drsatilalpatil Agrowon Article म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी: इरावती

म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी: इरावती

म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी: इरावती post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 03 April, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

खराब रस्ते जाऊन चकाचक डांबरी रस्ते लागले. लोण्यासारख्या रस्त्यावर बुलेटचे टायर कॅरमच्या स्ट्रायकर प्रमाणे फिरु लागले. हा बदल एकदम कसा झाला हे कळेना. पण रस्त्यावरीन बोर्डने त्याच उत्तर दिलं. राजधानीचं शहर ‘न्यापीदाव’ जवळ येत होतं. म्यानमारची जुनी राजधानी ‘रंगून’ हे ऐतिहासिक शहर होतं. मेरे पिया गये रंगून असं म्हणत भारतीय सिनेमे सुद्धा ‘रंगून’ च्या गुणगंणात रंगून जातं.  पण म्यानमारच्या मिलिट्री सरकारने नवीन राजधानी बांधायचं ठरवलं आणि चीनच्या मदतीने चकचकीत नवीन राजधानीच शहर उभं केलं. या शहराचं नाव आहे ”न्यापीदाव”. सुंदर डांबरी रस्ते हे राजधानी जवळ आल्याचं प्रतीक होतं.

या सुंदर रस्त्याने एका अवाढव्य पुलावर नेऊन सोडलं. समोर एक मोठ्ठी नदी दिसतेय. त्या नदीवरचा हा पूल होता. मोठ्ठा म्हणजे किती तर तब्ब्ल साडेतीन किलोमीटरचा हा लांबच लांब अजगर पाण्यावर पसरलाय असं वाटतंय. नदीचं नाव आहे ‘ईरावडी’ नदी. स्थानिक लोक हिला ‘इरावडी’ किंवा ‘अईरावडी’ असं म्हणतात. पहिल्यांना ऐकलं तेव्हा ईरावतीच वाटलं. पण माझा कयास खरा होता. संस्कृत शब्द ‘ऐरावत’ म्हणजे इंद्राच्या ‘ऐरावतावरून’ हे नाव पडलय. साडेतीन किलोमिटरचा हा  पुल भारत – म्यानमार – थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्पातील हा सर्वात मोठा आणि महत्वाचा पुल आहे. म्हणजे भारतातून थायलंडच्या उद्यानात रस्त्याने जायचं असेल तर या ऐरावताच्या अंबारीतूनच जावं लागेल.

ईरावडी ही म्यानमारमधील सर्वात मोठी आणि देशातील सर्वात लांब नदी आहे. उत्तर म्यानमार मधून तिबेटच्या बाजूने वाहत येऊन ती दक्षिणेला अंदमान समुद्रात स्वतःला झोकून देते. ह्या नदीचा ९१ टक्के भाग म्यानमारमध्ये, ५% चीनमध्ये आणि ४ टक्के भारतात येतो.

पावसाळ्यात या नदीचं पाणी फार गढूळ असतं. पात्राची झीज होऊन सुपीक माती पाण्याबरोबर मिसळते आणि अगदी चहासारख्या रंगाचं पाणी नदीच्या पात्रात उकळल्या सारखं वाहत असतं. मग हा पौष्टिक चहा आग्रहाने पाजत ही इंद्राची ‘ऐरावती’ शेताशेतून आणि गावागावातून फिरते.  उन्हाळ्यात बऱ्याचदा काही ठिकाणी पाणी एवढं कमी होतं की वाळवंटासारखे वाळूचे बेटं उघडी पडतात. पण पावसाळ्यात मात्र या वाळूची लाज झाकत पात्र दुथडी भरून वाहत असतं. 

जगातल्या सर्वोच्च जैवविविधता असलेल्या क्षेत्रात इरावडी नदीचा समावेश होतो. १४०० सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना ती आसरा देऊन आहे. त्यातले १०० प्राणी तर जगातून नष्ट होत जाणार्यांपैकी आहेत. इथं ३८८ प्रकारचे मासे सापडतात त्यापैकी ५० टक्के माश्यांचा मूळ अधिवास इरावडीतच आहे.  अजूनही जेव्हा जेव्हा सर्वे केला जातो तेव्हा एखादी नवीन जात इथं नोंदवली जातेच.

एक प्रमुख जलमार्ग म्हणूनही तिचं महत्व आहे. पुराणातल्या कवितांनुसार इरावडी नदीला मंडालेचा मार्ग असं म्हटलंय. सहाव्या शतकापासून या नदीचा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातोय. शतकानुशतके हा जलमार्ग म्यानमारच्या अर्थव्यवस्थेला पाणी घालतोय. पुढे इंग्रजांनी बर्मा बळकावलं. अत्याधुनिक नौसेनेच्या बळावर जग काबीज करणाऱ्या गोऱ्या साहेबासाठी ‘इरावडी’ वरदान तर म्यानमार साठी ईस्टापत्ती ठरली. येथील हिरे, सोनं, बर्माचं सागवान यासारख्या सामानाची लूट इंग्लंडला नेण्यासाठी ही नदी वाहतुकीचं उपयुक्त साधन बनली. आजही म्यानमारच्या निर्यातीत या नदीचा मोठा वाटा आहे

नदीच्या काठाने फिरतांना दिसणारं दृश्य एखाद्या जुन्या चित्रपटातल्यासारखं वाटतं. बायका धुणे धुतायेत, लोकं सागवानाचं लाकूड कापण्यात गुंतलेत. कोळी जाळं विणण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मग्न आहेत. रेडे पाण्यातून लाकडाचे ओंडके ओढून नेतायेत. शेतकऱ्याची लगबग सुरु आहे. असा हा इरावडी नदीचा काठ सदा गजबजलेला असतो. 

व्यापारासोबत या नदीच येथील शेतीव्यवसायात  भरीव योगदान आहे. तब्बल चार लाख वर्ग किलोमिटरचं सिंचन क्षेत्र एकट्या ईरावडीच आहे. यावरुन तिचं महत्व लक्षात येईल. या नदीच्या आश्रयाला साडेतीन कोटी लोक राहतात. म्हणजे देशाच्या ६६% लोकांना ही नदी आश्रय देते. उत्तरेकडून दक्षिणेकडे शेतीला आणि लोकांना पाणी पाजत ही नदी वाहतेय. इरावडीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाताचं पीक घेतलं जात. इथं तब्ब्ल ८० लाख हेक्टरवर भाताचं पीक पसरलय. त्यानंतर नंबर लागतो कडधान्य आणि तेलबियांचा. ४० लाख हेक्टरवर या द्विदल पिकांची डाळ शीजलीय.  त्यानंतर मक्यासारख्या इतर दुय्यम पिकांचा नंबर लागतो.

ईरावडीची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे येथील डॉल्फिन मासे. ईरावडी-डॉल्फिनची खासियत अशी आहे की ते समुद्री प्रकारात मोडत असूनसुद्धा नदीतील गोड्या आरामात राहतात. इरावडी साठी ते परप्रांतीयच. पण या परप्रांतातही ते वसले, समृद्ध झाले. जगातल्या सात मानांकित डॉल्फिनच्या मानाच्या यादीत त्यांना स्थान आहे. त्यांचं रुपडं देखील वेगळंच आहे. इतर डॉल्फिन सारखी चोच नाही, लांबुळकं तोंड नाही. कपाळ देखील गोलगुळगुळीत. कल्ले लहान, त्रिकोणी. रंग, वरच्या बाजूला गर्द करडा तर खालच्या अंगाला फिक्कट करडा. असा हा इरावडीचा डॉल्फिन एखाद्या एलियनच्या स्पेसशीप सारखा दिसतो. ८ फुट लांब आणि १८० किलो वजनाचा हा ईरवाडी-किंग दिमाखात नदीपात्रात फिरत असतो. हे डॉल्फिन तसे पोहण्यात संथ असतात पण जीवर बेतलं तर तासाला २० ते २५ किलोमीटर वेगाने पोहू शकतात. मादी दर दोन-तीन वर्षांनी एका बाळाला जन्म देते. दहा किलो वजनाचा, सव्वातीन फुट लांब गोंडस डॉल्फिन-बाळ जन्मानंतर दोन वर्षापर्यंत आईच्या देखभालीखाली असतं. त्यानंतर मात्र ते स्वतःच्या कल्ल्यांवर उभं राहत आत्मनिर्भर होतं. 

तसा हा जीव एकटा दुकटा राहत नाही. पाच सहाच्या ग्रुपने फिरतात. शिकार सुद्धा ते एकत्र करतात. सात डॉल्फिन सिंहाच्या काळपासारखे एकत्र येऊन शिकार करतात. माश्यांच्या मोठ्या घोळक्याला रिंगण करून ते घेरतात. विशिष्ट प्रकारचा द्रव थुंकतात. या द्रवाचा वापर करून माश्याच्या कळपाला जाळ्यात पकडतात. एकढचं नाही तर हे डॉल्फिन कोळ्यांना मासे पकडायलादेखील मदत करतात. 

सध्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालीये. शेती, खाणी आणि गाव शहरांनी जमिनीचा हिरवा शालू फेडायला सुरवात केलीय. त्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणात होतेय. इरावडीच्या गढूळ पाण्यातून सुपीक माती वाहत अंदमान समुद्राच्या वाटेला निघालीये. ईरावडी खोऱ्यात वापरले जाणारे खतं आणि कीटकनाशकं नदीत पोहोचताहेत.  मासेमारी आणि औद्योगिकरणामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झालाय. करोडो लोकांची जीवनदायिनी ‘इरावडी’ मलूल होतेय की काय असं वाटतंय. डोक्यातील विचार इरावडीच्या पाण्यासारखे गढूळ झाले.

गाडी पुलावर नेली. पुलावरुन ईरावडीचं विस्तीर्ण लांबवर पसरलेलं पात्र विलोभनिय दिसत होतं. मोटाररस्त्याच्या जोडीला शेजारून रेल्वेचा पुलही धावत होता. पुलावर बाईकच्या फायरींगचा आवाज बदलून स्पीकरचा बास वाढवावा, तसा येत होता. त्या स्पीकरच्या बासचा धडधडता आनंद घेत ‘ऐरावता’ च्या अंबारीची सफर आटोपली.    

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी: इरावती”

  1. अप्रतिम लेख, आवडला, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

मुशाफिरीचा अलविदा !मुशाफिरीचा अलविदा !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मित्रांनो, गेल्या वर्षभरापासून आपण एकत्र बाईकवरून ही आंतरराष्ट्रीय शेतशिवाराची फेरी मारतोय. तुम्हाला डबलसीट

थायलंडचे साखर सम्राटथायलंडचे साखर सम्राट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थाकसिन विद्यापीठातील चर्चा आता रंगलीय. अजून एक गरमागरम ‘ग्रीन टी’ चा कप

मौल्यवान रत्नांची शेतीमौल्यवान रत्नांची शेती

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ ब्रह्माच्या या देशातून माझ्या बुलेटरथातून हिंडतोय. वाऱ्याशी स्पर्धा करत माझा वारू उधळलाय. रस्त्याच्या