मौल्यवान रत्नांची शेती

मौल्यवान रत्नांची शेती post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 27 March, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

ब्रह्माच्या या देशातून माझ्या बुलेटरथातून हिंडतोय. वाऱ्याशी स्पर्धा करत माझा वारू उधळलाय. रस्त्याच्या दुतर्फा म्यानमारी पिकं पानांच्या टाळ्या वाजवत माझं स्वागत करताहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातून फिरताना पिकांची विविधता जाणवतेय.  म्यानमार हा दक्षिणपूर्व आशियातील सर्वांत मोठा देश. एकूण जमीन पावणेसात लाख वर्ग किलोमीटर. येथील शेतीचं गणित, थायलंड, मलेशिया, सिंगापूर  यांच्यापेक्षा जरा वेगळंय. जरी हा देश मोसमी प्रदेशात मोडत असला तरी संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागात पाऊस मुक्तच्छंदात वावरतो. म्हणजे समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात तो अगदी ५००० मिलीमीटर पर्यंत बदाबदा कोसळतो, त्रिभुज प्रदेशात तो २५०० मिलिमिटरपर्यंत ओसरतो, कोरड्या प्रदेशात तो १००० पर्यंत आटतो तर काही ठिकाणी वार्षिक ५०० मिलिमिटरचं कंजूष उदकसिंचन करतो. 

या देशाच्या जीडीपीत ५४ टक्के शेतीचा वाटा आहे. एकूण ६५ टक्के लोकांना हा शेतीव्यवसाय रोजगार देतो. म्यानमारचा मोठा भूभाग जंगलांचं पांघरूण घेऊन लपलाय. त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध जमीन त्यामानाने कमी आहे. त्यातही देशातल्या एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी फक्त ४५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे. 

संध्याकाळी बागान शहरात थांबलोय. हे ऐतिहासिक शहर आहे. बागानला ‘देवळांचं शहर’ असंही म्हणतात. कित्येक शतकानुशतकांचा इतिहास सांगत शेकडो मंदिरं भूछत्रासारखी सर्वत्र उगवलेली दिसताहेत. जिभेचे म्यानमारी चोचले पुरवून झाल्यावर बाहेर रस्त्यावर आलो. तेवढयात एक माणूस हातात कसलीशी डबी घेऊन ‘विकत घ्या’ असं म्हणू लागला. कुतूहलाने विचारल्यावर ‘रुबी आहेत’ असं उत्तर मिळालं. ‘माणिक ?’ मी उडालोच. केसावर फुगा विकावा एवढ्या सहजपणे तो लुंगीवाला माणूस रुबीचा मौल्यवान खडा इथं रस्त्यावर विकत होता. मनातील आश्चर्याचा पाट रोकत, माझ्या बरोबर असलेल्या श्री. हताय यांना विचारलं. तेव्हा उत्तर मिळालं ‘खरंय सर ! इथल्या खाणीतून वेचलेले लहानसहान, न तरासलेले रुबी चे तुकडे इथली लोकं विदेशी पर्यटकांना विकत असतात.’ 

 

रुबी हा हिरा आहे का? मी माझी बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करत विचारलं. त्यावर त्यांनी हसत ‘नाही, ते रत्न आहे.’ असं उत्तर दिल.  आता प्रश्न पडला, हिरा आणि रत्नांमध्ये फरक काय? पण पडलेला प्रश्न उचलून घेत इथल्या संथ इंटरनेटवाल्या ‘गुगल’गाईने सांगितलं की हिरा म्हणजे १०० टक्के अस्सल कार्बन चा स्फटिक. त्यात भेसळ मुळी नाहीच. त्याचं रूपरंग काचेपेक्षाही नितळ आणि चकचकीत. पण रत्नांमध्ये मात्र इतर मूलद्रव्यांची रसमिसळ असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे रंग येतात. जसं रुबी ऊर्फ माणिक मध्ये अॕल्युमिनियम ऑक्साईडचं मिश्रण असतं, त्यामुळे तो रक्तवर्णी होतो. १०० टक्के अस्सल असल्यामुळे हिरा सर्वांत कठीण. पण रुबीचा मात्र काठीण्याच्या बाबतीत हिऱ्यानंतर दुसरा नंबर लागतो. 

इथं किती प्रकारची रत्नं मिळतात, असं विचारल्यावर ‘भरपूर’ असं उत्तर मिळालं.  माणिक, नीलम, पुष्कराज, पाचू यांसारखे बक्कळ. माणसाची वर्णद्वेषी वर्गवारी करणाऱ्या माणसाने या रत्नांचीही रंगावरून विभागणी केलीय. म्हणजे लाल, केशरी, तपकिरी किंवा जांभळा असेल तर त्याला ‘रुबी’ म्हणतात. यांच्याव्यतिरिक्त इतर रंग असेल तर त्याला सफायर म्हणजे ‘नीलम’ म्हणतात. सगळ्यात प्रसिद्ध नीलम हा ‘रॉयल ब्लू’ म्हणजे  रॉयल निळा आहे असं समजलं. आजही जगातील ९० टक्के रुबी म्यानमार मधून येतात.  रत्नांचा हा व्यवसाय आहे तरी किती मोठा? तर २०१४ मध्ये म्यानमार सरकारला या रत्नांच्या धंद्याने घसघशीत २५,००० कोटी रुपये मिळवून दिले होते. अमेरिकेने घातलेल्या  बंदीला न जुमानता कमावलेली ही माया होती.  

‘मेगॉक स्टोन ट्रॅक’ हा म्यानमारच्या वरचा प्रदेश उत्कृष्ट  मौल्यवान खड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मौल्यवान खड्यांच्या खोदाखोदीचा उद्योग इथं सोळाव्या शतकापासून सुरू आहे. या पट्ट्यात नीलम, पुष्कराज, स्पिनेल, पेरिडॉट, झिरकॉन यांसारखे मौल्यवान खडे आणि रत्ने मुबलक प्रमाणात मिळतात. एक पाचू सोडल्यास इतर सर्व रत्ने या पट्ट्यात सापडतात. जगातील खूप कमी ठिकाणी या प्रकारची क्वालिटी मिळते. सर्वांत महागड्या रत्नांपैकी म्यानमारची रत्ने गणली जातात. जगातलं सर्वांत महागडं रत्न ‘पिजन ब्लड रेड रुबी’ म्हणजे माणिक ही म्यानमारची खासियत आहे. २०१५ मध्ये येथील २५.५९ कॅरेट च्या ‘सनराईस रुबी’ ने किमतीच्या बाबतीत विश्वविक्रम केला होता. त्याचा लिलाव तब्बल बावीस कोटी रुपयांना झाला. 

 

म्यानमारमधील रत्नांचा इतिहास फार जुना आहे. तो पार इसवीसनाच्या सहाव्या शतकापार जातो. १५९७ मध्ये ‘नुहा-थुरा महाधम्मा-याझा’ याने ‘मोगोक आणि क्याटपीन’ प्रांतावर आणि पर्यायाने या मौल्यवान व्यवसायावर कब्जा केला. एकोणिसाव्या शतकापर्यंत इथल्या खाणींवर स्थानिक राजवटींचं नियंत्रण होतं. पण १८८६मध्ये इंग्रजांनी म्यानमार बळकावलं आणि या मौल्यवान धनावर गोरा भुजंग बसला. इंग्रजांना कंपनी-कंपनी खेळायला आवडतं असावं. जसं भारतीय सोन्यावर  ‘ईस्ट इंडिया कंपनी’द्वारे डल्ला मारला गेला, तशीच इंग्रजांनी ‘बर्मा रुबी कंपनी’ स्थापन करून तिच्यामार्फत इथली रत्ने मनसोक्त लुटून त्याचा रतीब राणीच्या खजिन्यात घातला. पूर्वी इथले लोक जुन्या पद्धतीने खाणकाम करायचे. पण औद्योगिक क्रांतीच्या जोरावर जग लुटणाऱ्या गोऱ्या साहेबाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात खाणी सुरू केल्या. मशीनच्या साहाय्याने पहाड खोदून रुबी काढला. रत्नांच्या खाणीसाठी लोकांचे सोन्यासारखे संसार उद्ध्वस्त करत गावंच्या गावं उठवली गेली.  

 

जसा भारताचा कोहिनुर पळवून इंग्लंडला नेला, त्याच पळवापळवीच्या पिढीजात परंपरेने म्यानमारच्या हा ८३ कॅरेटचा १६.६ ग्रॅमचा म्यानमारचा ‘स्टार ऑफ बर्मा’ म्हणजेच ‘ब्रह्मदेशाचा तारा’ रुबी युरोपात पोहोचला.  १९३५ मध्ये या रुबीला हिरेजडित-प्लॅटिनम च्या कोंदणात बसवलं गेलं. असं म्हटलं जायचं की  ‘या सम हाच’ आख्ख्या जगात याच्यापेक्षा मौल्यवान कोणीच नाही. या रुबाबदार रुबीने अगदी हाॕलिवूडच्या चित्रपटातदेखील एन्ट्री मारली. इंग्रजांनी इंग्रजांना पळवून लावत बनलेल्या, जगातील सर्वांत श्रीमंत देशात हा रुबाबदार रूबीचा   रुबाबदार मौल्यवान खडा ताठ मानेने खडा आहे. 

म्यानमारमध्ये खाणव्यवसाय जोरात आहे. रत्नांच्या जोडीला जेड, सोने, कोळसा आणि बांधकामासाठी वाळूचा उपसा करणाऱ्या खाणी सर्वत्र पसरल्यात. त्यामुळे शेतकरी- कामकरी यांच्यासाठी रोजगार निर्मिती होतेय. पण या धरतीला झालेल्या खरुजांमुळे पर्यावरणाचं आणि शेतकऱ्याचं नुकसान होतंय. जंगलांचं अस्तर विस्कटतंय. येथील जैवविविधता धोक्यात आलीय. शेतीयोग्य जमीन खड्ड्यात जातेय. वातावरणात अनपेक्षित बदल होताहेत. इथं मिलिट्रीराज असल्याने पारदर्शकतेचे पार बारा वाजलेत.  खासगी कंपन्या आणि सरकार साटंलोटं करून पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत खोदत सुटलेत. दात कोरून पोट भरावं तसं सिंगापूर वाळूच्या  कणाकणांचा भराव टाकत जमीन पैदा करतोय. आजूबाजूच्या देशातून वाळू विकत घेतली जातेय. म्यानमारच्या वाळूचा वेलू पार सिंगापूरपर्यंत पोहोचलाय. बोटीने ही वाळू सिंगापूरला निर्यात होते. या वाळूच्या उपशामुळे कित्येक  शेतकऱ्यांची भातशेती वाळूत गेलीय. आपल्याकडे वाळूमाफिया असतात, पण इथं सरकारनेच माती खाल्लीय. कुंपणानेच वाळू खाल्ल्याने फिर्याद कोणाकडे करणार? 

असा हा ‘रुबीच्या रत्नांचा’ देश, ‘हिरव्या-रत्नाच्या’ निर्मात्याच्या मुळावर उठलाय. शेतकऱ्यांचं रक्त शोषत खणलेला हा ‘कबुतराच्या रंगाचा रक्तवर्णी रुबी’ मात्र रुबाबात जगभर मिरवला जातोय.  

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “मौल्यवान रत्नांची शेती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

बर्माचा साग आणि कृषी पर्यटनाला जाग !बर्माचा साग आणि कृषी पर्यटनाला जाग !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 April, 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ सकाळच्या कोवळ्या उन्हात डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात बसून नाश्ता आटोपला. नाश्त्याचा ठिकाण म्हणजे छोटंसं अग्रोटुरिझम

तेलाचं जंगलतेलाचं जंगल

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझ्या बुलेटचे रबरी पाय मलेशियन रस्त्याला लागल्यापासून तिच्यातील कंपन संपलय असं वाटायला लागलय.

शेतीच्या गप्पा आणी थायलंडचा बाप्पा !शेतीच्या गप्पा आणी थायलंडचा बाप्पा !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 01 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमार ची सीमा ओलांडून आमच्या बुलेटी थायलंडच्या रस्त्याला लागल्या आणी चॅनल बदलावं