drsatilalpatil Agrowon Article उपवासाचं थाई पीक

उपवासाचं थाई पीक

उपवासाचं थाई पीक post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 24 July , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर माझा प्रवास सुरु आहे. आज बराच प्रवास झालाय. पोटात काहीतरी टाकूया म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो. कॉफी बरोबर खायला काय आहे हे शोधू लागलो. मला काय हवंय हे हॉटेलवाल्या थाई बाईला, न सांगताच समजलं आणि चिप्सचा एक पाकीट तिने सस्मित चेहऱ्याने माझ्या हातावर ठेवलं. कसले चिप्स आहेत म्हणून वाचायचा प्रयत्न केला, पण थाई गिचमिड अक्षरं माझ्या मराठी मेडीयम टाळक्यात घुसेनात. माझी ही चिप्साळचण, त्या सस्मित सुंदरीच्या लक्षात आली आणि तिने ‘कसावा s s कसावा चिप s s’ असं सुरेल उत्तर दिल. सुरवातीला मला कळलं नाही, पण दुसऱ्यांदा तिने तान छेडल्यावर डोक्यात कसावा कसाबसा घुसला. ‘अरे! कसावा म्हणजे साबुदाण्याचा कंद !’     

असे हे साबुकंदाचे चिप्स थाईलंडमध्ये जागोजागी दिसले. थाईलंड मध्ये बाईक चालवतांना, काही ठिकाणी कसावाचे शेतं दिसले होते, पण हा उपवासकंद, चिप्सच्या माध्यमात पाउचमध्ये बसून, एवढ्या मोठ्या प्रमाणात देशभरात विकला जातो, हे माहित नव्हतं. मग गुगलबाईला विचारात, कसावा ची माहिती खोदायला सुरवात केली.

कसावा पिकाचं वैशिष्ट्ये म्हणजे, जिथं साधारणतः इतर पिकं तग धरत नाहीत अशा वातावरणात आणि जमिनीत, अगदी कमी खतपाण्यात ते उगवतं. म्हणजे उपवासाचं हे पीक स्वतः उपवास करून, आपण उपवासाचासाठी किती लायक आहोत हे सिद्ध करतं. या पिकाला जास्त खते लागत नाहीत पण जिवाणू आणि विषाणूजन्य रोगांना मात्र ते बळी पडतं. 

आजमितीला जगात ८० हुन जास्त देशात कसावाचं  पीक घेतलं जातं आणि ८० कोटींहून जास्त लोकांची मुख्य अन्नाची गरज हे उपवासपीक भागवतयं. काही देशांमध्ये कंदाबरोबरच, कसावाची पानेही खाल्ले जातात. इतर पिकासारखा, काढणीसाठी, साबुकंद शेतकऱ्याला हातघाईवर आणत नाही. कसावाचा  कंद जमिनीत २४ महिने साठवता येतो. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळेपर्यंत थांबायची सवड शेतकऱ्याला मिळते.

दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या खोऱ्यात, सहासात हजार वर्षांपासून घेतलं जाणारं हे पीक, स्पॅनिश आणि पोर्तुगीजांनी फिलिपाइन्स मध्ये नेलं आणि तिथून व्हाया मलेशिया ते थायलंडला पोहचलं. इथं पश्चिम थाईलँडमध्ये रबराच्या पिकात आंतरपीक म्हणून त्याची वर्णी लागली. नंतर मात्र रबराची शेती ताणली गेली आणि पर्यायाने साबुकंदाचं क्षेत्र आकुंचलं. मग उपवासाचं हे अमेरिकन बाळ, पूर्व थाईलँड मध्ये, चोनबुरी आणि रेयोंग कडे रांगत गेलं. बाजार वाढला आणि पश्चिमेत उपासमार झालेल्या या बाळाने पूर्वेत बाळसं धरलं. सध्या सत्तर टक्के थाईलँडमध्ये हे पीक घेतलं जातंय. अख्या थाईलंडमध्ये पाच लाख शेतकरी कुटुंब, कसावाच्या शेतीत राबून त्यातून तीन कोटी टन साबुकंदाचं उत्पादन करतात.

कसावा पिकाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कडू कसावा आणि दुसरा गोड. कडू कसावा नावाप्रमाणे कडू असतो. त्यामधील ‘साईनीक आम्लामुळे’ कसावाला कडवट चव येते. या साईनीक आम्लाची खासियत म्हणजे, ते चवीला कडू आणि विषारी असतं. त्यामुळे कसावा कंदाला कडू चव येते. म्हणून याला डायरेक्ट खाता येत नाही. खाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी लागते. कंदाची प्रक्रिया करतांना हे साईनीक आम्ल काढून टाकावे लागते नाहीतर, या विषारी आम्लाच्या अंमलामुळे उलटी, पोटदुखी सारखे त्रास होऊ शकतात. बात पुढे जाऊन कोमा आणि रुग्णाच्या मृत्यूपर्यंत सुद्धा पोहोचू शकते. म्हणजे साबुदाणा खाल्ल्याच्या पुण्याने स्वर्ग मिळेल का नाही हे माहित नाही, पण उपवासाच्या पिकातील ‘साईनीक आम्ल’ मात्र आपल्याला स्वर्गाच्या दारात नेऊन शकतं.

२००८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या कसावाच्या प्रॉडक्टवर संशोधन केलं गेलं. बाजारातून कसावा चिप्सचे एकूण ३७४ नमुने गोळा केले गेले. त्यातील ३१७ नमुन्यात घातक ‘साईनीक आम्ला’ ची मात्रा सापडली. चिप उत्पादक कंपन्या गपचिपपणे हा विषाचा धंदा करतं होत्या. मग या संशोधनाच्या आधारे ‘ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड फूड कोड’ मध्ये बदल करून ‘साईनीक आम्ला’ ची मात्र प्रतिकिलो १० मिलिग्रॅम पेक्षा जास्त नको हे ठरवलं गेलं.  

या साईनीक अम्लाबाबत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीपासून करोडो किलोमीटर दूर अवकाशातील इन्स्टास्टेलर भागात म्हणजे  तारे आणि आकाशगंगां मधील पट्ट्यात हे आयसोसाईनीक आम्ल सापडतं. करोडो किलोमीटर अंतरावरील अवकाशातून ‘आयसोसाईनीक आम्ल’, पृथ्वीवरील उपवासाच्या पिकाच्या कंदात कसं आलं हे, अवकाशातला देवचं जाणे.

कडू कसावाचा दुसरा गोड भाऊ, म्हणजे ‘गोड कसावा’ मात्र माणसाच्या अन्नाचा गोडवा कायम ठेऊन आहे. याच्या कंदात ‘साईनीक अम्लाचं’ प्रमाण कमी असतं त्यामुळे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्या सेवनासाठी ते चालतं.

थायलंडमध्ये या उपवासाच्या पिकाला फक्त अन्न म्हणून मर्यादित न ठेवता, त्यावर संशोधन करून वेगवेगळे मूल्यवर्धित प्रॉडक्ट बनवले गेले. त्यामुळे बिस्कीट, नूडल, केक यासारख्या अन्नपदार्थापासून ते जैव-प्लास्टिक, कागद, टेक्सटाईल, सॉर्बिटॉल, मोनोसोडियम ग्लुटामेट यासारख्या औद्योगिक उत्पादनात कसावा पोहोचलाय.

थाईलंडमध्ये पिकवल्या जाणाऱ्या कसावा पैकी, ४४ टक्के कसावा कंद हा ‘स्वीटनर’ म्हणजे साखरेला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट वापरला जातो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ‘स्वीटनर’ उत्पादनात कसावाचा वाटा ८० टक्के एवढा मोठा आहे. अन्नप्रक्रिया उद्योगात त्याला मानाचं स्थान आहे. शीतपेयं, फळांचा डबाबंद रस, जाम, सीरप यासारख्या अनेक उत्पादनात कसावा स्वीटनर वापरला जातो.

सॉर्बिटॉल हा साखरेला पर्यायी पदार्थ कसावा पासून बनवतात. २०१६ मध्ये थाईलंडने सव्वादोनलाख कोटी रुपयाचं सॉर्बिटॉल निर्यात केलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉलर देशात आणून साबुकंदाने देशाचा परकीय चलनाचा उपवास संपवला होता.

कमी खतपाण्यात वाढणारं हे पीक भारतातील काही राज्यापुरतंच मर्यादित आहे. आपल्याकडे याचा मुख्य उपयोग साबुदाणा उत्पादनात होतोय. कसावाच्या या  कुजवलेल्या फराळावर कमावलेल्या उपवासाच्या पुण्यावर लोकं खुश आहेत. तसे काही  स्टार्च उद्योगही आहेत, पण ते वाढणं गरजेचं आहे.

कसावा भारतीय शेतकऱ्याचं दारिद्र्य मिटवू शकेल का? माझ्या डोक्यात विचारचक्र बाईकच्या चाकाशी स्पर्धा करू लागलं. हे कसं शक्य होईल? आपल्याकडचं उपवासाचं पीक शेतकऱ्याचा आर्थिक उपवास सोडवून डॉलरची गंगा कधी दारी आणतंय याची मी वाट पाहतोय. यासाठी शासनाला शेतकरी, शात्रज्ञ आणि उद्योजक यांची संघबांधणी करावी लागेल. आइपीएलची संघबांधणी करून आर्थिक फटकेबाजी करणाऱ्यांना ही संघबांधणी करायला जड जाऊ नये.  या संघातील शेतकऱ्याला कसावाची शेती कसावी लागेल. शात्रज्ञ, त्यातील घटक वेगळे करून मूल्यवर्धित उत्पादन तंत्रज्ञान विकसित करतील आणि उद्योजक त्यात भांडवलाचं खतपाणी घालून  देशपरदेशात पोहोचवतील. शासकीय अधिकारी टेबलाच्या खाणाला कुलूप लावून, या तिघांचं काम कसं सोपं होईल याचा विचार करतील तेव्हाच, कासवाच्या गतीने निघालेल्या कसावाच्या भारतीय पिकाला गती येईल. नाहीतर या उपवासाच्या पिकाची आणि पर्यायाने शेतकऱ्याची उपासमार अटळ आहे. 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 30 January, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेले दोन दिवस जगातल्या सर्वात आनंदी देशात बुलेटने फिरतोय. रस्ते एकदम चकाचक

मौल्यवान रत्नांची शेतीमौल्यवान रत्नांची शेती

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ ब्रह्माच्या या देशातून माझ्या बुलेटरथातून हिंडतोय. वाऱ्याशी स्पर्धा करत माझा वारू उधळलाय. रस्त्याच्या

भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पाऊस बदाबदा कोसळतोय. पावसाच्या थेंबांचा टपटपाट हेल्मेटच्या काचेवर एकसारखा सुरु आहे. नखशिकांत