drsatilalpatil Agrowon Article आसामच्या चहाचे चाहते !

आसामच्या चहाचे चाहते !

आसामच्या चहाचे चाहते ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 09 January, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

भर्रर्र s s असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेट च्या काचेवर आदळत होता. आजूबाजूला जिकडे नजर जाईल तिकडे जंगलच जंगल होतं. काळ्याशार चकचकीत मक्खन रस्त्यावर आमच्या बुलेटी माधुरी सारख्या “धक धक” गाणं गात आसाम मधून धावत होत्या. सिंगापूरच्या ओढीने निघालेले बायकर्स लवकरच भारताची सीमा ओलांडणार होते. जंगल संपलं आणि समोर मानवनिर्मित हिरवं जंगल दिसू लागलं. हो, नजर जाईल तिथवर चहाचे मळे. कडक थंडीत एखाद्याने हिरव्यागार नक्षीची गोधडी पांघरावी तशी ही हिरवी पानगोधडी ओडून धरतीमाता पहुडली होती. एखाद्या मुलाचा न्हाव्याने बारीक कट मारावा तसे काटेकोर मोजमापातले चहाचे मळे  दुतर्फा पसरले होते. रस्त्याच्या कडेला चहाची टपरी दिसली. पी s  पी s  असा हॉर्न वाजवत बाकीच्या बायकर्स ना “चहा पियू या रे ! असा इशारा केला आणि पाचही धडधडणाऱ्या माधुरी रस्त्याच्या कडेला थंडावल्या. वा ! काय योग आहे? चहाच्या माळ्याच्या बांधावर आठ मराठी आसामी या आसामी चहाचा अस्मानी आनंद घेऊ लागले. एकदम ईशान्य भारतातली चहाची स्टोरी डोळ्या समोर तरळून गेली.

चहापानाच्या उगमाच्या बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. ४७३७ वर्षांपूर्वी शेनॉन हा चिनी राजा गरम पाणी पीत होता. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीने जवळच्या झाडाची काही पाने त्याच्या पेल्यात येऊन पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला. त्याची चव घेऊन पाहिल्यावर तो त्याच्या प्रेमातच पडला. दुसऱ्या आख्यायिकेनुसार राजा औषधी गुणधर्म शोधण्यासाठी वेगवेगळ्या झाडाझुडुपांची चव घ्यायचा. त्यात चुकून विषारी वनस्पती चावल्या जायच्या. मग त्यावर उतारा म्हणून तो चहाची पाने चघळायचा. ह्यासारख्या अजूनही काही कथा प्रसिद्ध आहेत.

स्टोऱ्या काहीही असोत, पण चहाला खरी रंगात आली ती गोऱ्या साहेबांच्या घाऱ्या डोळ्याची नजर चहा वर पडली तेव्हा. प्राचीन काळी जपान आणि चीनमधून चहाची  ब्रिटन आणि पोर्तुगीज मध्ये निर्यात केली जायची. नंतर मात्र जपान ने चहाची निर्यात बंद केली आणि चीन च्या ताब्यात हे मार्केट आलं. चहाच्या निर्यातीतून मलिदा खाणारा चीन मात्र चहापिकाचं गुपित बाहेर पडू देत नव्हता. जभरातुन चोरीमारी करून, लुटीचा माल गोळा करण्यात पटाईत गोऱ्या साहेबाने, हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी जंग जंग पछाडलं. व्यापाऱ्याचं सोंग घेऊन स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ चीनमध्ये घुसला आणि चहाची रोपं पळवली. ही रोपं भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. दार्जिलिंगच वातावरण त्यांना मानवलं आणि ती इथं बहरली. चीनच्या चहापेक्षाही भारी चव आणि सुगंध त्याला आला. आंतरराष्ट्रीय बाजारात तिला “शॅम्पेन ऑफ टी” असा बहुमान मिळाला.   

ह्याच काळात ब्रिटिशांद्वारे आसाममध्ये हे पीक घेण्याचे प्रयोग सुरु होते. चीनचा नाजूक वाण आसामच्या गरम वातावरणात तग धरत नव्हता. शेवटी इथल्या जंगलात आढळणाऱ्या स्थानिक जंगली जाती पासून बेणं तयार करून चहापिक वाढवायचा प्रयोग यशस्वी झाला. आसामच्या भूमिपुत्रागत ती इथं फुलली-फळली. १८२३ मध्ये आसमाधील चहा पहिल्यांदा लंडनच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला गेला. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी पिऊन तरारलेलं चहाच पीक देशाच्या इतर भागात पसरू लागलं. अगदी दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकापर्यंत त्याचा प्रसार झाला.

भारतात चहापानाचे संदर्भ १२ व्या शतकापासून सापडतात. डच प्रवाशी ‘जान हुगेन वॅन लिशोन’ च्या नोंदीनुसार आसामी चहाची पाने भाजीपाला म्हणून, लसूण आणि तेलाबरोबर खाण्यासाठी आणि पेय म्हणून वापरली जायची. इंग्रज आणि डच रेकॉर्ड नुसार भारतात चहाचा वापर पोट शुद्धीसाठी आणि पाचक म्हणून केला जायचा.

१९४७ मध्ये भारतमातेच्या मानगुटीवर बसलेलं गोरं भूत उतरलं आणि चहाच्या या इस्टेटी कायद्याने भारतात आल्या. साहेबाच्या या शाही पिकाला सामान्य शेतीचा दर्जा देऊन कृषी खात्यात समावेश न करता त्यासाठी “टी अँड कॉफी बोर्ड” ची स्थापना करून वेगळं बिऱ्हाड मांडलं. स्वातंत्र्यानंतर बरीच दशकं चहापिक हे नैसर्गिकरित्याच वाढतं आणि त्याची शेती करणं सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात नाही असा समज होता. पण भारतीय शेतकऱ्यानं ही साहेबी शेती यशस्वी रित्या विकसित करून दाखवली. आसाममध्ये लाखो लहानसहान चहामळे आहेत. येथील “स्मॉल टी ग्रोवर असोसिएशन” मोठमोठ्या चहा इस्टेटींच्या खांद्याला खांदा लाऊन चहा पिकवताहेत. हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. एकट्या आसाम मध्ये ६५ लाख मजूर चहाच्या मळ्यात राबताहेत.  

काळाच्या ओघात आघाडीवर असलेली ही चहाची शेती खऱ्या अर्थाने वेळे आधी आहे. नाही समजलं ना ? सांगतो ! घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या कर्मचाऱ्यासारखा आसाममधला सूर्य संध्याकाळी पाचलाच मावळतो. पण भारतात इतरत्र तो साडेसहा-सात पर्यंत ओव्हर टाइम करतो. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी ही वेळ अडचणीची होती. हा तासा-दोनतासांचा फरक भरून काढण्यासाठी ब्रिटिशांनी एक नामी उक्ती शोधून काढली. भारतीय प्रमाण वेळेला बाजूला ठेऊन त्यांनी “टी गार्डन टाइम” सुरु केला. त्यालाच “बागान टाइम” असंही म्हणतात. संपूर्ण भारत जेव्हा चार वाजलेले असतात तेव्हा आसामच्या चहामळ्यात पाच वाजतात. भारतीय वेळेच्या तुलनेत तो एक तास पुढे आहे. आहे का नाही गम्मत !       

गोरा साहेब गेला पण चहा इस्टेटीच्या मॅनेजरचा साहेबी रोब अजूनही कायम आहे. कडक साहेबी पोशाख, डोक्यावर गोल टोपी ठेऊन मॅनेजर साहेब आपल्या जीप ने गोऱ्या साहेबासारखे फिरत असतात. ह्या मॅनेजर लोकांसाठी भलामोठा क्लब असतो. सुट्टीच्या दिवशी क्लब मध्ये इंग्रजी पार्ट्या झोडणं, पोलो खेळणं अशी त्यांची साहेबी लाईफस्टाईल असते.

२०१४ मध्ये ग्रीनपीस संस्थेनं चहाच्या पेल्यातलं वादळ उठवलं होतं. भारतातल्या ४९ चहा ब्रॅण्डच्या नमुन्यांची तपासणी केली असता ६७ टक्के नमुन्यात डीडीटी आणि काहींमध्ये मोनोक्रोटोफॉस हे रासायनिक कीटकनाशक सापडले. १९८९ मध्ये बंदी घातलेलं डीडीटी चहा पावडरीत येण्याची जादू कशी साधली? ह्याचं स्पष्टीकरण देतांना ‘टी बोर्ड’ आणि चहा निर्मात्या कंपन्यांची त्रेधा तिरपीट उडाली. पण बॅन झालेल्या कीटकनाशकांना जैविक चा मुलामा देऊन विकणाऱ्यांच्या कृपेनं हि किमया साधली होती हे फारच कमी लोकांना ठाऊक होतं.

…. टपरीतून आसामी चहाचा कप मिळाला. वाफाळलेला चहा ओठांजवळ नेला. ह्यात डीडीटी चे रेणू वळवळत तर नाही ना ह्या शंकेने एक नजर टाकली. मग गेला उडत असं म्हणत, एका फुंकरीने डीडीटी आणि शंका उडवून लावत, कप ओठाला लावला. 

6 thoughts on “आसामच्या चहाचे चाहते !”

  1. प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे/महाराष्ट्र/भारत says:

    9 जानेवारी 2020 ला मी माझ्या आयुष्याचे 59 वर्षे पूर्ण करून 60 व्या वर्षात पदार्पण केले होते.
    आयुष्याच्या 60 व्या वर्षी ” चहा ” ची ” जन्मगाधा ” आपल्या मुळे समजली.

  2. आसामच्या चहाचे चाहते वाचतांना सर्व क्षणांचे वास्तव्य डोळ्यासमोर येत होते, लालजर्द टमाटे आणि हिरवेगार चहाचे मळे प्रत्यक्ष अनुभवत होतो अशी उत्कृष्ट भाषाशैली आहे. आपण उत्तम साहित्यिक आहात.

  3. आसामच्या चहाचे चाहते अप्रतिमच!! केवढं अफाट वाचन आहे तुमचं! प्रत्येक स्थळांचा इतिहास अचूक आणि रसपूर्ण पद्धतीने सांगता.

  4. आसामच्या चहाचे चाहते अप्रतिमच!! केवढं अफाट वाचन आहे तुमचं! प्रत्येक स्थळांचा इतिहास अचूक आणि रसपूर्ण पद्धतीने सांगता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

जगातल्या सर्वात मोठ्या मंदिरात !जगातल्या सर्वात मोठ्या मंदिरात !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ कंबोडियाचा सूर्य उठण्याआगोदर मी जागा झालो. आजच्या दिवसाची प्रचंड उत्सुकता ओसंडून वाहतेय. पोटात

उपवासाचं थाई पीकउपवासाचं थाई पीक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर माझा प्रवास सुरु आहे. आज बराच प्रवास झालाय. पोटात

कृषिरसायनांचे ‘स्कॉर्चिंग’ कसे टाळावेकृषिरसायनांचे ‘स्कॉर्चिंग’ कसे टाळावे

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बहुतेक वेळा आपण वेगवेगळे प्रॉडक्ट एकत्र फवारतो. या खिचडी फवाऱ्यामुळे पिकावर स्कॉर्चिंग येत. स्कॉर्चिंग