या आठवड्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स रिसर्च प्रयोगशाळेत, संशोधकांनी सकारात्मक बातमी दिली. त्यांनी घोषित केलं की त्यांनी अणूंची एकत्रीकरण अभिक्रिया यशस्वी केली असून त्यातून त्यांना जास्तीची ऊर्जा मिळाली. या बातमीने संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला. जगभरातल्या प्रसिद्धीमाध्यमांनी याची दाखल घेतली.
आण्विक विकिरण शास्त्राची प्रथमावस्था १८९५ ते १९४५ च्या काळात होती. त्यात शेवटचे सहा वर्षे महत्वाचे होते. १७८९ मध्ये युरेनियम शोधलं गेलं. जर्मन रसायन शास्रज्ञ मार्टिन क्लाप्रोथ याने ते शोधलं आणि युरेनस ग्रहाच्या नावावरून त्याच नामकरण करून टाकलं. मधल्या काळात बऱ्याच संशोधकांनी आण्विक संशोधनात भर घातली. पुढे १९३९ मध्ये त्याच्या अतिप्रचंड ऊर्जा निर्माण करणारी साखळी अभिक्रिया उलगडली. एक अणु तुटल्यावर त्यातून जी ऊर्जा तयार होते, तिच्या आघाताने अजुन अणुचं विखंडन होत. त्यातून परत ऊर्जा आणि परत विखंडन. अशी ही तुटातुटीची प्रक्रिया साखळी क्रिया सुरु असते. त्यामुळे महाविध्वंसक ऊर्जेचा उद्रेक होऊन विस्फोट होतो.

अणुस्फोटाचं वापर युद्धात करायच्या कल्पनेने पछाडलेल्या अमेरिकेने १९३९ ते ४५ या काळात फक्त अणुबॉम्ब बनवण्याच्या उद्धेशाने अणुसंशोधन केलं. मॅनहॅटन प्रोजेक्ट हा गाजलेला प्रकल्प. १९४२ ते १९४६ दरम्यान हा संशोधन प्रकल्प अमेरिकेच्या मॅनहॅटन येथे राबवला गेला. या प्रकल्पादरम्यान अमेरिकेने अणुबॉम्ब बनवून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीचं अणुवाटोळं करून बॉम्बची युद्धाचाचणी करून घेतली. ९७०० टनाच्या ‘लिटल बॉय’ ने हिरोशिमात पाच चौरस मैलाचा परिसर उध्वस्त करत १.४ लाख लोकांचा बळी घेतला. दुसरीकडे साधारणतः पाच टणाच्या ‘फॅट मॅन’ ने नागासाकीत तीन चौरस मैलाचा प्रदेश उध्वस्त करत लिटल बॉय एवढेच लोकं मारले. पुढे कित्येक दशके येथील जमीन बंजर झाली. किरणोत्सर्गाने सजीवसृष्टी नष्ट केली.
दुसऱ्या महायुद्धानंतर समीकरणं बदलली. औद्योगिक क्रांतीची लाट जगभर पसरली. ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली. संपूर्ण जग ऊर्जेच्या शर्यतीत पळू लागलं. तेलाच्या विहिरीचे मालक असलेले आखाती देश गब्बर होऊ लागले. पाश्चिमात्यांनी अणुबॉम्बच्या जोरावर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांच्या फायद्यात वाटेकरी झाले. ऊर्जेच्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धे देखील होऊ लागली. तेलाच्या जोडीला कोळसा जाळून ऊर्जेची गरज भागवली जाऊ लागली. पण तेल असो की कोळसा, पर्यावरणाला काळं फासणारच. जागतिक तापमानवाढीचा धोका त्यामुळे वाढू लागला. निसर्गाच्या चक्राची डळमळ सुरु झाली.
स्वच्छ आणि कमी प्रदूषण करणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांचा शोध सुरु होताच. त्यासाठी आण्विक ऊर्जेकडे पर्याय म्हणून पहिले जाऊ लागले. हिरोशिमात लाखो बळी घेत जगाला आपली अनुदादागिरीचा धाक दाखवल्यानंतर, या तंत्रज्ञानांचा उपयोग ऊर्जा तयार करायला देखील होऊ शकतो यावर अमेरिकेत संशोधन सुरु झाले. विध्वंसक सैतानाला बाटलीत घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. या तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जेसाठी करण्याचे प्रयत्न होते. अणुविखंडन अभिक्रिया नियंत्रित करून तिचा उपयोग जहाज चालवण्यासाठी आणि वीज तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. १९५६ नंतर चं अणुसंशोधन हे सुरक्षित अणुविद्युत प्रकल्प उभारण्याकडे केंद्रित होत. या प्रकल्पातून वीज तयार होऊ लागली. पाणबुड्या देखील आण्विक उर्जेवर महासागरात विहार करू लागल्या.
पण अणुविखंडन प्रक्रियेवर आधारित अभिक्रिया नियंत्रित करायला कठीण होती. एकदा का अणुंची विखंडनक्रिया सुरु झाली कि ही साखळी नियंत्रित करणं जिकरीचं काम होत. त्यातून तयार होणारी ऊर्जा देखील मोठी आहे. या प्रक्रियेत एखादा अपघात झालाच तर किरणोत्सर्ग पसरायचा धोका आहेच. रशियाच्या चेर्नोबिल मध्ये झालेला अपघात तुम्हाला आठवत असेलच. जपानमधी फुकोशिमा अणुप्रकल्प हे हे अलीकडचे उदाहरण. हा प्रकल्प चालवणे म्हणजे अणुबॉम्ब उशाशी बाळगण्यासारखं आहे. आतंकवाद्यांच्या हातात हे प्रकल्प पडल्यास घात होण्याची भीती आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकन शास्त्रज्ञांनी ज्या संशोधनाची घोषणा केली ते अणुऊर्जेच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरणार आहे. याआगोदर अणु तोडून ऊर्जा तयार केली जायची. पण नावीत संशोधनात दोन अणूंची युती करून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी ड्युटेरिअम आणि ट्युटेरिअम या जड हायड्रोजनच्या अणुंवर लेसर किरणांचा मारा करून त्यांना एकमेकांशी जोडले गेले. ही अभिक्रिया व्हायला २.०५ मेगाज्यूल एवढी ऊर्जा दिली गेली आणि त्यातून ३ मेगाज्यूल एवढी ऊर्जा बाहेर पडली. १.५ ऊर्जा घटक जास्तीचा मिळाला. शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास पेरलं तेवढंच उगवलं तर काय फायदा? आणि व्यापाऱ्याच्या भाषेत, भांडवल टाकलं तेवढाच धंदा झाला तर उपयोगी नाही. पण या प्रयोगात खर्च केलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जेचं उत्पादन या अभिक्रियेतून झालं आणि संशोधकांचा हेतू साध्य झाला.
तुम्हाला प्रश पडेल कि एवढं काय विशेष आहे या बातमीत? सतत वेगवेगळ्या क्रियाअभिक्रियांचा खेळ मांडत बसलेले संशोधक, संशोधन निबंध प्रकाशित करतच असतात की? अणुफ्युजन च्या माध्यमातून मिळालेल्या या सरप्लस ऊर्जेच्या बाबतीत एवढी चर्चा का होतेय? याला कारण आहे सध्याच्या अणुविखंडण पद्धतीचे तोटे या प्रक्रियेत नाहीत. फ्युजन पद्धत त्यामानाने सुरक्षित आहे. किरणोत्सर्गाचा धोका नाही. बरं या मध्ये वापरला जाणारा कच्चा माल देखील त्यामानाने स्वस्त आहे. अणु फ्युजन पद्धतीतून तयार झालेली ऊर्जा ही पर्यावरणाचं कमी नुकसान करत स्वस्त आणि सुरक्षित पर्यायी ऊर्जास्रोत उपलब्ध करण्याची संधी घेऊन आलीये.
३५० कोटी रुपये खर्चून १९९७ मध्ये स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेचा उद्धेश सफल झालाय. प्रयोगशाळेतील प्रयोग यशस्वी झालाय आणि पुढच्या दहा वर्षात व्यावसायिक पातळीवर हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. २०५० पर्यंतच्या शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्वाचे ठरेल यात शंका नाही.
या शोधाकडे अजून वेगळया नजरेने देखील पहिले जाऊ शकते. युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न नाटो देश करताहेत. रशियाचा तेलाचा धंदा संपवण्यासाठी भारतासह इतर देशावर त्यांचा दबाव टाकणे सुरु आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर स्वच्छ ऊर्जेचा बाजार बाळकावण्याची संधी अमेरिकेकडे चालून आलीये. पुढे इतर देशदेखील या स्पर्धेत उतरतील. अणुबॉम्बचा शोध लावून, त्याच्या धाकावर जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेला ऊर्जेच्या बाजारावर अधिपत्य गाजवून त्यांच्या साम्राज्याची जागतिक पकड घट्ट करायची संधी निर्माण झालीये.
अणुशास्राचा विखंडन अभिक्रियेचा दुसऱ्या महायुद्धापासून सुरु झालेला प्रवास, युक्रेनच्या युद्धाकाळात लागलेल्या अणुएकत्रिकीकरण अभिक्रियेच्या शोधापर्यंत येऊन पोहोचलाय. तोडातोडीच्या प्रक्रियेचा अवलंब केल्यास विध्वंस आणि प्रदूषण होते, पण जोडाजोडीच्या अभिक्रियेत मात्र प्रदूषणविरहित ऊर्जा मिळते. बा मानसा आण्विक अभिक्रियेने तोडातोडीपेक्षा जोडाजोडी जास्त फायदेशीर आहे हे दाखून दिलंय. बघ त्यातून काही आण्विक शिकवण घेता येते का? अणु जोडले तरी ऊर्जा मिळते मग माणसं, हृदय आणि मनं जोडल्याने काय जादू होईल? याची तू कल्पना करू शकतोसच. नवीन वर्ष जवळ येतंय. बघ, नववर्षाचा काही जोडतोडीचा संकल्प करता येतो का?

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
माणसे , हृदय , आणि मन जुळली तर
शांती प्रस्थापित होऊन ” माणूसकी ” जन्माला येईल