भाग-६: बळीचं राज्य!

<strong>भाग-६: बळीचं राज्य!</strong> post thumbnail image

भाग-६: बळीचं राज्य!

शाम ने आजची कामं जरा घाईनेच उरकली. शेतातून जरा लवकर परत आला. संध्याकाळी मित्रांच्या गप्पांच्या मैफिलीलादेखील न जाता तो सरळ घरी आला. ‘आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला म्हणायचं’ त्याची आईने हसत विचारलं. यावर ‘अगं आई, उद्या तालुक्याच्या गावाला जायचंय. पावसाळा तोंडावर आलाय. रेंगाळलेल्या कामांची यादी साचलीय, ती संपवतो आधी’. शाम उत्तराला. शयाम हा ग्रॅज्युएट झालेला सुशिक्षित शेतकरी. वडील थकल्यापासून, शेतीची धुरा सक्षमपणे खांद्यावर घेऊन निसर्ग, मार्केट, सरकार, सहकार, बँक यांचा असहकार झेलत जीगरबाजपणे लढतनारा तरुण शेतकरी होता.

‘अरे शाम, तालुक्याला जातोच आहेस तर अजून एक काम कर, दिनुकाकांच्या सुनील साठी मुलगी पाहिलीय. त्यांचं गाव रस्त्यातच आहे. सुनीलला बरोबर ने आणि येतांना मुलगी पाहून या. त्याला पसंत पडली म्हणजे आम्ही वडील मंडळी पुढचं पाहून घेऊ’. श्यामच्या वडिलांनी सुचवलं. सुनील हा श्यामच्या बालमित्र. तो शाम पेक्षा एका वर्षांनी मोठा होता. ‘ठीकाय’ म्हणत शामने जेवण आटोपलं. सकाळी डेरीवर लवकर दूध घालायचं आणि पहिल्या येष्टीने निघायचं असं ठरवून तो खाटेवर आडवा झाला.

श्यामने सकाळी डेरीवर दूध टाकलं. दूध मोजून सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नोंद केली. ‘शामभाऊ, आजपासून दुधाचे दर वीस रुपयांनी वाढले बरं का’. क्लार्क भाऊसाहेब म्हणाले. ‘काय म्हणता काय?’ शाम आनंदाने म्हणाला. ‘हो, आणि यापुढे ज्याप्रमाणे पेट्रोल, डिझेलचे भाव हे क्रूड तेलाच्या जागतिक दरानुसार कमीजास्त होतात, त्याचप्रमाणे आता दुधाचे भावदेखील महागाईच्या निर्देशांकानुसार कमीजास्त होतील असं सरकारने ठरवलंय. म्हणजे महागाई वाढली की दुधाचे भाव आपोआप वाढतील’. भाऊसाहेबांनी माहिती पुरवली. ‘क्या बात है! म्हणत श्यामने आनंदाने उडीच मारली. त्याच्या जन्माच्या वेळी, म्हणजे १९९७ मध्ये दुधाचा भाव १३ रुपये होता. पंचवीस वर्षानंतर तो सत्तावीस वर आला होता. म्हणजे पंचवीस वर्षांत तो फक्त डबल झाला होता. पण पंचवीस वर्षांपूर्वी फुकटात मिळणारं पाणी आता कंपन्या बाटलीत बंद करून वीस रुपयाला विकताहेत. म्हणजे पाण्याची किंमत वाढली पण दुधाकडे दुर्लक्ष झालं होत. याचबरोबर टूथपेस्ट, साबण, शेतीऔषधे यासारख्या वस्तूंच्या किमती दरवर्षी आकाशाला भिडायची स्पर्धा करत होत्या. सिगारेट, दारूसारख्या घातक वस्तूंचा भाव तर विचारूच नका. पण पौष्टिक दूध मात्र गोगलगायीच्या चालीने निघालं होत. आता मात्र दुधाच्या किमती महागाईच्या दराप्रमाणे वाढतील हे ऐकून शामला बरं वाटलं. ‘चला, शेवटी शेतकऱ्याला न्याय मिळाला म्हणायचं’ असं म्हणत त्याने दुधाची रिकामी चरवी अंगणातील ड्रममधील पाण्यात विसळली आणि तिला पाणी निथळण्यासाठी तिथंच उलटी ठेवून तो एसटी स्टॅण्डवर पोहोचला. बसची वेळ सकाळी सात वाजेची होती, पण उतावळा भावी नवरदेव सुनील तिथं पंधरावीस मिनिटे आगोदरच पोहोचला होता. 

श्यामने सकाळी डेरीवर दूध टाकलं. दूध मोजून सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नोंद केली. ‘शामभाऊ, आजपासून दुधाचे दर वीस रुपयांनी वाढले बरं का’. क्लार्क भाऊसाहेब म्हणाले. ‘काय म्हणता काय?’ शाम आनंदाने म्हणाला. ‘हो, आणि यापुढे ज्याप्रमाणे पेट्रोल, डिझेलचे भाव हे क्रूड तेलाच्या जागतिक दरानुसार कमीजास्त होतात, त्याचप्रमाणे आता दुधाचे भावदेखील महागाईच्या निर्देशांकानुसार कमीजास्त होतील असं सरकारने ठरवलंय. म्हणजे महागाई वाढली की दुधाचे भाव आपोआप वाढतील’. भाऊसाहेबांनी माहिती पुरवली. ‘क्या बात है! म्हणत श्यामने आनंदाने उडीच मारली. त्याच्या जन्माच्या वेळी, म्हणजे १९९७ मध्ये दुधाचा भाव १३ रुपये होता. पंचवीस वर्षानंतर तो सत्तावीस वर आला होता. म्हणजे पंचवीस वर्षांत तो फक्त डबल झाला होता. पण पंचवीस वर्षांपूर्वी फुकटात मिळणारं पाणी आता कंपन्या बाटलीत बंद करून वीस रुपयाला विकताहेत. म्हणजे पाण्याची किंमत वाढली पण दुधाकडे दुर्लक्ष झालं होत. याचबरोबर टूथपेस्ट, साबण, शेतीऔषधे यासारख्या वस्तूंच्या किमती दरवर्षी आकाशाला भिडायची स्पर्धा करत होत्या. सिगारेट, दारूसारख्या घातक वस्तूंचा भाव तर विचारूच नका. पण पौष्टिक दूध मात्र गोगलगायीच्या चालीने निघालं होत. आता मात्र दुधाच्या किमती महागाईच्या दराप्रमाणे वाढतील हे ऐकून शामला बरं वाटलं. ‘चला, शेवटी शेतकऱ्याला न्याय मिळाला म्हणायचं’ असं म्हणत त्याने दुधाची रिकामी चरवी अंगणातील ड्रममधील पाण्यात विसळली आणि तिला पाणी निथळण्यासाठी तिथंच उलटी ठेवून तो एसटी स्टॅण्डवर पोहोचला. बसची वेळ सकाळी सात वाजेची होती, पण उतावळा भावी नवरदेव सुनील तिथं पंधरावीस मिनिटे आगोदरच पोहोचला होता. 

‘शाम, आपण वेळेत आलो खरं, पण आजतरी एसटी वेळेत येवो म्हणजे झालं’ सुनील उतावळेपणाने म्हणाला. त्याला मुलगी बघायची घाई झाली होती. त्याची तगमग पाहून शाम म्हणाला ‘असं गुढग्याला बाशिंग बांधू नकोस गड्या. आपल्या आयुष्यात एकदा तर बस वेळेत आलेली पाहिलीय का आपण? तास दीड तास उशीर म्हणजे तीचा नॉर्मल टाइम असतोय’ शाम हसून म्हणाला आणि त्याने मोबाईलच्या घड्याळावर नजर टाकली. सात वाजायला एक मिनिट कमी. आणि तेवढ्यात तो परिचित आवाज कानावर पडला आणि शाम आश्चर्याने उडालाच. आज एसटी चक्क एक मिनिट आधी आली होती. या धक्यातून सावरत तो बसमध्ये चढला. तशी फार गर्दी नव्हती. ड्राईवरच्या मागच्या सीटवर ते बसले. आता कंडक्टर साहेब पुढे येतील की आपण मागे जाऊन तिकीट काढायचं, हा विचार श्याम करत असतांना कंडक्टर पुढे आले आणि ‘कुठलं तिकीट देऊ साहेब असं प्रेमाने विचारलं’. त्यांच्या बोलण्यातून अदब जाणवत होती. एवढंच काय पण विचारण्याआधी त्यांने लोखंडी रॉडवर हातातला तिकीट पंच करायचा चिमटा आदळून खणखणाट देखील केला नाही, आणि श्यामने पुढे केलेली दोनशेच्या नोट पाहून सुट्टे द्या असं देखील म्हटले नाही. कंडक्टरने आपल्या स्वच्छ इस्त्री केलेल्या खाकी शर्टाच्या खिशातून काढलेले सुट्टे पैसे आणि तिकीट मंद स्मित करत श्यामच्या हातात ठेवले आणि समोरच्या सीटवरील आजींना ‘आजी काही त्रास तर नाही ना?’ असं प्रेमाने विचारत आपल्या सीटवर परत गेले. श्यामने अविश्वासाने सुनीलकडे पहिले. ‘बघ, माझ्या होणाऱ्या सासऱ्याने आपल्यासाठी कशी व्यवस्था करून ठेवलीय’ असं सुनील मिश्कीलपणे म्हणाला आणि स्वतःच्या जोकवर मनापासून हसला.

बसने त्यांना अगदी वेळेत तालुक्याला सोडलं. ‘आधी माझी कामं संपवू या आणि नंतर तुझ्या वधुपरिक्षेचं बघूया’ असं श्याम म्हणाला. म्हणजे ‘आधी लगीन श्यामच्या कामाचं मग सुनीलचं’ असं म्हण की लेका! या विनोदावर दोघे खळखळून हसले. सर्वात आगोदर बँकेतली कामं उरकायची होती. ते बँकेत पोहोचले. पेरणीआधी बी-बियाणे, खते या साठी त्याला कृषीकर्ज हवं होत. ते बँकेत आले. दरवाजावरील सिक्युरिटीने बंदूक सांभाळत आणि वीरप्पनछाप मिशनमधून स्मित करत सॅल्यूट ठोकला. काउंटरवर त्याने, कर्ज हवंय असं म्हटल्यावर, काचेपलीकडल्या मॅडम बाहेर आल्या आणि आदबीने त्यांना मॅनेजर साहेबांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेल्या. मॅनेजर साहेबांनी चहा मागवला आणि कर्जाचे वेगवेगळे प्लॅन समोर ठेवत म्हणाले ‘शामसाहेब, शेतीकर्ज आता माफक व्याजदरावर उपलब्ध आहे बरं का, आणि एवढंच नाही तर पीकविमा, कर्ज आणि पैशाशी निगडित सर्व व्यवहार आमच्या बँकेत एका खिडकीत होतील. तुम्ही फक्त व्हाट्सअप वर मेसेज करा, आमचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन सेवा देईल’. साहेबांनी मॅडमना बोलावून फॉर्म भरून घेतला. त्यातील अटीशर्ती स्पष्ट शब्दात वाचून दाखवल्या. फॉर्मवर सह्या घेतल्या. उद्या आमचा माणूस कागदपत्रे घ्यायला घरी येईल. त्यानंतर दोनतीन दिवसात तुमच्या खात्यात कर्जाचे पैसे जमा होतील याचा विश्वास साहेबांनी दिला. काही मदत लागली तर मला फोन करा असं म्हणत साहेबांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड पुढे केलं. काय चाललंय हे शामला कळेना. सासुरवाडीला मिळतो तसा मान बँकेत मिळत असल्याचे पाहून त्याला हर्षवायू झाल्याचा भास होत होता. साहेबांचे आभार मानून ते बाहेर पडले.

तेथून ते कीटकनाशकांच्या दुकानात गेले. इथंही त्यांचं आदराने स्वागत झालं. चहा मागवला गेला. दुकानदाराने त्याला हवं असलेलं बियाणं, खतं आणि कीटकनाशकं दिली. खत घेतल्यावर दुसरं पौषक घ्यावंच लागेल असा आग्रह केला नाही. तीनचार कीटकनाशकं, टॉनिक, आणि मसाला प्रॉडक्ट मिसळण्याचा सल्ला न देता, ‘शामभाऊ, जे आवश्यक आहे तेच फवारा, उगाच मसाला प्रॉडक्ट फवाऱ्यात मिसळू नका असा सल्ला दिला’. बळीचं राज्य आलं की काय असा श्यामला त्याला प्रश्न पडला. आज सकाळी बस स्टॅण्ड पासून सुरु झालेले आश्चर्याचे धक्के सुरूच होते. ‘लेका तुझी होणारी बायको लै लकी ठरणार असं दिसतंय’ श्याम या धक्क्यातून सावरत सुनीलला म्हणाला.

टमटम रिक्षातुन ते सुनीलच्या भावी सासऱ्याच्या घरी पोहोचले. आगतस्वागत झालं. सुनील काय करतो? शिक्षण काय वैगरे प्रश्न झाले. घरातून चहापोहे घेऊन मुलगी आली. ही माझी मुलगी ‘दीक्षा’ वडिलांनी ओळख करून दिली. काही प्रश्न विचारायचे असल्यास बिनधास्त विचारा असं ते म्हणाले. ‘शिक्षण काय झालाय आपलं?’ श्यामने वधुपरीक्षेत घासून पातळ झालेला प्रश्न विचारला. यावर ‘या वर्षी एमबीएच्या शेवटच्या वर्षाला आहे’ असं मंजुळ उत्तर मिळालं. मुलीचं शिक्षण पाहून फक्त ‘बीए’ वर शिक्षणाला ब्रेक लावून, शेतातील ट्रॅकटरच्या ब्रेकवर पाय ठेवणाऱ्या सुनीलच्या घशात गोड चहाचा घोट अडकला. त्याची अडचण ओळखून ‘पण, आमच्या सुनीलचं शिक्षण तर फक्त बीए झालय, तुमच्यापेक्षा कमी शिकलेल्या, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर तुम्ही लग्न करायला का तयार झालात?’ श्यामने पुढचा प्रश्न फेकला. यावर दीक्षा म्हणाली ‘शामराव, मी शिकलेली मुलगी आहे. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचा, नोकऱ्यांचा अभ्यास मी केलाय. शेती असा एकमेव धंदा आहे ज्यामध्ये आरोग्य आणि पैसे दोन्ही कमावता येतं. या धंद्यात एका दाण्याच्या कच्च्या मालाच्या इनपुटच हजार पटीत आउटपुट मिळतं. याचबरोबर लहान मूल वाढवावं तसं पीक वाढवायचं समाधानदेखील मिळतं. राहिली गोष्ट शिक्षणाची, तर धीरूभाई अंबानींसारखे अरबोपती उद्योजक, माफक शाळकरी शिक्षणाच्या आधारावर  विश्वउद्योजक बनले. माणूस शिक्षणाने नाही तर, तो करत असलेल्या व्यवसायाने मोठा ठरतो. शिक्षण आपल्याला नोकरदार बनवू शकेल, पण त्यामुळे उद्योजक बनतीलच याची गॅरंटी  नाही. त्यासाठी उद्योजकाचा अटीट्युड पाहिजे, तो सुनीलरावांमध्ये आहे’. लग्न झाल्यावर ते उत्पादन पाहतील आणि मी मार्केटिंग आणि फायनान्स ची बाजू सांभाळेल. सुनीलरावांचं घर आणि व्यवसाय याचं बॅलन्स शीटचा बॅलन्स सांभाळायचं काम मी करेल’. दीक्षाच्या या वाक्याने श्यामला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. सुनील तर हवेत तरंगायला लागला होता. त्याने स्वतःला, कोणाला दिसणार नाही असा गुपचूप चिमटा देखील काढला. श्यामला चहा घ्यायचा आग्रह झाला. पण तो चहा घेत नसल्याने घरातून दुधाचा ग्लास आला. दीक्षाचे वडील म्हणाले, घ्याना शामराव दूध घ्या, दूध … 

 दूध… दूध… अरे शाम दूध घालायला जायचं ना डेरीवर? मग उठ कि लवकर. आणि आज तुला तालुक्याला जायचंय ना? मग आवार फटाफट. आईच्या आवाजाने शामला जाग आली.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “<strong>भाग-६: बळीचं राज्य!</strong>”

 1. हे वास्तव विनोदी वाटत असले तरी ते तितकेच करुण आहे.या वास्तवातून सुटका होणे तरी दूरच पण ते आणखी उजाड होऊ नये,एवढीच आशा करायची.तारणहार तरी कोण शेती या क्षेत्राला.किती सरकारे आली आणि गेली.किती पक्ष,किती नेते.त्यातले सर्वाधिक ग्रामीण भागातून आलेले.पण कुणी या गर्तेतल्यांना हात दिला नाही.शेत मालाला योग्य भाव द्या,वीज द्या,वेळेवर योग्य दराने पतपुरवठा करा बाकी फुकट काही नको.सरकार फुकटचा आवळा देते पण त्या बदल्यात कोहळा वसूल करते.काय बोलणार.

 2. शेतीक्षेत्राचा विचार मनापासून केला तर
  स्वयंरोजगार वाढीबरोबर ,
  बेरोजगारांची संख्या कमी होईल.
  शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी , रस्ता ,
  विज आणि बिनव्याजी कर्ज दिले तर
  भारताच्या जिडीपीत भरघोस वाढ होईल

Leave a Reply

Your email address will not be published.

Related Post

भाग-१५ मुंगीबाई मुंगीबाई !भाग-१५ मुंगीबाई मुंगीबाई !

आज रविवार. सुट्टीचा दिवस. शेतातील घरासमोर बसलो होतो. मोबाईल जवळ नसल्याने, दर पाचदहा मिनिटाला काहीतरी हरवलंय असं वाटून हात उगाचच खिसे चाचपायचे. मग मेंदूने, मोबाईल आपण घरात ठेवलाय! अशी आठवण

भाग- २०. नाही निर्मळ मन, काय करील साबण!भाग- २०. नाही निर्मळ मन, काय करील साबण!

पप्पु आज लै खुशीत होता. गुणगुणतच ऑफिसला आला. काय रे पप्पू, लै खुशीत दिसतोस? वाहिनी गावाला गेल्या की काय? त्याला मिश्किल विचारणा केली. नाही हो, आज ऑफिसला येतांना कावळ्याची विष्ठा

भाग- १६.  ये जवळ ये… !भाग- १६.  ये जवळ ये… !

घरातून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे, अंगणात बसून पुस्तकात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटूचे लक्ष विचलित झाले. पुस्तक बाजूला ठेऊन तो घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे वडील आणि काकांचे भांडण सुरु होते. त्याचे वडील