बर्माचा साग आणि कृषी पर्यटनाला जाग !

बर्माचा साग आणि कृषी पर्यटनाला जाग ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 24 April, 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

सकाळच्या कोवळ्या उन्हात डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात बसून नाश्ता आटोपला. नाश्त्याचा ठिकाण म्हणजे छोटंसं अग्रोटुरिझम सेंटर होत. शेतात गवताने शाकारून बनवलेलं खोपटं. तेलाचा घाना, घरगुती गूळ बनवण्याचं लहानसं गुऱ्हाळ. आश्चर्य म्हणजे या गुळापासून इथं राजरोसपणे दारुही बनवली जातेय. असली दारुडी पर्यटन केंद्र आपल्याकडे काय झिंगाट धंदा करतील या नुसत्या कल्पनेनेच डोक्याला झिंग आली. 

इथल्या सरकारने कृषिपर्यटनाला चालना द्यायचं ठरलंय. त्यामध्ये यंगून, बागो, इरावडी, कायान आणि चीन या राज्यांना प्राधान्य द्यायचं ठरलंय. टुरिझम उद्योजक संघटना आणि म्यानमारच्या हॉटेल आणि टुरिझम मंत्रालयाने देखील, जंगल सफारी, नदीवरील क्रूझ यासारखी नवनवीन पॅकेज तयार केलीयेत असं समजलं.

या देशात इकोटुरीझम उद्योगाला चांगला वाव आहे. एका बाजूला हिमालय, मध्ये इरावडी सारखी महाकाय नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. त्याचबरोबर भरपूर जंगलं, मौल्यवान रत्नांच्या, सोन्याच्या खाणी, कोरडवाहू शेतीपासून चहाच्या मळे अश्या विविधतेने नटलेल्या म्यानमार मध्ये कृषिपर्यटन आणि इकोटुरिझमला मोठी संधी आहे. पण साधुच्या वेशातील संधीसाधु लष्कराचा विळखा या देशाला पडलाय. लोकशाही नावालाच आहे. शेजारी डोक्यात सतत वळवळणारे लाल किडे पाळणारा शातीर चीन त्यांना खतपाणी घालतोय. त्यामुळे लोकशाहीचा हा बेगडी मुलामा कधीही गळून पडेल अशी भीती येथील लोकांना आहे. (म्यानमारमधील सध्याच्या परिस्थितीने ती खरी ठरलीये) अश्या या वातावरणात कृषिपर्यटनाचं रोपटं किती आणि कसं फुलेल याची लोकांना चिंता आहे.

श्री. हाताय यांनी ‘उशीर होतोय, निघूया’ असं घड्याळाकडे बोट दाखवत खुणावलं. फटाफट नाश्ता आटोपला आणि निघालो. उजव्या बाजूला नैसर्गिक जंगल आणि वामांगी कृत्रिम सागाचं जंगल माझी सोबत करतंय. म्यानमार हा सागासाठी प्रसिद्ध देश. बर्मा-टीक, म्हणजे म्यानमारी साग जगात भारी. दक्षिणपूर्व म्यानमार मध्ये ‘टानिनथारी’ भागात या व्यवसायाची सुरवात झाली. दक्षिणे तील ‘पेगू’ आणि ‘तानासेरीम’ च्या डोंगराळ भागात सागाची मोठी जंगलं आहेत. याव्यतिरिक्त पश्चिमेतील ‘अरकान’ आणि पूर्वेतील ‘शान’ टेकड्यातही सागाची जंगलं बसलीयेत.

इतर लाकडापेक्षा सागाचा पाण्याला प्रतिरोध जरा जास्त, त्यामुळे फर्निचर आणि जहाजबांधणीत त्याला पूर्वीपासून मोठी मागणी आहे. तसं साग हे भारत, म्यानमार, लाओस आणि थायलंड या देशातील मूळ निवासी. समुद्रसपाटी पासून ३००० फूटाच्या आत साग वाढतो. अगदी जुनाट पानाचं ओझंही अंगावर न ठेवणारा निर्मोही साग, मिश्र पानझडीच आणि सदाहरित, अश्या दोन्हीही प्रकारच्या जंगलात स्वतःला सामावून घेतो.  

देश्याच्या अर्थव्यवस्थेत म्यानमारी सागाचा मोठा वाटा आहे. १९८० मध्ये म्यानमारच्या एकूण निर्यातीत एकट्या सागाचा वाटा ३३% एवढा भरभक्कम होता. यावरून त्याचं महत्व लक्षात येतं.

ब्रिटिश काळात या धंद्याला फार चालती होती. एकोणविसाव्या शतकात अँग्लो बर्मीज युद्धात जिंकल्यावर, म्यानमारी सागाचे हिरवेगार जंगलं गोऱ्यांच्या ताब्यात गेली. जगात सर्वात भारी नौसेना असलेल्या ब्रिटनला जहाजबांधणीच्या व्यवसायासाठी बर्मीज सागाच्या रूपाने लॉटरीच लागली. सुरवातीला सागावर सरकारी नियंत्रण ठेवनाऱ्या गोऱ्यांनी १८२९ मध्ये खाजगी कंपन्यांसाठी सागतोड खुली केली. मग काय जंगलांचे सरकारी आणि कॉर्पोरेट लचके तोडायला खुली छुट मिळाली.

१९४१ मध्ये ब्रिटन सरकारने म्यानमारमध्ये पहिला ‘फॉरेस्ट सुप्रिटेंडन्ट’ नेमला. या ‘सुप्रीच्या’ने सागासाठी जंगलतोडीची ‘ताऊंगया’ ही नवीन अघोरी पद्धत अवलंबली. सागाची जुनी जंगलं तोडायची, उरलेली झाडेझुडपे आणी गवतावर काडी टाकून राखरांगोळी करायची. जाळून साफ झालेल्या जमिनीवर नवीन सागाची झाडे लावायची. हे साग मोठे होईपर्यंत इतर पिकांची अंतरपीक म्हणून लागवड करायची. या ‘ताऊंगया’ पद्धतीने हजारो हेक्टर जंगलांच्या जैवविविधतेचा बट्ट्याबोळ केला. सरकणाऱ्या शेतीने पर्यावरणाचा समतोल सरकवला होता.

 ‘ताऊंगया’ शेतीला ‘करेन’ या स्थानिक आदिवासी लोकांची मदत मिळेल अशी ब्रिटिशांना आशा होती. स्थानिक मजुरांची यासाठी गरज होती. पण गोऱ्यांच्या या मतलबी शेतीपद्धतीला ‘करेन’ लोकांनी कडाडून विरोध केला. ही जंगलं म्हणजे त्यांचा शतकानुशतकांचा अधिवास. तो गमावुन व्यावसायिक शेती करणं त्यांनी साफ नाकारलं. आपल्या फायद्यासाठी कायदे करून कायदेशीर पद्धतीने काम काढण्यात पटाईत गोऱ्यांनी वेगवेगळे कायदे बनवले. देशातील सर्व जमीन सरकारच्या मालकीची आहे असा नवीन कायदा केला. त्यामुळे ‘करेन’ लोकं शतकानुशतके ती बेकायदेशीररीत्या कसतायेत असा निवाडा केला. कोर्टकचेऱ्या बनवून बेकायदेशीररित्या कायदाकायदा खेळत ‘करेन’ लोकांना गुन्हेगार ठरवून छळलं.

अगदी स्थानिक लोंकांना जळणासाठी लाकूडफाटा नेणंही बेकायदेशीर होत. बर्मीज राष्ट्रवादी पार्टीने ब्रिटिश सरकारला ‘लोकांना जळणासाठी तरी लाकडं तोडू द्या’ असं समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ही विफल ठरला.

१९४८ मध्ये म्यानमार स्वतंत्र झाला आणी सागाच्या धंद्याची सोन्याची चिमणी राजकारण्यांच्या हातात आली.  १९८८ मध्ये ‘ने विन’ च्या लष्करी अधिपत्याखाली देश गेला. लष्कराला हत्यारं आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी पैशाची गरज होती. मग काय! जास्तीत जास्त साग तोडून परदेशात निर्यात करण्याचा या मिलिटरी सरकारने सपाटा चालवला. १९९० मध्ये जास्तीत जास्त सागाची तोड करून जंगलांचं आरोग्य बिघडवून देशाची लष्करी अर्थव्यवस्था सुधारवान्याचा शासनाने प्रयत्न केला गेला. सोमेश्वरी आग विझवण्याच्या प्रयत्नात रामेश्वरी बंब पाठवणाऱ्या मिलिटरी शासनाच्या विचित्र निर्णयामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. पेगू भागातील जंगल जास्तच पंगू झालं. 

लोकशाही सरकार आल्यावर २०१४ मध्ये सागाचं लाकडावर निर्यातबंदी लावली गेली. पण बेकायदेशीर लाकूडतोड मोठ्या प्रमाणात सुरु आहेच. उत्तर सीमेवर चीन मोठ्या प्रमाणात म्यानमार मधुन साग चोरून नेतोय. १९१५ मध्ये १५३ चीनी लाकूड चोरांना फासावर लटकवले गेले. त्यामुळे नुकत्याच अस्तित्वात आलेल्या लोकशाही सरकारने शातीर चीनशी पंगा घेतलाय. (सध्याच्या परिस्थितीत म्यानमारी मिलिटरीच्या कृष्णकृत्याला अभय देऊन त्यांनी त्याची परतफेड केलीय असं म्हटलं तरी चालेल.)

सागाच्या धंद्यात विस्कळीत झालेला निसर्ग कृषी पर्यावरणाने थोडासा का होईना सावरावा आणी बर्मीज टीकची ही वाचलेली जंगलं टिकावी असं ब्रह्मदेशी ब्रह्मदेवाला साकडं घातलं. मानवाने निसर्गाची चालवलेली ससेहोलपट पाहून संतापात मूठ पिळली गेली. त्यामुळे राग कमी झाला नाही, उलट बुलेटचा एक्सेलरेटर जरा जास्त पिळला जाऊन बाईकने उसळी घेतली. बाईकच्या धकधक आवाजावर लक्ष केंद्रित, बर्मा टिकमुळे वाढलेली डोक्यातील टिकटिक शांत करायचा प्रयत्न करत पुढे निघालो.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “बर्माचा साग आणि कृषी पर्यटनाला जाग !”

  1. खूपच छान
    माझ्या सारख्या वाचन वेड्यांना मेजवानीच

  2. म्यानमार मध्ये जशी सागाच्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणावर झाली. तशीच
    डॉ सतिलालजी पाटील आपल्या कडे पण पुर्ण सातपुडा पर्वतातील झाडांची तोड करून संपूर्ण
    सातपुडा पर्वताला विना कपड्यांचा केला.
    म्हणजे एकप्रकारे ” नागडाच ” केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

टिकली एवढ्या देशातटिकली एवढ्या देशात

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ आज मलेशियातील शेवटचा दिवस आहे. येथील प्रवासादरम्यान मी आणि माझी बाईक वेगवेगळ्या गोष्टींचा

विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!विजिगिषु देश! … त्याची भारताशी वेस!

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 30 January, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेले दोन दिवस जगातल्या सर्वात आनंदी देशात बुलेटने फिरतोय. रस्ते एकदम चकाचक

भगवान विष्णूच्या देशात !भगवान विष्णूच्या देशात !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधील प्रवास आज संपलाये . माझी बाईक थायलंड- कंबोडियाच्या बॉर्डरवर उभी आहे. थायलंडच्या हिरव्यागार