drsatilalpatil Uncategorized गो… गोचीड… गो ! (भाग-१)

गो… गोचीड… गो ! (भाग-१)

गो… गोचीड… गो ! (भाग-१) post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 13 June , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

शेतकरी आणि पाळीव प्राण्यांच्या मालकात सध्या गोचीड ही मोठी डोकेदुखी ठरलीय. मेडिकलच्या दुकानातून गोचीडाच्या औषधा बरोबरच शेतकरी, डोकेदुखीच्या गोळ्या पण खरेदी करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ह्या लेखमालेतून मी गोचीड आणि त्याचे नियंत्रण ह्यावर उजेड पडणार आहे.

गोचीड हा प्यारा नसलेला पॅरासाईट आहे. पॅरासाईट म्हणजे परजीवी कीटक. जो आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याचा वापर करतो आणि तोही इतरांच्या मर्जीविरुद्ध. हे परजीवी सुद्धा दोन प्रकारचे असतात. पहिला शरीराच्या आतून येणार (इंटर्नल) आणिदुसरा बाहेरून येणार (एक्सटर्नल). त्यात गोचीड हा बाहेरचा. पण त्याच्या नावावर जाऊ नका. हा रक्त शोधणारा व्हॅम्पायर, जंगली आणि पाळीव प्राण्यांचं रक्त तर शोषतोच पण त्यांच्या मालकालाही सोडत नाही.  प्राण्यांना बऱ्याच काळापर्यंत चिकटून राहत, गोचिडतापासारखे आजार पसरवत, आणि त्याचबरोबर विषारी पदार्थ जनावराच्या शरीरात सोडत, गोचीड मजेत जगत असतात. 

जवळपास सगळ्याच देशात गोचीड सापडतात. जगभरात त्यांच्या शेकडो जाती आहेत.  आठ पायाचा हा किडा, पाठीवर लढाईला निघालेल्या सैनिकांसारखी ढाल घेऊन फिरत असतो. नर गोचीडात ही ढाल मोठी तर मादीमध्ये लहानशी असते. कदाचित बिचाऱ्या नराला स्वसंरक्षणासाठी ढालीची जास्त गरज भासत असावी. मादीला गोचीडकुलाच्या वंशवाढीसाठी अंडी भरपूर घालावी लागतात. त्यासाठी तिला दुसऱ्यांच्या रक्ताच्या खुराकाची जास्त गरज पडते. म्हणून ती अधाश्यासारखी भसाभसा रक्त पिते. पाठीवरील लहान ढालीमुळे रक्त पिल्यावर मादीच्या शरीराला फुग्यासारखं फुगायला जागा मिळते. अर्धा सेंटिमीटर आकाराची गोचीड, पोटभर रक्त पिऊन लेकीच्या घरी पाहुणचार झोडून आलेल्या म्हातारीसारखी चांगली दोन सेंटिमीटर एवढी गलेलठ्ठ होते.

आता गोचीडाच्या आयुष्यात डोकावून पाहूया. गोचीडचा जीवनकालावधी  त्याच्या जाती नुसार, काही महिन्यांपासून, काही वर्षांपर्यंत असू शकतो. वातावरणातील तापमान आणि सावजाची उपलब्धता यावरही त्याच्या आयुष्यातील दिवस अवलंबून असतात. पोषक वातावरण नसल्यास तो सुप्तावस्थेत जाऊन, दीर्घ काळ तग धरून ‘चांगल्या दिवसाची’ वाट पाहत बसतो.  एका पेक्षा जास्त यजमानांवर अवलंबून असणाऱ्या गोचीडजातीचं जीवनचक्र दोनचार वर्षाचंही असू शकत.

एकदा का प्राण्याच्या शरीरात प्रवेश मिळवला की हा गोचीड, आपलं तोंड प्रण्याच्या त्वचेत टोचून घुसवतो. ह्या टोचण्यात प्राण्याला वेदना होत नाहीत.  प्राण्याच्या कातडीत तोंड खुपसल्यावर, तो चिकट द्रव सोडतो. त्यामुळे गोचडीचं तोंड, त्वचेला घट्ट चिकटून राहतं आणि पकड सुटत नाही. एकदा पोटभर रक्त प्यायल्यावर काही दिवस किंवा आठवडे गोचीड उपाशी राहू शकतो.

नर गोचीड, मादीला शोधतो आणि चिकटलेल्या स्वरूपातच त्यांचा संसार बहरतो. संसार संसार खेळून झाल्यावर आणि पोटभर रक्त पिऊन झाल्यावर मादी, प्राण्याला सोडते. अंडी घालण्यासाठी ती माहेरवासिनीसारखी जमिनीवर उतरते आणि कानाकोऱ्यात, गवतात अंडी घालते.

माहेरी आल्यावर सुरवातीचा काही काळ, पोटात साठवलेलं रक्त पचवण्यात जातो. त्यानंतर, मादी अंडी घालण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला सुरवात करते. ही अंडी म्हणजे जुळी, तिळी नसून, हम दो! हमारे दो-चार हजार! या प्रमाणात असतात. गोचिडाच्या काही जातीत तर पाच हजारापर्यंत अंडी घालण्याची प्रथा आहे.

गोचीडाचं अंड आणि त्यानंतर त्यातून बाहेर आलेलं गोचीड बाळ, दोन्हीही जवळपास एक मिलीमीटर आकाराचे असतात. या बाळाला जन्मतः सहा पाय असतात. या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात कारण जन्माला आल्याआल्या त्याचे सहाही पाय जवळपासच्या लहानसहान प्राण्यांकडे आपोआप वळतात. त्यासाठी ते गवताच्या पात्यावर, पार टोकाला जातात. तिथं बसल्यावर आपले पुढचे दोन्ही पाय टायटॅनिकच्या हिरोहिरोईन सारखे  हवेत फैलावून हवा खात बसतात. पण इथं बसण्याचा उद्देश फक्त हवा खाण्याचा नसतो. त्यांच्या पुढच्या दोन्ही पायात ‘हेलर्स ऑर्गन’ नावाचा अवयव असतो. या अवयामुळे त्याला अमोनिया, कार्बनडायऑक्साईड , आद्रता, उष्णता आणि हवेचा झोत याच्या संवेदना कळतात. यावरून आपला यजमान किती जवळ आहे याचा त्याला अंदाज येतो. प्राणी जवळ आला की त्याला जादूची झप्पी देतं गोचीडबाळ चिकटतो आणि प्राण्याच्या शरीरावरील दमट आणि अडचणीच्या जागी, जिथं खाजवता येणार नाही अश्या ठिकाणी अढळपद मिळवत जाऊन बसतो. 

आपल्या पहिल्यावहिल्या शिकारीनंतर, प्राण्याच्या रक्ताचं पौष्टिक अन्न रिचवल्यावर, किशोरवयीन गोचीडबाळ आकाराने वाढून एक ते पाच मिलीमीटर आकाराचचं होतं. याचदरम्यान त्याला अजून दोन पाय फुटतात आणि तो अष्टपाद बनतो. प्रौढ गोचीड अन्नासाठी लहानसहान प्राण्यांना चिकटण्याऐवजी, मोठं स्वप्न बघत सेटल होण्यासाठी बऱ्याचदा मोठ्या  शरीराच्या प्राण्याची निवड करतो. मग तिथंच तो मादी शोधतो, वंश वाढवतो आणि आपला संसार थाटतो. एक गोचीड काही एकाच प्राण्यावर वर्षानुवर्षे बिऱ्हाड मांडून राहत नाहीत. काही गोचिडाच्या जाती आयुष्यभर एकाच यजमानावर स्थायिक होणं पसंत करतात तर काही मात्र वेगवेगळ्या जीवन अवस्थांसाठी वेगवेगळे प्राणी निवडतात.

गोचीडामुळे प्राण्यांचं स्वास्थ बिघडत. त्याच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम होतो. पर्यायाने मोठं नुकसान होतं. ते कसं होतं आणि त्यावर उपाययोजना काय हे पुढील लेखात सविस्तर जाणून घेऊयात. असा हा गोचीड एकदा चिकटला की पोटाचा फुगा पूर्ण भरल्याशिवाय प्राण्याला सोडत नाही. नाकातल्या नथीसारखे गोचीड प्राण्यांना चिकटून राहतात. फरक फक्त एवढाच की ही नथ रक्त पीत नाही.  नुसत्या नावानेच ज्याची चीड येते अश्या या रक्तपिपासू गोचिडीला चिडून म्हणावेसे वाटते … गो … गोचीड… गो !

 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

कीटकनाशकांची जन्मकहाणीकीटकनाशकांची जन्मकहाणी

आपल्याला कहाणीमध्ये लै रस असतो. मग ती शेजार(नी)च्या घरातील असो की टीव्ही मधल्या डेलीसोप मालिकांमधली. मग आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग बनलेल्या शेतीरासायनांची कहाणी जाणून घेण्यात तुम्हाला नक्की रस असेल

थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटीथाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 31 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पावसाची रिपरिप सुरु होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो,

रसायननामा भाग-१रसायननामा भाग-१

रासायनिक कीटकनाशकांच्या निर्मितीपासून ते निर्माल्यापर्यंतच्या प्रवासावर टाकलेला प्रकाश. गेल्या महिन्यात केरळ हायकोर्टाने शबरीमाला मंदिर ट्रस्टला ते भक्तांना वाटत असलेला प्रसाद न वाटण्याचे आदेश दिले. असं काय झालं की कोर्टाला देवाचा