drsatilalpatil Agrowon Article लवचिक थाई शेती

लवचिक थाई शेती

लवचिक थाई शेती post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 14 August , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

दक्षिण-पूर्व थायलंड मधून माझा बाईक प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे दाटीवाटीने वर्षावनात उभी आहेत. थायलंड हा वर्षवनांचा प्रदेश. इथं मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे जंगलं माजतात. हिरव्या छत्रीखाली इतर लहानसहान झाडे, झुडपे,वेली, परजीवी वनस्पती फोफावतात. या वर्षावनांतून प्रवास म्हणजे ‘मज्जानु लाईफ’. हिरव्याकंच झाडांच्या गर्दीत रास्ता अंग चोरत घुसतो. रस्त्यावर चिटपाखरूही नाही असं मी म्हणनार नाही. कारण इथं ‘चिट आणि पाखरू’ भरपूर आहेत, पण माणूस आणि मनुष्यनिर्मित गोष्टींचा दूरदूरपर्यंत मागमूस नाही. अश्या निर्मनुष्य जंगलातून गाणी म्हणत माझा प्रवास सुरु होता. सलग दोन तास बाईक चालवल्यानंतर हळूहळू वनाचं रूपांतर वनशेतीत व्हायला लागलं. लांबच लांब रबराचे मळे हिरवा पडदा मागे सरावा तशी दोन्ही बाजूने मागे पडू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबवर हिरवीगार रबराची शेती ताणली गेली होती. या रबरी संगतीत माझा संगीत प्रवास सुरु होता.

एवढ्या मोठ्या प्रमाणात रबराची शेती थाईलंडमध्ये होते हे माझ्या गावीही नव्हतं. कुतुहलाचं रबर ताणलं आणि रबराची माहिती घळाघळा बाहेर पडू लागली.

रबराच्या इतिहासासंबंधी काही कहाण्या आहेत. माया संस्कृतीतील एक आदिवासी बाई जंगलात फिरत होती. अचानक तिला एक रडणारं झाड दिसलं. तिने आयुष्यात पहिल्यांदाच रडणार झाड पाहिलं होतं. कुतूहलाने ती झाडाजवळ गेली आणि तिने त्या झाडाचे अश्रू आपल्या वस्तीत नेले. वस्तीच्या प्रमुखाला हा पदार्थ उपयोगी वाटला आणि अश्या प्रकारे नैसर्गिक रबराचा उपयोग सुरु झाला असं म्हणतात.

१४९० मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस ‘हैती’ देशात गेला होता. तेव्हा त्याला तिथंली लोकं रबरासारख्या उसळणाऱ्या लवचिक चेंडूने खेळतांना दिसली. त्यानंतर ‘हैती देशात रबराची झाडे ‘हायती’ असं म्हणत त्याने युरोपियन देशापर्यंत रबर ताणत आणला. अशीही कहाणी सांगतात. १७३६ मध्ये फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाला सरकारने ‘पेरू’ देशात पाठवले. अवकाशात संशोधन करणाऱ्या साहेबांनी तेथील जंगलात फिरून मधासारखा पांढरा चीक गोळा करून मायदेशी आणला.  अश्या एक ना अनेक कथा सांगितल्या जातात.

इतिहास काहीही असो पण आधुनिक जगात रबराचा वापर ‘चार्ल्स गुडइयरने’ केला. गुडइयरचा रबराच्या पिशव्या बनवायचा व्यवसाय होता आणि रबरापासून बनवलेल्या ‘पोस्टाच्या पत्राच्या पिशव्या’ बनवायचं सरकारी कंत्राट त्याला मिळालं होतं. पण या पिशव्याचं विघटन होऊन त्या लवकर खराब व्हायच्या. १८३९ साल मात्र गुडइयरसाठी खऱ्या अर्थाने ‘गुड इयर’ ठरलं.  या वर्षी चार्ल्स गुडइयर कडून, चुकून रबर आणि सल्फर, तापलेल्या स्टोव्ह वर पडलं आणि त्यामुळे काळ्या रंगाचा जळका रबराचा गोळा तयार झाला. तो गोळा लवचिक होता. त्याला ताणलं तरी तो कोडग्यासारखा आपल्या मूळ आकारात परतायचा. चार्ल्स गुडइयरने, अपघाताने रबराच्या ‘व्हल्कनीकरण’ प्रणालीचा शोध लावला होता. या पद्धतीला अजून विकसित करत आधुनिक रबर बनलं.  या अपघाती शोधामुळे रबर व्यवसायात क्रांती झाली. १८४४ मध्ये गुडएअरला रबराचे पेटंट मिळाले. पण या रबराच्या जनकाच्या आयुष्याचा शेवट मात्र दारिद्र्यातच झाला.  पुढे १८८९ मध्ये इंग्लंडच्या ‘जॉन डनलप’ यांनी रबरापासून सायकलचा आणि १९०६ मध्ये मोटारीचा ‘टायर; बनवला आणि वाहनाच्या लाकडी चाकाला ‘रिटायर’ केलं. अशा प्रकारे टायरच्या स्वरूपात ‘रबराचा’ औद्योगिक शर्यतीत चंचुप्रवेश झाला. 

दुसऱ्या विश्वयुद्धात रबर भाव खाऊन गेलं होत. लष्करी ताकद वाढण्यात औद्योगिक रबराची मोठ्या प्रमाणात गरज होती. इंग्रज, अमेरिकन, जर्मन आणि जपान मध्ये रबराची गरज भासू लागली. आणि शेती आणि जंगलातून निसर्गाची ही लवचिक संपत्ती ओरबाडली गेली.  मध्य आणि आग्नेय आशियात इंग्रजांना आव्हान देत सत्तातुर जपान पुढे आला. १९४१ च्या युद्धात जपान आणि गोऱ्या साहेबात रबरी ओढाताण सुरु झाली. भारत, आफ्रिकन देश आणि ब्रह्मदेश इंग्रंजांच्या ताब्यात होते त्यामुळे त्यांना तिथून रबराचा पुरवठा होत होता. पण जपान्यांनी इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड, रबरासह घेतलं आणि हक्काचा रबराचा चिकट स्रोत मिळवला. या काळात रबर उत्पादकांनी आपल्या रबरी व्यवसायाच्या ट्यूबमध्ये नफ्याची हवा भरून घेतली.  

थायलंड हा जगातला सर्वात जास्त नैसर्गिक रबर उत्पादन करणारा देश आहे हा माझ्यासाठी पहिला धक्का होता. वर्षाकाठी ४८ लाख टन नैसर्गिक रबराचं उत्पादन हा देश करतो. नुसता उत्पादकाच्याच नाही, तर आख्या जगातील ३१.५ टक्के रबराची निर्यात करत, निर्यातदारांची यादीतही त्याने अव्वल नंबर पटकावलाय. जास्त करून जपान आणि चीनला इथलं रबर निर्यात होत. थायलंडमधील रबराचा उपयोग वाहनउद्योग आणि विमाननिर्मितीत केला जातो.

थाईलंडमध्ये सरकारने रबराचे क्षेत्र वाढावं म्हणून सरकारी योजना राबवल्या होत्या. त्यामुळे क्षेत्र वाढलं पण शेतकऱ्याच्या समस्या देखील तेवढ्याच वाढल्या होत्या.  थायलंडच्या रबर उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक आणि नैसर्गिक संकटांची मोठ्या प्रमाणात झळ बसली होती. २०११ मध्ये थाईलंड मध्ये रबराची लागवड ४५ टक्क्याने वाढवली आणि २०१५-१६ मध्ये जागतिक बाजारात अती पुरवठ्यामुळे भाव पडले. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे चीनची रबराची मागणी १० टक्क्याने कमी झाली. चीन हा जगातला सर्वात मोठा रबराचा ग्राहक. त्यामुळे प्रतिकिलो ६.४० डॉलर असलेली रबराची किंमत १.२७ डॉलर पर्यंत खाली आदळली. नैसर्गिक रबराने तब्ब्ल ८० टक्क्याची अनैसर्गिक आपटी खाल्ली होती. ताणलेल्या राबरासारखा हा बाजारातील किमतीचा ताण कमी झाला आणि किमती स्वगृही परत येऊ लागल्या.  पण थाई शेतकऱ्यापुढील संकट संपले नव्हते. ज्या दक्षिण थाईलँडमध्ये सर्वात जास्त रबराच्या बागा आहेत, तो भाग अतीपावसामुळे जलमय झाला. पाण्यामुळे झाडाचा चीक काढणे अशक्य झाले. जास्त काळ पाण्यात उभं राहिल्यामुळे झाडं सुकायला लागली होती.

२०१८ मध्ये अजून एक संकट या शेतकऱ्याची वाट पाहत उभं होत. ते म्हणजे उत्पादन खर्चाचं. एका किलो चिकाचा उत्पादनखर्च सव्वाशे रुपये किलो येतो, पण बाजारात त्याला फक्त ८० रुपये भाव मिळत होता. त्यात भर म्हणजे, २०१९ मध्ये ‘पेस्टालोटिप्सिस’ या बुरशीजन्य रोगाने रबराच्या शेतीत धुमाकूळ घातला. झाडाची पानं या रोगामुळे गळू लागली. जवळपास सव्वा लाख एकर क्षेत्रावरील रबराच्या बागांना या रोगामुळे नुकसान सोसावे लागले. हवेद्वारे शेजारी मलेशिया आणि इंडोनेशिया मध्ये देखील हा रोग पसरला. अश्या समस्यांमुळे या रबरी शेतीची ओढाताण झाली.  बरेच शेतकरी  रबराच्या बागा तोडून इतर पिकाकडे वळले. झाडाच्या खोडाला जखम करून त्यातून भळभळणारा रबरी चीक काढणारा शेतकरी असहाय आहे. अश्वस्थाम्याची भळभळती जखम घेऊन हा आधुनिक अश्वस्थामा तेल मागत फिरतोय. 

रबऱ्याच्या शेतीची अती झाल्यामुळे, निसर्गावर विपरीत परिणाम होताहेत. इतर झाडांची कत्तल करून हजारो एकरवर फक्त रबराची झाडं उभी राहिलीयेत. त्यामुळे जैवविविधता आणि पर्यायाने वर्षावनं नष्ट होताहेत. रबराच्या कारखान्यांमुळे हवा आणि पाण्याचं प्रदूषण होतंय.

या तोट्यातल्या व्यवसायाला आधार देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला. १३० रुपये प्रतिकिलो भावाने, सरकार हा चीक विकत घेऊ लागलं. या रबरापासून उशा बनवून त्या, थायलंडला भेट देणाऱ्या प्रवाश्यांना, कमी किमतीत किंवा फुकट देता येतील अशी कल्पना मांडली. ‘उषा’ च्या आशेने थायलंडला गेलेल्यांनी किती उशा भारतात आणल्या आहेत ही आकडेवारी मला अजून मिळाली नाहीये.  

सूर्याचा रबरी चेंडू पश्चिमेकडे ताणला गेलाय. मलाही रात्रीच्या मुक्कामासाठी ‘उशा’ शोधायला हव्यात असा विचार करत जवळपास कुठलं गाव दिसतंय का ते शोधू लागलो.   

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “लवचिक थाई शेती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

खाईके पान बर्मा वालाखाईके पान बर्मा वाला

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमारच्या खेड्यापाड्यातून मी फिरत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला लुंगीवाले लोक फिरताना दिसत होते. गैरसमज

पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारकपी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बाजारात पीएच बॅलन्सर म्हणजे सामू सुधारक उत्पादनांची भरमार दिसते. पण हे सामू सुधारक म्हणजे

अजब नियमांच्या गजब देशात !अजब नियमांच्या गजब देशात !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझ्या पुणे ते सिंगापूर या मोटारसायकलवरील मोहिमेच्या शेवटच्या देशात मी पोहोचलोय. सहा देशातील