Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 23 July , 2021

गेल्या काही दिवसात युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचे बळी गेले आहेत. अचानक आलेल्या पूरसंकटामुळे युरोपियन देशात हाहाकार माजलाय. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जीयम, इटली, लक्सम्बर्ग, नेदरलँड, स्वित्झर्लंड, युके या देशांना पुराचा फटका बसलाय. पण जर्मनीत सर्वात जास्त जीवितहानी झालीये. दोनशेपैकी १६० बळी एकट्या जर्मनीत गेलेत.

आपल्याकडे उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरात ७२ जण दगावले होते. आपल्या लोकसंख्येची घनता युरोप पेक्षा जास्त आहे. तरी तिथं २०० बळी गेले. यावरून युरोपच्या पुराची तीव्रता आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे, अधिक मासात न चुकता येणाऱ्या जावयासारखं, पूरसंकट कुठं ना कुठं हजेरी लावतं. पण आपल्यासारखी पूरसंकटांची सवय युरोपला नाही. त्यांच्याकडे यापूर्वी १९८५ मध्ये ‘व्हाल डी साटा’ धरण फुटल्याने आलेल्या पुरात २६८ लोक मेले होते. १९८५ नंतर जन्माला आलेल्यांनी असा महापूर पहिल्यांदाच पाहिलाय.

आता प्रश्न हा आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पूरसंकट कसं आलं. १४- १५ जुलैला अचानक १००-१५० मीमी पाऊस कोसळला. एवढा पाऊस या देशात २-३ महिन्यात पडत नाही, तो दोन दिवसात पडला. लहानसहान नद्या-नाले फुगले आणि गावाशहरात पाणी घुसलं. मोठ्या शहरात, प्रमुख नद्यांसाठी पुरनियंत्रक यंत्रणा भक्कम होत्या. पण लहानसहान नद्यानाले ज्या गावातून आणि छोट्या शहरातून जायचे, ते मात्र जलमय झाले. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, तेथील पुराचा इशारा देणारी ‘फ्लड अलर्ट सिस्टीम’ ने दगा दिला.
पण हे झाले रोगाचं लक्षण. पण या रोगाचं मूळ आहे पर्यावरण बदलात. जगभरात होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा वेग वाढतोय. हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास धरतीला ताप आलाय. तिच्या घामामुळे वाढलेल्या बाष्पीभवनामुळे जास्तीची पाण्याची वाफ ढगात पोहोचतेय. अचानक अतिवृष्टीचा धोका वाढलाय. धरतीमातेचा हा ताप जेवढा चढेल, तेवढा मानवाच्या डोक्याचा ताप वाढणार आहे. ता ताप उतरवण्यासाठी हव्या असणाऱ्या थंड पाण्याच्या जंगलांच्या पट्ट्या आपण ओरबाडून काढतोय. तिच्या स्वास्थासाठी हवी असलेली शुद्ध हवा औद्योगिक प्रगतीच्या धुराड्यांनी हिरावून घेतलीय.
भारत, चीनसारखे देश जास्त प्रदूषण करतात. आम्ही सर्वात कमी प्रदूषण करतो, हरितवायूंचं आमचं उत्सर्जन सर्वात कमी आहे, असा डांगोरा पाश्चिमात्य देश पिटतात. पण या पापाचे वाटेकरी आपण स्वतः आहोत, हे सत्य मात्र झाकून ठेवतात. वसाहतवादाच्या काळात युरोपिअन देशांनी, आपल्या मंडलिक देशातील लोकांचं आणि पर्यावरणाचं शोषण केलं. मंडलिक देशातून कच्चा माल आपल्या देशातील कारखान्यांना पुरवला. त्या देशातील रोजगार बंद पाडून, कामगारांचा रोजगार हिरावून, आपल्या देशातील कामगारांना रोजगार दिला.
पुढे उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाची जाणीव झाली. मग ज्या प्रॉडक्टच्या उत्पादनात जास्त प्रदूषण होते, त्यांचं उत्पादनं आपल्या देशात करायचंच नाही. कशाला हवेत ते धुराडे आपल्या देशात? त्यापेक्षा असे प्रॉडक्ट, इतर गरीब देशांना उत्पादन करायला सांगून, आयात करायचे. आपलं हवापाणी स्वच्छ ठेऊन इतर देश प्रदूषित करायचे. आपलं वृद्धत्व पुरुला देऊन, त्याचं तारुण्य घेणाऱ्या ययाती सारखं, या युरोपियन देशांनी, गरीब देशांच्या पर्यावरणीय तारुण्य हिरावून घेतलंय. या गोऱ्या ययातीने सुरवातीला जगभरातील संपत्ती लुटली, उपभोगली, मग त्याच संपत्तीने पर्यावरण विकत घेण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब वापरला आणि मोठमोठ्या देशांनी या अणुस्पर्धेत उडी मारली. जसं गावात दादागिरी करायला ‘दादा’कडे हत्यार महत्वाचं असतं, तसंच जगात दादागिरी करायला अणुबॉम्ब आवश्यक होता. अमेरिका, रशिया, फ्रान्स, युके, यांनी शेकडो चाचण्यां घेतल्या. चीन, भारत, पाकीस्थान या यादीत नंतर जोडले गेले. बहुतांश देशांनी आपल्याच भूमीवर अणुचाचण्या केल्या. पण अणुचाचणी म्हणजे किरणोत्सर्ग आणि पर्यायाने प्रदूषण. मी नाही त्यातली म्हणत कडी लावणाऱ्या युरोपियन देशांनी मात्र नामी शक्कल लढवली. आपल्या देशात अणुचाचण्या करण्यापेक्षा हे घाण काम, इतर देशात पार पडायचं ठरवलं.
सुरवातीला आपण फ्रान्सचं उदाहरण घेऊया. फ्रान्सने एकूण २१० अणुस्फोट केले. पण त्यातील एकही चाचणी आपल्या भूमीवर केली नाही. त्यांच्या मंडलिक देशात, हजारो किलोमीटर दूर केल्या. सुरवातीच्या चाचण्या त्यांनी सहारा वाळवंटातील अल्जेरियात केल्या. अल्जेरिया युद्धाच्यावेळी त्यांनी ही संधी साधली. त्यानंतर १९३ चाचण्या ‘फ्रेंच पॉलिनीयोशीया’ मध्ये केल्या.

‘फ्रेंच पॉलिनेशिया’ ही फ्रान्स ची ‘ओव्हरसीज टेरेटरी’ म्हणजे परदेशी प्रदेश. फ्रान्सने या बेटांवर कब्जा केला होता. नंतर जरासं स्वातंत्र्य देत, स्थानिक लोकांना स्वतःचं सरकार चालवायची मुभा दिली. मात्र परराष्ट्र धोरण, सरंक्षण आणि लष्करी तळ वगैरे सारख्या किरकोळ गोष्टी स्वतःकडे ठेवल्या. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास फ्रेंच पॉलिनेशिया ही फ्रान्सची वसाहतच आहे. पण फ्रान्सच्या मते ‘फ्रेंच पॉलिनेशिया’ चे लोकं फ्रेंच नागरिकच आहेत. पण फ्रान्सचं हे नागरिकप्रेम, मगरीचे अश्रू ठरले. फ्रान्सला जेव्हा अणुबॉम्बच्या चाचण्या घायचा होत्या तेव्हा ते फ्रेंच पॉलिनेशियात गेले आणि तिथं तब्ब्ल १९३ वेळा या विनाशकारी हत्यारांची चाचणी घेतली. त्यामुळे दक्षिण प्रशांत महासागराचा मोठा भाग किरणोत्सर्गाने प्रदूषित झाला. समुद्री जीवांचा घात झाला.

फ्रेंच पॉलिनेशियाची लोकसंख्या पावणेतीन लाख आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्क्यांपेक्षाही जास्त लोकं किरणोत्सर्गाने बाधित झाले होते. कित्तेक जण कँसर सारख्या दुर्धर आजाराने बाळी गेले. किरणोत्सर्ग बाधित मासे खाल्ल्याने लोकं आजारी पडून मृत्युमुखी पडले. आजारी पडले, मेले. यात किती समुद्री जीवांची आहुती गेली याची गणतीच नाही
शेजारच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आंदोलने झाली, त्यांनी फ्रान्सला जाब विचारल्यावर, काही लोकांची तब्बेत खराब झालीय, पण हा अणुकार्यक्रम आमच्यासाठी महत्वाचा आहे असं त्यांनी उत्तर दिल. शेवटी जास्त विरोध व्हायला लागल्यावर १९९४ मध्ये फ्रान्सने या चाचण्या बंद केल्या. या गुन्ह्यासाठी फ्रान्स ने भरपाई द्यावी आणि माफी मागावी अशी मागणी होतेय.
आता फ्रान्सचा वसाहतवादी भाऊ, ब्रिटन (युके) चं उदाहरण पाहूया. ब्रिटनने तरी काय वेगळं केलं. हे पापकर्म त्यांनीही दुसऱ्यांच्या भूमीवरच केलं. त्यांनी १९५२ ते १९५७च्या दरम्यान, पश्चिम ऑस्ट्रेलियातील मारालिंगा, इमू फिल्ड, आणि मोंन्टे बेलो बेटांवर १२ अणुस्फोट केले. त्यानंतर १९५७ ते ५८ मध्ये मध्य प्रशांत महासागरातील ख्रिसमस आणि माल्डेन बेटांवर अजून ९ चाचण्या केल्या. त्यातील काही तर हिरोशिमा नागासाकीत टाकल्या गेलेल्या बॉम्बपेक्षाही मोठ्या होत्या. त्यानंतरच्या २४ चाचण्या अमेरिकेबरोबर संयुक्तरित्या अमेरिकेतील ‘नेवाडा’ इथं केल्या.
एवढ्या सक्षम देशांनी आपल्या देशात या अणुचाचण्या का नाही केल्या? कारण एकाच होतं, आपला देश प्रदूषणविरहित ठेवायचा. युरोपियन देशांच्या या स्वार्थी धोरणाने मला ‘चंगो’च्या चारोळीची आठवण करून दिली…
घराला कुंपण हवं, म्हणजे आपलं जग ठरवता येतं,
बाहेर कितीला बरबटलेलं असलं, तरी आपल्यापुरतं सरावता येत.
पण आपल्यापुरतं सारवायचा प्रयत्न करणाऱ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. जो देश त्यांनी लुटला, त्याच देशातील गीतेत सांगितलेला कर्माचा सिद्धांत ते विसरले. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट, बुमरँग प्रमाणे आपल्याकडे परत येते, हे त्यांच्या गावीही नव्हते. देशांना सीमा आहेत. लोकांना देशाच्या सीमेत बांधून ठेवता येतं. पण पर्यावरणाला, हवापाण्याला सीमा नाहीये. एका देशातील प्रदूषणाचा फटका हजारो किलोमीटर लांबच्या देशाला बसतो. दुसऱ्याचं घर जळतंय, त्याचं मला काय? माझं घर तर लांब आहे! असं म्हणतं निवांत बिडी पिणाऱ्याला, हे माहित हवं की, आज ना उद्या ही आग त्याच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. इतर कोणत्या नात्याने आपण जोडलेले असु किंवा नसुही, पण पृथ्वीतलावरील सगळे जीव मात्र, हवा आणि पाण्याच्या धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेत. म्हणूनच सत्तेच्या लालसेने निसर्गावर अग्निअस्त्र सोडणाऱ्यांवर, निसर्गाने पर्जन्यास्त्र डागलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

दुसरों के लिए गड्डा खोदनेवाला ,
एक दीन उसी गड्डे में जाता है ।
यह अपने बुजुर्गो ने कही हुई सत्य बात है।