Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 02 October , 2021

कंबोडियाची अमेरिकेबरोबरच्या युद्धात झालेली फरफट आणि त्यानंतर त्यांचा भूमिपुत्र ‘पोल पॉट’ ने दिलेला घाव या देशाच्या उरी लागला होता. पुढचे कित्तेक वर्षे त्यांना या धक्क्यातून सावरायला लागले. अजूनही हा देश त्या दुःस्वप्नातुन सावरतोय. भूतकाळाची भुतं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वर्तमानात त्यांच्यासमोर उभे राहतात आणि त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतात. या संकटावर मत करत हा देश सावरतोय.
‘खमेर रूज’ च्या काळात ‘पोल पॉट’ ने देशातील बहुसंख्य लोकसंख्या संपवली होती. कंबोडियातील ७५ लाख लोकांपैकी २० लाख लोकांना त्याने मृत्यूच्या खाईत लोटलं होत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांच्या हत्येचं पाप त्याने डोक्यावर घेतलं होत. याचा परिणाम असा झाला की आता कंबोडिया हा सर्वात लहान वयाच्या लोकांचा देश आहे. या देशातील ६५ टक्के लोकांचं वय ३० वर्षाखाली आहे. ‘खमेर रूज’ च्या अत्याचारातून वाचलेली ही दुसरी-तिसरी पिढी आहे.
कंबोडियावर अमेरिकेने १९६५ ते १९७३ दरम्यान साडेसत्तावीस लाख टन बॉम्बचा वर्षाव केला होता. सोप्या भाषेत, अंदाज येण्यासाठी सांगायचे झाल्यास, जवळपास पावणेतीन लाख ट्रक भरून बॉम्ब कंबोडियावर टाकले. त्याच्या जोडीला तोफगोळे होतेच. संपूर्ण दुसऱ्या जागतिक महायुद्धात मित्रदेशांनी टाकलेल्या बॉम्बपेक्षा ही संख्या जास्त होती. हे बॉम्ब नदीनाल्यात, शेतात, जंगलात आणि डोंगरदऱ्यात पडले. काही फुटले, काही न फुटताच मातीत, पाण्यात, चिखलात रुतून राहिले. गावागावात आणि गावाबाहेर न फुटलेले बॉम्ब आणि तोफगोळे आजही सापडतात.

सुपीक, काळी, भुसभुशीत माती शेतकऱ्यांसाठी चांगली असते. प्रत्येक शेतकरी अशी सुपीक जमीन मिळावी म्हणून धडपडत असतो. पण हीच सुपीक माती कंबोडियन शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरलीये. सुपीक माती भुसभुशीत असते. अमेरिकेने विमानातून टाकलेले बॉम्ब टणक जमिनीवर आदळून फुटले. पण या भुसभुशीत शेतातील मातीत ते न फुटता रुतून बसले. इथल्या शेतकऱ्यांसाठी हे बाम्बगोळे डोकेदुखी ठरले. लाखो न फुटलेले बॉम्ब मातीत रुतून बसले आहेत. शेतात काम करणारा शेतकरी आणि प्राणी, खेळणारी लहान मुले यांचा पाय पडून हे बॉम्ब फुटतात. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी या बॉम्बमुळे आपले प्राण गमावले आहेत. अजूनही असे न फुटलेले लाखो बॉम्ब कंबोडियाच्या शेतजमिनीत कमनशिबी शेतकऱ्याची वाट पाहत बसले आहेत. हजारो एकर सुपीक जमीन मशागतीअभावी पडीक झालीये. काही शेतकरी त्याही परिस्थितीत ह्या जमिनी वापरायचा घातक प्रयत्न करतात. कोणत्याही क्षणी बॉम्बवर पाय पडेल अशी धाकधूक कायम मनात असते. शेतात गेलेला आपला धनी संध्याकाळी सुखरूप परत येईल का? या काळजीत सैनिकाच्या पत्नीसारखी, शेतकऱ्याची बायको डोळ्यात जीव आणून त्याची वाट पाहत असते. ज्या शेतात अमेरिकी सैनिकांनी विध्वंसच बीज पेरलंय त्याच मातीत कंबोडियन शेतकरी आशेच बीज पेरण्यासाठी जातोय.

अश्या अगणित त्रासाचा सामना करत कंबोडियन माणूस सावरतोय. त्याच्यातील सकारात्मक जिद्दीने तो उभा राहिलाय. त्याची काही उदाहरणे पाहूया. ‘अकीरा’ नावाचा एक मिसरूड ही न फुटलेला पोरगा ‘पोल पॉट’ च्या सैन्यात होता. ‘खमेर रुज’ च्या काळात त्याचे आईवडील मारले गेले. एका बाईने त्याला अनाथाश्रमात नेले. तिथून त्याला ‘पोल पॉट’ च्या सैन्यात दाखल करून घेण्यात आले. सैन्यात असतांना त्याने स्वतः बॉम्ब पेरले. या काळात या लहानग्याने मोठा नरसंहार पहिला. युद्ध संपल्यावर त्याच्यातील बॉम्ब निकामी करण्याचा कसबामुळे अकीराला संयुक्त राष्ट्रसंघाच्या बॉम्ब निकामी करायच्या पथकात काम मिळाले. इथं काही वर्षे काम केल्यावर तो आपल्या गावी परतला. गावोगावी, शेतात बॉम्ब फुटून लोकं मेल्याच्या बातम्या त्याला अस्वस्थ करत होत्या. मग त्याने पैसे न घेता बॉम्ब निकामी करायची सेवा सुरु केली. कुणीही बॉम्ब सापडल्याची माहिती दिली, की तो तिथं स्वखर्चाने पोहोचायचा आणि बॉम्ब निकामी करायचा. असे पन्नास हजारापेक्षाही जास्त बॉम्ब त्याने निकामी केले. या निकामी केलेल्या बॉम्बचं त्याने एक म्युझियम बनवलय.

अकिरा बॉम्ब निकामी करायचा, पण त्यासाठी त्याने कोणतंही ट्रेनिंग घेतलं नव्हतं. तो त्याचा युद्धातला अनुभव वापरून हे काम करायचा. असे अप्रक्षिशित बॉम्ब निकामी करणाऱ्यांवर सरकारने बंदी घातली होती. पण तरीही अकिरा आपलं काम करत राहिला. शेवटी २००१ मध्ये सरकारने त्याला जेलमध्ये टाकले. आपल्या ध्येयाने झपाटलेला अकिरा जेलमधून बाहेर आल्यवरसुद्धा आपल्या कामात मग्न राहिला. तो ऐकत नाही हे पाहून सरकारने २००६ मध्ये त्याला परत जेलमध्ये डांबले. यावेळी जेलमधून बाहेर आल्यावर तो लंडनला गेला आणि बॉम्ब निकामी करायचं प्रशिक्षण घेऊन आला.
अकिराची अजून एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी त्याने केलेले काम. न फुटलेल्या बॉम्बमुळे एक लहान मुलगा जखमी झाला हे त्याला कळलं. आपली कुठलीही चूक नसतांना अमेरिकी सैन्याने पेरलेल्या विषाची फळे ही लहान मुले भोगताहेत हे त्याच्या मनाला फार लागले. तो अश्या जखमी, पांगळ्या मुलांना घरी घेऊन आला. अकिरा आणि त्याची बायको या मुलांची काळजी घेऊ लागले. जीव घेण्यासाठी बॉम्ब पेरणारा अकिरा, जीव वाचवण्यासाठी बॉम्ब निकामी करणारा म्हणून प्रसिद्ध झालाय. अकिरा वर पुस्तकं लिहिली गेली आहेत. शॉर्ट फिल्म बनली आहे. त्याच्या म्युझियमला दरवर्षी हजारो लोकं भेट देत आहेत. खमेर रूजच्या विषारी वेलाला लागलेलं हे ‘गोड-अमृतमयी’ फळ देश वाचवण्यासाठी अहोरात्र झगडतय.
अशीच एक दुसरी कहाणी. ‘नॉम पेन’ च्या दक्षिणेला ‘चांथा थॉन’ नावाचा वल्ली राहतो. त्याचे आईवडील पोल पाटच्या खमेर रुज मध्ये मारले गेले होते. लहानगा ‘चांथा थॉन’ अनाथाश्रमात वाढला, मोठा झाला. इथंच वयाच्या १४व्या वर्षी तो तांब्याचं धातुकाम शिकला. पुढे स्वतःच लहानसं धातुकामाचं दुकान सुरु केलं. आपल्या लहानश्या धंद्यात जरी तो रमला होता, तरी ‘खमेर रूज’ मध्ये गमावलेल्या आईवडिलांच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. युद्धात डागल्या गेलेल्या गोळ्या जागोजागी सापडायच्या. नदीत मासेमारी करतांना माश्यांबरोबर जाळ्यांमध्ये बंदुकीचे काडतूसं आणि बॉम्बशेल सुद्धा अडकून यायचे. या गोष्टींमुळे जुन्या जखमेवरील खपली निघायची.

एके दिवशी त्याने ठरवलं, आपल्या या नकारात्मक भूतकाळाला, सकारात्मक वर्तमानकाळात बदलायचं. मग त्याने लोकांकडून हे बॉम्बशेल आणि काडतुसं गोळा करायला सुरवात केली. त्यांना आपल्या तांब्याच्या धातुकामाच्या दुकानात आणले. भट्टीत तापवून त्यापासून दागिने बनवायला सुरवात केली. त्याने बॉम्ब शेल आणि बंदुकीच्या रिकाम्या काडतुसापासून अंगठी, हार, कडी, पायातले पैंजण, केसातली पिन असे अनेक सुबक दागिने बनवले. हळूहळू त्याची ही ‘ब्युटी फ्रॉम ट्रॅजेडी’ ची कला सर्वत्र प्रसिद्ध झाली. देशी कंबोडियन नक्षीकाम केलेले दागिने तर ‘चांथा थॉन’ बनवतोच, पण परदेशी पर्यटकांच्या विनंतीनुसार विदेशी डिझाईन सुद्धा बनवतो. ‘चांथा थॉन’ म्हणतो ‘प्रत्येक काळ्या ढगाळ रुपेरी किनार असते, तुमच्या वाईट काळात नियतीशी झगडताना, अजाणतेपणे धैर्य आणि शौर्य तुम्ही कमावत असता. वाईट, विध्वंसक गोष्टींपासून सुद्धा चांगल्या, सुंदर गोष्टी बनू शकतात हे मला जगाला दाखवायचं’.

केवढा हा आशावाद. ज्वालामुखीच्या तोंडावर धूळमाती साठावी आणि त्यावर रानफुलांचा ताटवा फुलवा, तसा त्यांनी काही दशकापूर्वीच्या दुःखाचा लाव्हा पचवत आयुष्य फुलवले होते. संकटावर मात करून उभारी घेणाऱ्या कंबोडियन माणसाला सलाम केला. बाईकला किक मारली आणि बाइकच चाक बॉम्बवर पडणार नाही याची काळजी घेत, कच्चा रास्ता टाळत पुढे निघालो.

कंबोडिया देशातील पोल पाट या नरभक्षकाच्या काळात मनुष्यरूपात जन्माला आलेले दोन
मनुष्यरूपी देवता म्हणजे
” अकीरा ” आणि ” चांथा थॉंन ”
विनंती – पोल पाट नरभक्षकाचा शेवट कसा झाला ती
पण माहिती सांगावी.