Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 17 July , 2021

झिंगूर म्हणजेच क्रिकेटची चव चाखून पहिली. झिंगूर बरोबरच, बांबूतल्या अळ्या, रेशीम किड्याच्या अळ्या, पाम विव्हिलच्या अळ्या, नाकतोडा, पाणभुंगा हे किडे थाईलंडमध्ये खाल्ले जातात. त्यातील झिंगूर, नागतोडे यांचं शेतीला जोडधंदा म्हणून संगोपन केलं जातं, तर काही किडे सरळ जंगलातून गोळा करतात. जसा पिकांचा सीजन असतो, तसा किड्यांच्या पिकाचेही मौसम असतात. सिजननुसार त्यांचा भाव वरखाली होत असतो. नागतोड्यांचा सीजन, ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये असतो आणि त्यांना किलोला साडेचारशे ते पाचशे रुपये भाव मिळतो. पाणभुंग्यांचा सीजन, जुलै ते ऑक्टोबरदरम्यान असतो. भावाच्या बाबतीत मात्र पाणकिड्यात, नरमादीनुसार दुजाभाव केला जातो. नर किड्याला प्रतिनग २० रुपये आणि मादीला १६ रुपये भाव मिळतो. कधीकधी तर नर कीडा मादीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट भावाने विकला जातो. हा लिंगभेद का? असा प्रश्न पडला. पण हा पडलेला प्रश्न गुगल बाबांनी लगेच उचलला. हा दुजाभाव व्हायला कारण आहे त्याची चव. कस्तुरीमृगासारखा आपल्या पोटावरील ग्रंथींतून, नर पाणभुंगा, एक विशिष्ट चवीचा स्राव सोडतो. त्यामुळे जेवणाला वेगळी चव येते. म्हणून नराचा बाजारभाव वधारतो. कंपन्यांनी, स्वैयंपाकात वापरता येणारा, पाणभुंग्याचा कृत्रिम फ्लेवर तयार केलाय. पण लोक मात्र ‘ये दिल मांगे ओरिजिनल’ असं म्हणत असली नर किड्याला पसंती देतात.
आता पुढच्या किड्याची पाळी होती. त्या किड्याच्या फरसाणाच्या द्रोणात हात टाकला. द्रोणाचार्यानी बाण मारून कौरव-पांडवांची विटी विहिरीतून बाहेर काढावी त्या आवेशात एक कीडा बाहेर आणला. तो होता विंचू. मी दचकलो आणि ज्या वेगाने त्या ‘वृश्चिकाला’ द्रोणातून बाहेर काढला, त्याच्या दुप्पट वेगाने परत द्रोणात टाकला. माझ्याच राशीचा किडा माझ्या राशीला लागला होता. त्याला खायचे जीवावर आले होते. लहानपणी क्रिकेटचा स्टम्प ठोकायला उचललेल्या दगडाखालील, त्या नांगीच्याने मला डंख मारला होता. पण तेव्हा पहिल्यांदा कळलं होतं की मला विंचू चढत नाही ते. विंचू चावल्याने चढत नाही, पण खाल्ल्याने चढला तर? कशाला विषाची चव घ्यायची? डोक्यात नकारात्मक विचारांचे विंचू डंख मारू लागले. एक मन म्हणत होतं ‘फक्त चाखून बघ, चव कशी आहे ते’. मनाचा हिय्या करून, डोळे बंद करून त्या ‘वृश्चिकाला’ दाताखाली दाबला आणि थाई भूमीवरील बाईकर तात्या, विंचूची चव घेते झाले.


या विंचवाच्या शेतीची जरा माहिती गोळा केली. थाई लोकं जंगलात फिरून विंचू गोळा करतात. मग हा विषारी रानमेवा, बाजारात जाऊन विकतात. पण बऱ्याच ठिकाणी विंचूची पारंपरिक आणि व्यावसायिक शेतीही केली जाते. या विंचूला कारखान्यात प्रक्रिया करून वाळवतात आणि हवाबंद पाकिटात विक्रीसाठी पाठवतात. बाजारात हे वाळवलेले पाकिटबंद विंचू विक्रीला ठेवले जातात. विंचूचे हे प्रक्रिया कारखानेदेखील ‘हसाप’ आणि ‘जीएमपी’ प्रमाणित आहेत. अन्नपदार्थांच्या निर्यातीत थायलंडने का बाजी मारली याची कल्पना यावरून येते. विंचवाचे वेगवेगळे पदार्थ इथं बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस आणि चटण्यांमध्ये बुडवून विंचू खातात.
विंचूबरोबरच अजून एक चावणारं पीक थाईलंडमध्ये प्रसिद्ध आहे. ते म्हणजे मुंग्या. हो इथं लालमुंग्या देखील खाल्ल्या जातात. या मुंग्या झाडाच्या पानांना एकत्र जोडून घरटं बनवतात. म्हणून त्यांना ‘वेव्हर’ म्हणजे विणकर मुंग्या म्हणतात. झाडावर या मुंग्यांच्या वसाहती पाहायला मिळतात. मुंग्यांच्या विषात फॉर्मिक आम्ल असतं. कदाचित त्याचमुळे शास्त्रज्ञानी त्यांच ‘फॉर्मिसिड’ फॅमिली मध्ये वर्गीकरण केलंय.
थायलंडच्या ईशान्य भागात या मुंगेजेवणाची रीत आहे. त्यांच्या पारंपरिक गाण्यात आणि नृत्यात मुंग्यांच्या शिकारीचे संदर्भ येतात. मुंग्यांच्या जीवनातील सर्व अवस्थांचं थाई किचनमध्ये सोनं होत. मुंग्यांची अंडी, कोष आणि प्रौढ मुंग्या या सर्व अवस्था थाई जेवणात वापरल्या जातात. मुंग्यांपासून भाज्या, सलाड बनवले जातात. पण सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे मुंग्यांच्या अंड्याचं ऑम्लेट. मुंग्यांच्या ऑम्लेटबद्दल ऐकून, नुसत्या विचारानेच जिभेला मुंग्या डसल्या सारखे झाले. हे अन्न इथं एव्हडं लोकप्रिय आहे की ते खाण्यासाठी लोक, मुंग्यांची डिश घ्यायला मुंग्यांसारखे रांगेत उभे असतात. थाई माणसाचं या चावणाऱ्या अन्नाबद्दलच प्रेम पाहून, आपल्या जुन्या हिंदी सिनेमातील पदोपदी गाजर हलवा किंवा बैंगन भारत बनवणाऱ्या फिल्मी आईगत, थाई आई आपल्या गोंडस मुलाला म्हणत असेल, बाळा उठ, मी तुझ्यासाठी मुंग्यांचा हलवा किंवा विंचूचा भरता बनवलाय.

जास्तकरून मुंग्या जंगलातून गोळा करतात. पण काही दर्दी लोकं आपल्या शेतात किंवा बागेत या लाल मुंग्यांची घरटी पाळतात. खासकरून आंब्याच्या झाडावर या वसाहती वाढवतात. त्यासाठी या वसाहतींना परजीवी किड्यांपासून दूर ठेवणे आणि जवळपास पाण्याचा साठा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. ‘असेटिक आम्ल’ तयार करायला मुंग्यांना पाणी गरजेचं असत. मुंग्यांच्या व्यवस्थित पैदाशीसाठी त्यांची योग्य वाढ होणे आवश्यक असते. जास्तीत जास्त मुंग्यांच्या घरट्यांसाठी, त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पोहोचणं आवश्यक आहे. पण जमिनीवरून जाताना इतर भक्षक किड्यांच्या आक्रमणाला बळी पडण्याचा धोका असतो. मग हुशार थाई शेतकरी शक्कल लढवतो. दोन झाडांमध्ये दोऱ्या किंवा बांबू बांधतो. या पुलावरून मुंग्यांची ट्राफिक, कोणत्याही सिग्नल किंवा गतिरोधकांशिवाय सुरु असते. एक विशेष गोष्ट अशी की, या पुलासाठी प्लॅस्टिकची दोरी चालत नाही. मुंग्या या प्लॅस्टिकच्या पुलावरून जाणं टाळतात. रांगेच्या शिस्तीपासून ते प्लास्टिक प्रदूषणापर्यंत शिकवण देणाऱ्या मुंग्यांनी माणसाला शिकवावं तरी किती. मुंगी होऊन साखर खाण्याच्या ‘मुंगी सल्ल्याला’ डावलत, हत्ती होऊन लाकडं फोडणारा माणूस, आपल्याच तोऱ्यात निसर्गाचा ह्रास करत निघालाय.

फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कोरड्या हवामानात मुंग्या गोळा करतात. या हंगामात मुंग्यांच्या घरट्यात जास्त कोष तयार होतात. म्हणून या महिन्यात ते थाई शिकारी मुंग्यांच्या शिकारीला निघतात. बांबूचा पाईप, झाडावरील मुंग्यांच्या घरट्यात घुसवतात आणि जोरात हलवतात. या पाईपचे दुसरे टोक पिशवीत घुसवलेले असते. घरटं जोरात हलवल्यावर, मुंग्यांच्या घरट्यातील कोष आणि अळ्या पिशवीत पडतात. एका घरट्यातून तीनशे ते चारशे ग्राम कोष आणि अळ्या मिळतात. एक माणूस दिवसाकाठी कमीत कमी एक ते दोन किलो माल गोळा करतो. त्यातून त्याला पाचशे ते हजार रुपये मिळतात. काही तरबेज मुंग्याबहाद्दर, दोन किलोपेक्षा जास्त माल गोळा करू शकतात. ईशान्य थायलंडमधील मुंग्या विक्रेताही दिवसा काठी अडीच ते सहा हजाराचा मुंगेमाल विकतो. भात आणि साबुकंदाच्या शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा हा व्यवसाय मुख्य पिकापेक्षा जास्त नफा देऊन जातो.
पण उठसुठ मुंग्या गोळा करणाऱ्या लोकांमुळे जंगलातील मुंग्यांची संख्या कमी झाल्याचं स्थानिक लोक सांगतात. दिवसेंदिवस मुंग्यांची शिकार मिळणं दुरापास्त होतंय. निसर्गातून मुंग्या कमी झाल्यामुळे पर्यावरणावर परिणाम दिसू लागलेत. निसर्गातील मुंग्यांची भूमिका मोलाची आहे. कीड रोगांच्या नियंत्रणात मुंग्यांचा मोलाचा वाटा आहे. ही निसर्गाची हानी टाळायची असेल, तर जंगलातून गोळा करण्यापेक्षा, मुंग्यांची शेती वाढवणे गरजेचं आहे. मुंग्यांच्या शेतीच्या विचाराने डोक्याला आणि बऱ्याच वेळ बसल्याने पायाला मुंग्या आल्या होत्या. त्या झटकल्या आणि पाटयामधील आमच्या हॉटेलकडे पायी निघालो.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
मुंगी ना कळलं , प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
पण आपल्या मनुष्य प्राण्यांना कळत नाही.
ही मोठी शोकांतिका आहे.
बुध्दीजीवी मनुष्यच एक ना एक दिवस या सुंदर पृथ्वीचा नाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.