‘लै फडफड करतोय हा पाकिस्तान, एक अणुबॉम्ब टाकून संपून टाकायला पाहिजे याला’ माझा एक मित्र तावातावाने बोलत होता. विषय नेहमीप्रमाणे ‘भारत आणि पाकिस्तान’ हा होता. ‘तो रशिया बघा, अमेरिका युरोपची पर्वा न करता, कसा वाघासारखा घुसलाय युक्रेनमध्ये, आपली लोकसंख्या तर रशियापेक्षा दहा पटीने जास्त आहे, आपण कशाला घाबरायचं’ अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला मित्र फुल जोशात होता.

रशिया युक्रेन युद्धामुळे अणुयुद्धाची चर्चा परत सुरु झालीये. पुतीनने तसं सूचक वक्तव्य केलंय. युक्रेनमधे तर लोकांनी ‘पोटॅशियम आयोडफाइड’ च्या गोळ्यांचा साठा करायला सुरवात केलीय. आयोडीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ति वाढवून, किरनित्सार्गपासून बचाव करू शकतात. स्थिर आयोडीनच्या मिठामुळे किरणोत्सर्गी आयोडीनच्या, थाइरॉइड ग्रंथिमाधुन शोषणला प्रतिबन्ध होईल आणि अश्या पद्धतिने किरणोत्सर्गापासून आपला बचाव होईल. पण या गोळ्या किती परिणामकारक आहेत? तर त्या किरणोत्सर्गाचा परिणाम फ़क्त २४ तासासाठी थांबवू शकतात. म्हणजे किरणोत्सर्गापासून वाचण्यासाठी दररोज गोळ्या खाव्या लागतील.
जगाला अणुयुद्धाकडे नेणाऱ्या घटना इतिहासात याच्या आगोदर घडल्या आहेत. अमेरिकेतील लष्करी तळावरील अलार्म चुकीने वाजवला गेला. त्यांना वाटलं रशियाने आण्विक हल्ला केलाय. उत्तरादाखल त्यांची अणुबॉम्ब-सज्ज विमाने उड्डाण करायला धावपट्टीवर आली देखील. सुदैवाने चूक लवकर लक्षात आली आणि या विमानांना वेळेत थांबवता आलं. जगाला समज-गैरसमजातून अणुयुद्धाकडे नेणाऱ्या डझन दीड डझन घटना आजपर्यंत घडल्या आहेत. याचा संदर्भ देऊन, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस ‘आंतानिओ बुखारीस’ यांनी नुकतंच त्यांच्या भाषणात पोटतिडिकीने सांगितलंय, की प्रत्येक वेळी आपल्याला नशिबाची साथ मिळेलच असं नाही. जग आण्विक धोक्यात वावरत आहे. आज नाही तर उद्या लहानश्या चुकीमुळे किंवा गैरसमजामुळे अणु-ठिणगी उडू शकते.
जगात तीन प्रकारचे अण्वस्त्र धारी देश आहेत. पहिल्या गटात, जुने लायसन्सवाले अमेरिका, चीन, युके, फ्रांस, रशिया असे पाच देश मोडतात. ही मानाची अण्वस्त्र पंगत. हे सर्व एनपीटी वर सही करणारे देश. दुसऱ्या पंगतीत भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांची वर्णी लागते. यांनी एनपीटी वर सही केलेली नाही म्हणून यांच्याकडे अणुबॉम्ब असूनही त्यांना अधिकृत अण्वस्त्र धारी देशाचा दर्जा मिळाला नाहीये. हे तिघे देश बिना लायसेन्सच्या ड्राइव्हरसारखेच. इस्राईल कडे अणुबॉम्ब आहे पण त्यांनी आजपर्यंत जगाला कळू दिलेलं नाही. त्यामुळे त्यांना अधिकृत बॉम्बवाले म्हणत नाहीत. याचबरोबर इराण सारखे ‘मी नाही त्यातला’ म्हणणारे छुपे अन्वस्त्र धारी देश आहेतच. पण त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याचा पुरावा मिळाला नाहीये. सिप्री या संस्थेच्या रिपोर्ट नुसार, हे नऊ आण्विक-अस्त्र धारक देश, त्यांची क्षमता वाढवताहेत. त्यांच्याकडील आण्विक अस्त्रांचा साठा वाढतोय. ते नवनवीन शस्त्रे विकसित करताहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार जगाच्या एकूण आण्विक अस्त्रांपैकी ९० टक्के फक्त अमेरिका आणि रशियाकडे आहेत.
अणुयुद्धाची ठिणगी उडू शकेल असे काही हॉटस्पॉट जगात आहेत. भारत-पाकिस्तान, अमेरिका-रशिया, रशिया-युक्रेन, इराण-इस्राईल, चीन-अमेरिका, उत्तर कोरिया-अमेरिका हे ते हॉटस्पॉट आहेत. पण खरंच एवढं सोपं आहे का अणुयुद्ध? अणुयुद्ध म्हणजे प्रलय! ते जगाच्या पाठीवर कुठेही खेळलं गेलं तरी त्याची धग आपल्यापर्यंत नक्की पोहाचेल हे लक्षात ठेवा. यासंदर्भात अमेरिकेतील विद्यापीठात एक रिसर्च पेपर प्रकाशित झाला. या पेपर नुसार जगात अणुयुद्धाचा भडका उडल्यास काय नुकसान होऊ शकते याचा अभ्यास करून अंदाज बांधला आहे.
समजा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अणुयुद्ध झालं तर यात साधारणतः शंभर अणुबॉम्ब वापरले जातील. या हल्ल्यात पावणेतीन कोटी माणसे तात्काळ मारले जातील. त्यानंतर दुय्यम युध्दबळींना सुरवात होईल. या बॉम्बमुळे ५०० कोटी किलो धूळ आणि काजळी आकाशात फेकली जाईल. या काजळीला इंग्रजीत ‘सूट’ म्हणतात. ही सूट एवढ्या दूरवर जाईल की कोणत्याही देशाला तिच्या प्रभावापासून सूट मिळणार नाही. या आकाशव्यापी ढगांमुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणार नाही.
त्यामुळे शेती नष्ट होईल. हातातोंडाशी गाठ पडायची मारामारी होईल. त्यामुळे जवळपास २०० कोटी लोकं दहा वर्षात भुकेने मारले जातील. व्यापार ठप्प होतील. जागतिक तापमान १.५ डिग्रीने खाली येईल. निसर्गाचा समतोल बिघडेल. ही काजळी खाली बसायला आणि आकाश स्वच्छ व्हायला साधारणतः दहा वर्षे लागतील.
आता दुसरी शक्यता पाहूया. समजा अमेरिका आणि रशिया एकदुसऱ्याशी अणुयुद्धात भिडले तर काय नुकसान होईल? भारत पाकिस्तानपेक्षा त्यांचं युद्ध फारच मोठं असेल. या अणुयुद्धात ५०० कोटी लोकं मारले जातील असं म्हटलं गेलंय. सध्या पृथ्वीची लोकसंख्या ८०० करोड आहे. त्यातील ५०० कोटी लोकं एका युद्धामुळे यमसदनी जातील एवढं हे युद्ध भयाण असेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की अमेरिकेची लोकसंख्या ३४ कोटी आहे आणि रशियाची लोकसंख्या १५ कोटीपर्यंत आहे. याचबरोबर संपूर्ण युरोपची लोकसंख्या आहे ७४ कोटी. यांची बेरीज केली तर ती होते १२३ कोटी. म्हणजे या युद्धात भाग घेणाऱ्या देशांची लोकसंख्या १२३ कोटी आहे, मग एवढे ५०० कोटी लोक कसे मारले जातील? याच उत्तर आहे, हे युद्ध कुठेही खेळले गेलं तरी संपूर्ण जग त्याच्या कृष्णछायेखाली येईल. असा अंदाज आहे की या युद्धात ४४०० अणुबॉम्ब टाकले जातील. यामुळे १ लाख ३० हजार कोटी किलो काजळी आकाशात उडेल. ३६ कोटी लोक जागेवरच मारले जातील. सूर्य धुळीत झाकला जाईल.
शेती संपेल. संपूर्ण पृथ्वीचं तापमान १४ डिग्रीने खाली येईल. जागतिक दुष्काळ येऊन शेकडो कोटी लोकं उपासमारीने मरतील. अन्नधान्याच्या टंचाईमुळे होणाऱ्या गुन्ह्यांमुळे मरणाऱ्यांची गणना यात केली नाहीये. याचबरोबर स्ट्रेटोस्फेअर तापून ओझोनचा थर नष्ट होईल. त्यामुळे अतिनीलकिरणे सरळ जमिनीवर येतील. त्यापासून होणाऱ्या घातक रोगाला बहुतांश लोकं बळी पडतील.
सध्याच्या युक्रेन रशिया युद्धामुळे जागतिक अन्नधान्याच्या पुरवठ्यावर काय परिणाम झाले आहेत ते आपल्यासमोर आहेच. अणुयुद्धामुळे होणाऱ्या परिणामांची कल्पनाच न केलेली बरी. म्हणजे संपूर्ण भूमंडळावरील देश यात होरपळतीलका? हा प्रश्न स्वाभाविक आहे. परंतु काही देशांचं त्यामानाने कमी नुकसान होईल असं या पेपरमध्ये सांगितलंय. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, उरुग्वे, ओमान, ब्राझील, पॅराग्वे या देशांना पोहोचणारी हानी इतर देशांच्या मानाने कमी असेल असं म्हटलं गेलंय.
यावर काही उपाय आहे का? हा प्रश पडणं स्वाभाविक आहे. अणुयुद्धानंतर उद्भवणारी मोठी समस्या म्हणजे अन्नधान्याची कमतरता. त्यासाठी शेती करणे महत्वाचं आहे. पण वर्षभर काळोख आणि धुरकट वातावरणात पिकं कसे वाढणार. त्यासाठी लवचिक शेती पद्धती अवलंबावी लागेल. अशी पिकं उगवावी लागतील जी कमी पाणी आणि सूर्यप्रकाशात वाढू शकतील, जे कणखर असतील. त्यासाठी ज्वारी-बाजरी सारख्या पिकांचा विचार केला जातोय. हे पिके कमी खतपाण्यात उगवतात. कणखर असतात. कीडरोगांचा जास्त प्रभाव त्यांच्यावर दिसून येत नाही. आपल्याकडे दुष्काळी भागातदेखील ही कोरडवाहू पीक उगवतात.
योगायोगाने भारत २०२३ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ साजरं करतोय. मिलेट्स वर्गात मध्ये ज्वारी, बाजरी सारखी पिके येतात. ही पिके गहू तांदुळापेक्षा सकस आहेत. पण परदेशी अनुकरणामुळे आपल्या पारंपरिक धान्यपिकांपासून आपण दूर गेलो आहोत. जगातील अन्नटंचाई कमी करायला बाजरी पिके महत्वाची भूमिका बजावू शकतात असं मानलं जातंय. आधुनिकीकरणाच्या नादात ज्या अन्नापासून आपण दूर गेलो आहोत, तेच अन्न आपल्याला संकटसमयी तारणार आहे हे मात्र नक्की. अणुयुद्धानंतर, संकटसमयी, जगाला या कोरडवाहू शेतकऱ्याची आणि त्याच्या पिकाची आठवण येईल असं रिसर्च म्हणतोय. मग आज या कोरडवाहू शेतकऱ्याच्या संकटसमयी त्याची आठवण ठेवायचं भान आपल्याला आहे का? फार उशीर होण्याअगोदर या संकटमोचकाचे आपण आजच आभार मानूया !

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
” बाजरी ” ने होत नाही आजार ,
म्हणून ” बाजरी ” च होईल जगाचा “आधार “
” बाजारी ” खाल्याने जातो ” आजार ”
म्हणूनच जगाला बाजारीचा ” आधार “