drsatilalpatil Agrowon Article देवाची करणी आणि नारळात दुध !

देवाची करणी आणि नारळात दुध !

देवाची करणी आणि नारळात दुध ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 04 Jun , 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

थायलंडमधल्या हिरव्यागार दिवसांचा आणि चमचमत्या रात्रीचा आनंद घेत बुलेट प्रवास सुरु आहे. सुकुमार नितळ त्वचेवर, सुगंधी तेलाचा मुलायम मसाजी हात फिरवा तसे बाईकचे टायर गुळगुळीत रस्त्याला गुदगुल्या करत धावताहेत. थाईलंडमधली लोकं आपल्या देशाएवढीच मानाने स्वच्छ आणि सुंदर आहेत. लहानसहान गावात, वाड्यावस्त्यांवर , हॉटेलांमध्ये स्वादिष्ट थाई अन्नपदार्थ आग्रहाने वाढले जाताहेत. थायलंड हा खवैय्यांसाठी नंदनवनच. शेकडो प्रकारचे अन्नपदार्थ पंचेंद्रियांना सुखावत आवताण देत असतात. शाकाहारी लोकांची इथं पंचाईत होते पण तुम्ही जर खाटखुट वाले असाल तर मात्र चंगळ आहे. पोर्क, चिकन, मटण, मासे आणि इतर समुद्री डिशेश अलिबाबाच्या हिरेमाणकाच्या गुहेत आल्याचा फील देतात. 

थायलंडच्या स्वैयंपाकघराने सर्वसामावकतेचा संदेश देत पाश्चिमात्य, भारतीय, चिनी अशा नानाविध पाककृतींना सामावून घेतलय. पण एक पदार्थ इथं सर्रास वापरला जातो. तो म्हणजे नारळाचं दूध. वेगवेगळ्या चटण्या भाज्यांमध्ये हे नारळी दूध आपलं अस्तित्व राखून आहे. जशी थाई जेवणाच्या टेबलावरची नूडल्सची वळवळ चीनमधून आलीये तसं हे नारळी दूध दक्षिण भारतातून ओघळत इथं आलंय असं उगाचच मला वाटून गेलं.

या दुधाचे भरपूर उपयोग आहेत. ज्या लोकांना प्राण्यांच्या दूध पचत नाही त्यांसाठी हे दुध फारच उपयोगी आहे.  दूध म्हणजे तेल आणि पाण्याचं मिश्रण. शास्त्रीय भाषेत त्याला ‘इमल्शन’ म्हणतात. नारळात तेलाचं प्रमाण बक्कळ असल्यामुळे नारळाचं दूध इतर दुधापेक्षा घट्ट बनतं आणि ते तयार करणं सुद्धा सोपं जात. नारळी दुधात २० टक्के तेलाचं प्रमाण आहे.  नारळाच्या दुधाचं क्रीम म्हणजे साय पण प्रसिद्ध आहे. ते वेगवेगळ्या मिठायांमधे वापरलं जात. नारळाचं दूध पौष्टिक असून यात २४ टक्के फॅट, ६ टक्के कर्बोदके आणि २ टक्के प्रोटीन आहे. या दूधातील फॅट संतृप्त प्रकारातले असून आपल्या तब्बेतीसाठी चांगली आहेत. याचबरोबर मँगनीज, फॉस्फोरस, लोह आणि मॅग्नेशिअम यासारखे अन्नद्रव्ये  यात ठासून भरलीयेत.

हे दूध काढायची पद्धत फार सोपी आहे. जुन्या पद्धतीनुसार ओल्या नारळाला किसुन गरम पाण्यात भिजून ठेवतात. त्यानंतर गाळ फडक्याने गाळून घेऊन दूध वेगळं करतात. पण सध्या कारखान्यात मशीनच्या साहाय्याने दूध काढले जाते.

ताजेताजे नारळाचे दूध खाणे चांगलं. नंतर हवेतील प्राणवायू दुधातील तेलाबरोबर युती करून त्याला नासवतो. पण सध्या या दुधाला कॅनमध्ये डबाबंद करून प्राणवायूच्या वाईट संगतीपासून दूर ठेवलं जातं. त्यामुळे ते जास्त काळ टिकतं. एवढंच नाही तर त्याची दूधपावडरसुद्धा बनवतात.

फिलिपिन्स ने पहिल्यांदा नारळाच्या दुधाला कॅन मध्ये बंद करून निर्यातीला सुरवात केली खरी. पण पण आपल्या या सुबक ठेंगण्या विद्यार्थ्याला, निर्यातीच्या पेपरात जास्त गती आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात बाजी मारत त्यांनी ११९ देशात हे नारळी अमृत निर्यात करायला सुरवात केलीय.

या दुधासाठी नारळ पिकाचं उत्पादन महत्वाचं आहे. थाईलंडमध्ये १० लाख ‘राय’ किंवा ‘रे’ जमिनीवर नारळाची शेती केली जाते. एक ‘रे’ म्हणजे साधारणतः ०.३९ एकर. थाईलंडमध्ये वर्षाकाठी ८० कोटी नारळ पिकवले जातात. यातील जवळपास सर्वच नारळ स्थानिक बाजारात विकली जातात. उत्पादनापेक्षा जास्त नारळ इथं खाल्ला जातो. म्हणून या देशाला नारळांची आयात करावी लागते.

नारळाच्या बागांमध्ये नारळ तोडण्यासाठी थायलंडमधील शेतकरी एका अनोख्या मजुराचा वापर करतो. हा मजूर पगाराची अपेक्षा करत नाही. फक्त पोटभर जेवण आणि नारळाचं दूध दिलं कि बस्स. डोक्याच्या नारळात प्रश्नांचं पाणी खळखळू लागलंय ना. सांगतो ! हे मजूर म्हणजे मानवाचे वंशज, माकडं. माकडं गायीम्हशींच्या दुधापेक्षा नारळाचं दुध जास्त पसंत करतात. याचा फायदा घेत थाई शेतकरी या दुधाचं अमिश दाखवत माकडाला झाडावरील नारळ तोडायला वापरतो. हे नारळतोडे माकडं सरसर झाडावर चढतात आणि आपल्या धारदार दातांनी नारळ तोडून खाली फेकतात. सूर्यफळाला तोडायला निघालेल्या हनुमानाच्या  वंशजाला नारळतोडीच्या कामासाठी वापरणाऱ्या थाई माणसाच्या कल्पकतेला सलाम करावासा वाटला.

नारळ तोडणे हे काही अकुशल काम नाहीये. यासाठी कुशल माकड कामगार पाहिजे. म्हणून या कामासाठी माकडांना पकडून प्रक्षिशित केलं जात. त्यासाठी खास माकडशाळा आहेत. या शाळेत प्रवेश घेऊन आपल्या माकडाला सहा महिन्यासाठी पाठवायचं. या सहा महिन्यात थेरीला टांग मारत डाइरेक्ट प्रॅक्टिकल वर भर देत आपला माकडराव, नारळ उतवरायाची डिग्री घेऊन येतो. असे हजारो माकड-मजुर पगाराची अपेक्षा न करता थायलंडच्या नारळबागेत काम करतायेत.

या थाई मजुराच्या व्यवसायाने आंतरराष्ट्रीय संस्था ‘पेटा’ च्या पोटात दुखलं आणि त्यांनी माकडांच्यावर अन्याय होतोय असा वाद पेटवला. थायलंडच्या नारळबागात माकडांचा छळ केला जातोय असा त्यांचा दावा होता. काही ठिकाणी तसं घडलंही असेल पण सरसकट सर्वांना जबाबदार ठरवणं कितपत योग्य होतं हे पश्चिमी देवच जाणे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी थायलंडचं नारळदुध खरेदी करणं बंद केलं. अमेरिकेत आणि युरोपमध्ये लोकांनी या जुलमी दुधापासून दूर रहा असा सूर आळवला. त्यामुळे सामान्य थाई शेतकऱ्याचं नुकसान झालं हे मात्र खरं. या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासाठी मात्र अजुन कोणतीही संस्था पुढे आल्याचं ऐकिवात नाही. 

आक्ख्या जगाचा कळवळा घेतलेल्या या गोऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी मात्र योगायोगाने घडतात. पहिले त्यांनी योगायोगाने जगभरातून करोडो लोकांना लुटून, लुबाडून, मारून धनसंपत्ती गोळा केली. तसा त्यांचा श्रीमंत होण्याचा मानस नव्हता, पण योगायोगाने ते गर्भश्रीमंत झाले. योगायोगाने त्यांना इतर गरीब किंवा विकसनशील देशातील प्राण्यांची जरा जास्तच कणव येते. या देशातील पारंपरिक सणात, खेळात, प्राण्यांवर लई अत्याचार होतो, येथील दूधउत्पादक शेतकरी, प्राण्यांचं दूध त्यांच्या बछड्यापासून हिरावून घेऊन लई जुलूम जबरदस्ती करतो, अमुलसारख्या दूधउत्पादक कंपन्या या अघोर अत्याचारात सामील असुन, त्यांनी हा पांढरा दहशदवाद त्वरित थांबवावा असा साक्षात्कार त्यांना योगायोगानेच होतो. पण सर्वात मोठा योगायोग म्हणजे पाश्चिमात्य देशात होणाऱ्या बऱ्याच गोष्टी नजरचुकीने त्यांच्याकडून दुर्लक्षित होतात. त्यांच्याकडे होणाऱ्या बैलाच्या झुंजी, शिकारीच्या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी मारले जाणारे हजारो प्राणी, भाले टोचून,  नशापाणी करून उधळवलेल्या वळू समोर धावणारी बायामाणसे, हजारो किलो टमाट्यांचा नाचूननाचून, चेंदामेंदा करून वाया घालवलेले अन्न, युके, जर्मनी आणि फ्रान्समध्ये दोन वर्षात, तीन कोटी प्राण्यांचा औषधाच्या ट्रायलसाठी केला गेलेला छळ आणि हत्या, ‘व्हेल शिकार महोत्सवात’ हजारो व्हेल माश्यांची विनाकारण होणारी कत्तल. अश्या एक ना अनेक गोष्टी योगायोगाने म्हणा की नजरचुकीने, त्यांच्या नजरेतुन सुटतात. आणि अख्ख्या जगाची पाटीलकी करायच्या व्यवसायात या लहानसहान गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यास काय फरक पडतो. 

मीही आता योगायोगाने ठरवलंय. आपल्या पोराबाळांना शिकवायचं, मोठ्ठ करायचं, जात, धर्म, भाषा याच्या राजकीय सापळ्यात त्यांना न अडकवता आंतरराष्ट्रीय पातळीवर नोकरी धंद्यासाठी तयार करायचं. तोंडपाटिलकीत वेळ वाया न घालवता, कशाचीही लाज न बाळगता मिळेल तो व्यवसाय करायचा. योगायोगाने आपल्याकडून बेकायदेशीररीत्या लुटून नेलेल्या संपत्तीला, पश्चिमेच्या चोरांकडून निर्यातीच्या माध्यमातून कायदेशीररित्या डॉलरच्या रूपाने परत आणायची. देशाच्या सीमा ओलांडून परमुलुखात मोहिमा करणं आपल्या साठी नवीन नाही. तेव्हा अटकेपार … आता सातासमुद्रापार !

जय शिवाजी ! असं म्हणत मी बुलेटला किक मारली…जय भवानी म्हणत बुलेटने धडधडत प्रतिसाद दिला !

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “देवाची करणी आणि नारळात दुध !”

  1. बहोत पहिले हिंदूस्थान को
    सोने की चिडीयॉं कहॉं करते थे ,
    उस सोने की चीडीयॉं को ,
    कीन कीन गद्दारों ने ,
    नोच नोच कर खायॉं ,
    उनका हिसाब चून चून कर लेना है ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पाऊस बदाबदा कोसळतोय. पावसाच्या थेंबांचा टपटपाट हेल्मेटच्या काचेवर एकसारखा सुरु आहे. नखशिकांत

कंबोडियाची शाही नांगरणीकंबोडियाची शाही नांगरणी

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 9 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझी कंबोडियाची बाईक राईड जोरात सुरु आहे. इथल्या खेड्यापाड्यात फिरतांना आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा

भाग-५: अ-विश्वासभाग-५: अ-विश्वास

भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे  रावसाहेबांना