Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 27 November , 2021

माझ्या बुलेटचे रबरी पाय मलेशियन रस्त्याला लागल्यापासून तिच्यातील कंपन संपलय असं वाटायला लागलय. रस्ते लोणी लावल्यागत चकाचक आहेत. रस्त्यावरील वाहनं लष्करी शिस्तीत धावताहेत. वाहनांचा वेग वाढलाय. माझ्या बुलेटपेक्षा, लहानसहान वाहने भरधाव वेगाने मला ओव्हरटेक करून, वाकुल्या दाखवत पुढे निघून जाताहेत. माझ्यातील बुलेटी ईर्षा मला एक्सेलरेटर पिळायला मजबूर करतेय. पण सुळकन जाणाऱ्या त्या बारक्या गाड्यांना गाठणं मुश्किल आहे. ‘आपली गाडी वजनदार आहे, त्यात एवढ्या ब्यागांचं वजन. आपल्याला नाही परवडणार ही वेगाची स्पर्धा. आपली स्ट्रेंथ, वेग नसून मजबुती, स्थैर्य आहे. या कचकड्यांच्या फटफट्यांना चिखलाच्या, खड्ड्याच्या हिमालयीन रस्त्यांवर भेटू देत, म्हणजे माझ्या बाईकची ताकद काय आहे ते दाखवेल’ अशी स्वसमजूत काढत हे धकधकतं वजनदार धूड मी पुढे नेलं.
नागमोडी रस्त्यावरून पुढे वळण घेतलं आणि रस्त्याच्या दुतर्फा जंगल सुरु झालं. सुरवातीला माझं त्याच्याकडे एवढं बारकाईने लक्ष गेलं नाही. पण मात्र या जंगलात काहीतरी वेगळपण आहे असं जाणवला. माझ्या आणि निसर्गाच्या आड येणारा, हेल्मेटच्या पारदर्शी काचेचा पडदा बाजूला सारत मी बारकाईने पाहिलं. ‘अरे, हे तर पामच्या झाडांचं जंगल आहे’ मी स्वतःशीच पुटपुटलो. पार दुरपर्यंत पामच्या शेतीच जंगल, कवायतीला उभ्या राहिलेल्या सैन्याच्या शिस्तीत पसरलं होत.

मलेशियात पामची शेती कधीपासून केली जाते? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. इथं पाहिलं पामचं झाड इंग्रजांनी १८७० मध्ये आणलं होतं. शोभेचं झाड म्हणून सुरवातीला त्यांनी हे झाड लावलं खरं, पण त्याला इथलं वातावरण मानवलं. ते इथं फळलं फुललं आणि मलेशियाला त्याने पाममय टाकलं. पामच्या शेतीचं मोठं योगदान मलेशियाच्या अर्थव्यवस्थेत आहे. एकूण ५७००० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ही पामशेती पसरलीय. या देशाच्या जीडीपीत संपूर्ण शेतीक्षेत्राचा वाटा ७.१ टक्के आहे. या समग्र पिकांमध्ये ३७.७ टक्के एवढं भक्कम योगदान या तेलाच्या पिकाचं आहे. मेहेनती मलेशियन शेतकरी प्रयत्ने ‘पाम’ ची फळे रगडून, घामाबरोबर तेलही गाळत असतो. पामतेलाच्या उत्पादनात मलेशिया जगात दुसरा मोठा देश आहे. पहिल्या नंबरवर इंडोनेशिया आहे. मलेशियन शेतीला पाममुळे अर्थ आणि अर्थार्जन असा दुहेरी फायदा झालाय.

पामची फळं तोडून, गोळा करून त्यापासून तेल काढलं जात. पालतेलाचा उपयोग फार प्राचीन काळापासून होतोय. पाच हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तच्या थडग्यांमध्ये त्याचा उपयोग होत असल्याचं समोर आलय. पूर्वीपासून पामतेलाचा उपयोग स्वयंपाकासाठी व्हायचा. युरोपियन लोक आफ्रिकेतून जहाजं भरभरून हे तेल युरोपात न्यायाची. पण या तेलाला खरी प्रसिद्धी मिळाली ती युरोपातील औद्योगिक युगात. माणसांऐवजी मशीन जेव्हा कारखान्यात राबायला लागले, तेव्हा त्या मशीनमध्ये ल्युब्रिकंट म्हणून पामतेलाचा उपयोग होऊ लागला. आणि हे पामर तेल खास झालं.
हे तेल ऑल राउंडर आहे असं म्हटलं तरी चालेल. पाम तेलाचे उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतात. खाद्यतेल, जैवइंधन, बेकरी उत्पादने, बिस्किटांसारखे अन्नप्रक्रिया उद्योग यापासून ते सौंदर्य प्रसाधने आणि साबणाच्या व्यवसायात ‘पामोलिव्ह का जबाब नही’ म्हणत पामतेल मनाच्या स्थानावर जाऊन बसलंय.

भारतात पामतेलाचा उपयोग तसा अलीकडील काळात सुरु झालाय. पूर्वी मोहरी, शेंगदाणा, तीळ यासारखे देशी तेलं वापरली जायची. पामतेलाच्या भारतातल्या आगमनाची कहाणी रंजक आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत १०० टक्के आत्मनिर्भर असलेल्या भारताला हळूहळू परावलंबी व्हावे लागले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय समाजात भिनलेल्या, ब्रिटिश विंचवाच्या विषाला उतरायला बरीच दशकं जावी लागली. कोणे एके काळी दुधातुपाच्या गंगा दारी वाहणाऱ्या देशातील, गोरसाचा ओघ आटला. याचा फायदा घेत परदेशी कंपन्यांनी खाद्यतेलाला हैड्रोजनेशन प्रक्रियेद्वारे तुपासारखे घट्ट बनवलं आणि या थिजलेल्या तेलाला ‘वनस्पती तूप’ म्हणून विकायला सुरवात केली. लोकांनीही गाईच्या तुपाची तहान या वनस्पती तुपावर भागवली. अश्या प्रकारे वनस्पती तूप भारतीय स्वयंपाकघरापर्यंत घसरले आणि देशी तूप घराबाहेर झाले. ज्या देशात ‘डाल डाल’ वर ‘सोन्याची चिडिया’ बसायची तिथंल्या लोकांवर ‘डालडा’ खाण्याची पाळी आली. पुढे वनस्पती तुपाची लोकप्रियता वाढली. वनस्पती तूप बनवायला शेंगदाणा आणि मोहिरीचं तेल वापरलं जायचं. आधीच बाजारात खाद्यतेलाची टंचाई, त्यात तूप बनवायला खाद्यतेल वापरलं जात होतं. तेलाच्या ‘उपाशी’ ग्राहकाला, तेच ‘तेल’ तुपाशी वापरण्याच्या धंद्याला आळा घालण्यासाठी आणि बाजारातील खाद्यतेलाची टंचाई कमी करण्यासाठी, भारत सरकारने तुपाच्या निर्मितीसाठी मोहरी आणि शेंगदाणा तेल वापरू नये असा नियम काढला. पण कंपन्या गप्प बसणार नव्हत्या. त्यांनी पामतेलाचा तूप बनवण्यासाठी उपयोग सुरु केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पामतेलाची आयात इंडोनेशिया आणि मलेशियातून सुरु झाली. शेंगदाना आणि मोहोरीसारख्या स्वदेशी तेलाला बाजूला सारत, विदेशी पामतेल आढळस्थानावर बसलं. गेली कित्त्येक वर्षे भारताला मोठ्या प्रमाणात पामतेल निर्यात करून, मलेशिया मलई खातोय.

या तेलाच्या शेतीला येथिल नेत्यांचा आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बराच त्रास झालाय. पामच्या शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते. हजारो एकरांवरील जंगल तोडून पामची झाडे शिस्तबद्ध पद्धतीने लावली जातात. या जंगलतोडीमुळे येथील ओरँगउटान माकडांची प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आलय. तेलाचं हे झाडच पर्यावरणाला तेल लावतंय, हा मुद्दा लक्षात घेऊन युरोपियन युनियन ने २०३० पर्यंत पामतेलाचा इंधनतेलातील उपयोग संपुष्टात आणावा असा निष्कर्ष काढला. युरोपियन युनियनप्रमाणेच, अमेरिकेनेसुद्धा मलेशियाच्या कंपन्यांवर बंदी घातली होती. कारण होतं, पामच्या शेतात कामगारांचं होणारं शोषण.
२०१९ मध्ये अजून एका वादात पामची शेती आणि शेतकरी भरडला घेतलं. इथल्या शंभरीत आलेल्या, तोंडाळ पंतप्रधान ‘महातीर मोहम्मद’ यांनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये आपलं नाक खुपसलं. संयुक्त राष्ट्रसंघात भारतावर टीका करत, पाकिस्थान आणि टर्कीच्या चांडाळ त्रिकुटात ते जाऊन बसले. आपण महा तीर मारल्याच्या आवेशात त्यांनी भारतावर निशाणा साधला होता. तेव्हा त्यांचा हा ‘तीर’ पाम तेलास्र वापरत भारताने परतवला. मलेशियाकडून प्रक्रिया केलेलं पामतेल आयात करायचं नाही असा निर्णय घेतं मलेशियाला ‘पाम’ झटका दिला. महातिरच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे मलेशियाचे पामर शेतकरी मात्र पामतेलातच्या राजकारणात विनाकारण भरडले गेले.

पाम शेतीमुळे होणाऱ्या जंगलतोडीने मी व्यथित झालो. ‘अरे जंगल तोडून शेवटी झाडच लावली ना? पामची जंगलं लावली, सिमेंटची जंगलं नाही ना उभी केली?’ माझ्या सकारात्मक मानाने मलमपट्टी करायचा प्रयत्न केला. ‘जंगल कसलं? माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी शिस्तीत लावलेल्या झाडांचा औद्योगिक व्यवसाय आहे तो’, माझ्यातला पर्यावरणप्रेमी थोडाही वेळ न दवडता उत्तराला. ‘जंगलात वेगवेगळ्या जातिप्रजातीची झाडं, सर्वधर्मीय एकोप्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता नांदतात. पण आपल्या फायद्यासाठी, फळा, पाना आणि फुलांसह संपूर्ण झाडाच्या जंगली आपेक्षेने लावलेल्या या बेगडी जंगलाने पर्यावरणाचं नुकसान होतंय’ असं म्हणत त्याने प्रवचन लांबवलं. ‘मग आपल्या बाइकमुळे देखील पर्यावरणाचं नुकसान होतंय, त्याच काय?’ या प्रश्नावर मात्र तो मुग गिळून गप्प बसला. धाड, धाड, धाड असं ध्वनी प्रदूषण करत आणि सायलेन्सर मधून बारीक धुराची बारीक रेषा काढत माझी बाईक पुढे निघाली.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
देवा मी तुझा पामरं ,
जसं
गरीबांसाठी पाम तेल.