Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 20 November , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

भारतातून निघालेली माझी बुलेट आणि मी, आता मलेशियात येऊन पोहोचलो आहोत. भारत, भूतान, ब्रह्मदेश, थायलंड आणि कंबोडिया असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत, माझ्या बुलेटचे टायर मलेशियाच्या गुळगुळीत रस्त्यांना गोंजारत सिंगापूरच्या दिशेने निघाले. एवढा लांबचा पल्ला पार करत, दर किलोमीटरगणिक आमची मंजिल जवळ येत आहे.

कंबोडिया आणि थाईलँडमधून मलेशियात आल्यावर बऱ्याच गोष्टींमधील बदल जाणवतोय. एवढ्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. इथले हायवे एकदम मोठे, चकाचक आहेत. भिंगाने शोधला तरी खड्डा सापडणार नाही. पोटातील पाण्यावर तरंगसुद्धा उमटू न देता, हवेत तरंगत चालल्यागत रस्त्यावरून वाहत जाताहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाल्या भिंती  आहेत. इतर देशात रस्त्याच्या कडेला, गावात बाजूला गाडी घेऊन लोकांशी, निसर्गाशी संपर्क साधता येत होता. निसर्गाच्या कॉल साठी सुद्धा नैसर्गिक मोकळेपणा मिळत होता. पण इथं मोकळा, हिरवा निसर्ग, जेलमध्ये बंद व्हावा तसा, रस्त्याच्या दोन्ही भिंतीमुळे अडवला गेलाय. हायवेच्या रांगा सापासारख्या कुठून कुठे जातायेत तेच कळत नाहीये. सापांच्या रांगातुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय.  कानावर पडणारे, बौद्ध मंदिराच्या घंटा आणि लाऊडस्पिकरचे आवाज गायब झालेत. कौलारू, बैठी घरं जाऊन, मोठाल्या सिमेंटी इमारती, आकाशाला डोक्याने ढुशी देताहेत.  हिरवी नैसर्गिक सहजता जाऊन सिमेंटी सिंथेटिकपणा वातावरणात जाणवतोय. आतापर्यंत हिरव्या डोंगरातून आणि ससमुद्रालगत, लहान मुलागत धावणारा अवखळ रास्ता, प्रौढ म्यॅच्युरिटीने शिस्तीत पुढे जातोय.  

मलेशिया हा सव्वातीन लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला देश आहे. भूभागानुसार हा देश दोन भागात विभागाला गेलाय. पहिला म्हणजे जमिनीपासून तुटलेला द्वीपकल्पाचा प्रदेश आणि दुसरा म्हणजे आशिया खंडाशी जमिनीने नाळ जोडून असलेला मुख्य भूभाग. इथलं वातावरण भारतापेक्षा वेगळं आहे. २३ ते ३१ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचं तापमान, जास्त आद्रतेमुळे घाम काढतं. वर्षभरात इथं मुबलक पाऊस कोसळतो. मुबलक कसला, जरा जास्तच पडतो. त्याची प्रचिती मी या देशात पाऊल ठेवल्याठेवल्या आलीये. जमिनीवरच्या इमिग्रेशन ऑफिसवरून सुटका करून, माझ्या बाईकचे टायर लागले ते ओल्या मलयभूमीलाच. मलयगिरीचा  चंदनगंधीत पावसाचा शिडकावा करंत, माझं मलेशियात स्वागत झालं. लहान मुलाला आईने प्रेमाने थोपटत झोपवावं त्याप्रमाणे मलेशियाचा पाऊस मला हलके हलके थोपटत होता. मात्र थोड्या वेळाने रागावलेल्या सावत्र आई सारखं त्याच थोपटणं, धोपटण्यात परिवर्तित झालं आणि तो भडाभडा झोडपू लागला. कसाबसा आसरा शोधला आणि रागावलेली सावत्र आई शांत होण्याची वाट पाहू लागलो. 

मलेशियातील लोकांचे चेहरे पाहिल्यावर इतर शेजारी देवशापेक्षा जरा वेगळे वाटतात. इथली लोकसंख्या मिश्र आहे. इथं मलेय भूमिपुत्र फक्त अर्धेच आहेत. उरलेल्यांमध्ये चिनी, भारतीय आणि इतर देशातून आलेले लोकं आहेत. इथं भारतीय आणि चिनी का जास्त आहेत हा प्रश्न मला पडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय आणि चिनी लोकांची संख्या असल्याने, आधी इथं कोण आलं होतं हा प्रश्न विचारला जातो. मलेशियात पहिले भारतीय आले होते का चिनी हा संशोधनाचा मुद्दा आहे. या प्रश्नच उत्तर, तुम्ही हा प्रश्न कोणाला विचारात आहात यावरून ठरतं. म्हणजे चिन्याला हा प्रश्न विचारल्यास,  इंग्रजांच्या काळात आमचे चिनी लोकं इथं आले असं उत्तर मिळेल. पण भारतीय वंशाच्या लोकांना हाच प्रश्न विचारल्यावर, ‘हे तर काहीच नाही, आमचे भारतीय वंशज तर २५०० वर्षांपूर्वी या मालयगिरीच्या आश्रयाला आले होते’ असं उत्तर मिळतं. अशी ही ‘पहले हम पाहिले हम’ ची हिंदी चिनी रस्सीखेच इथं सुरु आहे. यासाठी इथं आंदोलनं देखील झालीयेत.

मलेशियात घटनात्मक लोकशाही असून, न खात्या देवाला नैवद्य दिसारखं राजा असतो. ही नावापुरती राजेशाहीदेखील फिरती आहे. इथल्या नऊ मलाय राज्यांमधून पाच वर्षाच्या अंतराने आळीपाळीने राजा निवडला जातो.  मग हा राजा पाच वर्षापर्यंत राजेपदाचा उपभोग घेतो आणि नंतर पुढच्यासाठी जागा मोकळी करतो.

क्रूड तेल, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांचा मलेशियाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम टेकू आहे. इंधनतेलाच्या शेतीबरोबरच इतर खाद्य आणि अखाद्य पिकांचीही इथं शेती होते. मलेशियातील शेती आणि शेतकरी, शेजाऱ्यांपेक्षा प्रगत आहे असं दिसतंय. मलेशियाच्या शेतीचा त्यांच्या देशाच्या जीडीपीत बारा टक्क्यांचा वाटा आहे. लाखो लोकांना शेतीत रोजगार मिळतो. आकड्यात सांगायचं झाल्यास, देशातील दहा टक्क्यांपेक्षा जास्त कामगारांना, काम देऊन हे क्षेत्र, रोज गार करतं. वृक्षशेती, भात आणि मांसासाठी केली जाणारी प्राण्यांची शेती हे इथंले मुख्य शेतीप्रकार आहेत.  तेलाचा पाम, रबर, कोका, अननस आणि मिरी यासारखे पिकं इथून निर्यात होतात. या पिकांनी देशातील लगडवडयोग्य जमिनीपैकी ७५ टक्के जमीन व्यापलीये.  या श्रीमंत देशातील सरकारदेखील, जास्त पैसे देणाऱ्या पिकांवर भर द्या असं म्हणत शेतकऱ्यांना प्रोहत्साहित करतंय.

मलेशिया हा इतर दक्षिणपूर्व आशियायी देशांच्या मानाने श्रीमंत देश. जमिनीतल्या फुटलेल्या तेलाच्या पाझरामुळे, पैशाचा झरा त्यांच्याकडे वाहत असतो. एकूण तेलाचा धंदा मलेशियन लोकांना धार्जिणा आहे असं दिसत. जमिनीतील तेलाबरोबरच तेलपिकाचं, म्हणजे पाम तेलाचं इथं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आपण पामर लोकं, पामतेलाच्या बाबतीत मलेशियावर अवलंबून आहे.   

एवढ्या प्रगतीमय चालचलन असणाऱ्या देशाचं चलन काय? असा प्रश्न आपल्याला चालताचलता पडेल.  तर, रिंगेट हे इथलं चलन. इथंल्या जमिनीला तेलाचा पाझर फुटल्याने, यांच चलन भाव खाऊन गेलंय. एका रिंगेटला सतरा भारतीय रुपये मोजावे लागतात. पेट्रोलच्या जोरावर त्यांच्या अर्थव्यवस्थेला अर्थ आलाय. याच पेट्रोलच्या जोरावर एक इमारत ताठ मानेने उभी आहे. ती म्हणजे ‘पेट्रोनास टॉवर’. पेट्रोनास नावाच्या कंपनीने बांधलेली ही इमारत ही सरळसोट इमारत राजधानी क्वालालंपूर मध्ये उभी आहे. तुम्ही म्हणाल, एवढं काय विशेष आहे या इमारतीत?.  हिची खासियत म्हणजे, ही इथली सर्वात उंच इमारत आहे. १४८३ फूट उंच पेट्रोनास टॉवर २००४ पर्यंत जगातील सर्वात उंच इमारतीचा शिरपेच मिरवत उभा होता. यापूर्वी तैवानमधील ‘तैपेई-१०१’ या इमारतीकडे जगातील उंच इमारतीचा मान होता. ८८ मजल्याच्या ‘पेट्रोनास टॉवर’ समोर उभा उभा राहून, डोक्यावरून घसरून पडणाऱ्या गोल टोपीला सावरत, ताठ मानेने ‘ आमचा टॉवर, जगात भारी!’ असं  मलेशियन माणूस अभिमानाने छाती फुगवत सांगत होता. पण ‘तैपेई-१०१’ चा शाप त्यांना लागला आणि पेट्रोलच्याच पैशांवर बांधलेल्या, पेट्रोलच्या या टॉवरला खुजं करत, दुबईच्या अरबांनी, ‘बुर्ज खलिफा’ ही पेट्रोलची इमारत उभी केली आणि पेट्रोनास टॉवरचा शिरपेच हिरावून घेतला. फक्त पेट्रोलच्या धंद्यातले लोकच उंच इमारती का बांधतात? असा प्रश्न पेट्रोल पिणाऱ्या बुलेटवर बसून मला पडला. म्हणजे, पेट्रोल फक्त विमानालाच हवेत उंच नेत नाही तर, माणसाला आणि इमारतींना सुद्धा ते उंच हवेत नेतं, हे पेट्रोनास आणि बुर्ज खलिफाने सिद्ध केलंय तर.

हिरव्यागार शेजारी देशांपेक्षा मलेशियाचा जीडीपी जास्त आहे. ‘हा देश श्रीमंत आहे, इथली श्रीमंती एन्जॉय करूया’, असं माझा भांडवलवादी मेंदू मला सांगत आहे. पण ‘रस्त्याच्या भिंतींनी मला अस्पृश्य करून टाकलंय, मला या जोखडातून मोकळं कर’, असं माझा समाजवादी मेंदू, मोर्चात ओरडल्याच्या सुरात ठणकावून सांगततोय. या दोघांचं भांडण, मी माझ्या बाईककडे नेलं. तिने ‘धाडधाड’ ठणकावून सांगत निवाडा केला आणि स्थितःप्रज्ञासारखं मलमली रस्त्यावरून ती पुढे निघाली.

error: Content is protected !!