drsatilalpatil Agrowon Article ड्रॅगनच्या विळख्यातला – टोनले साप

ड्रॅगनच्या विळख्यातला – टोनले साप

ड्रॅगनच्या विळख्यातला – टोनले साप post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 16 October , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

भारताशी सांस्कृतिक भावकी असणाऱ्या देशात बाईकने फिरतोय. थायलंड आणि व्हिएतनाम अश्या दोन दमदार अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये गरीब कंबोडियाचं सॅन्डविच झालंय. पण निसर्गाने या देशाला भरभरुन दिलंय. अमेरिकेबरोबरच्या युद्धात मानवाने या सौंदर्याला ओरबाडायचा प्रयत्न केला खरा. ती जखम जवळजवळ भरून निघालीय. पुढे चालत राहणं हे निसर्गाकडून शिकावं. इथला निसर्ग परत सावरलाय. इथला असाच एक महत्वाचा निसर्गाविष्कार आहे ‘टोनले-साप’. गोंधळु नका. हा काही फणाधारी साप नाहीये.  ‘टोनले-साप’ हे कंबोडियातील एक प्रसिद्ध तळं आहे. पण हे काही साधंसुधं तळं नाहीये. हे एक खास तळं आहे. ‘टोनले-साप’ म्हणजे निसर्गाचा अविष्कार आणि कंबोडियाची जीवनरेखा आहे. बरीच तरंगणारी गावं तळ्याच्या काठावर वसलीयेत.

‘टोनले-साप’ चा अर्थ, ‘ताजी नदी’ किंवा दुसऱ्या अर्थाने ‘महान तळं’ असा होतो. हा लहानसहान तळं नाहीये. या तळ्याचं पाणलोट क्षेत्र आहे तब्ब्ल ८०,००० वर्ग किलोमीटर. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास अख्या कंबोडियाच्या जमिनीच्या ४४ टक्के जमीन तोनले-साप च्या पाणलोटात येतो. यावरून त्याच्या अवाढव्य आकाराची कल्पना येते. या तळ्याची खोली कोरड्या हंगामात एक मीटर तर ओल्या हंगामात दहा मीटर एवढी असते.

 कोरड्या हंगामात त्याचा आकार २५०० ते ३००० किलोमीटर असतो. पण पावसाळ्यात मात्र रक्त पिऊन टम्म फुगलेल्या जळूगत ते फुगतं. आजूबाजूच्या जंगलातून आलेल्या पावसाने त्याचा फुगवटा वाढतो. पावसाळ्यात चक्क चारपाच पटीने फुगून टोनले चा हा साप १०००० ते १६००० वर्ग किलोमीटर येवढा मोठा होतो.  

टोनले-साप नदी, या तळ्याला कंबोडियाची जीवदायिनी ‘मेकॉंक’ नदीशी जोडते. टोनले-साप नदीने आणलेलं तळ्याचं पाणी मेकॉंक नदी दक्षिण चीनी समुद्रात नेऊन सोडते.

या तळ्याला कंबोडियाचं धडधडणारं हृदय असं म्हणतात. या तळातल्या पाण्याची पातळी सतत कमीजास्त होत असते. म्हणजे उन्ह्याळ्यात टोनले-साप नदी तळ्यातील पाणी मेकॉंक नदीत वाहून नेते. त्यामुळे तळ्याच्या पाण्याचा विस्तार दोनअडीच हजार किलोमीटर एवढा आकसतो. पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते.  तिथं झाडी वाढते. इथं पाऊण भरपूर होतो. डोंगरदऱ्यात कोसळलेला पाऊस, लाखो लिटर पाणी मेकॉंक नदीत आणून सोडतो. त्यामुळे मेकॉंकनदीला पूर येतो. टोनले-साप तळं मेकॉंक नदीशी टोन्ले-साप नावाच्या नदीने जोडले गेलंय. मेकॉंक नदीच्या पुरामुळे टोनले साप नदीच्या पाण्यावर दाब तयार होतो आणि मेकॉंकचं पाणी उलटं टोन्ले-साप नदीमधून टोनले-साप तळ्यात येतं. त्यामुळे तळ्याचा आकार पाचपटीने फुगून दहा ते सोळा हजार वर्ग किलोमीटर एवढा होतो. इतके दिवस दर्शन देणारी, उन्हात तापलेली जमीनआणि झाडी काही महिन्यासाठी पाण्याखाली जाते. तळ्याची ही अंकुचन प्रसरण प्रक्रिया हृदयाच्या धडधडी सारखी दरवर्षी सुरु असते. गेली हजारो वर्षे कंबोडियाचं हे निळं हृदय अविरत धडधडतंय.   

ह्या तळ्याच्या आश्रयाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहे. हेथील जैवविविधता अद्वितीय आहे. पाण्याच्या फुगवट्यात तयार झालेल्या जंगलात २२५ प्रकारच्या वनस्पती आढळतात. ४६ प्रकारचे सस्तन प्राणी, २२५ प्रकारचे पक्षी, ४२ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि २९६ प्रकारचे वेगवेगळे मासे इथं सापडतात. या तळ्याच्या लाभक्षेत्रात १२ लोक लोकं राहतात. म्हणजे, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३२ टक्के लोकं तळ्याच्या आश्रयाला आहेत. तळ्याच्या काठावर वसलेली हजारो गावं आणि तेथील लोकांची दिनचर्या तळ्याशी एकरूप झालीये. टोन्ले-साप नदी आणि मेकॉंक नदी जिथं मिळतात त्या संगमावर नववर्षाच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. कंबोडियन जलोत्सवानिमित्तांने लाखो लोकांची तळ्यावर झुंबड उडते. या उत्सवासाठी जवळपास दहा लाख लोकं इथं जमा होतात.

जगातली संपन्न मासेमारीव्यवसाय इथं आहे. ७० टक्के कंबोडियन लोकांची प्रोटीनची गरज माश्याने भागवली जाते. म्हणून कंबोडियन लोकं आणि मासे यांचं गहिरं नातं आहे. कदाचित त्यामुळे कंबोडियन चलन ‘रियाल’ हे नाव इथल्या माश्याच्या नावावरून घेतलं गेलाय. मेकॉंक नदीचा चा हा पट्टा जगातला सर्वात जास्त मत्स्य उत्पादक पट्ट्यापैकी आहे. दरवर्षी २० लाख टन मासेमारी इथून होते. ऍमेझॉन, कॉंगो, यांगत्से आणि मिसिसिपी पेक्षाही जास्त मासे इथं पकडले जातात. पाण्याचा असामान्य चढउतारामुळे इथलं माश्यांचं उत्पादन जास्त आहे असं म्हणतात. मेकॉंक नदीतून उलट्या दाबाने येणारं पाणी, माश्यांसाठी वरदान ठरत. हे स्थलांतरित पाणी आपल्याबरोबर अन्नद्रवे घेऊन येतं, जे माश्यांचा उत्पन्न वाढवतं.

पूर्वीसारखे मासे आताशा मिळत नाहीत, इथल्या माश्यांची संख्या कमी होतोय अशी इथल्या लोकांची तक्रार आहे. जंगलतोड, लोकसंख्यावाढ, प्रदूषण, नदीकाठचे औद्योगिक प्रकल्प यामुळे माश्यांची संख्या घटलीय. मासे पकडायला  भलंमोठं औद्योगिक जाळं लावतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे पकडले जातात. माश्यांच्या कमी उत्पादनामुळे, पूर्वी जे लहान मासे सोडून द्यायचे, ते देखील पकडले जाताहेत. त्यामुळे तळ्यात म्हणावं तेवढं माशांचं बीज उरत नाही. म्हणून माश्यांची पैदास कमी होते. अश्या दुष्टचक्रात ‘टोनले-साप’ अडकलंय. 

कंबोडियाच्या या प्रोटीनच्या स्रोताला सध्या चिनी ग्रहण लागलंय.  मेकॉंक नदी ही जगातली १२ वी सर्वात मोठी नदी आहे. तिला आग्नेय आशियातील ‘ऍमेझॉन’ असंही म्हणतात. तिबेटच्या पठारावर उगम होऊन ही नदी चीन, ब्रह्मदेश, लाओस, थायलंड, कम्बोडिया आणि व्हिएतनाम मधून वाहत जाते. या देशांना मासे, शेतीसाठी आणि प्यायला पाणी पुरवत ती दक्षिण चीन समुद्रात स्वतःला झोकून देते. या सर्व देशांची अर्थव्यवस्था मेकॉंक नदीवर अवलंबून आहे. १९९० नंतर चीनने मेकॉंक नदीचं पाणी अडवायचा शातीर प्लॅन बनवला. त्यांनी डझनावारी, मोठाली धरणं या नदीवर बांधली. वर्षातून काही वेळा चीन, धरणाचा विसर्ग मुद्दाम कमी करतो आणि जास्त पाणी अडवतो. त्यामुळे थायलंड, कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम मध्ये दुष्काळ पडला. मेकॉंक नदीची पाण्याची पातळी लाक्षणियनरीत्या कमी झाली. शेती, मासेमारी व्यवसायाला याची मोठी झळ बसली.

मग आशियान संघटनेच्या माध्यमातून चीनवर दबाव आणायचा प्रयत्न केला गेला. पण दबावात येईल तो चीन कसला. याउलट शातीर चीनने या देशांना वेगळा प्लॅन सांगितलं. ‘जशी आम्ही धारण बांधली, तशीच धरणं तुमच्या देशात बांधा, म्हणजे तुमचा पाण्याचा साठा तुम्ही वर्षभर धरून ठेऊ शकाल’. यासाठी पैसे कुठून येतील? हा प्रश्न विचारल्यावर, ‘आम्ही आहोत ना’, असं म्हणत, चीन या प्रकल्पासाठी कर्ज देईल असा प्रस्ताव मांडला  गेला. या प्रस्तावानुसार चीनने या देशांमध्ये, मेकॉंक नदीवर २२७ धरणं बांधायचा घाट घातला. तब्ब्ल चौदा लाख कोटी रुपये खर्चून हा महाकाय धरण प्रकल्प चीन राबवतोय. ही धरणं चीनच्या बांधकाम कंपन्या, चिनी कामगार वापरून बांधणार. म्हणजे चिनी पैसा वापरून, चिनी बांधकाम कंपन्या, चिनी कामगारांमार्फत धरण बांधणार. म्हणजे चीनने दिलेला हा कर्जाऊ पैसा, बांधकाम कंपन्या आणि कामगारांमार्फत चीनमध्ये परत येणार. या कर्जावरचं व्याज मात्र धरणाची गरज नसणारे इतर देश भरणार आणि चीनच्या कर्जाच्या विळख्यात हे देश अडकणार. आपला एक शेजारी अश्याच चिनी कर्जाच्या विळख्यात अडकूनसुद्धा, हिरव्या मस्तीत वावरतोय.

चीनने धरणांचा नळ बंद करून मेकॉंक नदीच्या पाण्यावर मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे टोनले-साप तळ्यातील पाण्याची पातळी कमी होतेय. इथल्या माश्यांची पैदास खालावलीय, इथली जैवविविधता धोक्यात आलीय. चिनी ड्रॅगनच्या विषारी विळख्यात टोनले चा हा साप अडकलाय.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “ड्रॅगनच्या विळख्यातला – टोनले साप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

राखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्सराखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्स

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 02 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ कंबोडियाची अमेरिकेबरोबरच्या युद्धात झालेली फरफट आणि त्यानंतर त्यांचा भूमिपुत्र ‘पोल पॉट’ ने दिलेला

थायलंडचे साखर सम्राटथायलंडचे साखर सम्राट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थाकसिन विद्यापीठातील चर्चा आता रंगलीय. अजून एक गरमागरम ‘ग्रीन टी’ चा कप

थाई रामाची अयोध्या आणि तरंगणारी भातशेती !थाई रामाची अयोध्या आणि तरंगणारी भातशेती !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 03 July, 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ सकाळची कोवळी हवा अंगावर मोरपीस फिरवतेय. सर्व गाड्या एका लयीत चालताहेत. बॅंकॉक अब