drsatilalpatil Agrowon Article,Sakal Article नाव बदलणाऱ्या देशा… भाताच्या देशा !

नाव बदलणाऱ्या देशा… भाताच्या देशा !

नाव बदलणाऱ्या देशा… भाताच्या देशा ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 13 November , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

गेले काही दिवस कंबोडियामध्ये बाईकने हिंडतोय. लहानसहान, गावं शहरातून जातान एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे इथला माणूस साधा आणि सरळ आहे. अगदी मनापासून तो परदेशी लोकांना, प्रवाश्यांना मदत करतांना दिसतो.  भाषेच्या बाबतीत देखील जास्त गोंधळ नाहीये. यांची खमेर ही एकमेव ऑफिसिअल भाषा आहे. बहुतांश लोकांना इंग्रजी येत नाही. पण जिथं टुरिस्ट येतात त्या ठिकाणची लोकं तोडक्यामोडक्या भाषेत वेळ मारून नेण्याएवढी इंग्रजी झाडतात.

पोटातल्या कंबोडियन कावळ्यांनी रस्त्याच्या कडेला थांबून पोटपूजा करण्याचा निर्णय घ्यायला भाग पडलं. टपरीवजा हॉटेलात थांबलो. चौफेर नजर टाकत, पोटात टाकण्याजोगा पदार्थ शोधू लागलो. तेव्हड्यात भाताच्या वासाने, मी, मी असं म्हणत माझं लक्ष वेधायला सुरवात केली. ठीक आहे, आज भाताची पाळी, असं म्हणत भाताचा कसलासा स्थानिक पदार्थ ऑर्डर केला. फ्राईड राईस सारखा तो प्रकार होता. दहा मिनटात माझा भात माझ्यासमोर हजर झाला. गरमागरम भाताचा वास फुफ्फुसात भरून घेतला. क्या भात है! असं म्हणत त्यावर ताव मारायला सुरवात केली.  माझ्या समोर बसलेल्या गिर्हाईकाच्या प्लेटमधील भाताचा रंग मात्र वेगळा दिसत होता. त्याच भात पांढराशुभ्र होता पण माझा मात्र पॉलिश न केलेल्या तांदळासारखा तपकिरी. आपका भात मेरे भात से सफेद कैसा? असं मिश्किल सवाल त्याला करावासा वाटलं. पण त्याला माझा बाष्कळ हिंदी जोक कळला नसता. त्याच्या गंभीर चेहऱ्यावरून तो जोक ऐकायच्या मूडमध्ये नसावा असं दिसतं होत. उगाच रिस्क नको असं म्हणतं तो विचार आणि भाताचा गोळा एकत्र गिळला. त्यापेक्षा गुगलबाईला विचार ना ! असं माझ्या डोक्यातील ट्यूबलाईटने एकदोनदा फडफडत सांगितलं आणि मी मोबाईल मधील बाईला कंबोडियातील भाताचे प्रकार किती हा सवाल करून टाकला. मोबाइलमधल्या बाईने सांगितलेली माहिती वाचून माझा आ वसलेला जबडा तसाच राहिला. कंबोडियामध्ये तब्ब्ल चार हजार प्रकारच्या भाताच्या जाती आहेत. माणसांच्या अठरापगड जातीवर कंबोडियाच्या चतुःसहस्र भात जातींनी वरताण  केली होती.  तोंडात कंबोडियाच्या स्थानिक भाता बरोबर स्थानिक माशीचा प्रवेश होऊ नये म्हणून वासलेला जबडा बंद केला आणि भाताच्या जातींची माहिती वाचू लागलो. येथील सीआयएपी या संस्थेने १९९० मध्ये या चार हजार भाताच्या जातींच्या माहितीचं संकलन केलं होत. 

कंबोडियामध्ये मेकॉंक आणि टोनले साप नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवला जातो. इथं भाताचे दोन मोसम आहेत. पहिला पावसाळी, म्हणजे ओला सीजन. पावसाळी मोसम सहा माहिण्याचा असतो. दुसरा हिवाळी किंवा कोरडा. हा तीनचार महिन्यात आटोपतो. 

मी प्रवासात असतांना ज्या देशात फिरतो त्या देशातील चांगल्या गोष्टी शोधून काढतो. तेथील उणिवा नजरेआड करत सकारात्मक बाबी गोळा करत मी प्रवास करतो.  आता सुद्धा या देशातल्या बऱ्याच खुबी जाणवताहेत. जगातलं सर्वात मोठं धर्मस्थळ, अंगकोर वाट मंदिर इथं आहे. झेंड्यावर एखाद्या वास्तूची प्रतिमा असणारा देखील हा पहिलाच देश आहे. एकढच काय पण मॅकडोनाल्डचं अरबट चरबट खाण्याचं एकही दुकान आख्या देशात नाहीये. 

इथली नमूद करण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे कंबोडियात जन्माला येणं सोप्पय पण मरण मात्र फार महाग आहे. गोंधळात पडलात ना? थांबा तुमचा प्रश्नांचा गुंता सोडवतो. कंबोडियामध्ये अंत्यसंस्कार फार महाग आहे. शेवटच्या प्रवासात एकूण खर्च येतो तब्ब्ल साडेसहा लाख रुपये. म्हणजे कंबोडियातून स्वर्गाच्या प्रवासाच्या विमानाचे तिकीटदर, आपल्या देशातल्या इंधनदाराशी स्पर्धा करतायेत तर. मला नवल वाटलं! ज्या देशात लोकांचा महिन्याचा सरासरी पगार साडेसात- आठ हजार रुपये आहे, त्या देशात अंत्यसंस्कारासाठी लाखो रुपयांचा चुराडा लोकं कसा काय करू शकतात? पण याला पर्याय नाहीये. जसं आपल्याकडे कर्ज काढून मुलीचं थाटामाटात लग्न केलं जातं, तशीच ही जुनी प्रथा आहे, म्हणून मेल्यानंतरच्या या मरणयातना सोसाव्या लागतात.  लोकं आयुष्यभर, आपल्या आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी पैसे जमा करत असतात. इथला अंत्यसंस्काराचा सोहळा सात दिवस चालतो. मृतदेहाला अंघोळ घालून घरात ठेवलं जातं. त्यानंतर तिसऱ्या किंवा सातव्या दिवशी मिरवणूक निघते. ही मिरवणूक वाजतगाजत मंदिरात पोहोचते. तिथं प्रेताचं दहन केलं जात. या संपूर्ण कार्यक्रमात भिक्कूची भूमिका महत्वाची असते. वाजंत्री, लोकांचं खाणंपिणं, भिकूची दक्षिणा वगैरेचा खर्च लाखोंच्या घरात जातो.

कंबोडियात अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आणि ती म्हणजे गेल्या काही दशकात कंबोडियाचं नाव सातत्याने बदललय. १९५३ ते १९७० च्या दरम्यान इथं राजेशाही होती. त्यावेळेस याचं नाव होतं ‘किंगडम ऑफ कंबोडिया’ पण राजा गेला आणि १९७० ते ७५ दरम्यान प्रेसिडेंट ‘लोन नुई’ चं सरकार.  मग, जा, आम्ही नाही वापरत तुमचं जुनं नाव ! असं म्हणत प्रेसिडेंट साहेबांनी ‘दि खमेर रिपब्लिक’ असं दमदार नाव ठेवलं. पुढे १९७५ ते ७९ मध्ये पोलपाटने अत्याचाराचं लाटणं फिरवत देशाचं वाटोळं केलं. आणि आमची बॅट आमचं राज्य या न्यायाने ‘डेमोक्रॅटिक कंपूचीया’ असं नवंकोरं नाव ठेवलं. चीनच्या पाठिंब्याने हवेत गेलेल्या पोलपाटचं देशाला दिलेलं नवीन नाव मात्र चिनी मालाप्रमाणे तकलादू निघालं. ते चारच  वर्षे टिकलं. पुढे व्हिएतनामला उंगली करणं पोलपाटला महागात पडलं. व्हिएतनामच्या आक्रमणापुढे नमतं घेत त्याने पळ काढला. मग व्हिएतनामच्या अधीपत्याखालील सरकारने, आमचं पण नवीन नाव, असं म्हणत ‘दि पीपल्स रिपब्लिक ऑफ कंपूचीया’ असं देशाचं नामकरण केलं. व्हिएतनामी मालाची क्वालिटी चीनपेक्षा बरी निघाली. ते १९७९ ते १९८९ असं दहा ते वर्षे टिकलं.  व्हिएतनाम कंबोडियामधून बाहेर पडल्यावर, १९८९ ते १९९३ दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या हस्तक्षेपाने कंबोडियन सरकार स्थापन झालं. हम भी कुछ कम नही! म्हणत त्यांनी ‘दि स्टेट ऑफ कंबोडिया’ असं पाश्चिमाळलेलं मॉडर्न नाव देऊन टाकलं. पण अजून कंबोडियच्या मागे लागलेलं नावबदलीचं भूत गेलं नव्हतं. १९९३ मध्ये या देशात घटनात्मक राजेशाही लागू झाली आणि ‘किंगडम ऑफ कंबोडिया’ असं नवीन नाव चिकटलं. एवढी नाव बदललेल्या कंबोडियातील लोकांनी नावबदलीचा धसका घेतला असणार. ‘नावात काय आहे’ असं पुस्तकात लिहून, त्याखाली आपलं नाव लिहिणाऱ्या सेक्सस्पेअरने, त्याच हे  प्रसिद्ध वाक्य लिहण्याअगोदर कंबोडियाला भेट द्यायला हवी होती असं मला वाटून गेलं.

कंबोडियाच्या भाताची बातच और असं म्हणत भात संपवला. बाईकवर मांड ठोकली. रस्त्याचे नियम पाळ नाहीतर शिक्षा म्हणून कंबोडियन ट्राफिक पोलीस, या देशाची बदललेली नावं लिहायची शिक्षा देतील! असा इशारा माझ्या खट्याळ मानाने मला दिला. नको रे बाबा एवढी कठोर शिक्षा असं म्हणत, नियमात बाईक चालवत निघालो. 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “नाव बदलणाऱ्या देशा… भाताच्या देशा !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

थाईलंडचा काटेरी राजाथाईलंडचा काटेरी राजा

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 15 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बाइकिंगचा स्वर्गीय आनंद घेत प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या

फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ आज जर आपण शेतीऔषधांच्या दुकानात गेलो, तर कीटकनाशकांपेक्षा टॉनिक, झाईम, स्प्रेडर, स्टिकर यासारख्या, मसाला

कृषिरसायनांचे ‘स्कॉर्चिंग’ कसे टाळावेकृषिरसायनांचे ‘स्कॉर्चिंग’ कसे टाळावे

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बहुतेक वेळा आपण वेगवेगळे प्रॉडक्ट एकत्र फवारतो. या खिचडी फवाऱ्यामुळे पिकावर स्कॉर्चिंग येत. स्कॉर्चिंग