर्सीटी’ असा तो फलक डावीकडे बाण दाखवत उभा होता. रस्त्याच्या बाजूला मोठ्या भिंतीवरील दुसऱ्या फलकावर छान झाडवेलींची झालर चढली होती. थायलंडमधील विद्यापीठं आणि कॉलेज कसे आहेत याची उत्सूकता होतीच. एक क्षण विचार केला आणि हॅण्डल विद्यापीठाकडे वळवून, बुलेट सरळ आत नेली. विद्यापीठात जाणारा रस्ता प्रशस्त आहे. अगदी राजमार्गासारखा वाटतोय. या राजमार्गावरून बुलेटाधीच महाराज विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश करते झाले


विद्यापीठाचा परिसर बराच मोठा आहे. शेकडो एकरचा हा परिसर हिरवागार दिसतोय. मुख्य इमारतीसमोर बाईक लावली. तेव्हड्यात समोर गाडी लावणारा मुलगा आणि त्याची मैत्रीण भूत बघितल्यागत माझ्याकडे पाहू लागले. माझा जॅकेटमधील कमांडोछाप अवतार आणि बुलेट, याकडे पाहून ते आश्चर्याने माझ्याकडे आले. घाबरू नका, मी माणूसच आहे असं हसत म्हणत मी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्यांना माझी बाइकिंगची लांब स्टोरी थोडक्यात सांगितली. ते दोघंही जीवशास्रातले पीएचडीचे विद्यार्थी होते. मी त्यांना विद्यापीठाच्या प्रयोगशाळा आणि परिसर पहायचा आहे, ही मनिषा बोलून दाखवली. माझ्या इच्छेला मान देत, त्यांनी मला त्यांच्या प्रोफेसरांकडे नेलं. शेती जैवतंत्रज्ञान आणि खासकरुन शेतीसंबंधीत जैवरसायनांमध्ये आम्ही करत असलेल्या संशोधनाबद्दल त्यांना सांगितलं. ‘एक मिनिट हं!’ असं म्हणत प्रोफेसरसाहेबांनी फोन घुमवला आणि शेती आणि जैवरसायनशास्रात काम करणाऱ्या प्राध्यापकांना बोलवून घेतलं. सोबत मर्जीतले विद्यार्थी होतेच. चहापाण्यासोबत गप्पांचा फड रंगला.

थाईलंडच्या शिक्षणव्यवस्थेसंबंधी माझ्या प्रश्नांचं गासोडं मी सोडलं. आणि त्यांनी उत्साहात, लक्षवेधी सूचनेला दिलेल्या प्रतिसादासारख्या गंभीरतेने माहिती द्यायला सुरवात केली. थायलंडमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्याने त्यांची पीकं आणि समस्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. सध्या आशियानच्या माध्यमातून संशोधनासाठी बराचसा निधी येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. अजून एक गोष्ट त्यांच्या बोलण्यातून लक्षात आली. ती म्हणजे इथलं संपूर्ण शिक्षण थाई भाषेत आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील कमजोरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. पण विद्यापीठ त्यावर काम करतंय, असं सांगण्यात आलं.

थाकसीन विद्यापीठ, हे दक्षिणेतील एक महत्वाचं विद्यापीठ आहे. ‘थकसिन’ हे नाव ‘दक्षिण’ या संस्कृत शब्दापासून घेतलंय. देशाच्या दक्षिणेतील विद्यापीठ असा त्याचा अर्थ होतो. १९९६ मध्ये राजाने विद्यापीठाच्या नावाला हिरवा झेंडा दाखवला आणि ह्या विद्यापीठाने देश हिरवा ठेवण्याचा कार्यात वाहून घेतल. अगदी कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडी पर्यंतचे अभ्यासक्रम इथं शिकवले जातात.
गप्पांचा ओघ थाई शिक्षणव्यवस्थेकडे वळला. येथील साक्षरतेचं प्रमाण ९६ टक्क्यापेक्षा जास्त आहे. याचं श्रेय सरकार शिक्षणावर करत असलेल्या खर्चाला आहे. इथं देशाच्या वार्षिक बजेटच्या १९.३५ टक्के पैसे शिक्षणावर खर्च केले जातात. १२ वर्षापर्यंतच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षण दिलं जात. ‘तुमच्याकडे पर्मनंट शासकीय नोकरीसाठी शिकणाऱ्यांचं पीक येतं का?’ असं मी विचारल्यावर, तसे काही विद्यार्थी असतात, पण त्यांची संख्या जास्त नाही. व्यवसायासाठी शिक्षणावर जास्तकरून भर दिला जातो. ‘थायलंडमधून परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यात बिझिनेस’ सर्वात लोकप्रिय विषय आहे’ हे सांगतांना त्यांच्या डोळ्यात देशाबद्दलचा अभिमान चमकून गेला.
इथली शिक्षणव्यवस्थेची उतरंड आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे. म्हणजे तीन ते पाच वयापर्यंत बालवाडी, सहा ते अकरा वयात, पहिली ते सहावी अशी प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळेला इथं ‘प्रथोम’ म्हणतात. आपल्या ‘प्राथमिक’शी जुळणारा ‘प्रथोम’ ऐकून आपल्या थाई भावकीबद्दल प्रेम दाटून आलं. बारा ते चौदा वयात, तीन वर्षाची ‘माथयोम’ ही कनिष्ठ माध्यमिक शाळा. तसं ‘मायथोम’ आणि ‘माध्यमिक’ पण जुळतंय त्यानंतर पुढची तीन वर्षे वरिष्ठ माध्यमिक. एवढ्या शैक्षणिक पायपिटीनंतर विद्यार्थ्यांची वाटचाल महाविद्यालयीन शिक्षणाकडे सुरु होते.
थाईलँडमध्ये एकूण १२० उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यापैकी साधारणतः ४९ महाविद्यालयांमध्ये शेतीशिक्षण दिलं जातंय. कृषिविस्ताराबरोबरच सेंद्रिय शेतीच्या अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. ‘तुमच्या विद्यापीठातील शास्रज्ञ शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का?’ या माझ्या प्रश्नाला ‘हो तर!’ असं उत्साही उत्तर मिळालं. कृषी शास्त्रज्ञाच्या बुटाला किती माती चिकटलीय, यावरून त्यांचा पगार ठरवावा असा आगाऊ सल्ला मी त्यांना, न मागता देऊन टाकला आणि ते चिमुकल्या डोळ्यांच्या फटी मिटून मनसोक्त हसले.
पंतप्रधान ‘प्रयुत चान ओ चान’ यांच्या कार्यकाळात बालवाडीपासून ‘देश संरक्षक बटालियन’ नावाने सैनिकी शिक्षण सुरु केलं गेलं. चारपाच वर्षाच्या मुलांना मिलिटरी गणवेशात ट्रेनिंग देणं सुरु केलं. त्यात दंडबैठका, जाळीखालुन रांगत जाणं, जमिनीवर बसून खाणं वगैरे शिकवलं जातं. थायलंडची ‘बारा मूल्ये’ शिकवणं आणि मुलांत देशभक्ती रुजवणं हा त्यामागचा उद्देश. त्याचबरोबर इथल्या अभ्यासक्रमात ‘शाश्वत विकास शिक्षणाचा’ केलेला अंतर्भाव देशाच्या दूरदृष्टीची झलक दाखवतो. आपल्यासारखीच थायलंडमधेही, ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता शहरांच्या तुलनेत चांगली नाहीये. जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार येथील ग्रामीण भागातील शाळेत, पंधरा वर्षाखालील दर तीन विद्यार्थ्यांमागे एक मुलगा शिक्षणात ‘ढ’ आहे. पण हळूहळू ही परिस्थिती सुधारतेय. ग्रामीण शाळेतील या ‘ढ’गांचं मळभ दूर होतंय.
२०१५ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांचा आयक्यू म्हणजे बुद्ध्यांक मोजण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यात धक्कादायक निष्कर्ष समोर आले. थाई विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक ९४ वरून ९३ वर घसरला होता. बुद्ध्यांकाची जागतिक सरासरी १०० आहे. जगाच्या मानाने आगोदरच कमी असललेला बुद्ध्यांक अजून खाली का घसरला हे शोधायचा प्रयत्न केला गेला. या ‘आयक्यू’ च्या घसरणीचं एक कारण आयोडीनची कमतरता असावी असा निष्कर्ष काढला गेला. मग यावर उपाय म्हणून, आरोग्य खात्याने ‘आरोग्य आणि पोषण’ यांचा शालेय शिक्षणात समावेश केला. देशाचा घसरलेला बुद्ध्यांक ९४ वरून १०० वर नेण्यासाठी त्यांनी कंबर कसलीय. ‘राजकारण्यांचा आयक्यू वाढवण्यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का?’ असा प्रश विचारल्यावर ‘त्यांच्या आयक्यूचा अंदाज करणं कठीण असल्याने, सध्यातरी जगात कोणत्याही देशात तसं ऐकिवात नाही’ असं मिश्किल उत्तर मिळालं.
इथल्या शिक्षणाचा एक भक्कम भारतीय दुवा म्हणजे, थायलंडच्या शाळेत शिकवलं जाणारं रामायण! हो! थायलंडच्या अभ्यासक्रमात चक्क रामायण शिकवलं जात. इथं त्याला ‘रामाकेन’ असं म्हणतात. हा विषय इथं मन लावून शिकला आणि शिकवला जातो. म्हणजे थाई शिक्षणात ‘राम’ आहे आणि शिक्षणव्यवस्था ‘रामभरोसे’ नाही हे ऐकून छान वाटलं. ‘तुमच्या देशात शालेय अभ्यासक्रमात तुमचे प्राचीन ग्रंथ शिकवले जात असतीलच ना?’ असा आशावादी प्रश्न त्यांनी रामाच्या देशातून आलेल्या बाईकरला विचारला. मी सव्वालाखाची मूठ झाकत आणि होकारार्थी मान डोलवत वेळ मारून नेली.
विद्येचं पीठ पडण्याचा कार्यक्रम जोरात सुरु होता. इतर प्राध्यापक, शास्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसोबतचा शास्रार्थ रंगात येत होता….
वेगळी माहिती, सुंदर लेख, संस्कृत प्रचुर थाई भाषा, शिक्षणाचे महत्त्व, मातृभाषेतुन शिक्षण,
माहितीपूर्ण लेख
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. थायलंड मधे शालेय विद्यार्थ्यांना रामायण शिकवलं जातं आणि रामायण जिथे घडलं त्या देशात मात्र ते शिकवलं जात नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे.
It is a very well written article. I agree that our education does not provide such indepth knowledge of our culture and heritage. I hope the new education policy will bring some reforms.
थायलंड देश आपल्या देशातील लोकांच्या
” आरोग्या आणि शिक्षणा ”
बाबत किती गंभीरपणे विचार करतो.
हि गोष्ट अभिमानास्पद आहे…
आणि
आपल्या एवढ्या मोठया देशाला हि गोष्ट विचार करायला लावणारी आहे.