drsatilalpatil Uncategorized थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी

थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी

थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 31 July , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

पावसाची रिपरिप सुरु होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो, न चुकता हजर होतोय. इथलं वातावरण तसं दमट आहे. त्यामुळे दुपारी सूर्य डोक्यावर आला की उकडतं आणि त्याने पश्चिमेच्या पलंगावर अंग टाकलं की थंड वाऱ्याचा पंखा सुरु होतो. त्यात पावसाचा शिडकावा सुरु झाला की मग थंडी चोरपावलाने नको तीथपर्यंत पाझरते. बाईकवरचा वारा त्या थंडीला अजून थंडगार बनवतो. असा हा थंडा मामला घश्याखाली काहीतरी गरमागरम पदार्थ टाकून संपवावा लागतो. आताही तेच करायचं ठरवलं. समोरच्या डोंगरापलीकडे छोटंसं गाव असल्याचं गुगळे काका सांगताहेत. एक्ससलरेटर पिळलं. बाईकने काही घोट पेट्रोल पिऊन त्या लहानश्या घाटापलीकडे गावात पोहोचवलं. थायलंडच्या गावागावात असतं तसंच, लहान टपरीसारखं हॉटेल चौकात होतं. धडधडती बाईक टपरीसमोर थांबली आणि टपरीमालकीण आणि गिर्हाईकांनी आश्चर्यमिश्रित चिमुकल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं.  

गरम काय आहे? कपाळावर ओघळणारे पाण्याचे थेंब निथळणाऱ्या घमासारखे बोटांनी बाजूला सारत त्याला विचारलं. कॉफी ! ती गुणगुणली. पण रोजरोज कॉफी पिऊन कंटाळा आला होता. दुसरं काय दिसतंय का ते शोधत असतांनाच, समोर ठेवलेली मक्याची कणसे दिसली. छोट्याश्या लोखंडी पेटीत कोळसे टाकून त्यावर ती  मक्याची कणसे भाजत होती. आपल्याकडे मक्याला त्याच्यावरील आवरण काढून दिगंबर अवस्थेत भाजतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती मक्याच्या कणसांना त्याच्या वरील आवारणासह भाजत होती. मी कुतूहलाने तीच्याकडे पाहू लागलो. शेजारी गॅसवरच्या कुकरमध्ये कदाचित मक्याची कणसे उकडायला ठेवली असावीत. आता भूक नाहीये, असं एक मन ‘माका नको गो’ म्हणत असतांना, दुसऱ्या मानाने ‘एक डिश द्या’ अशी खुणेने ऑर्डर दिली. पुढच्या पाच मिनिटात एका प्लेटमध्ये दोन स्वीटकॉर्न म्हणजे मधुमक्याचे मक्याचे कणसं घेऊन ती मकावुमन हजर झाली. कणसांमध्ये कुल्फी सारखी काडी खोचलेली, नारळाच्या दुधात त्याला अभ्यंग स्नान घातलं आहे हे स्पष्ट दिसत होत. हिरवी मिरची त्याच्या रंगसंगतीत भर घालत होती. गरमगरम भुट्ट्याचा लचका तोडला आणि वाह! अशी दाद नकळत निघून गेली. चव छान होती. मका या देशासारखाच गोड होता.

स्वीटकॉर्न मध्ये १८ टक्क्यापर्यंत साखर असते. जास्तकरून ही साखर सुक्रोज च्या स्वरूपात असते. आपल्या गोडीमुळे मधुमका खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. माणसाच्या खाद्याबरोबरच पशुखाद्य म्हणून मका मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मक्याचं पीक थाईलँडमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. वर्षाकाठी ५० लाख टन मका थाईलँडमध्ये पिकतो. थाईलँडमध्ये मका दोन हंगामात पेरला जातो. एप्रिल-मे आणि जुलै ऑगस्ट असे दोन हंगाम असतात. दीडशे दिवसाचं हे पीक थाई शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देतं. पण गेल्या काही वर्षात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव या पिकात झालाये. या फायद्याच्या पिकाचा नफा, शेंडेअळीने कुरतडला होता. शेंडेआळीला हरवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे फवारे मक्याच्या शेतात उडताहेत.

कोणत्याही व्यवसायाच्या भरभराटीत राजाश्रययाचा मोठा वाट असतो.  थायलंडमधील मक्याच्या भरभराटीला सरकारचा मोठा आधार आहे. मक्याच्या पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार बिनव्याजी कर्ज देतं. मका उत्पादनात थायलंड २५व देश आहे पण निर्यातीत मात्र त्यांचा १५व नंबर लागतो. याउलट घटक चाचणीत पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा पप्पू बोर्डाच्या परीक्षेत सपशेल नापास व्हावा, तसा मकाउत्पादनात जगात सातवा नंबर मिळवणाऱ्या भारताचं नाव मात्र निर्यातदारांच्या यादीत दूरदूरपर्यंत सापडत नाही.

 मका उत्पादनात जगात २५ व्या नंबरवर असलेला थायलंडने, मक्याच्या बियाण्याच्या बाबतीतही  बाजी मारलीय. थाईलँडमध्ये मका बियाण्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. देशांतर्गत आणि निर्यातीत या बियाण्याचा सिंहाचा वाटा आहे. मकाच काय पण इतर पिकांच्या बियाण्यांच्या उत्पादनात त्यांनी मानाचं स्थान पटकावलंय. भाजीपाला, मका, भात यासारख्या बियाण्यांच्या उत्पादनात लहानमोठे थाई शेतकरी व्यग्र असतात. बीजोत्पादन उद्योग थाईलँडमध्ये चांगलाच रुजलाय.

येतील योग्य वातावरण, भौगोलिक परिस्थिती, आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेली गुंतवणूक यामुळे बियाणे व्यवसायाने इथं चांगलंच बाळसं धरलाय. सरकारने योग्य धोरणं राबवून त्याला खतपाणी घातलंय. त्यामुळे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक करत बियाणे विकसित आणि उत्पादित करणारे प्रकल्प इथं राबवले आहेत. बियाणे व्यवसायात परदेशी गुंतवणूक वाढतेय. थायलंड बियाण्यांची खाण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.    

योग्य त्या नेमक्या गुणाचं बियाणं मिळणं, कीडरोग प्रतिकारक वाण विकसित करणं, देशी परदेशी कंपन्यांचे संशोधन आणि विकास कार्यक्रमात विकसित होणाऱ्या नवीन जाती, ही थायलंडच्या बियाण्याची खासियत आहे.  खासकरून मका आणि भाजीपाल्याच्या बियाण्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. जशी इतर प्रॉडक्ट च्या निर्यातीत थायलंड अग्रेसर आहे, तशीच बियाणे निर्यातीत त्यांनी बाजी मारलीय. एवढासा देश, पण या यादीत त्यांचा जगात २४वा क्रमांक लागतो. आशिया खंडात जपान आणि चीन नंतर ते तिसरे मोठे बीजनिर्यातदार आहेत.

थाई बियाणे व्यवसायाचं बीज तसं साठ वर्षांपूर्वीच रोवलं गेलं होत. १९६० मधेच बियाणं विकासाठी संशोधन इथं सुरु झालं. १०७० मध्ये सरकारने, राष्ट्रीय मका आणि ज्वारी बियाणे विकास अभियान राबवलं होत. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी दिली गेली. ‘थाई सीड ट्रेड अससोसिएशन’, ‘सीड अससोसिएशन ऑफ थायलंड’ आणि थाईलंड सरकारचं ‘शेतकी खातं’ येथील बियाण्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी झटताहेत. शासनाने खासगी कंपन्यांबरोबर संशोधन आणि विकासासाठी करार करून नवनवीन बियाणांचे वाण विकसित करायचं सतीचं वाण घेतलं आहे. याचमुळे एकवीस राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या थाईलंडमध्ये बियाणे व्यवसायात कार्यरत आहेत. बिजकारणाचा व्यवसाय राजकारणापासून दूर ठेवल्याने विश्वासाचं वातावरण तयार झालंय. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढतेय.  

भारतात सुद्धा बियाणे उत्पादन व्यवसायात मोठी संधी आहे. वर्षभर पीक घेण्यासाठी पोषक वातावरण बहुतांश राज्यात आहे. शेतकरी आणि कंपन्यांमधील विश्वास वाढणे गरजेचे आहे. शासनाने, बीज उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि शेतकऱ्यांना ‘बीज’वरासारखी दुजाभावाची वागणूक न देता, त्यात समन्वय निर्माण करण्यासाठी कॅटॅलीस्ट ची भूमिका निभावन्याची गरज आहे. 

गरमागरम थाई भुट्टा संपवला. ‘तिने कसा होता?’ असं भुवई दोनदा उडून विचारलं. मी झक्कास ! असं अंगठा आणि तर्जनीच वर्तुळ करून सांगितलं. ती भुट्ट्यासारखीच छान गोड हसली. गरमागरम मका खाऊन तृप्त तन आणि मनाने मी थंडगार बाईक वर बसलो.    

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास !कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास !

जैविक असो किंवा रासायनिक,  कीटकनाशकाची बाटली आपल्यापर्यंत कशी पोहोचते? याचा प्रवास आजच्या लेखात पाहूया. आपल्या शेतात, बागेत वापरत असलेलं कीटकनाशक आपल्या बंधाशी येईपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून पार पडतं हे जाणून घेणं

रसायननामा भाग-१रसायननामा भाग-१

रासायनिक कीटकनाशकांच्या निर्मितीपासून ते निर्माल्यापर्यंतच्या प्रवासावर टाकलेला प्रकाश. गेल्या महिन्यात केरळ हायकोर्टाने शबरीमाला मंदिर ट्रस्टला ते भक्तांना वाटत असलेला प्रसाद न वाटण्याचे आदेश दिले. असं काय झालं की कोर्टाला देवाचा

कीटकनाशकांची जन्मकहाणीकीटकनाशकांची जन्मकहाणी

आपल्याला कहाणीमध्ये लै रस असतो. मग ती शेजार(नी)च्या घरातील असो की टीव्ही मधल्या डेलीसोप मालिकांमधली. मग आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग बनलेल्या शेतीरासायनांची कहाणी जाणून घेण्यात तुम्हाला नक्की रस असेल