Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 30 October , 2021

भारतातून निघून आम्हाला आता जवळपास महिनाभर झालाय. इतके दिवस बाईक चालवत, हजारो किलोमीटरचे रस्ते तुडवत आम्ही कंबोडियाला पोहोचलो आहोत. आमची मोहीम सुरु झाली तेव्हा भारतात दिवाळी सुरु होती. गावागावात दिव्यांचा सण साजरा होत असतांना, आम्ही सात देशांच्या सफरीवर दिवे लावायला निघालो होतो. खेड्यापाड्यातून बाईक चालवतांना कधी पोराटोरांनी लावलेल्या फटाक्यांच्या माळेला चुकवत, तर कधी भुईचक्राची भुणभुण मागे लागू नये म्हणून त्यांना लांबूनच वळसा घालत, वाट काढत पुढे निघालो होतो. एवढ्या लांबच्या सात देशांच्या बाईक सफरीने आगोदरच आगीशी खेळत होतो, त्यात फटाक्यांच्या आगीची भर नको असं म्हणत, फटाक्यांची फटकून वागत पुढे सटकत होतो. आम्हाला हिंदीतली सफर करायची होती, इंग्रजीतली नव्हे. पोटातल्या दारूच्या जोरावर, रात्री आमच्यावर खेकसत आवाज करणारे सुतळी, लवंगी आणि आगनखे दाखवून घाबरावणारी भुईचक्रे आणि भुईनळे, सकाळी धाराशायी झालेली असायची. बाईकच्या सायलेन्सरच्या हवेच्या फटकाऱ्याने त्यांच्या पार्थिवांचा कचरा हवेत उडायचा. दारू माणसाच्या पोटातली असो की फटाक्यांच्या, आवाज करणारच. पण ती संपल्यावर मात्र धाराशायी होण्याशिवाय पर्याय नसतो हे उमगले म्हणजे झालं.

असो, एवढे हजारो किलोमीटर दूर, कंबोडियाच्या पावन भूमीवर फिरतांना भारतातली सण परंपरा कायम आहे असं दिसतंय. भारतासारखे इथंही वेगवेगळे सण साजरे केले जातात. यांच्या सणांमध्ये ‘मृतात्म्यांचा सण’ किंवा ‘भुकेल्या भुतांचा सण’ साजरा केला जातो. या सणाला खमेर भाषेत ‘चुम बेन’ असं म्हटलं जात. ‘चुम बेन’ हा पंधरा दिवसांचा सण आहे. या पंधरवड्यात कंबोडियन लोकं आपल्या सात पिढ्यांच्या पूर्वजांच्या मृतात्म्याला तृप्त करतात. या सणाच्या पहिल्या दिवशी नरकाची दारे उघडतात आणि सर्व भुते बाहेर पडतात असं इथं मानलं जात. या नरकातील आत्म्यांमधे आपले पूर्वजही असू शकतात या समजुतीने, बाहेर पडलेल्या भुतांना शांत करण्यासाठी ‘पॅगोडा’ म्हणजे बौद्ध मंदिरात विधी करतात. इथंले भिक्कू रात्रभर जागून पाली भाषेतील मंत्रोपचार करत, नरकाची दारे उघडणारा राजा ‘यम’ आणि ‘आत्म्यांना’ ते आवाहन करतात. या आत्म्यांसाठी, लोकं भाताचा नैवद्य नेतात. हा नैवैद्य आत्म्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे मंदिरातील भिक्कूना हा नैवैद्य खाऊ घालायचा. पोटभर जेऊन भिक्कूचा आत्मा तृप्त झाला की मग आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त झालाच समजायचं. काही जण दुसरी पद्धत वापरतात. भाताने भरलेलं भांड हवेत उडवत आत्म्यांना आवाहन करतात. यामुळे आत्म्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय, डायरेक्ट नैवैद्य पोहोचतो. हा प्रसाद खाल्ला की मग हे पूर्वजांचे आत्मे शांत होतात. या सणावरुन मला आपल्याकडील पितृपंधरवाड्याची आठवण आली. किती साम्य आहे ना आपल्या आणि कंबोडियाच्या सणांमध्ये? या कंबोडियन सणानिमित्त तीन दिवस राष्ट्रीय सुट्टी असते. पितृपंधरवाड्यात सुट्टी देणाऱ्या देशाचं खरंच अप्रूप वाटलं.
शेती आणि शेतकऱ्याशी संबंधित दोन महत्वाचे सण कंबोडियात साजरे केले जातात. पहिला म्हणजे भात पेरणीचा सण. या सणात राजा किंवा राजवंशातील प्रतिनिधी आपल्या बायकोसह शेतात भात पेरणी करतो. या सणात यंदा पाऊसपाणी कसा असेल आणि शेतमालाला भाव मिळेल का याचे भविष्य वर्तवले जाते. संपूर्ण देश या शाही सणात सामील होतो. या सणालाही राष्ट्रीय सुट्टी असते.
त्यानंतरचा दुसरा शेती सण म्हणजे सुगीचा मोसम संपल्यावर साजरा केला जाणारा ‘बोन ओम टोक’ सण. कंबोडियात भाताचे दोन हंगाम असतात. पहिला पावसाळी हंगाम, जो जून पासून सुरु होतो आणि सहा महिन्यांनी साधारणतः डिसेंबर मध्ये संपतो. दुसरा हंगाम, हिवाळी म्हणजे सुका हंगाम. या हंगामात नोव्हेंबरमध्ये भातलावणी होते आणि तीन महिन्यात पीक काढणीला येतं. हिवाळी पीक फक्त तीन महिन्याचं असतं.
सुगीचा हंगाम आटोपल्यावर ‘चौल चाम थमे’ हा सण साजरा केला जातो. या वेळी शेतकऱ्याला त्याच्या मेहेनतीची कमाई हातात पडलेली असते. याला कंबोडियन नववर्षदेखील म्हणतात. साधारणतः १३ किंवा १४ एप्रिलला हा सुगीचा नववर्षदिन साजरा केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील सुगीशी संबंधित आणि नवीन वर्षाच्या सणांचं या कंबोडियन सणाशी साधर्म्य आहे. आपल्याकडच्या बऱ्याच राज्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नववर्ष दिनाच्या तारखा कंबोडियाच्या नववर्षाच्या सणाशी जुळतात. उदाहरण द्यायचं असल्यास महाराष्ट्रातील ‘गुढीपाडवा’, पंजाबमधील ‘बैसाखी’, बिहार, झारखंडमधील ‘जुडे शीतल’, ईशान्य भारतातील ‘भोंगा भिऊ’, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील ‘उगाडी’, केरळ मधील ‘विष्णू’ आणि पश्चिम बंगालमधील ‘पोचेल बोईशाख’ हे एप्रिल मध्ये येणारे सण आणि कंबोडियाचा ‘बोन ओम टोक’ सण एकाच वेळी येतात. या सणाच्या तारखा फक्त भारतातील सणाशी मिळतात असं नाहीये, भारताखेरीज नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, लाओस आणि थायलंड च्या नववर्षाशी तो साधर्म्य राखून आहे. यावरून आपली प्राचीन भारतीय संस्कृती कुठवर झिरपली होती याची कल्पना येते.


कंबोडियन नववर्षाचा सण तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवसाला ‘मोहा संक्रन’ असं म्हणतात. हा शब्द संस्कृत मधील ‘महा संक्रांती’ वरून आलाय. आपल्या मकर संक्रांतीशी किती मिळताजुळता आहे ना? या दिवशी नवीन कपडे घालून लोकं मंदिरात जातात, तिथं दिवा, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या लावतात. भगवान बुद्धाला तीनदा वाकून नमस्कार करतात. तिथल्या पवित्र तीर्थाने सकाळी तोंड धुतात, दुपारी ते छातीला आणि रात्री झोपायच्या आगोदर पायाला लावतात.
दुसऱ्या दिवसाला ‘वारेक वानबत’ म्हणतात. हा दानधर्माचा दिवस असतो. या दिवशी नोकर, गरीब, बेघर लोकांना दान देतात. ‘वारेक लेऊंग साक’ हा कंबोडियन नववर्षाचा तिसरा दिवस. या दिवशी भगवान बुद्धाच्या पुतळ्याला अंघोळ घालून उत्तर लावले जाते. घरातील मोठ्यांना अंघोळ घालण्याचा हा दिवस. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना अंघोळ घालून पुण्य कमावले जाते. या सणादरम्यान वेगवेगळे देशी खेळ खेळले जातात. अश्या पद्धतीने तीन दिवसांचा हा सुगीचा नववर्ष सोहळा संपन्न होतो.

त्यानंतर अजून एक सुगीचा सण कंबोडियात साजरा होतो. याला वॉटर फेस्टिवल असंही म्हणतात. नोव्हेंबर मध्ये पावसाळा संपल्याच्या निमित्ताने हा सण साजरा होतो. हा जलोत्सव देखील तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी होड्यांची शर्यत असते. संध्याकाळी सहा वाजता मोठमोठाले दिवे नदीत सोडून ‘मा गोंका’ म्हणजे ‘माँ गंगा’ ची पूजा केली जाते. फटाके फोडले जातात. गंगा नदी भारतात आहे. ती कंबोडियात कशी येणार? पण इथल्या प्रथेनुसार ‘माँ गंगा’ प्रत्येक नदीत, तलावात, समुद्रात, खाडीत आणि झऱ्यात वास करते. ती प्यायला, शेतीला आणि माश्यांचा पैदाशीसाठी पाणी देते. या दिवसामुळे मला आपल्याकडील छटपूजेची आठवण झाली. या सणाच्या दुसऱ्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. या कंबोडियन कारवाचौथला, रात्री सव्वाबाराला चंद्राची पूजा केली जाते.


याव्यतिरिक्त बरेच लहानमोठे सण कंबोडियात साजरे केले जातात. किती साम्य आहे आपल्या देशाचं यांच्याशी? हे कंबोडियात फिरतांना सारखं जाणवतंय. एवढी स्थित्यंतर होऊनदेखील त्यांनी आपली संस्कृती धरून ठेवलीय. पश्चिमेची आस धरणाऱ्या आपल्या भारतीयांना, पूर्वेकडील सांस्कृतिक भावकीची कधी जाणीव होईल? सत्तेच्या खेळात मश्गुल राजकारणी कधी या पूर्वेकडील देशांशी तुटलेली प्राचीन नाळ जोडायचा प्रयत्न करतील? असे ना उमगणारे प्रश, मी माझ्या बाईकला विचारले. तीने ढुर्रर्रर्रर्र sss असा आवाजात न समजणारं राजकीय उत्तर देऊन टाकलं. आणि मीही आपल्या जनतेसारखी, न समजता समजल्यासारखी मान हलवत एक्सलरेटर पिळला.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
आपल्या सारखेच साधर्म्य असणारे सण ,
श्रीलंका , नेपाळ , ब्रम्हदेश , लाओस , थायलंड ,
मध्ये आहेत.
या गोष्टी ने मनाला समाधान मिळाते.
आपल्या आजूबाजूला आपलेच लोक आहेत.
या भावनेने भविष्यात येणारया आपल्या भावी पिढींन
बद्दल ची चिंता कमी झाली.
फक्त आम्हीच राहायला पाहिजे.
या भावने पेक्षा
” जिओ और जिने दो. ” हेच सर्व श्रेष्ठ आहे.
मिले जो कडी कडी ( आदमी सें आदमी ) ,
एक जंजीर बने ( इंन्सानीयत की जंजीर ) ,
प्यार के रंग भरो , जिंदा तस्वीर बने ।
ज्योत से ज्योत , लगा के चलो ।
प्रेम की गंगा , बहातें चलो ।