थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील पांथस्थ!

थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील पांथस्थ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 19 Jun , 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

ठाकसीन विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबरची चर्चा रंगात आलीये. माझ्या अधाशी प्रश्नांच्या भडिमाराला ते उत्साहात उत्तरं देतायेत. थायलंडमधील, शेती, शेतकरी, समाज, समाजकारण अश्या विविध विषयांच्या स्टेशनवर थांबत आमची गाडी शेतमजुरावर येऊन थांबली.

‘तुमच्या देशात, शेतमजुरांची मजुरी किती असते?’ असं विचारल्यावर ‘एका दिवसाचं किमान वेतन सव्वासहाशे ते साडेसहाशे रुपयांच्या घरात आहे, आणि शहरी भागात ते जास्त तर ग्रामीण भागात कमी आहे.’ असं उत्तर मिळालं. शतकार्याच्या उत्पादनाबद्दल विचारल्यावर, ते तो काय पिकवतो आणि व्यवहारात किती हुशार आहे यावर अवलंबून आहे. काही शेतकरी बक्कळ कमावतात पण काहीजण वार्षिक ६०-७० हजार कमाईवर येऊन अडकतात’ असं उत्तर मिळालं. शेतीच्या बाबतीत पुढारलेल्या थाईलँडलाही काही प्रमाणात का होईना कर्जबाजारी शेतकऱ्यांची समस्या भेडसावतेय, हे ऐकून आश्चर्य वाटलं. सध्या देशात ट्रॅक्टर, हार्वेस्टर सारखी अद्यावत यंत्र आलीयेत. पण ग्रामीण भागात काही थाई शेतकरी अजूनही रेड्याचा वापर शेतात करतात. हॉर्स पावरच्या जमान्यात रेड्याच्या पावरचाही वापर केला जातोय.

थायलंडची शेती ३१ टक्के लोकांना रोजगार पुरवते. त्यात स्त्रीपुरुषांचं प्रमाण जवळपास सारखंच आहे. थाईलंडमध्ये शेतीचा विकास झाला. नवनवीन पिके आली. निर्यात वाढली, पण शेतमजुरीची समस्या तोंड वर काढू लागली. शिकलीसवरल्या तरुण पिढीला, चकाचक वातावरणात काम करायचं होतं. चिखल तुडवण्यात त्यांना रस नव्हता. म्हणून ती शहराकडे धावली आणि शेतात काम करणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षात रोडवली. ४० ते ६० वयोगटातील शेतमजुरांची संख्या वाढत ५० टक्क्यावर गेलीय. मग सख्खे शेजारी म्यानमार, लाओस, आणि कंबोडिया मधून शेतमजूरांचा ओघ सुरु झाला. घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या देशी मजुरांच्या तुलनेत हे परदेशी मजूर शेतात बाराबारा तास राबतात. पैसे कमावतात आणि मायदेशी पाठवतात.

एकदा का देशाची प्रगती सुरु झाली की लोकांचं वार्षिक कमाई वाढते. मग गरजा वाढतात. घरात टीव्ही प्रवेश होतो. त्याच टीव्हीतून झगमगीत जाहिराती घरात येतात. आपलं पारंपारिक अन्न, कपडे, दागिने, बूट, चप्पल, दंतमंजन वगैरे कसं मागासलेलं आहे हे टीव्हीतील सुंदर चवळीच्या शेंगा आपल्याला पटवून देतात. नुसत्या टूथपेस्टच्या ताजगीने, मदनबाण चालवल्या सारख्या अप्सरा आजूबाजूला पिंगा घालतायेत असा भास होऊ लागतो.  चुलीवरच्या कसदार गरमागरम भाजीभाकरीपेक्षा चकचकीत हॉटेल मधल्या रंगरंगोटी केलेल्या डिशेश आवडायला लागतात. मैदा कुजवून बनवलेल्या पिझ्झा, बर्गर सोबत सेल्फी काढल्याकाढल्या, नुसत्या फेसबुकच्या लाईनने पोट भरू लागतं. आपल्या पारंपरिक, देशी गोष्टी डाऊन मार्केट वाटायला लागतात. मग देशी घर परदेश वस्तूंनी भरायला सुरवात होते. राबराब  राबून कमावलेले स्वदेशी पैसे, महागडे परदेशी उत्पादने खरेदी करून सीमेपार झालेले असतात. पूर्वी शेकड्यात भागणारा मासिक घरखर्च हजाराच्या घरात कमाई होऊनही भागत नाही. मग मजुरी वाढ अनिवार्य आहे याची जाणीव व्हाट्सअप आणि फेसबुकवर बोटं चालवता चालवता होते. मजुरी वाढली की शेतमालाचा उत्पादनखर्च वाढतो. पण शेतमालाचा दर, भाव खात, रुसलेल्या जावयागात वर्षानुवर्षे एकाच जागी चिकटलेला असतो. मग ही वाढलेली मजुरी शेतकऱ्याची मजबुरी बनते. त्यावर एक उपाय म्हणून, इतर देशातील/राज्यातील गरजू मजूर, कमी मजुरीत काम करण्यासाठी येतात आणि वार्षिक कमाई वाढून, मॉडर्न होण्याच्या प्रक्रियेत ते सामील होतात. असं हे चक्र सतत फिरत असत. प्रत्येक चक्रगणिक मजुरी, खर्च वाढतात पण त्या पटीत शेतमालाचे भाव वाढत नाहीत ही जगभरातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.

ही चर्चा सुरु असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे आजच्या बैठकीत एक प्राध्यापक तृतीयपंथी होते. त्यांच्या हावभावावरुन बोलण्याच्या पद्धतीवरुन त्यांची ओळख अजिबात लपत नव्हती. पण संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांना सामान्य माणसासारखे सामावून घेतले होते. इतरांसारखीच समान वागणूक त्यांना मिळत होती.

थायलंडच्या समाजात तृतीयपंथी लोकांना मानाचं स्थान आहे. ते सरकारी ऑफीस, कंपन्या, हॉटेल, बँका यासारख्या ठिकाणी सन्मानाने काम करतात. येथील समाजाने त्यांना सामावून घेतलंय. रस्त्यावर टाळ्या वाजवत भिक मागणारे तृतीयपंथी मला संपूर्ण थायलंडमध्ये कुठेच आढळले नाहीत. 

इथं किन्नरांसाठी ‘कथोआय’ हा शब्द इथं वापरला जातो. हा खमेर भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ लेडीबॉय असा होतो.  ‘कथोआय’ हा इथला एक समाज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे ‘कथोआय’ जास्तकरून दुकाने, हॉटेल, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर यामध्ये काम करतात. काहीजण फॅक्टरीतही कामाला जातात. ग्रामीण भागात शेतमजूर म्हणूनही ते काम करतात. थायलंड हा पर्यटनासाठी प्रसिद्ध देश असल्याने, मनोरंजन, कॅबरे, डान्सबार या सारख्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळतो. पट्टायातला ‘अल्काझार-शो’ मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना पाहून हे ‘लेडी बॉइज’ आहेत यावर विश्वास बसणार नाही. दरवर्षी भारतात अंगमेहनत करणारे, थाईलंडमध्ये अंग रगडून घ्यायला जातात. पण त्यांना शेवटपर्यंत काळत नाही की आपल्याला रागडणारी ‘ती’ होती, ‘तो’ होता की,  ‘ते’  होता.

तृतीयपंथीयांना एव्हडी सन्मानजनक वागणूक मी इतर देशात पहिली नाही. काही तुरळक घटना सोडल्यास, देशभर ते ताठ मानाने आपली रोजीरोटी कमावतात. इतर देशात मात्र जन्माला आला त्या हॉस्पीटलपासून, तर मेल्यावर स्मशानात जाण्यासाठीच्या अर्जापर्यंत, सर्व ठिकाणी फक्त स्री आणि पुरुष असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. अर्धनारीश्वराच्या आपल्या देशात तर ‘तो’ आणि ‘ती’ पेक्षा वेगळ्या मध्यम मार्गावरील निष्पाप पंथस्थांना शिक्षण, नोकरी, धंदा यासारखे उपजिवीकेचे सर्व मार्ग बंद करुन भिक मागण्यास भाग पाडले जाते. या पार्श्वभूमीवर थायलंडमधील लिंगभेदीय समानता विस्मयचकित करणारी आहे. सर्वसमावेशकतेच्या देशा ! शतशः नमन !

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

3 thoughts on “थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील पांथस्थ!”

  1. खुप छान माहीती मांडली आuल्या लेखातुन आपला अभ्यासुuणा लक्षात येतो

  2. नेहमी प्रमाणे अनोखा विषय घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिणं हे तुझं वैशिष्ट्य आजही जपून ठेवलयस.
    शेतकऱ्यांसाठी शेतमालाला योग्य किंमत,चांगली बाजारपेठ, न विकल्या गेलेल्या किंवा चांगली किंमत यावी यासाठी बाजारात न नेलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदामे किंवा शीतगृहे उपलब्ध करून देणे, उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहणे ,कर्जाची उपलब्धता व परतफेडीची सुलभता
    हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तोपर्यंत तू उल्लेख केलेली थाई किंवा भारतीय शेतकऱ्याची अवस्था बदलणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

कंबोडियातील भारतीय सण !कंबोडियातील भारतीय सण !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 30 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघून आम्हाला आता जवळपास महिनाभर झालाय. इतके दिवस बाईक चालवत, हजारो किलोमीटरचे रस्ते

म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी: इरावतीम्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी: इरावती

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 03 April, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ खराब रस्ते जाऊन चकाचक डांबरी रस्ते लागले. लोण्यासारख्या रस्त्यावर बुलेटचे टायर कॅरमच्या स्ट्रायकर

भाग-५: अ-विश्वासभाग-५: अ-विश्वास

भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे  रावसाहेबांना