Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 25 September , 2021

पोलपॉटने बरबाद केलेल्या देशात बाईकने फिरतांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवताहेत. व्हिएतनाम युध्दमुळे त्यांच्या देशाचं झालेलं नुकसान आणि त्यामुळे जन्माला आलेला ‘खमेर रुज’ चा अत्याचार, लोकांच्या मनात घर करून राहिलाय. खरं तर हे युद्ध व्हिएतनाम मध्ये होत. पण व्हिएत काँगचे बंडखोर, शेजारी कंबोडिया आणि लाओस मध्ये येऊन लपायचे. मग त्यांना शोधत आलेले अमेरिकी सैनिक, या देशांना लक्ष करायचे. या युद्धात वापरलं गेलेलं एक अस्त्र शेतकऱ्याच्या आयुष्याशी जवळीक साधणारं आहे. ते म्हणजे रासायनिक तणनाशकास्त्र. अमेरिकेने करोडो लिटर रासायनिक तणनाशक या युद्धात कंबोडिया, व्हिएतनाम आणि लाओस या देशांवर फवारलं.
एजन्ट ऑरेंज हे घातक तणनाशक व्हिएतनाम युद्धात वापरलं गेलं होतं. हा एजन्ट ऑरेंज आहे तरी काय? हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. दुसऱ्या महायुद्धात टू. फोर. डी. (२,४,D) हे रसायन तणनाशकाचं काम करते असा शोध अमेरिकेत लागला. त्यानंतर टू. फोर. डी. मध्ये टू. फोर. फाईव्ह. टी (२,४,५T) मिसळले की अजून चांगला परिणाम मिळतो असं लक्षात आलं. पण हे करत असतांना त्यात तयार होणार घातक TCDD म्हणजे डायॉक्सिन हे रसायन टाळणं आवश्यक होत. या कंपन्यांनी कमी किंवा डायॉक्सिन नसलेलं तणनाशकं सरकारला पुरवणे आवश्यक होते. पण ते झालं नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या युद्धात वापरलेल्या तणनाशकात डीऑक्सिनचं प्रमाण दुपटीने जास्त होतं हे आता समोर आलंय.
तणनाशकांच्या युद्धातील वापरावर १९४० पासून संशोधन सुरु होतं. सुरवातीला जपानची भातशेती नष्ट करून, जपानी सैनिकांची उपासमार घडवण्याच्या उद्देशाने या योजनेवर काम सुरु होतं. तणनाशकांच्या रासायनिक युद्धाची सुरवात ब्रिटिशांनी केली. १९५० मध्ये त्यांनी मलेशियात याचा उपयोग केला. कम्युनिस्टांचं बंड मोडून काढण्यासाठी त्यांनी इथल्या जंगलांवर तणनाशकांचा वापर केला. त्याचे दुष्परिणाम पुढे कित्त्येक वर्षे जाणवले. पहिल्या महायुद्धानंतर रासयनिक आणि जैविक युद्धावर जिनिव्हा करारानुसार बंदी घातली होती. पण आमचं हे मुळी युद्ध नव्हतचं, हा फक्त एक आणीबाणीचा काळ होता आणि त्यासाठी आम्ही हे रासायनं वापरली असा युक्तिवाद करतं ब्रिटिशांनी वेळ मारून नेली.
या घटनेनंतर अमेरिकेचं फावलं. त्यांनी तणनाशकांच्या युद्धास्त्रावर संशोधन आणि चाचण्या सुरु ठेवल्या. अमेरिकेकडे वेगवेगळे तणनाशकास्त्र होते. एजन्ट ऑरेंज हा त्यातलाच एक. एजन्ट ऑरेंज हा काही रंगाने ऑरेंज म्हणजे नारिंगी होता, असं नव्हे. पण या रसायनांना ज्या प्रकारच्या ड्रम मध्ये साठवले जायचे त्यावरून त्यांची नावं पडली. त्यामध्ये एजन्ट हिरवा, जांभळा, निळा, पांढरा, नारिंगी-I, नारिंगी-II, नारिंगी-III आणि सुपर नारिंगी असे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले गेले. या युद्धात सात आठ प्रकारच्या तणनाशकांचा रासायनिक पाऊस कंबोडिया-व्हिएतनामच्या दाट हिरव्यागार जंगलांवर आणि शेतांवर पडला गेला. या तणनाशकांना ‘रेनबो हर्बिसाईड’ म्हणजे ‘तणनाशकांचं इंद्रधनुष्य’ असं म्हणायचे.

६ लाख एकर क्षेत्रावर हे तणनाशकांचं विष, दशकभर चाललेल्या युद्धात वापरले गेले. या तणनाशकांच्या रासायनिक युद्ध मोहिमेचं नाव होतं ‘ऑपरेशन रांच हँड’. १९६२ ते १९७१ दरम्यान राबवल्या गेलेल्या मोहिमेत साधारणतः साडेसात कोटी लिटर तणनाशक, व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस वर फवारलं गेलं. कल्पना करा, आपल्या हिरव्यागार, डोलणाऱ्या पिकावर, घरादारावर, अचानक आकाशातून विषारी तणनाशकाची फवारणी होते आणि काही तासात सर्वांची राखरांगोळी होते. हे सगळं कल्पनेपलीकडलं होत. या रसायनांच्या वापरानंतर हिरवेगार जंगलं, शेती बेचिराख झाली. लोकांची उपासमार झाली आणि त्यामुळे दुष्काळ पडला.

या तणनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डायॉक्सिन’ हे रासायन होतं. त्यामुळे कॅन्सर होतो हे सर्वज्ञात होतं. डायॉक्सिनचा स्पर्श झाल्यावर किंवा त्याचे अंश खाण्यावाटे तोंडात गेल्यावर ते सरळ रक्तात भिनतात आणि अन्न साखळीत फिरत राहतात. त्यामुळे कॅन्सर, जन्मतः पांगळेपण येणं, हार्मोनचा असमतोल होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यासारखे गंभीर आजार होतात. डीऑक्सिन हे वर्षानुवर्ष जमिनीत, नद्यानाल्यात, तलावाच्या पाण्यात टिकून राहते. डायॉक्सिन हे मासे, पक्षी आणि प्राण्यांच्या चरबीत अडकून राहते. तिथं साठत जाते. अशाप्रकारे माणसाच्या अन्नसाखळीत प्रवेश करतो. त्याच्या थोड्याश्या संपर्काने कातडी काळी पडते, लिव्हर खराब होतं आणि गंभीर त्वचारोग आणि टाईप-२ चा मधुमेह होऊ शकतो. जमिनीत पडलेल्या या रसायनांमुळे जंगलं, शेती नष्ट झाली, जमिनीची सुपीकता संपली, नैसर्गिक अन्नसाखळी तुटली आणि त्यामुळे पर्यावरणाचे फार नुकसान झाले.
कंबोडिया, व्हिएतनामआणि लाओस मध्ये या तणनाशकाने मोठं नुकसान केलं. एकट्या व्हिएतनाममध्ये ४० लाख लोकं बाधित झाले. त्यापैकी ३० लाख आजारी पडले, ४ लाख मेले २० लाख लोकांना कॅन्सर झाला आणि पाच लाख विकृत बाळं जन्माला आली. व्हिएतनाम-कंबोडिया आणि लाओसच्या पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये विकृती दिसू लागल्या. डोळे नसलेले, एकचं हात असलेले, दोन डोके आणि एकचं शरीर असलेले जुळे, डोकं प्रमाणापेक्षा मोठं आणि शरीर बारीक, असे एक ना अनेक विकृत मुलं या देशात जन्माला येऊ लागली. दक्षिण कंबोडियाच्या गावांमध्ये अशाप्रकारच्या विकृत मुलांचं प्रमाण जास्त आहे.


अमेरिकेने, ही रसायने तुमच्यासाठी सुरक्षित आहेत असं त्यांच्या सैनिकांना सांगितलं गेलं होत. पण अमेरिकी सरकार आपल्या सैनिकांशी देखील खोटं बोललं. कित्तेक अमेरिकी सैनिक त्यामुळे बाधित झाले. युद्धातून परत आलेल्या सैनिकांना त्वचारोग होऊ लागले, त्यांना शारीरिक विकृती असलेले मुले जन्माला येऊ लागली, मधुमेहासारखे आजार दिसू लागले. बायकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपात होऊ लागला आणि कॅन्सरचे रोगी समोर येऊ लागले लागले.
आता तुम्हाला प्रश्न पडेल कि हे करोडो लिटर तणनाशकाचं उत्पादन केलं तरी कोणी. तर ते उत्पादन करणाऱ्या मुख्य कंपन्या होत्या डाऊ केमिकल, मोन्सॅन्टो आणि हर्क्युलस. यांच्या जोडीला इतर अमेरिकी कंपन्या होत्या. १९७९ मध्ये व्हिएतनाम युद्धातील बाधित लाखो सैनिकांनी या तणनाशक बनवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात खटला दाखल केला. शेवटी कोर्टाबाहेर समझोता करत या कंपन्यांनी हजारो कोटी रुपये या सैनिकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून दिले. याचा दाखल देत २००४ मध्ये काही व्हिएतनामी लोकांनी देखील ३० रसायनं बनवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात अमेरिकी कोर्टात दावा ठोकला. पण अमेरिकी न्यायदेवता देशाच्या सीमांची बंधनं पाळून न्याय देते असं वाटतं. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
ज्यांनी हि विष फवारलं त्या डायॉक्सिन बाधित अमेरिकन लोकांसाठी, अमेरिकी सरकारने ९५००० कोटी रुपयांची मदत केली. ज्या देशावर हे रसायनं फवारली त्या व्हिएतनामला १८०० कोटी दिले. कंबोडिया आणि लाओस मध्ये, आम्ही हे तणनाशकास्त्र वापरलंच नाही असं म्हणत अमेरिकेने हात वर केले.
सरकारे बदलली पण करोडो लोकांचं आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या कंपन्या आजही टिकून आहेत. पूर्वी त्यांचे प्रॉडक्ट युद्धात वापरली जायची आता शेतात वापरले जाताहेत. पूर्वी सैनिक आणि युद्धबंधितांना भरपाई द्यायचे. आता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना झालेल्या व्याधींसाठी भरपाई देताहेत. आणि आपण आजही ही तणनाशके आपल्या घरात ठेवतोय, शेतात फवारतोय आणि शेती आणि माती प्रदूषित करतोय.
जगातील कोणतेही देश शिक्षणामुळे ,
विकासात , यांत्रिकीकरणात , तंत्रज्ञानात ,
अग्रेसर असतील.
आणि
असे प्रगतदेश अश्या प्रगतीचा उपयोग
जर सजिव-कल्याणासाठी करीत नसतील
तर अश्या शिक्षणाला काय चाटायचे आहे.
त्यापेक्षा अशिक्षित राहिलेले बरं !
तणनाशके फवारणी आता शेतकऱ्यांच्या शेतीतील नांगरट जशी केली जाते तसा एक भागच होऊन बसला आहे. तणनाशकांची तीव्रता, परिणामकता याचा अभ्यास करून तारतम्याने वापरावीत असे वाटते. शेतकामासाठी यांत्रिकीकरणामुळे मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येकालाच शेती असावी असे वाटते मात्र अंगाला माती लागता कामा नये अशी मानसिकता बळावलेली आहे.
पण हे गंभीर आहे, सेंद्रीय औषध निर्मिती, मित्र कीटक यांचा अभ्यासपूर्ण प्रयोग आदींचा ््ए््एकात्मिक प्रयोग झाला पाहिजे.
खरं आहे.या अशा शिक्षितांपेक्षा अशिक्षित खूप बरे म्हणायची पाळी आली आहे.
बाप रे ! हे माहितच नव्हतं.मागच्या वेळचा कवट्या व मानवी हाडांचा ढिगारा व आजचा उजाड शेतीचा फोटो दोन्ही तितकेच भयानक आहेत.ही सगळी माहिती तुमच्यामुळे सामान्यांपर्यंत पोहचत आहे.नाही तर आम्हाला हिरोशिमा-नागासाकी किंवा जर्मनीतल्या छळ छावण्या माहित असतात.हे त्याही पेक्षा भीषण आहे.जीवाची कालवाकालव व्हावी इतके हे भयानक आहे.शिवाय तणनाशकांचा मोह किती घातक आहे याबाबत शेतकऱ्यांचेही या लेखामुळे प्रबोधन व्हावे.शेतकरी तरी काय करतील शिक्षणाच्या आभासी प्रसाराने(इतरही कारणे आहेतच) शेतमजूर दुर्मीळ होऊन बसले आहेत.
Dear Dr.
This is so pathetic and rather enlightenment for all of us.
This is the height of cruelty and destruction of nature and mankind for selfish motives by developed countries and no one can challenge them as of now.
Thanks for sharing such beautiful and eye opener informationand we all must learn from this and avoid such mistakes for future and kick out those chemical mfg companies from our country.
तणनाशके फवारणी आता शेतकऱ्यांच्या शेतीतील नांगरट जशी केली जाते तसा एक भागच होऊन बसला आहे. तणनाशकांची तीव्रता, परिणामकता याचा अभ्यास करून तारतम्याने वापरावीत असे वाटते. शेतकामासाठी यांत्रिकीकरणामुळे मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येकालाच शेती असावी असे वाटते मात्र अंगाला माती लागता कामा नये अशी मानसिकता बळावलेली आहे.
पण हे गंभीर आहे, सेंद्रीय औषध निर्मिती, मित्र कीटक यांचा अभ्यासपूर्ण प्रयोग आदींचा ््ए््एकात्मिक प्रयोग झाला पाहिजे.
अमेरिका काहीही करताना पुडचा विचार करत नाही .हे विचार जगासाठी धोकादायक ठरतील