drsatilalpatil Agrowon Article भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !

भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !

भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 29 May , 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

पाऊस बदाबदा कोसळतोय. पावसाच्या थेंबांचा टपटपाट हेल्मेटच्या काचेवर एकसारखा सुरु आहे. नखशिकांत भिजलोय. पावसाचं पाणी शरीराच्या कान्याकोपऱ्यात थंडी घेऊन घुसलंय. पावसाला चिरत बुलेट निघालीय. थंडगार वारा पावसाशी युती करत, थंडीला पार नसानसात भिनवतोय. ‘बस्स झालं हे पावसाची होळी खेळणं!’ असं म्हणत बुलेट रस्त्याच्या कडेला एका टपरीवजा हॉटेलवर  थांबवली. एक नाजूक थाई ललना, आपल्या सस्मित, जलतरंगी, मंजुळ आवाजात गिर्हाईकांच्या ऑर्डरला प्रतिसाद देत वातावरणात प्रसन्नता भरत होती. पावसाने पळवलेली गरमी परत आणण्यासाठी घशाखाली काहीतरी गरमागरम उतवरायाला हवं. ‘गरम काय आहे?’ असं विचारल. जलतरंग किणकिणलं आणि ‘कॉफी’ असं सस्मित उत्तर मिळालं.

थायलंडला स्मित करणाऱ्यांचा किंवा हसरा देश असंही म्हणतात. आपल्याशी बोलतांना इथली लोकं हळू आवाजात छान स्मित हास्य करत संवाद साधतात. कॉफी ऑर्डर केली. पावसाच्या थेंबफेकीने वैतागलेलं हेल्मेट बाजूला ठेवलं. ओले हातमोजे, पायमोजे आणि बूट काढून टेबलाखालच्या कोपऱ्यात ढकलले. ओलं जॅकेट रिकाम्या खुर्चीच्या हँगरवर  लटकावलं. तेवढ्यात ती सस्मित जलतरंगी कॉफी आली. कॉफीचा मग तोंडाजवळ नेऊन त्यावर फुंकर मारली. गरम वाफेचा स्पर्श गारठलेल्या चेहऱ्याला सुखावून गेला. कॉफीचा घोट घेतला आणि लक्षात आलं की कॉफी जरा जास्तच कडवट झालीये. ‘दूध मिळेल का जरा’ असं विचारल्यावर तिने दुधाचा पेला पुढे केला. हे दूध जरा घट्ट दिसतंय. मी प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. माझा प्रश वाचून ती म्हणाली ‘कंडेन्स दुध आहे सर.’ कंडेन्स म्ह्नणजे आटवलेलं दूध.

थाईलंडमध्ये आटवलेलं दूध सगळीकडे सर्रास वापरलं जातं. साखरेबरोबर गोडधोड म्हणून या आटवलेल्या दुधाचा वापर होतो. सेव्हन इलेव्हन सारख्या दुकानात हे आटवलेलं दूध, समोरच्या शेल्फवर दिमाखात मानाने बसलेलं असतं. स्वैयंपाक करतांना थाई गृहिणी गोंधळली तर आटवलेलं दूध टाकते असं इथं गमतीने म्हणतात. दुधात प्रेमाचं विरजण घालून, नाजूक थाई हातांनी या थाई गवळणी रवीने ताक घुसळत असतील. कारण दही, ताक, लोणी, तूप यासारख्या पदार्थांची भरमार इथं दिसते.

घुसळण काही थायलंडसाठी नवीन नाही. थायलंडच्या सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनाचा भाला मोठा पुतळा उभारला आहे. तीन तोंडाचा वासुकी नाग मंदारपर्वताला विळखा घालून सेल्फीच्या पोझ मध्ये दिमाखात उभा आहे. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव जोर लावून समुद्रमंथनाच्या कार्यात मग्न आहेत. पौराणिक भारताचा वारसा कोणत्याही अमृताची अपेक्षा न करता थायलंडने जपलाये. विमानतळावर समुद्रमंथनाच्या पुतळा लावणाऱ्या या देशातील दूधउत्पादन क्षेत्र कसं आणि किती मोठं असेल? हा प्रश्न डोक्यातील विचारांना घुसळून काढू लागला.

थायलंडमधील दुग्धशेतीची मुळं  पार भारतापर्यंत पोहोचलीयेत. १९१० मध्ये भारतातून थाईलंडमध्ये वास्तव्यासाठी गेलेल्या लोकांनी हा व्यवसाय तिथं नेला. सुरवातीला राजधानी बँकॉकच्या आजूबाजूला दुधाचा व्यवसाय चालायचा. या गाईम्हशींची दिवसाकाठी २-३ लिटर दुध द्यायच्या. पण थायलंडचा दुग्धव्यसाय खऱ्या अर्थाने विकसित व्हायला लागला जेव्हा इथल्या राजाराणीने १९६० मध्ये डेन्मार्कच्या दुधाव्यसायाला भेट दिली. डेन्मार्क भेटीनंतर ही धवलक्रांती आपल्या देशातही झाली पाहिजे या विचाराने राजाराणीने डेन्मार्कची  दूधगंगा थाईलंडमध्ये आणण्यासाठी कंबर कसली.

१७ जानेवारी १९६२ ला पहिला थाई-डॅनिश डेरी फार्म उभा राहिला. म्हणून हाच दिवस थाईलंडचा ‘राष्ट्रीय दूध दिवस’ म्हणून मनावला जाऊ लागला. पुढे १९७१ मध्ये हा फार्म, शासनाच्या शेती खात्याकडे सुपूर्द केला गेला आणि ‘दुग्ध प्रसार संस्था’ म्हणून  नावारूपाला आला. या संस्थेत शेतकऱ्यांना दुग्धउत्पादनाचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. जनावरांची काळजी, त्यावरील कीड-रोगनिवारण, पशुखाद्य, थायलंडच्या वातावरणात टिकू शकतील अश्या गाईंच्या जाती विकसित करणं, दुधावर प्रक्रिया करुन वेगवेगळे पदार्थ बनवणं आणि मांसाहारी थाई माणसाला दुधाची गोडी लावणं यासारख्या गोष्टींवर ही संस्था काम करू लागली.

सरकारने दूध व्यवसायाला प्रोहत्सान दिलं. आणि त्याचा फायदा संपूर्ण देशाला झाला. दूधउत्पादन वाढलं. गावागावात दुधव्यवसाय सुरु झाले. पण दुसरी समस्या डोकं काढू लागली. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागलं. यावर उपाय म्हणून १९६० मध्ये दूधपावडर बनवण्याचा कारखाना सुरु केला आणि ही वाहती दूधगंगा पावडरीचा डब्ब्यात बंद झाली.

आपल्यासारख्या ‘दूध सहकारी संस्था’ थाईलंडमध्येही आहेत. सहकारी संस्थांचं लोण इथं १९७१ मध्येच पसरायला सुरवात झाली होती. त्यानंतर मात्र बऱ्याच संस्था बंद पडल्या. कारण त्या फारच लहान होत्या.  त्यांचं दूधसंकलन कमी होत त्यामुळे दुधावर प्रक्रिया करणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. पण मोठ्या सहकारी संस्थांनी मात्र त्यांचे स्वतःचे प्रक्रिया  उद्योग उभारले. आईसस्क्रीम आणि योगर्टचे कारखाने उभे करून कच्च्या दुधाला पक्क्या मालात रुपांतरीत केलं.

एवढं करूनही थाई लोकांचा दूध पिण्याकडे जास्त कल नव्हताच. मग १९८५ मध्ये थाई सरकारने ‘पियो ग्लासफूल दूध’ असं म्हणत ‘राष्ट्रीय दूध पिणे मोहीम’ सुरु केली. दूध पिण्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या मोहिमेद्वारे केला गेला.  तरीही पोर्क आणि चिकन वर दररोज हात मारणारे थाई लोकं दुधापासून जरा लांबच राहिली.  थाई माणूस दरवर्षी दरडोई फक्त १८ लिटर दूध पितो. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार एका माणसाने वर्षाकाठी कमीत कमी २५ लिटर दुध पिलं पाहिजे. भारतात लोकं तर याबाबतीत जास्त जागरूक आहेत. आपल्या देशातील लोकं दरडोई सरासरी ४८.५ लिटर दूध वर्षाकाठी रिचवतात. त्यामानाने थाई माणसाचं दुग्धप्रशान फारच चिल्लर आहे. पण थाई सरकारने हार मानली नाहीये. २०२६ पर्यंत थाईलंडमधी दुधाचं दरडोई सेवन २५ लिटर वाढवण्याचा विडा सरकारने उचललाये.   

भारतातून गाईम्हशीं घेऊन दुधाव्यवसाय सुरु करणाऱ्या थायलंडने मोठी बाजी मारलीय. चीनला मागे टाकत तो आशिया खंडात सर्वात मोठा दूधनिर्यातदार देश बनलाय. २०१५ मध्ये ३.३१ कोटी डॉलर्सची निर्यात करून २.४२ कोटी डॉलरवाल्या चीनला मागे टाकलं आणि अव्वल नंबर पटकावला. आता गंमत बघा. भारत जगात सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. अख्या जगातलं १८ टक्के दुधाचं आपण उत्पादन करतो. पण निर्यातीत मात्र आपला पप्पू नापास होतो. दूध निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या १५ मध्ये देखील आपला नंबर लागत नाही. हे म्हणजे घटक चाचणीत पैकीच्या पैकी आणि बोर्डाच्या परीक्षेत ठेंगा, असं झालं. याला एक कारण आपलं देशांतर्गत दूध विक्री हे आहेच. पण याचबरोबर निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्ता निकषात आपलं दुध नापास होतं. गावच्या दूध डेअरीत, फॅट तपासणीच्या चाचणीत आपलं कसब पणाला लावणाऱ्या फॅटबहाद्दरांचा यात नक्कीच वाटा असणार, यात शंका नाही.

पाऊस ओसरत आला होता. थायलंडच्या दुधभरारीच्या कौतुकाने ओथंबलेल्या मनाने ते आटवलेलं दूध कॉफीत टाकलं. काळ्या कॉफीत दाट दुधाच्या पांढऱ्या ढगांचे धुमारे उठले. चमच्याने ढवळत कॉफीतील ढग मिटवल आणि एक घोट घेऊन मनातील विचारांच्या ढगांची वासलात लावली.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

3 thoughts on “भारताच्या गाईम्हशीं… थाईलंडमध्ये दूध देती !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट (भाग-१)

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ आज जर आपण शेतीऔषधांच्या दुकानात गेलो, तर कीटकनाशकांपेक्षा टॉनिक, झाईम, स्प्रेडर, स्टिकर यासारख्या, मसाला

भाग-४: अनर्थभाग-४: अनर्थ

भाग-४: अनर्थ आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत

तरंगणारे म्यानमारी टोमॅटो !तरंगणारे म्यानमारी टोमॅटो !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 06 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ क्यू याम किम सी s s सर s s क्यू याम किम सी