drsatilalpatil Uncategorized रसायनामा- भाग ४

रसायनामा- भाग ४

सुपंथ !

मित्रांनो रसायननामा या मालिकेतील हा शेवटचा भाग. आज उत्पादक, विक्रेता, शासन आणि शेतकरी यांच्या सम्यक सहभागाबद्दल बोलूया. मला एक प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे तेलंगणामधून एक कीटकनाशक उत्पादक आला. म्हणाला ‘साब मेरे पास एकदम स्ट्रॉंग प्रोडक्ट है, उससे किडा मिंटो मे नीचे गिरता है’.मी त्याला वचारलं की आपण सक्रिय घटक कुठले वापरता?, यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून मला चक्कर आली तिथं बिचाऱ्या किड्याचं काय होत असेल? हे साहेब अकरा प्रकारचे रासायनिक कीटकनाशकाचे सक्रिय घटक एकत्र मिसळून त्यांचा काढा बनवायचे. त्यामध्ये करंज तेल टाकून, त्यात मस्तपैकी रंग टाकून, स्ट्रॉंग जैविक कीटकनाशक म्हणून मोठ्या प्रमाणात गावागावात विकायचे.

या प्रकारांचा धागा चीनपर्यंत जातो. तुम्हाला चीनची एक व्यापारी क्लृप्ती सांगतो. चीन पाश्चिमात्य देशांकडून निकामी झालेल्या बॅटरीच्या सेलचा कचरा जहाजं भरून आपल्या देशात आणतो. पाश्चिमात्य देश, आपल्या देशाततील कचरा, पैसे देऊन चीनला देतात. गोरा साहेब आपल्या अंगाला घाण लावून घेत नाही. भलेही ती आपली घाण असो. चीनमध्ये पॉवर बँकचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मग चीन, नवीन पॉवर बँकमध्ये दोन चांगल्या बॅटरी आणि एक कचऱ्यातली, निकामी बॅटरी टाकून जगभर निर्यात करतो. म्हणजे पैसे घेऊन घेतलेला कचऱ्याचा निचरा, चीन त्याला जगभर घराघरात पाठवून करतो.

अश्या शातीर चीनचं एक रासायनिक कारस्थान कीटकनाशक व्यवसायाला घातक ठरू शकतं. चीन ही जगाची सर्वात मोठी रसायन फॅक्टरी आहे. रसायन कारखान्यातुन मोठ्या प्रमाणात रासायनिक बायप्रॉडक्ट म्हणजे कचरा तयार होतो. त्याच्यावर प्रक्रिया करून निचरा करणे खर्चिक काम असते. मग या कचऱ्यामुळे किडे मारतात का ते तपासले जाते. किड्यावर प्रभावी ठरलेले निनावी कचरा रसायन जगभर कीटकनाशक म्हणून निर्यात केले जाते. हे निनावी कीटकनाशक किड्याला जरी घातक असले तरी, त्याचे मनुष्य, प्राणी आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम तपासले नसतात. या निनावी रसायनांपेक्षा, चाचण्या केलेले, नोंदणीधारक रासायनिक कीटकनाशक सुरक्षित आहे. आपल्या औषधाला अधिकाधिक स्ट्रॉंग बनवण्याच्या नादात या भेसळीपासून दूर राहावे. आपण बनवलेल्या रसायनाचे अंश आपण आणि आपल्या कुटुंबा पर्यंत पोहोचतील हे सत्य आहे. हे रासायनिक अतृप्त आत्मे कधी ना कधी तुम्हाला झपाटल्याशिवाय राहणार नाहीत.

बऱ्याचदा अनावश्यक उत्पादने शेतकऱ्याच्या गळ्यात मारले जातात. या पावडर टिकली प्रॉडक्ट मुळे शेतकऱ्याचा नाहक खर्च वाढतो. म्हणून गरजेचे उत्पादन बनवणे आणि विकणे आवश्यक आहे. आपण बनवलेल्या प्रत्येक बाटलीमुळे शेतकऱ्याच्या समस्या सुटतील, त्याचा फायदा होईल ही अपेक्षा. बऱ्याचदा मार्केटिंग करणाऱ्या लोकांकडून चुकीचे मार्गर्दर्शन केले जाते. जाणतेअजाणतेपणे औषधाचा डोस तर कधीकधी दुप्पट तिप्पट सांगितला जातो. मार्केटिंग वाल्याला टिंग मारण्यापासून वाचावन्यासाठी त्याला योग्य ती माहिती देऊन प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. मेंबर बनवणाऱ्या एमएलएम कंपन्यांमध्ये हा प्रकार सर्रास दिसतो. 

बाजारात अप्रमाणित उत्पादने बरेच आहेत. सरकार त्यांना प्रमाणित करायचे प्रयत्न करतेय. आपण लायसन असलेले उत्पादने उबनवायचा प्रयत्न करा. बिगर लायसन वालीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या लायसनवालीवर लक्ष द्या. डोक्याचा ताप कमी होईल. मित्रांनो, आपल्या बॅलन्स शीट मध्ये नफ्याच्या कॉलम मध्ये प्रामाणिकपणा सुद्धा मांडा. मग बघा तुमचं बॅलन्स शीट कधीच तोट्यात जाणार नाही.

आता डीलर मित्रांसाठी. भावा शेतकऱ्याचा तूच तारणहार आहे ते लक्षात घे. शेतकऱ्याचा पहिला सल्लागार म्हणजे डीलर. शेतकऱ्याला चुकीचा सल्ला देऊन गार करू नका.  सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला उत्तम प्रतीचं पक्षीखाद्य खाऊ घालायचं असतं. मित्रा, चांगला प्रॉडक्ट विकून देखील थायलंडला किंवा उझबेकिस्थानला जाता येतं हे लक्षात ठेव. एखादं उत्पादन विकतांना अगोदर प्रॉडक्ट चांगले आहे हे तपासा नंतर किती मार्जिन आहे हे विचारा. ज्या कंपनीचे उत्पादन विकतो तिच्याकडे फॅक्टरी, प्रयोगशाळा आहे का हे एकदा तरी तपासून घ्या. ते मीठ देतायेत, की खत हे जाणून घ्या. इतक्या वर्षाच्या व्यावसाईक अनुभवाने आपल्याला कंपनी आणि उत्पादन याची जाण निश्चितच असते. उत्पादनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत शंका आल्यास त्वरित नकार द्या. कुसंगतीमुळे आपली प्रतिमा डागाळली जातेय.  

 जसं मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला समाजात मान आहे, तसेच शेतकऱ्यासाठी खते कीटकनाशक वापरासंबंधीचे आपण शिक्षक आहोत. राजकारण्यासारखा आपला डिलरी पेशा समाजात बदनाम होण्यापेक्षा, शिक्षकासारखा आपल्याला मान मिळेल असं काम करायची इच्छा ठेवा. आपली प्रतिमा एवढी उंचवा की सरकारला, संस्थांना शेतकऱ्याच्या हितासाठी झटणारा उत्कृष्ट डीलर, विक्रेता असे पारितोषिकं देण्याचा मोह होईल. कृषिव्यवसायाच्या चित्रपटात आपल्याला हिरो बनायचंय, खलनायक नाही. जुन्या नव्या पिढीतले कित्येक उमेदी विक्रेते गेल्या पंचवीस वर्षात मला भेटलेत. नवनवीन उपक्रम राबवून, नाविन्यपूर्ण पद्धतीने ते यशस्वीरीत्या व्यवसाय करताहेत. असे शेकडो, हजारो विक्रेते गावोगावी तयार होवोत हीच अपेक्षा. 

 

आता काही शब्द सरकारी साहेबांसाठी. साहेब, ही कृषिव्यवसायाची गाडी सुरळीत कशी चालेल हे पाहणे आपले काम आहे. ट्राफिक हवालदारासारखं लायसन्स, पीयूसी, इंडिकेटर असं एक ना अनेक सापळ्यांची मालिका तयार ठेवायची गरज नाहीये. कुठे कमतरता असतील, त्रुटी असतील तर उद्योजकाला, विक्रेत्याला, शेतकऱ्याला सांगा, तो त्या दुरुस्त करायला तयार असतो. बहुतांश लोकांची कायदा तोडायची इच्छा नसते. फक्त काय करायचं ते माहित नसल्याने त्रुटी निर्माण होतात. शेतकरी, विक्रेते आणि कंपन्यांना निस्वार्थ सहकार्य करणारे कित्येक साहेब, निवृत्त झाल्यावरदेखील समाजात मानसन्मान मिळवताहेत. हीच परंपरा पुढे सुरु राहावी ही अपेक्षा. शासन हे शिक्षा या शब्दाच्या समानार्थी न होता असमानार्थी होऊन सुशासन व्हावे ही अपेक्षा.

आता हा व्यवसाय ज्या खांबावर टिकून आहे त्या शेतकरी राजासाठी. भाऊ, झटपट किड्याला मारण्याच्या नादात चुकीचे प्रॉडक्ट वापरू नका. झटपट किड्याला मारण्याची अपेक्षा ही, झटपट श्रीमंत करणाऱ्या गुंतवणूक स्कीमप्रमाणे स्कॅम असू शकते. गरज असेल तरच फवारा.  बऱ्याचदा नुसते पाणी फवारले, कडुलिंबाचे तेल, जीवामृत, झाडपाल्याचे अर्क फवारले तरी समस्या संपते किंवा कमी तरी होते. कीटकनाशकाच्या बाटलीवरील लेबल वाचा, योग्य तोच डोस वापरा. अति डोस मुळे पैसे, पीक आणि पर्यावरणाची माती होते.

कंपन्यांकडून पैसे उकळायचे काही एजंटचे व्यवसाय बनले आहेत. राजकारणी, चुकीच्या लोकांच्या नादी लागून नुकसान झाले नसून देखील तुमच्या प्रॉडक्टमुळे आमचे नुकसान झाले असं म्हणत करोडो रुपयाची मागणी केली जाते. ब्लॅक मेलिंग सुरु होते. आयत्या सापडलेल्या बकऱ्यावर गल्लीतील नेते, साहेब लोकं, कधीकधी कंपनीचे कामगार आणि विक्रेते हात मारून घेतात. यासारख्या प्रसंगांमुळे एखाद्या जिल्ह्यावर, तालुक्यावर किंवा पिकावर कारण नसतांना चुकीचा ठप्पा बसतो. कंपन्या त्या भागात, पिकात नवनवीन तंत्रज्ञान, उत्पादने आणतांना कचरतात. जुना धोपट मार्ग बरा म्हणत विक्रेत्याला हाताशी धरून बॅकफूट वर खेळतात.  

मित्रांनो, शेतीव्यवसायाच्या इंजिनाचे आपण वेगवेगळे स्पेअर पार्ट आहोत. आपण आपले काम इमानदारीने केले की संपूर्ण इंजिन व्यवस्थित काम करेल यात शंका नाही. पण स्वतः बेईमानी करून इतरांनी व्यवस्थित काम करावे ही अपेक्षा करणे मात्र अयोग्य आहे.  शेतकरी, डीलर, कंपनी आणि शासन या व्यवसायाच्या एकाच बोटीत बसलेत. या व्यवसाय चक्रात आपली नाळ एकदुसऱ्याला बांधली गेलीय. एकाने इमानदारीने काम केले तर दुसऱ्यावरील बोजा कमी होणार आहे. या बोटीतील सर्वांनी इमानदारीने वल्हवलं तरच आपली नौका व्यवस्थित पार होईल. पण बोटीतील काहींनी फक्त वल्हवन्याचं नाटक केलं तर मात्र इमानदारीने वल्हवणाऱ्यांवर जास्तीचा बोजा पडेल. तो थकेल आणि पर्यायाने संपूर्ण बोट थांबेल. हे एक दुसऱ्याला गिऱ्हाईक बनवायचं नाटक किती दिवस आपण खेळणार आहोत? मला एक शेर आठवतोय,

एक ही उल्लू काफी है बरबादे गुलिस्ता के लिये I

यहा हर डाल पे उल्लू बैठे है, अंजामे गुलिस्ता क्या होगा?

या बोटीतील कामचुकारांना शोधूया. हे केल्यास कीटकनाशकावरील खर्च आणि त्याचे आपल्यावरील दुष्परिणाम कमी होतील. इमानदार साथीदारांना साद आणि साथ देऊया. चला तर मग, एकमेका सहाय्य करत सुपंथाला लागूया.

 

 

 

1 thought on “रसायनामा- भाग ४”

  1. खूप छान आणि उद्बोधक लेख लिहिला आहे. सगळ्यांचेच कान पकडल्याबद्दल धन्यवाद.😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडरमहत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मागच्या लेखात आपण फवारा साहाय्यकाची माहिती घेतली. आज फवारा साहाय्यक कुळातील ‘स्प्रेडर’ या प्रकारची

थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटीथाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 31 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पावसाची रिपरिप सुरु होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो,

रसायननामा भाग-१रसायननामा भाग-१

रासायनिक कीटकनाशकांच्या निर्मितीपासून ते निर्माल्यापर्यंतच्या प्रवासावर टाकलेला प्रकाश. गेल्या महिन्यात केरळ हायकोर्टाने शबरीमाला मंदिर ट्रस्टला ते भक्तांना वाटत असलेला प्रसाद न वाटण्याचे आदेश दिले. असं काय झालं की कोर्टाला देवाचा