Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 11 September , 2021

कंबोडियाचा सूर्य उठण्याआगोदर मी जागा झालो. आजच्या दिवसाची प्रचंड उत्सुकता ओसंडून वाहतेय. पोटात एक अनामिक संवेदना उठली. आनंद, उत्सुकता असंच काही बाही… त्या संवेदनेचं अनालिसिस करायचा प्रयत्न करतोय पण नक्की काय होतंय ते कळत नाहीये. लहानपणी शेजारच्या गावात क्रिकेटची मॅच खेळायला जाण्यापूर्वी पोटात जशी संवेदना व्हायची, काहीशी तशीच आता होतेय. या कंबोडियन उत्साहाच्या नदीला कोल्हापुरी बांध घालत आवरायला सुरवात केली.
आज जगातील सर्वात मोठ्या मंदिराला भेट देणार आहे. नुसत्या विचारानेच अंगावर रोमांच उठतंय. शेकडो वर्षांपूर्वी, कोणतीही आधुनिक वाहने नसतांना हजारो किलोमीटर लांब येऊन आपल्या पूर्वजांनी बांधलेलं मंदिर कसं असेल? किती मोठं असेल ? काळाच्या ओघात मंदिराची मोडतोड झाली नसेल ना ? का ते काळाच्या ओघात टिकून राहिलय? एक ना हजार प्रश्न उतू जाणाऱ्या दुधाप्रमाणे उड्या मारताहेत. अरे जरा दम धरा म्हणत, फुंकर मारत त्यांना नियंत्रणात आणन्यानाचा प्रयत्न करतोय.
सियाम रीप या शहराजवळ हे जगप्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर शतकानुशतके उभं आहे. नाश्तापाणी आटोपून निघालो. लॉजपासून मंदिर फक्त पाच किलोमिटरवर असल्याने सामान बरोबर घेतलं नाही. तालुक्याच्या बाजारात सामानाने गच्च भरून गेलेली बैलगाडी जशी परतीच्या प्रवासात हलक्या अंगाने दुडदुडत गावाकडे येते ना, तशीच माझी बिनासामानाची बाईक हलक्या अंगाने मंदिराकडे निघालीय. सियाम रीप गावाबाहेर पडलो. १०-१५ मिनिटातच तिथं पोहोचलो. तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये जाऊन तिकीटं काढली आणि मंदिर परिसरात आलो. समोरचं विशाल मंदिर विस्मयचकीत होवून पाहतंच राहिलो. इतके दिवस ज्याला कल्पनेत, चित्रात आणि व्हिडिओत पाहत होतो ते भव्य दिव्य अंगकोर-वाट मंदिर साक्षात आमच्या समोर उभं होतं.

इथं येण्या आगोदर मंदिरावर बराच होमवर्क करून आलो होतो. पण एखाद्या कार्यक्रमाला जाण्याअगोदर आठवडाभर तयारी करून भाषण पाठ करावं आणि ऐन कार्यक्रमाला शब्दांनी दगा द्यावा अशी माझी अवस्था झाली होती. मंदिराचा परिसरच एवढा मोठा होता की कुठून सुरवात करू असं झालं. त्यावर उपाय म्हणून मंदिराची माहिती देण्यासाठी स्थानिक गाईड घेतला. आम्ही केलेला गृहपाठ आणि स्थानिक गाईडची माहिती असा संयुक्त मंदिराकलन कार्यक्रम सुरु झाला.
अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठी धार्मिक वास्तू आहे. या जगात भारी हिंदू मंदिरा एवढी विशाल धार्मीक वास्तु जगात दुसरीकडे नाही. युनेस्कोच्या जागतीक वारसा यादीत याला मानाचं स्थान आहे. येवढच काय पण कंबोडीयाच्या राष्ट्रीय झेंड्यावर देखील अंगकोर वाट मंदिराचं चित्र आहे. यावरुन या स्थळाचं महत्व अधोरेखीत होतं. देशाच्या झेंड्यावरील मंदिराचं चित्रामुळे, या देशात झेंडा बदलण्यासाठी आंदोलन झाली असतील का? असा धर्मनिरपेक्ष भारतीय प्रश्नाचा झेंडा डोक्यात फडफडून गेला.
कंबोडीयामध्ये ख्रिस्तपूर्व १०० वर्षातल्या फुनान राजवटीपासून हिंदू धर्म असावा, असं म्हणतात. म्हणजे २१०० वर्षापासून हिंदू धर्म कंबोडीयात आहे. खमेर राजा सुर्यवर्मन-२ याने १२ व्या शतकात हे अवाढव्य मंदिर बांधलं. अंगकोर ही खमेर राज्याची राजधानी होती. येवढ्या मोठ्या मंदिरात कोणता देव बसलाय हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मेरु पर्वताच्या आकाराच हे विष्णू मंदिर बांधून राजा सुर्यवर्मनने त्या काळातील शिवमंदिर बांधायची परंपरा मोडली. मेरु पर्वत हे देवदेवतांच निवासस्थान. सर्वात मध्यभागी उंच चौथऱ्यावर मुख्य मंदिर. त्याच्या चारही कोपऱ्यांना चौथ्याऱ्यात चार मंदिरं, असा पाच मोठ्या मंदिरांचा आतील मुख्य परिसर. या पाचही मंदिरांना वेढणारा मोठा दगडी मंडप, त्यावर हजारो देवी देवतांच्या मुर्ती कोरलेल्या. तब्बल ४०२ एकर क्षेत्रावर हा मंदिरसमुह आणि त्याला वेढणारा तीनचार किलोमिटर लांब पाण्याचा खंदक, असा मंदिराचा अवाढव्य विस्तार आहे. मंदिराला भुकंपासारख्या धक्क्यांपासून सावरण्यासाठी हा पाण्याचा खंदक बांधलाय.

सॅन्डस्टोन म्हणजेच वालुकामय दगडात संपूर्ण मंदिराचं बांधकाम झालंय. हे दगड एवढे गुळगुळीत घासलेत की बऱ्याच ठिकाणी दगडांचा जोड कुठे आहे, हे ओळखणं कठीण जातंय. काही ठिकाणी दगडात खाचा करुन एक दुसऱ्यात बसवलेत. हे मंदिर बांधण्यासाठी १५०० किलोचा वजनाच्या ५० लाख ते १ कोटी दगडांचा वापर झालाय. ईजीप्तमधील सर्व पिरॅमिड्सचे दगड एकत्र केले तरी त्यांची संख्या यापेक्षा खूप कमी भरेल. हे सर्व दगड एकाशेजारी एक असे मांडले तर १०५ चौरस किलोमिटरवर पसरलेल्या पॅरीस शहरापेक्षाही जास्त जागा व्यापतील. यावरून तुम्हाला त्याच्या व्याप्तीचा अंदाज बांधता येईल. संपूर्ण अंगकोर प्रकल्पासाठीचा दगड ४० किलोमिटरहून अधिक अंतरावरुन वाहून आणलाय. त्या काळी भात हे मुख्य पीक होतं. भाताच्या उर्जेवर शेतात राबणाऱ्या हातांनी एवढे मोठाले दगडं वाहून आणले होते. ‘अन्को’ म्हणजे राजधानीचं शहर आणि ‘नोकोर’ हे संस्कृतमधील ‘नगर’ चा अपभ्रंश, असं अंगकोर हे नाव पडलं. अर्थात ‘वाट’ म्हणजे मंदिर. राजा सुर्यवर्मनने हे मंदिर बांधलं तेव्हा त्याचं नाव ‘वराह विष्णू लोक’ होतं असं म्हणतात.

मंदिराच्या सर्व भागांवर कोरीव काम केलंय. भिंती, खांब, अगदी छतांवर देखील सुबक कोरिव मुर्त्या आहेत. हत्ती, घोडे, रथ, अप्सरा अशी हजारो शिल्पे कोरली आहेत. मंदिर परिसरातील एकूण शिल्पांचे क्षेत्रफळ मोजल्यास ते काही चौरस किलोमिटरमध्ये जाईल. अप्सरा आणि देवतांची शिल्पच अठराशेच्या आसपास आहेत. त्यांचे केस, कपडे, दागिणे अगदी आखीव, रेखीव आहेत. मंदिराबाहेरील दगडी मंडपाच्या चारही बाजूला दगडात १२०० चौरस मीटर क्षेत्रावर कोरीव काम केलंय. सात आठ फुट उंचीची ही शिल्पे अगदी जिवंत वाटतात. पश्चिमेकडील सुमारे ३०० चौरस मिटरच्या संपूर्ण भिंतीवर रामायणातील वेगवेगळे प्रसंग कोरलेत. राम, लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, रावण यासारखी शेकडो शिल्प आहेत. इथल्या रावणाला तोंडे दहाच आहेत, पण ती एका रांगेत नसुन मानेवर मुंडक्यांची उतरंड आहे. मानेवर चार तोंडे, त्यांच्यावर तीन, त्यावर दोन आणि सर्वात वर एक तोंड. कंबोडीयन रावणाची तोंडं म्हणजे एकावर एक असे चार मजले असलेली इमारत वाटते.

या गॅलरीच्या विरुद्ध बाजूला ३०० चौरस मिटर भिंतीवर संपूर्ण महाभारत कोरलयं. कौरव पांडव युद्ध, शरपंजरी भीष्म, एका हाताने रथाचं रुतलेलं चाक सांभाळत युद्ध करणारा कर्ण, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव… सगळ्यात कसा जिवंतपणा आहे. पूर्वेकडील गॅलरीच्या भिंतीवर समुद्रमंथनाचं दृश्य साकारलंय. ९२ असुर आणि ८८ देव संपूर्ण ताकदीनिशी वासुकीचा दोर ओढताहेत. दानवांच्या चेहऱ्यावरचे असूरी आणि देवांच्या चेहऱ्यावरचे प्रेमळ भाव स्पष्ट दिसतात. उरलेल्या दोन भिंतीपैकी एकीवर मृत्यूनंतरचा स्वर्ग – नरक प्रवास आणि नरकात शिक्षा देण्याचे शेकडो प्रकार कोरले आहेत. मंदिराच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५० मिटर लांब सात फणाधारी नागाचं शिल्प आहे. त्याच्या नागाचा फक्त फणाच तीन ते चार मजली इमारतीएवढा उंच आहे. एकूण हा प्रकार एवढा अवाढव्य आहे की डोकं चक्रावून जातं. भगवान विष्णूचं महाकाय शिल्प व शंकराची पिंड मंदिराच्या आतल्या बाजूला आहेत.


आकडेवारीनुसार २०१४ मध्ये जगभरातून ४५ लाखाहून अधिक पर्यटकांनी कंबोडीयातील या जगप्रसिद्ध हिंदू मंदिराला भेट दिली त्यात फक्त २८ हजार भारतीय होते. याउलट शेजारच्या थायलंडमध्ये याचवर्षी तब्बल ९ लाख ३२ हजार भारतीय फिरून गेले. म्हणजे दररोज २५०० पेक्षा जास्त भारतीय थायलंडची वाट धरतात आणि ‘अंगकोरची’ वाट चुकतात. क्या बात है, थायलंड तुसी ग्रेट हो ! थायलंडमधील ‘अर्थक्षेत्र’ पटाया शहरापासून फक्त ४०० किलोमिटर अंतरावर अंगकोर वाटचं ‘पौराणिक तिर्थक्षेत्र’ आहे. कंबोडियाने देखील पौराणिक शिल्पांचा देखावा सोडून थाईलंडसाख आधुनिक जिवंत बाहुल्यांचा बाजार मांडला तर पर्यटक इकडे येतील का? असा मिश्किल प्रश्न डोक्यात येऊन गेला.
अंगकोरवाट व्यवस्थित अनुभवण्यासाठी भरपूर वेळ देणं आवश्यक आहे, हे प्रकर्षाने जाणवलं. मी पुन्हा येणार ! असा निर्धार करुन या ऐतिहासिक वास्तुचा निरोप घेतला.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

सुंदर आर्टिकल। सुंदर फोटो।
अप्रतिम वर्णन आणि उत्कृष्ट शब्दांकना मुळे
थायलंड मधील ” अंगकोर ” मंदीराचे दर्शन झाले.
आपले पुर्वज असलेले महान हिंदू राजे
” सुर्यवर्मन ” यांना कोटी कोटी प्रणाम.
Very amazing….
फारच छान वर्णन