पप्पु आज लै खुशीत होता. गुणगुणतच ऑफिसला आला. काय रे पप्पू, लै खुशीत दिसतोस? वाहिनी गावाला गेल्या की काय? त्याला मिश्किल विचारणा केली. नाही हो, आज ऑफिसला येतांना कावळ्याची विष्ठा अंगावर पडली. ते शुभ असतं ना. आजचा सकाळीसकाळी शुभशकुन मिळालं. एका कावळ्याने पप्पूचा दिवस शुभ केला होता. दुसऱ्या दिवशी देखील तसंच घडलं. तेव्हा त्याला म्हटलं ‘पप्पू, नक्की कोणता कावळा तुझ्या कुंडलीत शुभस्थानी आहे ते बघ जरा?’ तिसऱ्या दिवशी पप्पू आला तो तावातावाने, शिवीगाळ करतच. काय झालं? विचारल्यावर म्हणाला. ‘काय सांगू राव, तो कावळा नव्हताच, वरच्या गॅलरीत टूथपेस्टने दात घासणारा शेंबडा पोरगा थुंकत होता‘. त्या दिवशी पप्पूचा कसा पप्पू झाला हाच विषय ऑफिसमध्ये चघळला गेला. पण अश्या पद्धतीने पप्पूच्या नशिबाला कावळा शिवला होता.
पप्पूच्या शुभ शकुनाचा फेस विरला होता, पण माझ्या विचाराचा साबण मात्र उगाळला जात होता. साबण म्हणजे काय? जरा सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यावर, साबण म्हणजे दोन विरुद्ध विचारांच्या पक्षांची युती. पहिला पक्ष म्हणजे पाण्यात विरघडणारा कॅल्शियम किंवा सोडियमचा क्षार आणि दुसरा म्हणजे तेल, ज्याचं पाण्याशी वाकडं आहे. साबण बनवतांना, तेलाला सोडियम किंवा कॅल्शियमच्या क्षाराबरोबर अभिक्रिया करून जोडले जाते. जेव्हा साबण डागाच्या संपर्कात येतो, तेव्हा साबणाचा तेलकट भाग त्याला चिकटतो. कारण डाग तेलकट असतो आणि म्हणूनच तो नुसत्या पाण्याने धुतला जात नाही. दुसऱ्या टोकाचा सोडियम किंवा कॅल्शियमचा भाग मात्र पाण्यात विरघडणारा असल्याने, पाण्याकडे ओढला जातो. या रस्सीखेचेत डाग उखडला जाऊन पाण्यात येतो. आणि तेलकट डागाची धुलाई होते.
माणसाचं आयुष्य निर्मळ करणारा साबण कधीपासून वापरला जातोय? या प्रश्नाचा माग घेतांना शतकानुशतके मागे घसरलो आणि साबणाच्या इतिहासाचा फेस काढायचा प्रयत्न सुरु झाला. हजारो वर्षांपूर्वी भांडी, कपडे आणि स्वतःला स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर व्हायचा. आजपासून ४८०० वर्षांपूर्वी, बॅबिलोनियन संस्कृतीत साबण वापरला जात असल्याचे पुरावे, उत्खननांती समोर आले आहेत. त्याकाळी चरबी आणि राख एकत्र करून साबण बनवला जायचा. चरबीत तेल आणि राखेत क्षार असतात. त्यानंतर साडेतीन हजार वर्षांपूर्वी इजिप्त मधील लोकं देखील साबणाने अंघोळ करायचे असे दाखले मिळतात. हे झाले प्राचीन उदाहरणें. पण ख्रिस्त गेल्यावर कालगणनेला सुरवात झाल्यानंतर, फ्रांस, स्पेन आणि इटली मधील लोकांच्या अंगाला पहिल्यांदा साबण लागला तो सातव्या शतकात. पुढे रोमन साम्राज्याची वाट लागल्यानंतर, मध्ययुगात युरोपातील लोकांच्या न्हाणीघरातला साबणाचा फेस वीरला. सुबत्ता गेली आणि साबणाचा वापर कमी झाला. पण साबण साबणाभावीच्या अस्वच्छतेमुळे १४ व्या शतकात संसर्गजन्य रोगांना लोकं बाळी पडले असं म्हणतात.
आतापर्यंत घरगुती पातळीवर साबण तयार केला आणि वापरला जात होता. पण प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडणाऱ्या ब्रिटिशांनी साबणाला धंद्याला लावले आणि १२ व्या शतकात औद्योगिक पातळीवर साबण बनवायला सुरवात केली. सतराव्या शतकात श्रीमंत लोकांमध्ये साबण वापरण्याची फॅशन झाली. जो तो ‘तुम्हारी त्वचा, मेरी त्वचा से मुलायम कैसे?’ म्हणत साबणाचा ब्रँड विचारू लागला. १९७१ मध्ये निकोलस लेब्लॅंक या फ्रेंच शास्त्रज्ञाने साबण बनवायचं पेटंट घेतलं आणि या व्यवसायाला वेगळं वळण मिळालं. हा व्यवसाय इतका वाढला की १८५० मध्ये तो अमेरिकन अर्थव्यवस्थेतला सर्वात वेगवान वाढणारा उद्योग बनला.
इथपर्यंत सर्वकाही ठीक होत. तेल, चरबी, राख, क्षार, खनिज असे नैसर्गिक पदार्थ वापरून साबण बनवले जायचे. पण पहिल्या महायुद्धात तेल आणि चरबीची कमतरता भासू लागली. म्हणून रसायनशास्त्रज्ञांनी वेगवेगळे पेट्रोलियम रसायने वापरून रासायनिक साबण तयार केला. याला डिटर्जंट म्हणतात. सध्या वापरले जाणारे बहुतांश साबण हे डिटर्जंट आहेत. वनस्पती तेल आणि चरबीची जागा पेट्रोलियम पदार्थानी घेतली आणि नैसर्गिक साबण अनैसर्गिक झाला. या आधुनिक साबणाला ‘सरफॅक्टन्ट‘ असं म्हणतात. जिथं तेल आणि पाण्याला एकत्र नांदवायचं असतं, तिथं या सरफॅक्टन्ट‘चा मध्यस्थी म्हणून वापर होतो.
पूर्वी फक्त, अंग धुण्यासाठी वापरला जाणारा साबण, आता जीवनाच्या प्रत्येक अंगापर्यंत पोहोचलाय. टूथपेस्ट पासून ते रंग, मेकअप, कॉफी, चहा, शीतपेये, औषधे, अन्नपदार्थ, पॅकिंग, कीटकनाशके, खते, कापडउद्योग, कागद, तेल, रसायन, वाहनउद्योग, बांधकाम, मशीन उद्योग यासारख्या हजारो क्षेत्रात त्यांचा सर्रास उपयोग होतोय. सुरवातीला केलेला साबणाचा मर्यादित वापर ठीक होता. पण कंपन्यांनी दिसेल तिथे साबणी पदार्थ घुसडायला सुरवात केली. हात धुण्यासाठी, अंग धुण्यासाठी, केसासाठी, कपड्यासाठी, भांडी धुण्यासाठी. भांड्यात देखील, तांब्या पितळेच्या भांड्यासाठी ‘बायको गेली माहेरी म्हणत‘ दिलेला स्पेशल साबण, असे एक ना अनेक प्रकार. घरातील पाळलेल्या कुत्र्यामांजरासाठी अजून वेगळा. बरं हाताने कपडे धुवायचे असतील तर वेगळा साबण, वॉशिंग मशीनसाठी वेगळा, असे कित्येक साबणाचे प्रकार.
दूरदर्शनच्या जमान्यापासून ‘ला s s लाला s लाला ss ला ss’ गात हिरव्या सुगंधी साबणाच्या जाहिरातींपासून, ते सध्याच्या ओटीटी वरील सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलेल्या मादक जाहिरातींपर्यंत, साबण लावून मुलायम त्वचा करणाऱ्या बायका टीव्हीवर झळकू लागल्या. या जाहिरातींमध्ये तसा पुरुषमंडळींवर अन्याय होतो म्हणा. बघा ना, बायकांचे साबण रंगीत, सुगंधी, मुलायम त्वचा बनवणारे आणि पुरुषांचे मात्र लाल, डेटॉलच्या वासाचे, किटाणू मारणारे. याला काय अर्थ आहे राव? या अन्यायाविरुद्ध एखादं फेसाळलेलं आंदोलन करावं म्हणतोय. असो.
या निर्मळ सरफॅक्टन्टच्या अतिवापरामुळे मात्र हवा, पाणी, जमीन यासारखे नैसर्गिक श्रोत प्रदूषित होताहेत. विचार करा सकाळी दात घासण्याने साबण वापराची सुरवात होते, ते आंघोळ, कपडे धुणे, संडासाच्या भांड्याचा निळा साबण, फारशी पुसायचा, भांडे धुवायचा साबण असा एक ना अनेक कारणाने साबणाचं पाणी आपण निसर्गात फेकतो. आपल्या बाथरूममधून किंवा घरातून बाहेर फेकलेलं साबणाच्या पाण्याचं पुढे काय होतं याचा कधी विचार केलाय का? हे पाणी नद्यानाल्यात सोडलं जातं. गावगातील घाण जमा करत, लोकांचं फेसाळलेलं पाप धूत, ही मैली गंगा समुद्र प्रदूषित करायला निघते. काही पाणी जमिनीत मुरतं, आणि तिथंदेखील हे प्रदूषण पोहोचवतं.
या फेसांपैकी फक्त टूथपेस्टच्या फेसाची आकडेवारी आपण समजून घेऊया. भारताची लोकसंख्या आजमितीला १३८ कोटी आहे. आकडेवारीनुसार ५१ टक्के भारतीय टूथपेस्ट वापरतात. म्हणजे ७०.३८ कोटी जनता दिवसातून एकदातरी तोंडातून फेस काढते. म्हणजे एका माणसाने कमीत कमी १०० मिली (हे प्रमाण पण मी कमीत कमी घेतलंय) जरी फेस दिवसातून एकदा काढला, तरी दररोज सात कोटी लिटर फेस वातावरणात फेकला जातोय. म्हणजे महिन्याला २१० कोटी आणि वर्षाला २५३० कोटी लिटर फेस आपल्या बाथरूम मधून बाहेर पडतोय. हे फेसाळते न्हाणीघरं वर्षभर अविरत फेस ओकताहेत. अंदाज येण्यासाठी उदाहरण द्यायचं झाल्यास, भारतीय लोकं दात घासून, दर दोन वर्षांनी, फेसाने खडकवासला धरण भरतील. बरं या टूथपेस्ट मध्ये काय असतं हे, त्याची पॅकेटवर लिहेलेली संरचना, कधी भिंग लावून, किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून, आणि झूम करून पाहण्याचा प्रयत्न केलाय का? तसं केल्यास, हा नुसता फेस नसून, रसायनांचा कॉकटेल फेस आहे हे दिसून येईल. २०२० मध्ये १४१ टन टूथपेस्टचं भारतात उत्पादन झालं. हे मार्केट जवळपास १५००० कोटी रुपयाचं आहे. म्हणजे भारतात जवळपास दीडशे टन टूथपेस्टचा फेस एका वर्षात निघाला.
आपल्याला या कंपन्या कश्या उल्लू बनवतात ते बघा. जेंव्हा भारतीयांना पारंपरीक दंतमंजनांपासून, त्यांच्या टूथपेस्टवर न्यायचं होत. तेव्हा दंतमंज वापरणारे घाटी, मागासलेले, डाऊनमार्केट असं मार्केटिंग केलं गेलं. कोळसा वापरणे म्हणजे मागासलेपणाचं लक्षण. मिठाने म्हणे दात खराब होतात. तेव्हा ते उपहासाने जाहिरातीत म्हणायचे ‘क्या आप के टूथपेस्ट मे नमक है?’ आता याच कंपन्या ‘क्या? आपके टूथपेस्ट मे नमक नही है?’ अशी जाहिरात करत मीठ टाकलेले टूथपेस्ट विकताहेत.


फेसाच्या प्रदूषणाची व्याप्ती लक्षात घ्यायची झाल्यास, यमुनेच्या पाण्यात झालेला फेस आणि त्या फेसातच सूर्याला अर्ध्य देणाऱ्या भक्तांचा हा फोटो पुरेसा आहे असं वाटत. या फोटोवरून आपल्या फेसाळलेल्या भविष्याची कल्पना येईल. साबणाची अति झाल्यामुळे जलश्रोतांची फेसाळलेली माती झाली आहे. ‘नाही निर्मळ मन, काय करील साबण?’ असा प्रश्न तुकोबारायांनी तेव्हा विचारला होता. ते जर आता असते तर त्यांनी विचारलं असतं. ‘बा विठ्ठला! या साबणाने पर्यावरणात निर्माण केलेला मळ धुवायला कोणता साबण वापरू? मानवाच्या कुविचाराचे डाग धुण्यासाठी कोणता शाम्पू घासू?’

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
आता सध्याचे मीठ रासायनिक असल्याने रॉक साल्टच्या टूथपेस्ट यायच्याच बाकी आहेत.
४८०० वर्षा पासूनचा साबणाचा ” नैसर्गीक ते अनैसर्गिक ” प्रवासा बाबतची माहीती छान आहे.